एकाकीपणा आणि त्यावरचे उपाय

Submitted by नरेंद्र गोळे on 1 December, 2010 - 05:54

एकाकीपणामुळे हृदयविकार उद्भवू शकतो असे सिद्ध झालेले आहे. मनुष्य समाजशील प्राणी आहे. एकटे पडण्यामुळे मनाच्या काही गरजा भागत नाहीत. साखरेपासून कोलेस्टेरॉल तयार करण्याच्या शारीरिक गतीस अशा परिस्थितीत वेग लाभतो. आणि मग सर्व शरीर सुदृढ आणि निरोगी असूनही हृदयधमन्यांमध्ये किटण साठू लागते. त्या अवरुद्ध होतात. हृदयविकार होतो. असल्यास बळावतो. म्हणूनच हृदयविकार झालेल्यांना समाजात मिळून-मिसळून राहण्याचा सल्ला दिला जातो. इतरांशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने फायदाही होतो. ह्याकरिताच एकाकीपणा उद्भवतो कसा? त्याचा सामना कसा करावा? हृदयविकाराचा प्रतिबंध करण्यासाठी, एकाकीपणा टळावा म्हणून जीवनशैलीत काय परिवर्तन करावे? ह्या प्रश्नांचा उहापोह इथे करण्याचे योजिले आहे.

हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात माणसेच मुळात कमी असतात. दार बंद संस्कृतीमुळे शेजाऱ्यांशी संवाद मर्यादितच असतो. त्यात घरातील प्रत्येक व्यक्ती इतकी व्यस्त असते की एकमेकांशीही बोलायला फुरसत असू नये. घरात माणसे एकतर झोपलेली असतात किंवा घराबाहेरच जास्त वेळ असतात. जागेपणी घरातील दोन-चार व्यक्ती घरात असण्याचा काळ, तीन-चार तासांचाच काय तो असतो. ह्या 'काळास' ते एकतर प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विश्रांती घेण्याचा काळ मानतात किंवा सामुहिकरीत्या दूरदर्शन बघण्याचा काळ मानतात. व्यक्तीव्यक्तींमध्ये अर्थपूर्ण संवाद होतच नाही.

ह्यामुळे, व्यक्तींचे न सुटणारे प्रश्न, साखळलेली निराशा, कामाचे जागी कधीही उद्भवू शकणारे वैमनस्य, अनपेक्षित रीतीने वेळाचा, कष्टाचा, पैशाचा झालेला ऱ्हास इत्यादी समस्यांना श्रोता सापडत नाही. दिलासा मिळणे तर दूरच राहते. अशा परिस्थितीत शरीरभर चैतन्य मंद होते. मनाचे अस्वास्थ्य शरीरात अवतरू लागते.

वाढत्या वयात माणूस कार्यशक्तीच्या बहरातून प्रथम चढत असतो व पन्नाशीनंतर उतरत असतो. उत्तरोत्तर उत्कर्ष साधत तो स्वत:ची एकमेवाद्वितीय जागा बनवत जातो. एकटा पडत जातो. त्याची कामे करण्यास केवळ तोच सक्षम राहतो. इतरांची मदत त्याला होईतनाशी होते. आपले पद अबाधित राहावे म्हणून कधीकधी तो स्वत:च इतरांना सुगावा लागू देत नाही. व्यावसायिक गुप्ततेच्या भिंती बांधत जातो. त्यामुळे कुठेही काहीही बोलू शकण्याचे, वागू शकण्याचे त्याचे स्वातंत्र्य उत्तरोत्तर घटत जाते. मन कैदेत पडल्याचा अनुभव घेते. आणि शरीर परिणाम भोगू लागते.

घरात आणि बाहेरही आपण क्षणोक्षणी असंख्य लोकांना भेटत असतो. मात्र मनातली किल्मिषे दूर करण्यासाठी त्यांच्याशी अनेकानेक कारणांनी संवाद साधता येत नाही. कधी ते लोक आपल्या बौद्धिक क्षमतेचे नाहीत असे आपल्याला वाटत असते. कधी पुरेसा वेळच हाताशी नसतो. कधी समोरच्याला तुमची रामकहाणी ऐकण्यात मुळीच स्वारस्य नसते. कधी परिस्थिती सोयीस्कर नसते. अगदी ओठांवर आलेली गोष्ट बोलण्याच्या वेळेसच काही दुसरी महत्त्वाची घटना बोलणेच खुंटवते.

नुकत्याच झालेल्या दसऱ्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी ५० वर्षांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तित करून बुद्ध धर्मात प्रवेश केला त्या घटनेचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. ते बुद्ध धर्माकडे आकर्षित झाले त्यामागील अनेक कारणांची चर्चा ह्यानिमित्ताने सर्वत्र झाली. मात्र त्याही आधीपासून मला बुद्ध धर्माच्या तीन वचनांची मोहिनी पडलेली आहे. संघशक्तीचे निस्संदिग्ध वर्चस्व त्यांमध्ये विषद केलेले आहे. ते प्रार्थनेचे शब्द आहेत:

बुद्धं शरणं गच्छामि । म्हणजे बुद्धिवंतास मी शरण जातो,
धम्मं शरणं गच्छामि । म्हणजे धर्मास मी शरण जातो,
संघं शरणं गच्छामि ॥ संघास मी शरण जातो.
(धर्म = अर्धमागधी भाषेत धम्म, बुद्धवचने संस्कृत/अर्धमागधीत लिहिलेली दिसून येतात.)

क्रम महत्त्वाचा आहे. संघशरणता सर्वोच्च महत्त्वाची मानलेली आहे. माझे मानणे असे आहे की साऱ्या अवनतीकारक रोगांचे मूळ मनोविघटनाद्वारे शारीरिक दुर्बलतेत घडून व्यक्तीस ऱ्हासाप्रत नेत असल्याचे ज्ञान ह्या वचनांमागच्या भूमिकेमधून स्पष्टपणे दिसून येते.

बुद्धीला पटेल तसे आपण वागतो. ही बुद्धीशरणता होय. स्वार्थासाठी दुसऱ्याची फसवणूक करून सौख्य साधणे बुद्धीला पटू शकते. मात्र ते धर्माला पटणार नाही. नैतिकतेला पटणार नाही. तसे वागणे धर्मशरणता ठरणार नाही. शत्रू बलवान असला तर लढाईत विजय मिळणार नाही. तरीही अशी लढाई बुद्धीला पटणारी असू शकते. धर्म्य असू शकते. मात्र ती संघशक्तीला पटणारी नाही. संघाच्या दृष्टीने तो निव्वळ ऱ्हास ठरेल. म्हणून असेच वागावे जे बुद्धीला पटेल, धर्म्य असेल आणि संघास हिताचे ठरेल. त्याकरीता अनुक्रमे बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि म्हणायचे आहे. तिन्हीही आवश्यक.

मात्र गौतम बुद्धास ह्यापरता, तसे न वागल्यास, व्यक्तीलाही मानसिक व शारीरिकदृष्ट्या गंभीर परिणाम भोगावे लागत असणार ह्याचे ज्ञान असले पाहिजे. माणूस समाजशील असल्याकारणाने. ते ज्ञान, जे आज मनोकायिक अभ्यासांनी सिद्ध केलेले आहे. तेव्हा संघशरणता हा एकाकीपणावर उत्तम उपाय आहे. मात्र हे साधावे कसे?

भाषेचा वापर वर्णन करण्यासाठी, साद/प्रतिसाद देण्यासाठी, टिप्पणी करण्यासाठी केल्या जातो. आपल्या बोलण्यात आपण वस्तुनिष्ठ वर्णनशैली विकसित करावी. टिप्पणी/भाष्य करणे टाळण्याचे धोरण ठेवावे. असे केल्यास एकवाक्यता साधते. सहमती होऊ शकते.

कुणीही कधीही आपली मदत मागत असेल, न मागताही आपल्याला शक्य असेल तर प्रसंगी पदरमोड करूनही करावी. मानवी मनाला कृतज्ञता शिकविण्याची गरज नसते. अवघड प्रसंगी केलेल्या मदतीची जाण दुष्ट लोकही ठेवतात. म्हणून कुणि मदत मागत असणे ही आपल्या एकाकीपणावर मात करण्याची संधी मानावी. अर्थातच आपापल्या कार्यशक्तीच्या मर्यादेत राहून.

आपण समाजशील आहोत ह्याचे सदैव भान ठेवावे‌. सर्वांसोबत राहिल्यानेच आपली उन्नती वेगाने घडून येऊ शकते. आपले विशेषाधिकार समाजपुरूषाच्या पायी समर्पित केल्यास आपली भौतिक आणि मानसिक उन्नती घडून येते. कम्युनिस्टांनी 'कम्युन्स'चा महिमा गायिला. गीतेनी 'सांख्य'योग शिकविला. सर्वच धर्मांनी समुदायाचे भान ठेवले. दखल घेतली. मात्र भांडवलशाही समाजात पैशाला अवास्तव महत्त्व प्राप्त झाल्याने माणसाची, माणुसकीची किंमत अकारणच घटली. पैशावरचा विश्वास माणसामाणसातील विश्वासापेक्षा मोलाचा ठरला.

एकाकीपणा सामान्यत: खालील कारणांनी उद्भवू शकतो. आणि त्याचा सामना त्यासोबतच सुचविलेल्या उपायांनी होऊ शकतो.

१. खराखुरा एकाकीपणा. आपल्यासारखेच इतरही लोक मैत्रीच्या शोधात असतातच. तेव्हा 'बर्डस् ऑफ सेम फिदर' शोधत असावे.

२. सभोवती असंख्य नातेवाईक, मित्र, ओळखीचे, आसपासचे, कार्यालयीन असे लोक सदैवच साथ असूनही त्यांच्याशी संवाद साधता न आल्याने येणारा एकाकीपणा. अशा बाबतीत संवादास कारणे हुडकून काढण्याची, संवाद करण्याची, विसंवाद टाळण्याची आत्यंतिक गरज असते. सोबतच्या लोकांच्या मदतीने आणि जाणीवपूर्वक संवाद साधावा.

३. आपल्या पदाच्या एकमेवाद्वितीयत्वामुळे उद्भवणारा एकाकीपणा. आपण जीवनाच्या केवळ एखाददुसऱ्या पैलूबाबत एकमेवाद्वितीय असतो, हे लक्षात घ्या. इतर अनेक बाबतीत आपले इतरांशी असलेले सांख्य (साधर्म्य, समानता, सारखेपणा) शोधा. त्यांच्या अनुभूतीत रस घ्या. त्या त्या बाबतीत तेही तुमच्यात रस घेतील, आणि संवाद साधेल, वाढेल.

४. जवळच्यांनी दूरत्व पत्करल्याने येणारा एकाकीपणा. ही सर्वसामान्यपणे एकतर्फी प्रेमाची कहाणी असते. तेव्हा समोरच्याने काय करावे हे तुमच्या हातात उरलेलेच नसते. म्हणून 'मिले न फुल तो काटों से दोस्ती कर ले' हेच धोरण पत्करावे. आपल्याला आपला एकाकीपणा घालवायचा आहे. त्यांना त्याच्याशी काय कर्तव्य?

५. पराकोटीच्या वैमनस्यात सदासर्वदा रममाण होण्यामुळे येणारा एकाकीपणा. लोक तुमच्या वैमनस्यापायी हैराण होतात. त्यांना तुमच्या कर्मकहाण्यांमध्ये मुळीच रस राहत नाही. अशावेळी त्या आपल्यासाठी ऐतिहासिक महत्त्वाच्या असलेल्या वैमनस्यावर वर्तमानाचा दाट पडदा टाकून, निरामय भविष्याची वाट धरावी हेच श्रेयस्कर ठरते.

६. स्वावलंबनाच्या अतिरेकी कल्पनांमुळे उद्भवणारा एकाकीपणा. मी कुणावर अवलंबून नाही. माझे कुणावाचून काही अडणार नाही. ह्या व्यर्थ कल्पना असतात. 'पराधिन आहे जगती, पुत्र मानवाचा' हेच काय ते निखळ सत्य असते. परावलंबित्वाचा एवढा बाऊ करू नये. किंबहुना काहिसे परावलंबित्व हेतुत:च पत्करावे. म्हणजे त्यायोगे आपोआप मित्र मिळतात.

मी जनात फिरलो तेव्हा, असंख्य मित्रही केले |
जंगलात फिरलो तेव्हा, निर्झरही बोलत होते ||
मी मनात फिरलो तेव्हा, स्मृतींची साथही होती |
मी कशात मन रमवावे, मज भ्रांत मुळी ही नव्हती ||

वरीलप्रमाणे विचार असतील तर सदरहू कविवर्यांस एकाकीपण सतावणारच नाही. स्मृतींची साथ ही माणसाला एकाकीपण कधीच जाणवू देत नाही. भरपूर पाठांतर असावं. असंख्य कविता, गाणी, वेचे मुखोद्गद् असावेत. म्हणजे अगदी अंधारकोठडीतही मनुष्य सुखेनैव कालक्रमणा करू शकतो. माणसाला कल्पनादारिद्र्य नसावे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरूंगातही 'सागरा प्राण तळमळला' लिहून एकाकीपणा घालवला. कालिदासाच्या शापित यक्षानी 'मेघदूता'स भारतवर्षाची रमणीय सफर घडवित अलकानगरीत मनोमन पोहोचविले. कल्पनाविलास माणसाला मुळीही एकाकीपण जाणवू देत नाही. म्हणून कल्पनाचित्रण करावे. तशी सवयच जडवून घ्यावी.

ह्या आणि तुम्हाला सुचतील त्या सर्व उपायांनी एकाकीपणाचा सामना करावा. लोक आपले शत्रू नाहीत. एकाकीपणा आपला शत्रू आहे. हे मनोमन मानावे. म्हणजे खचितच एकाकीपणापासून सुटका होईल ह्यात काय संशय?

-------------------------------------------------------

हा लेख माझ्या http://nvgole.blogspot.com/ या अनुदिनीवर पूर्वप्रकाशित आहे.

--------------------------------------------------------

रच्याकने: प्रकाशित न करता, अंतिम संस्करणार्थ लिहून ठेवण्याची सोय हल्ली दिसत नाही. का बरे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख खूप आवडला.
लेख लिहीतांना अप्रकाशित अवस्थेत ठेवण्याची सोय फक्त गुलमोहर आणि रंगीबेरंगी विभागासाठी आहे. हितगुज विभागात धागे काढतांना तो पर्याय उपलब्ध नाही.

नरेंद्रजी, खरंच महत्वाचा मुद्दा मांडलाय तुम्ही.
छंद जोपासणं हा एक उपाय मला सुचवासा वाटतो. तो जोपासण्यासाठी तुम्हाला कुणाचीतरी मदत
घ्यावी लागते, त्यात थोडी गुणवत्तेची पातळी गाठल्यावर जवळच्या लोकाना ती प्रगति दाखवता येते
व अशा तर्‍हेने हळुहळू समान आवडीचा तुमचा असा एक समुदाय होतो . अशा समुदायात सहज रमून जाता येतं.

ह्म्म्म छान लिहिले आहे. पुन्हा एकदा निवांत वाचावे लागेल.
माणसाबद्द्ल म्हणलेच आहे "न एकाकी रमते"
पण आजकाल इन्टरनेट (विशेष करून माबो) मुळे एकाकीपणा घालवता येऊ शकतो Happy

महेशला अनुमोदन. माबो हा एकाकीपणावर उत्तम उपाय आहे. इथे कधीही न भेटलेल्या आयडी पण खर्‍याखुर्‍या व्यक्तींच्या आहेत, असा विश्वास वाटतो.

रूनी, धन्यवाद. मला हे माहीतच नव्हतं.

अनिल, भाऊ, महेश, तोषवी, विनय, पूर्वा, सीमा, आकाशकंदील, डेलिया आणि दिनेशदा
आपण सगळ्यांनी हा लेख वाचलात आणि प्रतिसाद दिलात ह्याखातर सगळ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याला तो आवडला म्हणजे इथे लिहीण्याचे सार्थक झाले.

एरव्ही इतक्या रुक्ष आणि दुर्लक्षित विषयावरल्या लेखाकडे सर्वसामान्यपणे लक्ष वेधले जाणेच अवघड!!

फार सुंदर लेख नरेंद्र.......

वैद्यकीय विश्लेषणाखेरिज अनेक पैलू एकाकीपणाला आहेत हे फार छान विषद केलेय आपण.

मला '' कास्ट अवे'' हा चित्रपट आठवला. इथे एकाकीपण घालवण्यासाठी नायक एका लाकडाच्या गोल तुकड्यास सजीव समजून गप्पा मारतो,हसतो,रडतो.... आणि हरवलेले ते लाकूड गवसल्यावर्,एखादा सजीव पुन्हा भेटल्यागत हरखून जातो......

फार आवडला तुमचा हा लेख. Happy