गिरिकुहरांमधील भैरव-ढाक बहिरी

Submitted by चिन्मय कीर्तने on 1 December, 2010 - 10:12

राजमाचीहून पाहिले असता मांजरसुबा डोंगरपलीकडे जो डॊंगर आपल्या कातळभिंतींच्या भुजा थोपटत उभा असतो तोच प्रसिद्ध "ढाक बहिरी".आपणा डोंगरभटक्यांना या वनदेवाची ओळख करुन दिली ती दुर्गमहर्षी गो.नी.दांडेकरांनी.या भैरवाचे दर्शन अंतरिची ओढ असल्याखेरीज मिळणारच नाही.अश्या या ढाकदुर्गाच्या पोटातील गुहेमधे अनादी काळापासुन या दुर्ग(म)देवतच वास्त्व्य आहे.ढाकदुर्ग आणि काळकराय सुळका यामधील चिंचोळी खिंड,उभ्या कड्याच्या छातीवरुन पाय ठेवायला अवघी काही बोटं असलेला आडवा ट्रेवर्स,खाली हिडिंबेप्रमाणे आ वासुन आपला घास घेण्यास सिद्ध असलेली दरी,सर्वात शेवटी लाकडी मोळी आणि दोरखंड याना लटकून पार करावा लागणारा कातळटप्पा हे सर्व नेट वर पाहुन ऐकून होतो पण जायचा काही योग येत नव्हता.परिक्षेनंतरच्या शनिवारी कोठे जायचे हा प्रश्न "ट्रेकमेट्स" च्या फेसबूक पोस्ट ने सोडवला-मिशन ढाक!! ज्याची मी गेली कित्येक वर्षे वाट पाहत होतो. नुसता मी ढाकला येत्या वीकएंडला जाणार या विचारानेच शरिरामधील adrenaline चा फ्लो मला जाणवू लागला!! :)अनेकांना विचारले तर त्यांनी केवळ फोटोज बघुनच नको रे बाबा म्हणून झिडकारल!! तेव्हाच कळल की या ट्रेकवर "एकला चालो रे" होणार,पण ट्रेकमेट्ससारखा ग्रूप आणि ढाकसारखा गड हे combination मी हुकवण शक्यच नव्हत.....
शुक्रवारी माझ्या अभियांत्रिकीच्या सातव्या सत्राचा शेवटचा पेपर एकदा आणि एकदाचा(!) संपवून, शनिवारी शस्त्रसज्ज(!)होवून दख्खनच्या राणीने लोणावळ्याला मार्गस्थ झालो.मन मात्र त्याच्या कितीतरी आधीच ढाकच्या वाटेला लागल होत.लोणावळ्याला उतरलो नाही तोच स्वागताला दुसर्‍या डब्यातून ट्रेकमेट्स हजर! कित्येक नव्या आणि काही जुन्या चेहर्‍यांबरोबर लोणावळा लोकलने कामशेतला उतरलो.कामशेत ते जांभिवली हा मार्ग जवळजवळ अर्धा-पाउण तासांचा आहे.आधीच जीप्स मागवल्या होत्या.त्यामधे असा काही मैफिलीला रंग चढला की बस.... "खेळताना रंग-बाई होळीचा..." पासुन "कही दूर जब दिन ढल जाये..." पर्यंत गाणी गाऊन(?) आम्ही आपआपले घसे साफ केले! तोच गाडीला जोरदार धक्का बसला... कळल की रानडुक्करान धडक मारली(!) म्हटल चला की ट्रेकची सुरुवातच अशी असेल तर शेवट टेरिफिकच असणार...जांभिवली गावात पोहोचलो. तेथे पुण्याहुन आलेले ट्रेकमेट्स भेटले.पटकन तहान लाडू-भूक लाडू उरकल्यावर introduction चालू झाल्या...(ट्रेकंमेट्स चा introduction राऊंड(की रॅगिंग ??) हे काय प्रकरण आहे त्यासाठी तुम्हालाच त्यांच्याबरोबर जाव लागेल.) त्यानंतर आम्ही आपआपल्या विजेर्‍या सरसावुन अंधार कापीत गडाकडे मार्ग आक्रमू लागलो.वाटेत कोंडेश्वराच अप्रतिम मंदीर पाहुन मन प्रसन्न झाल.
आमचा मुक्काम पहाटेपर्यंत ढाक आणि काळकराय़ सुळका यामधील खिंडीआधी जे जंगल आहे तेथे असणार होता.वाट काही ही अजिबात दमवणारी नव्हे.छोटे-छोटे चढ-उतार,सपाटी यांना कवेत घेउन ही वाट ढाककडे सरकते.लोणावळा-भीमाशंकर या प्रसिद्ध ट्रेकचा मार्ग सुद्धा येथुनच पुढे सरकतो.षष्ठीच्या उगवत्या चंद्राच पूर्वेच्या रंगमंचावर झालेलं आगमन खुप लोभसवाण होत. म्हटल तर या अशा "शारद सुंदर चंदेरी राती.." चालण मनाला खूप आल्हाददायक वाटत होत.चोहोबाजूना सह्यशिखर ध्यानस्थ बसलेली होती.त्यांच्या अंगाखांद्यावरुन चांदण जणू ओसंडून वाहत होत. डाव्या हाताला असलेल्या दरीतून खालच सह्याद्रीच्या मांडीवर झोपी गेलेल कोकण दिसत होत.कर्जत परिसरातला दिसत असलेला दिव्यांचा प्रकाश पाहून "नवलाख तळपती दिप वीजेचे येथ,उतरली तारकादळे जणु नगरात..." ह्या कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रत्यय आला. सोबतीला रातकिड्यांच पार्श्वसंगीत होत.एकूणच अस काही धुंद वातावरण होत की काही "हालो नये,बोलो नये" फक्त हे निसर्गाच गूढरम्य पण तितकच असीम सौंदर्य फक्त नि:शब्द अवस्थेत अनुभवाव... तर अशाप्रकारे निसर्गाशी गुजगोष्टी करत आम्ही एकदाचे खिंडीआधीच्या जंगलातील मोकळवणात पोहोचलो.पहाटेनंतर कातळटप्प्यांना(rock patch) हात घालणार असल्याने आम्ही निद्रादेवीला शरण जायचे ठरवले.... पहाटेच्या झोंबणार्‍या वार्‍याने मात्र माझी अवस्था बिकट झाली.चांगली शाल अंगावर असुनही खुप कुडकुडु लागलो. शेवटी काही उत्साही ट्रेकमेट्सनी पेटवलेल्या शेकोटीमुळे जरा माणसात आलो Lol
सुमारे सात वाजता सर्वांची निद्रादेवीची आराधना पुर्ण(!) झाल्यावर ट्रेकच्या सर्वात रोमांचक अशा पर्वाला सुरुवात झाली.आमच्या रात्रीच्या मुक्कामाच्या जागेपासुन खिंड फक्त १५ मिनिटांवर आहे.येथेच कर्जत-सांडशी मार्गे येणारा रस्ता आमच्या जांभिवली-ढाक बहिरी वाटेला येउन मिळतो.आता आम्ही खिंडीच्या ऐन माथ्यावर उभे होतो.दोन्ही बाजूना उंच डोंगर आणि त्यामधुन ही चिंचोळी पट्टी खाली उतरत गेली आहे.हिला खिंडीपेक्षा नाळ म्हणणेच जास्त बरोबर.सकाळची प्रसन्न वेळ होती पण खिंडीच्या मुखाशी वारा आपले तांडव दाखवत होता.तेवढ्यातही मला engineeringच्या fluid dynamics च्या तत्वाची आठवण झाली(एरिया कमी झाला की फ़्लो स्पीड वाढतो का असेच काहीतरी... p)तर असेच काही वार्‍याप्रमाणेच भरकटल्यागत विचार करत ती खडी आणि अरूंद नाळ आम्ही एक-एक करत उतरलो.खिंड संपल्यावर उजवीकडे चांगली रुंद खडकाळ वाट बहिरी गुहेकडे सरसावते.ह्या वाटेवर काही खोदीव गुहा आहेत त्यामध्ये आम्ही आमच्या पाठपिशव्या ठेवल्या.खिंडीच्या डाव्या हाताला काळकरायचा उत्तुंग सुळका जणु काही गगनावेरी गेला होता,असे वाटत होते की आम्हाला cheer करतोय,की "शाब्बास मावळ्यांनो इथपर्यंत आलात आता जरा धाडस दाखवलत की तुम्हावरी भैरव प्रसन्न होइल!" समोर दिसणार्‍या नजार्‍याचे काय वर्णन करु?? विराट सह्यमंडळाचा पट जणु काही समोर पसरला होता. अगदी समोर राजमाचीचे आवळेजावळे किल्ले,श्रीवर्धन आणि मनरंजन आमचे हे कौतिक मोठया कुतुहलाने निरखत होते.त्यांच्या डाव्या अंगाला "मांजरसुबा" नावाचे डोंगरी मांजर बसले होते.मला मात्र त्या मांजराचा एक कान कोणीतरी पिळल्यासारखा छोटा वाटला!:) अगदी अलीकडे प्रबळ्गडाचे मोठे पठार आणि त्याच्या डावीकडला इरशाळगड,माणिकगड आणि दूर क्षितिजावर कर्नाळ्याचा लिंगोबा एवढा विस्तीर्ण परिसर नजरेत येत होता.आमच्या पायाखाली असणार्‍या दरीमधे कर्जत-सांडशी मार्गे चढत येणार्‍या वाटेवरील गच्च रान नजरेला गारवा देत होत
हा कातळटप्पा आम्हाला ११ वाजायच्या आत चढून उतरायचा होता.अन्यथा भर उन्हात कातळ तप्त झाले की काय हिम्मत होती आमची त्यांवर हात ठेवायची!खिंड उतरल्यावर गुहेमध्ये जाणारा टप्पा हा इंग्रजी c आकारासारखा आहे.आम्ही ती रूंद वाट चालून गेल्यावर ज्याची इतके दिवस वाट पाहत होतो तो ढाकचे आकर्षण असलेला टप्पा सुरु झाला तो म्हणजे पहिला आडवा ट्रेवर्स. खाली ३०० फूट खोल दरीचा जबडा,उजवीकडे कातळ आणि पायाखाली एक पाउल जेमतेम राहील एवढी वाट.या वाटेवर आपला तोल सर्व डोंगराच्या दिशेला ठेवून आडवे एक-एक पाऊल जिंकीत जावे लागते.जरा देखिल गफलत झालीतर सह्याद्री आपली अजिबात दयामाया ठेवणार नाही!!! पण हल्ली काही अगदीच अरुंद जागांवर बोल्ट्स फिक्स केले असल्याने हा टप्पा आरामात पार करता येतो.आम्ही एक-एक करुन पुढे सरकत होतो. हास्याच्या फुलबाज्या उडत होत्याच आणि त्या जोडीला आमचे भयानक फॊटॊशूट सुद्धा चालू होते:) ७०-८० फ़ूट आडवा ट्रेवर्स संपल्यावर खोदलेल्या ओबडधोबड पाय‍र्‍यांचा टप्पा लागतो.ह्यातील बहुतेक पायर्‍या कालौघात उद्वस्त झाल्या आहेत.त्यामुळे दोन पाय-दोन हात यांचा पूर्ण वापर करुनच चढावे लागते.काही अडचणीच्या जागांवर येथेदेखिल लोखंडी रेलिंग टाकल्याने हा टप्पादेखिल एकदम कठिण नाहिये. येथून वरच्या गुहेचे दर्शन होताच मात्र आम्हाला अजुन स्फूरण चढले. भल्या सकाळी सुरुवात केल्याने दुसरे कोणी ग्रूप नव्हता नाहीतर या मार्गावर नेहमी traffic खोळंबून राहते.
त्या खोदीव कातळटप्प्यानंतर पुन्हा एक छोटा अगदी अरुंद ट्रेव्हर्स आहे.पण त्यालादेखिल रेलिंगचा सपोर्ट दिला आहे.तो पार केल्यावर आम्ही ढाकच्या सुप्रसिद्ध अशा उभ्या कातळटप्याच्या पायथ्याशी पोहोचलो.हा पॅच म्हणजे एक प्रकरणच आहे ! Happy सुरुवातीला एका मजबूत बांबूची मोळी फिकस केली आहे.त्याच्या छोटया-छोटया फांद्यांचा आधार घेत वर चढायचे.त्यानंतर आपल्या हाता-पायानी कडा येंगायचा.या सर्व पॅचवर आधारासाठी दोन मजबूत दोरखंड सोडले आहेत.त्या पॅचवर बांबूच्या मोळीवर तसेच दॊराचा आधार घेत आणि खाली असलेल्या दरीला वाकुल्या दाखवत चढताना असलेला थरार शब्दामधे पकडणे अशक्य!! त्याची प्रत्यक्ष अनूभुतीच घ्यावी. तर अशा सर्व मर्कटलीला करत एक्दाचा भैरवाच्या गुहेत पोहोचलो!!इतके दिवस मनात असलेला ढाक सर झाला याचा माझा मलाच विश्वास बसत नव्हता! समोरच भैरवाची धीरगंभीर मूर्ती होती.त्या शिवाच्या रौद्र रुपाकडे पाहून नकळ्त हात जोडले गेले.लीडर्स नवख्या लोकांना रोपचा बिले देवून चढवण्यात मग्न होते.गुहा चांगलीच प्रशस्त आहे.पाण्याची खोदीव टाकी आहेत एवढेच नव्हे तर मुक्काम करायला येणार्‍यांसाठी भांडी सुद्धा आहेत!!:) एकूण सर्व संसार थाटून दिलाय म्हणायचा तापसांना Proud ही भांडी चोरायचा प्रयत्न केला तर हा बहिरी त्या मनुष्याला उतरताना समोरच्या दरीत ढकलून देतो अशी गावकर्‍यांची श्रद्धा आहे!!हा बहिरी अतिशय रागीटही आहे म्हणे! त्याला स्त्रीवर्गाचा वारादेखिल सहन होत नाही असे गावकरी सांगतात त्यामुळे ट्रेकर्स आणि ग्रामस्थ यांमधे नेहमी कुरबुरी होतात असे ऐकिवात आहे! Happy गुहेतून समोरचा नजारा खिंडीतून दिसतो तसाच आहे पण त्याला गुहेच एक सुंदर कोंदण लाभल्याने ते न्याहाळण्यामधे वेगळीच खुमारी आहे.सर्व निर्विघ्नपणे वर आले.सकाळची कोवळी उन्हे आसमंतावर पसरलेली होती. काही मेट्स दर्शन घेत होते,काहींचे फोटोसेशन चालले होते.काही समोरच्या नजार्‍यामधे हरवून गेली होती.
इतर ग्रूप्स येण्याच्या आत गर्दी टाळण्यासाठी आम्ही लगेच उतरायलादेखिल सुरुवात केली.रॉक पॅच चढताना जसा रोमांचित करतो त्यापेक्षा जास्त thrill उतरण्यामधे येते.उतरतानापण लोकांना दोराचा बिले लीडर्स देत होते तसेच प्रत्येक कठीण जागेवर खाच कोठे आहे,ग्रिप किंवा होल्ड कोठे घ्यायचा याचे अचुक आणि न कंटाळता मार्गदर्शन करत होते!!आम्ही उतरणे प्रत्येक पॅचवर एंजॉय करत होतो.काळजीपूर्वक उतरत खिंडीच्या आधी असणार्‍या गुहांकडे आलो.येथे आमच्या बॅग्ज होत्या.आता पोटाला मात्र जाग आली होती.स्वादिष्ट ठेपल्यांचा केव्हा फन्ना उडाला ते कळले सुद्धा नाही!:) मग एका मेळाने खिंड चढून जांभिवलीच्या वाटेला लागलो. रात्री अंधारात आल्याने जातान ही वाट बरोबर पाहता आली.या वाटेवरुन परतताना वेगवेगळ्या कोनांमधून होत जाणारे ढाक-बहिरी आणि काळकराय सुळका यांचे दर्शन फारच मनोहारी आहे! वाटेत एक मस्त ओढा लागल्याने सर्वच र्रिचार्ज झालो.रमतगमत चालताना जांभिवली केव्हा आले तेच समजले नाही! तेथील तांदळाची भाकरी,कांदा आणि भाजीच्या अस्सल गावरान जेवणाने आतापर्यंतच्या कार्यक्रमावर कळस चढवला! Happy दुपारनंतर लोणावळ्याला मार्गस्थ झालो ते भरपूर अविस्मरणीय क्षण घेउनच आणि पुढच्या ढाकभेटीचे संकल्प घोळवत...

काहीच केले नाही फक्त ढाक चढलो! मात्र निसर्गाच्या आणि सह्याद्रीच्या र्रौद्रभीषण सौंदर्याच दर्शन घेउन आणि त्याच्या अंगाखांद्यावर खेळून आपल्या रुधिरान इतिहास घडवणार्‍या मावळ्यांच स्मरण होऊन माझ्या खुजेपणाची जाणीव मात्र झाली ही फलनिष्पत्ती म्हणायची...

मी काढलेली प्रकाशचित्रे पाहण्यास इथे क्लिक करा: http://picasaweb.google.com/chinu234/DHAKBAHIRITREKMATESNOVEBER282010#

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्या या ढाकदुर्गाच्या पोटातील गुहेमधे अनादी काळापासुन या दुर्ग(म)देवतच वास्त्व्य आहे.ढाकदुर्ग आणि काळकराय सुळका यामधील चिंचोळी खिंड,उभ्या कड्याच्या छातीवरुन पाय ठेवायला अवघी काही बोटं असलेला आडवा ट्रेवर्स,खाली हिडिंबेप्रमाणे आ वासुन आपला घास घेण्यास सिद्ध असलेली दरी,सर्वात शेवटी लाकडी मोळी आणि दोरखंड याना लटकून पार करावा लागणारा कातळटप्पा>>>>>क्लास वर्णन चिन्मय. Happy

वृतांतामध्ये थोडे फोटो असते तर वाचताना अजुन मजा आली असती.

पुढिल ट्रेकसाठी शुभेच्छा!!!!!

मित्रा धन्यवाद!! पण मला लेखामध्ये फोटो कसे insert करायचे ते समजत नाहीये! म्हणून लिंक शेवटी दिली आहे. Happy

मस्तच वर्णन !!!! ..

वृतांतामध्ये थोडे फोटो असते तर वाचताना अजुन मजा आली असती >>>>> अनुमोदन

मला मात्र हा ट्रेक गेली काही वर्ष हुलकावण्या देतोय. बघू ह्या ट्रेक सीझन मधे जमतोय का ते...

सॉलीड वर्णन आणि फोटो रे...
च्यायला आम्ही गेलो होतो तेव्हा सगळ्यांची इतकी ... होती की कॅमेरा काढून फोटो घ्यायला लागलो तेव्हा शिव्या खाल्या...
"%^&%^&% इथे आम्ही मरायला लागलोय आणि या &*(&%% ला फोटो काढायचे सुचतायत" Happy

>पण मला लेखामध्ये फोटो कसे insert करायचे ते समजत नाहीये!
चिन्मय. मदतपुस्तिकेमध्ये 'लेखनासंबंधी प्रश्न' विभागात याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

चिन्मय, उत्क्रुष्ट वर्णन केले आहेस.
सर्व दुर्गभ्रमणाचा थरार उत्तम रीतीने जिवंत केला आहेस.
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते, ही उक्ति सावरकरांची सार्थ करणारा सह्याद्री.
आणि त्याच्या शिरपेचातला हा एक मानाचा तुरा म्हणजेच ढाक की (धाक) उर्फ़ गडदेचा बहिरी होय. गो. नी. दांडेकरांनाही प्रणाम.
प्रकाशचित्रेही एकदम चाबूक!!!!!!!!!!!!
आणि जाता जाता स्वस्थ बसवत नाही म्हणून बल स्थिर असताना बलवहन करणारे क्षेत्रफ़ळ कमी झाले की दाबाची व्रुद्धी होते. हया द्रव यांत्रिकीच्या तत्वाचे उपयोजन ही छान.
मर्यादेयं विराजते!

ढाक......... काय बोलणार या ट्रेक बद्दल...... सिर्फ नाम हि काफी हे.
२ वर्षापुर्विच्या आठवणी जाग्या झाल्या. ...... मस्त लिहिले आहेस.