चित्रकारांचे किस्से

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मायबोली दिवाळी साठी काही पाहिलेले /ऐकलेले किस्से लिहायचे ठरवले होते ते राहुन गेलं, त्यातले काही...

जलरंगात काम करताना आधिचा दिलेला रंग किती सुकलाय यावर चित्रातले रिझल्ट्स अवलंबुन असतात, स्टुडीओत काम करताना बरेच जण हेअर ड्रायर ने हवा तेव्हढा रंग सुकउन चांगला परीणाम साधतात. मात्र प्रत्यक्ष लोकेशन वर लँड्स्केप करताना मात्र हि सोय नसते. येक प्रसिध्द जलरंग चित्रकार ज्या प्रामुख्याने स्टुडीओ वर्क करतात त्या पहिल्यांदा नॅशनल पार्क मधे ग्रूप बरोबर लँड्स्केप साठी आल्या होत्या. पहिला रंगाचा वॉश देउन झाल्यावर त्यांनी बॅग मधुन इलेक्ट्रीक हेअर ड्रायर काढला आणि नॅशनल पार्क मधे तो ड्रायर कुठे प्लग करायचा या विचारात पड्ल्या.

असाच येक ग्रुप आउट्डोर् ला गेला होता, येक चित्रकार चित्र रंगवत बसले होते, सगळी कडे जमतात तसे थोडेफार लोकं बघायला जमले होते, त्यातल्या येकाने विचारले (बहुदा गुज्जु) "ये पेंटींग कितने मे बेचोगे". त्या चित्रकारानी त्याची किंमत सांगीतली (जी खरं तर त्यांच्या मार्केट प्राईज पेक्षा थोडी कमिच होती), त्यावर तो माणुस म्हणाला " इतनासा पेपर, इतनेसे कलर सब मिलाके २०० रुपयेभी नहि लगे होंगे आपको फिर ईतन किमत क्यु?" त्यावर ते चित्रकार ऊठले म्हणाले " हे घे ब्रश, हे घे रंग आणि पुर्ण कर हे चित्र .." त्यामाणसाचा चेहरा कसा झाला असेल ते कल्पना करा Happy

येका चित्रकार महाशयांचे आर्ट प्लाझा(जेहांगीर बाहेर च्या फुट्पाथ वर ची ओपन गॅलरी)ला प्रदर्शन भरले होते त्यात त्यानी येऊर च्या जंगला चे मोठे ऑईल पेंटींग लावले होते. ते चित्र तेव्हा काही विकले गेले नाही. या महाशयांचे सहा महिन्यानी जेहांगीर ला प्रदर्शन होते. तीथे पण त्यानी हे चित्र लावले. त्यांचा येक मित्र जो आधिचे प्रदर्शन हि पाहुन गेला होता त्याने विचारलेच कि हे तेच चित्र आहे पण थोडा फरक वाततोय तर उत्तर मिळाले की त्या कोपर्‍यातल्या झाडामागे जो वाघ डोकावताना दिसतोय ना तो अ‍ॅड केलाय. का तर म्हणे काही दिवसापुर्वी येउर ला वाघ दिसल्याची बातमी पेपर मधे होती. कोण म्हणतं की समाजात घडणार्‍या गोष्टींचे प्रतिबिंब चित्रात पडतं नाही Happy

चित्रकले चे क्लासेस चालवण यात नविन काहिच नाही. असे क्लासेस बहुतेक शहरात चालतात. त्याही पुढे जाउन इंटरनेट च्या माध्यमातुन इ-बुक्स मधुन ईन्स्ट्रक्शन्स आणि इमेल द्वारे चित्र बघुन त्यात सुधारणा/चुका समजावणे हा प्रकार सुध्हा मान्यता पावलेला. मात्र येका विशिष्ठ शहरात दुरध्वनी वरुन चित्रकलेवर सल्ले दिले जातात. तेही जलरंगा सारख्या प्रवाही माध्यमाबाबत ज्यात चुका सुधारायला वाव नसतो. याचे वैशिष्ठ्य म्हणजे येकदा पैसे भरले की ही कन्स्लट्न्सी आयुष्यभर उपलब्ध होते. आणि या गुरूजीं कडे म्हणे असे बरेच दुरध्वनी विद्यार्थी आहेत . फक्त कल्पना करा कि तुम्हि फोन इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे जलरंगात चित्र रंगवताय Happy

गेल्या वर्षी दहायेक चित्रकार मित्राना घेउन माझ्या गावी गेलो होतो. दोन तीन दिवस आजुबाजु च्या परिसराची लँद्स्केप करायची म्हणुन. असाच मी हि त्यांच्या बरोबर चित्र रंगवत बसलो होतो. पाठिमागुन आमच्या गावचे येक जाणते गृहस्थ आले त्यानि मला विचारले : "अरे अजय तु तरं इंजिनियर होतास ना मग हे काय झालं तुझं" . चित्र काढणे म्हणजे काय झालं तुझं म्हणण्या येव्हढया खालच्या पातळीवरचे आहे ते मला तेव्हाच समजले..

असे बरेच किस्से आहेत जे पुन्हा केव्हातरी.

विषय: 
प्रकार: 

>>>> "अरे अजय तु तरं इंजिनियर होतास ना मग हे काय झालं तुझं" <<<< Lol Lol Lol
अरे बाबा, आमच्यात तर "चित्रे काढून कधी काय पोटे भरतात की क्कॉय? काही नकोत ती नस्ती सोन्गेढोन्गे, अभ्यास करा त्यापेक्षा!" हा नित्याचा महान मन्त्र होता! जस काय चित्रकला किन्वा मूर्तिकलेला अभ्यास लागतच नाही!
परिणाम एकच झाला, रन्गाच्या काटकसरी मुळे मी आयुष्यात कधी चित्र रन्गवू शकलो नाहीच, पण आज समोर किलोकिलोने रन्ग ठेवले तरी रन्गवू शकत नाही! Sad खर्च नको म्हणून मग माती हे माध्यम निवडले
असो.
बाकी लेख छान! Happy

अजयराव उत्तम किस्से. तुमचा लेख् व साइट बघून मग नीट प्रतिक्रीया देणार. पन्नाशीनंतर युरोपातील सर्व चित्रकलेची महान स्थळे पायाखाली घालायचा विचार आहे. चित्रे म्हणजे आमचा अगदी वीक पॉइंट. पुलेशु.
पुढील चित्रकलेस शुभेच्छा. भारतीय पैकी रझा फेवरीट. युरोपीअन मास्टर्स तर सर्वच ग्रेट आपापल्या परीने.

" हे घे ब्रश, हे घे रंग आणि पुर्ण कर हे चित्र .."

आणि

"अरे अजय तु तरं इंजिनियर होतास ना मग हे काय झालं तुझं"

दोन्ही मस्तच. किस्से आवडले.

<< " हे घे ब्रश, हे घे रंग आणि पुर्ण कर हे चित्र .." >> एक लोखंड-पोलादाचा व्यापारी एका प्रसिद्ध मराठी शिल्पकाराकडे स्वतःच्या वडिलांचा अर्धपुतळा बनवून घेण्यासाठी गेला. शिल्पकाराने रु.२०,००० हजार लागतील असं सांगितल्यावर त्या व्यापार्‍याने कॅलक्युलेटर काढून हिशेब मांडला व म्हणाला " कोणताही किंमती अ‍ॅलॉय
वापरला तरी रु.८००० पेक्षां जास्त खर्च येणार नाही व करणावळ रु ५००० मिळून
रु.१३००० हजारात पुतळा सहज व्हायला हवा ". शिल्पकाराने त्याला सांगितलं कीं यासाठीचा अ‍ॅलॉय मी स्वतः बनवतो, त्यामुळे किंमत कमी होऊ शकत नाही. त्यावर व्यापर्‍याने बढाई मारली " अरे, जगातनं कुठूनही तुला हवा तो अ‍ॅलॉय आणून देतो; फक्त करणावळीचं बोल ". त्यावर शिल्पकारानं " तीस वर्षांच्या माझ्या तपःश्चचर्येची राख मिसळतो मी त्या अ‍ॅलॉय मध्ये, समजलं ?" असं म्हणून त्या व्यापार्‍याला बाहेरचा रस्ता दाखवला.
एका शिल्पकारानंच मला आपल्या गुरुचा हा किस्सा ऐकवला होता.

सगळ्याना धन्यवाद.
लिंबु-Every child is an artist. The problem is how to remain an artist once we grow up. -
Pablo Picasso
अश्विनी मामी- केवळ तेव्हढ्यासाठिच मलाही युरोप ला जायची ईच्छा आहे
भाऊ- असच येक प्रसिद्ध उत्तर , येका चित्रकाराला कुणि तरी विचारले कि हे चित्र काढायला तुम्हाला किती वेळ लागला तर त्यांनी उत्तर दिले अमुक वर्ष (त्या चित्रकारचे वय) आणि दोन दिवस ( चित्र काढायला लागलेला वेळ)
सुधिर- खुप दिवसानी Happy

अजय किस्से मस्त! अजुन येउद्यात!!

-Every child is an artist. The problem is how to remain an artist once we grow up. -
Pablo Picasso >> खुप आवडले आणि पटले पण.

'लहान मूल ज्या निरागसतेने, कन्व्हिक्शनने, आत्मविश्वासाने कागदावर रेघोट्या मारते त्या निरागसतेने मला चित्र काढता येईल तेव्हा मी खरा प्रामाणिक चित्रकार बनेन.' हे किंवा अश्या अर्थाचे उदगार एका खूप मोठ्या चित्रकाराचे आहेत. तो कोण हे मी पण शोधतेय. तुला सांगता येईल का?

अजय मला भूतकाळात पोचवलेत की तुम्ही. लहानपणी सांगलीत एका मंगल कार्यालयात फावल्यावेळी चित्रपटांचे होर्डींग्ज बनवत. मला आठवतय सुमारे २० बाय २० चे पोस्ट्र्र असावे. त्यावर केवळ चौकटी मारयला २ दिवस मग स्केचेस सुरुवात नंतर कलरिंग असे करत १ महिना लागत असे. तांबडीमाती ची सारी पोस्टर्स करतांना पाहीलीत. तसेच सांगलीच्या म्युझियम मधील पोर्ट्रेट्स पाहण्यासारखी होती. कल्याण शेटे, वेद्पाठक असे चित्रकार होते सांगलीत तेव्हा - म्हणजे सुमारे १९६७ साल असावे. आजही कुठे छानसे चित्र,पोर्‍ट्रेट पाहीले की पाउल थबकते. सारा भूतकाळ उभा राहिला डोळ्यासमोर.

सुनील साहेब,

चित्रपटांची पोस्टर रंगवता रंगवता एक वेडा इतका महान झाला की ( बहुदा ) त्याचे त्याला कळत नसावे की तो काय रंगवतो ? साधारण १९९० सालाच्या आसपास २२ लाख रुपये किमतीला विकल गेलेल त्याच चित्र मी पहायला गेलो होतो. चित्राच नाव होत ब्रम्हा विष्णु महेश. मला या तिघांपैकी कोणीच नाही दिसल. साधारण मी दहा लोकांना विचारल की काय हो आवडला का चित्र आणि काय आवडल त्यातल ?

२२ लाखांच चित्र विकत घेणारा आमचा अन्नदाता होता. त्याच्या भितीने सर्व म्हणाले आपल्याला हे चित्र कस पहाव हेच कळत नाही. या चित्राचा आस्वाद घेण एक कला आहे जी आपणाजवळ नाही.

मला राजा रविवर्म्याच्या चित्रातल सौदर्य आवडत. विचार समजतात. पण प्रत्येक वेळी मात्र मॉडर्न आर्ट्स अजिबात समजत नाही.

>>'लहान मूल ज्या निरागसतेने, कन्व्हिक्शनने, आत्मविश्वासाने कागदावर रेघोट्या मारते त्या निरागसतेने मला चित्र काढता येईल तेव्हा मी खरा प्रामाणिक चित्रकार बनेन.' हे किंवा अश्या अर्थाचे उदगार एका खूप मोठ्या चित्रकाराचे आहेत. तो कोण हे मी पण शोधतेय. <<

मला वाटतं हा पिकासोच्या या उद्धृताचा एक अवतार असावा:
It took me four years to paint like Raphael, but a lifetime to paint like a child.