बाळ-सीताराम-मर्ढेकर

Submitted by ट्यागो on 27 November, 2010 - 02:28


बाळ- सीताराम- मर्ढेकर

हे भन्नाट प्रकरण. यातला बाळ खूप जवळचा वाटतो; माझ्या मित्रासारखा. त्याच्या खांद्यावर हात ठेऊन दोन-चार कविता सहज वाचून होतात.
सीताराम थोडे प्रौढ; माझ्या वडिलांच्या वैगैरे वयाचे. एक आदब राखत मी त्यांच्या काही कविता वाचतो, काही सहज कळतात, काही प्रयासाने.
मर्ढेकर हे त्यापुढचे काहीच थांगपत्ता न लागू देणारे. माझ्या जाणिंवापेक्षा कैकपट दूर असणारे, अस्वस्थ करणारे. क्वचीत उमगणारे.
मी मर्ढेकर प्रथम वाचले ते १६व्या १७व्या वर्षी. शिशिरागममधल्या काही कविता सोडल्या तर बाकी काय तेच कळेना, पण तेव्हाच एक अस्वस्थ कळ दाटत होती. ती वाढतेय हेही कळत होतं. आजही ती मिटलेली नाहिये, ती जागवते रात्र-रात्र, मर्ढेकरांच्या कवितांसोबत जागरण नेहमिचेच. मला छळणार्‍या नाही म्हणत; अर्थात काही कवितांनी छळलेही, पण या कॉन्ट्रोवर्सी असो वा इतर काही त्यांच्या नेहमिच्या वादग्रस्त कवितांनी नेहमिच भुलवले आहे. पुढच्या काही कविता व काही अर्थ माझ्याच दृष्टीने. जितके जाणवले, झेपले तितकेच!

आलो क्षणिचा विसावा म्हणून;
टेकले पायः
तो तुच हटकलेस 'कोण?' म्हणून.
आणि मनातले शिणलेले हेतू
शेण झाले.

प्रेम वैगैरे काय हे नेमके नाही सांगू शकत, पण कदाचित जिथे परतायची ओढ असते ते प्रेम. तो विसावाच.
जा बाहेर जाऊन जगाशी काहीही कर पण पुन्हा परतून ये ही ओढ लावते ते प्रेम.
म्हणजे ही एकच जागा जिथे क्षणिचा विसावा मिळतो, अन् तिथेच निव्वळ येण्याच्या चाहूलीने ती विचारते 'कोण?' म्हणून.. असल्या करंट्या नशिबासोबत सगळेच शेण होणार!

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.

गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

प्रचंड वादग्रस्त कविता. अश्लीलतेचा आरोप्/खटला वै. झालेली. बर्‍याच जणांनी बरेच अर्थही लावलेत.
ही लैगिंकतेवर आधारलेली कविता. संभोगाची कथाच. पण किती दिवस उंदिर डोळ्यासमोर घेऊन अर्थ लावणार आम्ही? पिप डोळ्यासमोर घेऊन वेगळ्या अर्थानेदेखील पाहता येईलच की.
ही एका वैश्येवर रचलिये कविता असे नाही वाटत?
सगळं काही यांत्रीक चाललंय, या यांत्रिकयुगातला संभोगही यांत्रिकच, वैश्येशी संबध त्यात कसली आसक्ती?
यांत्रिकपणे जवळीक, एकदाची मोकळीक! इथे जगायची पण सक्ती, मरायची पण सक्ती.
बेकलाईटी- इथे लिपस्टीक हा अर्थ घेता येतो, त्याने कविता जितक्या वेगाने भेटते तेवढी ती याधी भेटलेली नसतेच.

बाकी अजुन काही कवितांवर असंच थोडे-बहूत लिहेनही.. हळूहळू.
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि मनातले शिणलेले हेतू
शेण झाले.>>> जबरदस्त.
मात्रा-छंदांचे रुक्ष कॅल्युलेटर घेउन 'मान्यवर' येतीलच इथे.

अप्रतिम लिहलं आहेस!!!

पण पुन्हा वेगळ्या विषयाला हात?
हे तरी व्यवस्थीत पुर्ण करणार ना?
की परत अजून काही?
वाफाडा, सज्जन्पूर, आणि अजुन बरेच काही अपुर्णच, त्यात आता ही एक भर.
मर्ढेकरांच्या वाटेला मी जात नाही, तेवढी माझी पात्रताही नाही. पण तु सुरुवात केली आहेस तर किमान अजुन लिहीच. असेच अर्धवट नकोच सोडूस. किमान माझ्यासारखीला पुन्हा मर्ढेकर वाचावे वाटतील आणि यातंच तुझे यश.
तुझ्या ह्या पुढच्या लिखाणास अगदी मनापासून शुभेच्छा! Light 1 Happy

@बी, आपली प्रतिक्रिया नीटशी नाही कळली. मर्ढेकरांच्या वेगळ्या कवितांवर लिहेनच..

@आगाऊ, 'मान्यवर' येओत पण काही 'नवीन' घेऊन एवढीच अपेक्षा! Happy

@हंसा, अपुर्णतेत मजा असते.. Lol
चावत, रवंथ करीत राहायचं जे जेव्हा जमेल, भेटेल ते.
सगळं पुर्ण करणारंच नाहीये मी, पण वाढवत नेणार नक्कीच Wink

@ऋयाम भावा, नक्की लिहेन जसे जमेल तसे!

प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार!

छान लिहिलेस. Happy पण जरा विस्तृत विवेचन वाचायला आवडेल. भाग छोटे झाले तरी हरकत नाही. पण एका भागात एक कविता, आणि त्यानंतर तिचे रसग्रहण किंवा तुला लागलेला अर्थ- अशा स्वरूपाचे. प्रतिक्रियांमध्ये मग त्या त्या कवितेवर/रसग्रहणावर रीतसर चर्चा होऊ शकेल.

वा! मनापासून लिहीलेत मयूरेश.
'शिशिरागम', 'काही कविता' आणि 'आणखी काही कविता' मधील मुडस वेगळे जाणवतात.
तूर्तास माझी आवडती

या गंगेमधि गगन वितळले,
शुभाशुभाचा फिटे किनारा;
असशील जेथे तिथे रहा तू,
हा इथला मज पुरे फवारा !

कवितांचे रसग्रहण वाचायला नक्कीच आवडेल.त्यानिमित्ताने चांगल्या कविता पुन्हा वाचायला मिळतील!

मर्ढेकरांच्या काही कविता आम्हाला अभ्यासाला होत्या. तेव्हा आमच्या मराठीच्या प्राध्यापिकेने
पिपांत मेले ओल्या उंदिर; ह्या कविता चा उल्लेख करून सांगीतले होते की, ही कविता दुस-या महायुद्धाच्या -हासाचे वर्णन करणारी आहे. तो अर्थ मला आजवर कधी सापडला नाही. उंदिराचे रुपक माणसाला दिले आहे उंदिरासारखी माणसे मरतात. पण मला तेव्हा कळाले नाही.

पिपात मेले ही मला मुंबईतल्या (किंवा एकूणच आधुनिक भारतीय समाजातल्या) दाबल्या गेलेल्या- लपून छपून केल्या जाणार्‍या - एक ओंगळवाणेपणाची भावना असणार्‍या - लैंगिक संबंधांबाबतची वाटते.

बेकलाइटी - बॅकेलाइट - प्लास्टिक - कृत्रिम

साजीरा, किमान १२७ धागे उघडावे लागतील, सध्या जमेल तेवढे लिहतोय.. मनासारखे जमत जाईल तसे पोस्टेनच एक एक करून. अर्थात आपल्या कल्पनेप्रमाणे प्रयत्न करतोच!

रैना, मनापासून लिहले हे जाणलेत आभार!

अंजू, रुणु़झुणू पुढे लिहतोयच.. वाचत रहा!
बेकलाइटी - बॅकेलाइट - प्लास्टिक(कदाचित यास 'कचाकडा' असे मराठीत संबोधतात; उच्चारात फरक असु शकतो) - कृत्रिम- ठिसुळ..

अखी- आमच्याही मास्तरांनी असंच काहीसं सांगितलेलं; अर्थात "आपण जे सांगताआहात ते तितकेसे पटत नाही" हे मास्तरांना तेव्हा सांगितलेही(एफ. वाय. चा दुसरा तिसरा तास असेल, अन् पटवून देणे न जमल्याने), परिणाम- वर्गाबाहेर! Happy
मर्ढेकर म्हटलं की दुसरं महायुद्ध हा एकच रेफ्रन्स... मोठी पळवाट वाटते.. असो!

टण्या, अर्थ बराचसा मिळता-जुळता.. पण 'दाबल्या गेलेल्या- लपून छपून केल्या जाणार्‍या..' यातही एक आसक्ती असते.. इथे ती नाहीच असे जेव्हा कवी म्हणतो तेव्हा..?
आपल्या अध्यात्मिक शिकवणूकींनुसार आसक्ती पल्याड पाहणे श्रेष्ठ. इथे आसक्तिविण आहे, पण पल्याड वा वैराग्यत्व नाही. ही कोणती स्थिती? कदाचित यांत्रिक..?
अर्थात ही माझीच मते, गैरसमज नसावा. सुरेख चर्चा होतेय, गोड-गोड अभिप्रायांपेक्षा मत-मतांतरे उत्तमच!

आपण सर्वांचे आभार!

अगदी मनापासून, अप्रतिम लिहले आहेस.
माझ्या आवडत्या ओळी,

'किती वितींचे जीवन माझें
तुलाच ठावे, सदारंग तू;
किती शितांची माझी भुक
ओरबाडते आंतिल किंतू.'

जमल्यास यावरही लिहा काही. Happy

तरुणपणी, मनात प्रेम, शृंगार हे विषय मनाला भावतात. सगळीकडे त्याचीच रूपके दिसतात. म्हातारपणी आध्यात्मिक विचार बळावले की जिथे तिथे ईश्वरभक्ति, आध्यात्मिक रूपके दिसू लागतात. (उघडपणे, असे सांगतात काही म्हातारे. त्यांच्या मनात काय असते कुणास ठाऊक?)

पूर्वी श्री. भा. रा. तांबे यांच्या काही कवितांमधून असे अनेक अर्थ, आमच्या त्या काळच्या प्रसिद्ध टीकाकार श्री. के. क्षीरसागर यांनी आम्हाला सांगितले होते.

धर्म, समाज, राजकारण, अर्थव्यवस्था, स्थळकाळ या बाहेरील गोष्टींपैकी ज्याचा जास्तीत जास्त पगडा मनावर असेल, किंवा प्रेम, राग, इ. पैकी आंतरिक भावनांपैकी ज्याचा मनावर जास्त पगडा असेल त्याप्रमाणे कवितेचा अर्थ जाणवतो.

जेंव्हा श्री. सावरकरांनी 'ने मजसी ने परत मातृभूमीला' हे गीत लिहीले तेंव्हा त्या काळात, त्या परिस्थितीत, जे लोक परदेशी होते, त्यांना ते फार 'जाणवले' असणार, त्यातल्या भावनांचा उत्कटपणा दिसला असेल.

आजकाल दर महिन्यात दोनदा परदेशी जाउन परत येणार्‍या, नि अमेरिकेत सुद्धा 'झी' टीव्ही बघणार्‍या नि ओक ट्री रोडवर भेळपुरी खाणार्‍यांना एव्हढी मातृभूमीची ओढ कशी जाणवणार?

कदाचित् अश्लील, वाईट शब्द वापरल्याखेरीज 'भावनांचा उत्कटपणा' जाणवत नसावा आजकाल. रोजचे जीवन इतके संघर्षमय, की नाजूक भावना, नाजूक शब्द यांना जागाच नाहि मनात! काहीतरी 'स्फोटक' लिहील्याखेरीज लक्ष जाणार कसे लोकांचे?

मयुरेश, छान उपक्रम. आणखी कवितांबद्दल नक्की लिहा.

टण्या, मलाही ही कविता 'केवळ' लैंगिक संबंधांबद्दल बोलते आहे असं नाही वाटत. यांत्रिकतेत एकूण जगण्यातलीच/आयुष्याबद्दलचीच आसक्ती (attachment / passion) मरून गेलेल्यांचं चित्रण वाटतं. सर्व थरातल्या व्यक्तींना सर्वांत स्पष्टपणे आणि थेट जाणवणारी passion ही लैंगिक संबंधांबाबतची असल्यामुळे प्रातिनिधिक म्हणून तिचं रूपक वापरलं असावं.

जुन्या हितगुजवर मर्ढेकर.

पहिली ३ वाक्यच खाउन टाकतात Happy

स्वातीने दिलेला अर्थाशी मिळता जुळता अर्थ मलाही वाटायचा, फक्त यांत्रिकतेऐवजी 'शहरामधील day to day life च्या रहाटगाडग्यामधे' एव्हढा फरक.

सर्वांचे आभार!
स्वाती_आंबोळे, आपण दिलेली लिंक व जुन्या हितगुजवरील मर्ढेकरांवरील बाफ तिथे फक्त एकच पान दिसतेय इतर चर्चा पाहताना Script Execution Error असं काहीसं दिसतंय..

(बरंच काही-बाही लिहलंय मर्ढेकरांच्या कवितांवर; आज डकवतो वेळात वेळ काढून!)

मला भावलेला अर्थ ...

महानगरातील मध्यमवर्गीयांचा कोंडमारा..

एकंदर सगळ्या गर्दीचा चाललेला पाठलाग वा खटाटोप मन मारुन यांत्रिक होत जातो.डोळ्याला झापड लावुन ठरलेल्या मार्गावरुन नेमके तसेच आयुष्य जगतो अन या सगळ्या रहाटगाड्यात पार संपल्यानंतर त्याच्या मुळ स्वप्नांची आठवण त्याला शेवटी अस्वस्थ करते.वाढत जाणारी पिपासा पण ती ही फसवी वा निरर्थक.इथे इच्छा ठेवल्याशिवाय जगता ही येत नाही आणि इच्छा मारल्याशिवाय ही जगता येत नाही.अन या सार्‍यातुन जी उदासी येते ती घातक आहे पण त्या जाणीवेतही जिवंतपणा नसतो.शेवटी तो सगळ्या परिस्थिती पुढे गलितगात्र होतो एवढेच उरते.

कदाचीत चुकही असेल....

http://www.loksatta.com/daily/20090503/lr11.htm

"पिपात मेले ओल्या उंदीर’मध्ये नाही का, कुणाला युद्धातले सैनिक आढळतात, कुणाला कारकुनांच्या रांगा दिसतातच. कुणाला खरेच उंदीरही आढळतील. परवाच कुणीतरी म्हणत होते की मर्ढेकरांनी आपल्या विदग्ध आणि व्हिजनरी प्रतिभेने आगामी काळातल्या साहित्य संमेलनाचे चित्रण ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ या कवितेत केले आहे."

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%...

"'पिपांत मेले ओल्या उंदिर' ही मर्ढेकरांची कविता फार गाजली. तीच्यावर अनेकांनी भाष्ये केली. स्वतः धोण्डांनीसुद्धा ऑगस्ट १९६७ च्या सत्यकथा अंकात एकनिरुपणात्मक लेख लिहला होता पण त्यांना स्वतःलाच त्यांचं 'ईंटरप्रिटेशन' बोचत राहिलं पुढे १९९३ मध्ये एका [दुसर्‍याच विषयावरच्या] लेखांत रॉबर्ट बर्न्स [१७५९-१७९६] च्या एका कवितेतल्या काही पंक्ती लेखकाने उद्ढृत केल्या होत्या. त्यांतल्या 'माईस अ‍ॅण्ड मेन' ह्या शब्दांच्या जोडीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यावरून त्याना जॉन स्टाइनबेकच्या १९४० च्या सुमारास वाचलेल्या 'ऑफ माईस अ‍ॅण्ड मेन' ह्या कादंबरीची आठवण झाली. मग त्यानी बर्न्सचा कवितासंग्रह आणि स्टाइनबेकची ती कादंबरी मिळवली. त्यांच्यावरून सुरू झालेल्या विचार-शृंखलेतून त्यांना 'पिपात मेले ओल्या उंदिर' चा जो नवा अर्थ गवसला, तो अगदीच वेगळा होता. त्यावर त्यांनी १९९४ मधे 'पुन्हा एकदा पिपांत मेले' ह्या शीर्षकाचा लेख लिहला. ते दोन्ही लेख 'तरीहि येतो वास फुलांना!' ह्या पुस्तकांत वाचायला मिळतात!"

पिंपात मेले ओल्या उंदिरांची प्रतिमा हिटलरच्या छळछावण्यातील ज्यु कैद्यांकरीता वापरलेली आहे. ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दात झालेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचा तसेच तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ आहे. खालील ब्लॉगवर ही सर्वमाहीती तसेच कवितेचा ह्या संदर्भातील असू शकणारा अर्थ यांचा समावेश केलेला आहे. ही माहीती खालील संकेतस्थळावर उपलबध्द आहे.

http://belsare.blogspot.com

इमां मुझे रोके है तो खीचे है मुझे कुफ्र
काबा मेरे पीछे है कलीसा मेरे आगे

माझे इमान मला मागे ओढते तर नास्तिकता, मोह मला पुढे खेचतात. मशीद माझ्या (घराच्या) मागे आहे तर चर्च / देऊळ समोरच्या बाजूला !

१८५७ च्या गदरमध्ये गालिब यांना त्यांच्या अस्थिर मानसिकता व विलासी वृत्तीमुळे (ज्यात कुठल्याच सिंहासनासंदर्भात निष्ठा नव्हती), इंग्रजांच्या बाजूनेही बोलता आले नाही की मुघलांच्या / भारतीयांच्याही!

मात्र त्यांचे प्रेम प्रगतीशील इंग्रजांवर अधिक होते व पेन्शनही इंग्रजांवरच अवलंबून होती. ही पेन्शन हे त्यांच्या विलासी वृत्तीसाठी 'उपलब्ध होऊ शकेल' असे एकमेव आर्थिक उत्पन्नाचे साधन होती. गालिब यांनी आयुष्यात काहीही केले नाही. (शेवटी शेवटी जफरची उस्तादी हे एक काम आणि जफरनेच मध्यंतरी दिलेले एक काम सोडून)

इंग्रजांनी पेन्शन द्यावी म्हणून त्यांनी अनेक अधिकार्‍यांवर कसीदे लिहीले. पण पेन्शन मिळेना! स्वभाव घमेंडी! विलासी! जुगार व मद्यपान आणि गझल हे तीनच उद्योग!

१८५७ नंतर बादशहावर आरोप पत्र दाखल झाले आणि गालिब यांना इंग्रजांनी पेन्शन नाकारली. इंग्रजांनी कारण दिले की तुम्ही त्या लढ्याच्या वेळेस आमच्या विरुद्ध बोललात, मग आता पेन्शन कशाला??

इस्लामची तत्वे तर पाळायला हवीत हा विवेक कुठेतरी मनात आणि इंग्रजांचे लांगुलचालन केल्याशिवाय 'कर्ज की मय' पासून मुक्ती नाही ही भीती! धड कुणाचीच बाजू घेता येत नाही. एकाची घेतली आणि दुसरा जिंकला तर मुंडके उतरवले जाईल अशी भीती!

अशात जे व्यक्त करायचे असायचे ते असे 'वेगळ्याच' तर्‍हेने व्यक्त करावे लागायचे.

मर्ढेकरांच्या काळात काय मोगलाई होती की काय? उंदीर पिपात मेले कसले? सरळ सरळ शब्दात लिहिता येत होतेच की जे लिहायचे ते? हे असे लिहूनही केस झाली. मग सरळ तरी लिहून केस करून घ्यायची? आता या कवितेवर समीक्षकांनी ग्रंथच्या ग्रन्थ लिहीले आहेत! ज्ञानेश्वरांनी सरळ लिहीले, तुकाराम, रामदास सगळ्यांनी स्वच्छ आणि सरळ लिहीले. पण आम्ही काहीतरी प्रतिमांच्या भाषेत अवजड लिहीणार आणि पब्लिकला सांगणार 'शोधा याचा अर्थ'!

इथे वेळ कुणाला आहे? बरं! जे काही ओल्या पिपात आणि बॅकेलाइटी वगैरे लिहीले आहे ते तरी काय कर्णमधूर आहे की काय?

आजवरच्या सगळ्या पिढ्या एखाद्याला 'महान' म्हणतात म्हणून आपणही महान म्हणण्यासारखे आहे हे!

============================

अवांतर - श्री आगाऊ,

मात्रा-छंदांचे रुक्ष कॅल्युलेटर घेउन 'मान्यवर' येतीलच इथे>>>

हे विधान आपण कुणालाही उद्देशून केलेले असोत. आपल्याला बहुधा हेच समजलेले दिसत नाही की मर्ढेकरांची ती कविता प्रॉपर लयबद्ध कविता आहे. त्याला मुळातच मापदंड व्यवस्थित लावलेले आहेत त्यांनी स्वतःच! हे आपल्याला समजू शकत नसतानाही आपण भंकस करताय याचा अर्थ आपला उद्देश कवितेवर भाष्य करण्याचा नसून फालतूपणा करण्याचा आहे हे समजत आहे.

आणि तेच अपेक्षितही आहे आपण जे नाव आपल्या आय डी साठी घेतले आहेत त्यावरून!

-'बेफिकीर'!

श्री. भूषण,
मी माझ्या स्वभावधर्मानुसार आयडी घेतला आहे आणि त्याचे पालन करतो आहे याचा मला आनंद आहे!
तुमचे मात्र तसे दिसत नाही. माझे वरील विधान भंकस, फालतू इ.इ. आणि तेही कोण्या मान्यवरांना उद्देशून असल्यास त्यावर तुम्हाला एवढी मोठी टिप्पणी देण्याची 'फिकिर' का बरे वाटली?
'मात्रा-छंदांचे रुक्ष कॅल्युलेटर' यातून ही कविता लयबद्ध आहे की नाही ते मला कळलेले नाही हा शोध तुम्ही कसा लावलात तेही समजले नाही. 'कवितेकडून बाळबोध,सरळ अर्थाची मागणी करणारे लोक' आता इथे येतील एवढाच माझा मुद्दा होता, आता तो सरळपणे न लिहिता असा खवटपणे का लिहिला याचे कारण, तुमच्याच म्हणण्याप्रमाणे, माझ्या आयडीत आहे.

ओक्के स्सर!

तुम्हाला उद्देशून तो प्रतिसाद लागू पडत नसल्यास रद्द करून टाकतो.

धन्यवाद!

या निमित्ताने आपण एकमेकांशी (कसे का होऊईनात ) बोललो तरी!

Happy

बॅकेलाईट हे कॉफीच्या रंगाचे इलेट्रीकल इन्सुलेटर आहे. आज काल याचा वापर कमी झाला आहे.

खरच काय म्हणायच होत कविला ?

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.

संभोगाची शेवटची पातळी, जेथे ** मान मुरगळ्याप्रमाणे **त पडते. ती ** ओली असते ही 'नवीनच' माहिती कवीवर्यांनी पेरलेली आहे.

गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन धुऊन घेउन.

एरवी कसेबसे गुदमरून राहिलेले ** अचानक पौरुषत्वाची जाणीव होऊन पेटले आणि शेवटी **त उचकी देऊन मेले.

तिसर्‍याच घार्‍या डोळ्याच्या स्त्रीचे विचार ओथंबून दिवस संपला होता. इकडे घरी आल्यावर उचकी देण्याव्यतिरिक्त काही शक्यच राहिलेले नव्हते.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

सरळ स्वच्छ ओळी!

उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

उदासपणे जीवन कंठावे लागत आहे. पण वासना हा एकच आधार असा आहे की ज्याच्या सहाय्याने क्षणभर का होईना 'जहरी' होऊन त्या उदासतेला डंख मारता येतो किंवा निदान तशी भावना तरी जागृत करून घेता येते. बायकोचा चेहरा एवढ्या अन तेवढ्यावर चिडतो आणि तडकतो काचेप्रमाणे ! पण त्या चेहर्‍यावरही क्षणभरासाठी मधाचे पोळे आले आहे. बेकलाइटी (हे माझ्यामते एका आगगाडीचे नांव असावे) च्या धडाक्यात एकदाचा संभोग उरकतो आणि मग 'उंदीर जेव्ह ओल्या पिंपात न्हातो' तेव्हा नुसते ओठांवरती ओठ ठेवून पडून राहावे लागते.