गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग १५

Submitted by बेफ़िकीर on 23 November, 2010 - 08:17

व्वा! काहीतरी दम आहे तर ट्रीपमध्ये!

मधुमतीच्या मनात आलेला हा विचार तिला एकदम उत्साहीत करून गेला. तीन दिवस झाले मॅडम रूममध्ये नुसत्या बसून होत्या! बाई आहे का भूत? मधुमतीने टीव्ही वरचे यच्चयावत कार्यक्रम पाहिले. आता तर ती अंदाजही करू लागली होती पुढे काय होणार याचा! हॉटेलच्या मेन्यूमध्ये असलेले सर्व पदार्थ आता खाऊन झालेले होते. बाहेरचा बर्फाळ पाऊस उगाचच घटकाभर थांबून पुन्हा हैराण करायला सुरुवात करत होता. मनालीच्या पब्लिकचे आयुष्य कसे असेल याचा विचार त्या उबदार रुममध्ये बसून मधुमतीने किमान तासाला एकदा केला असावा.

हे काय काम आहे? नुसतं बसायचं आपलं! ही बया एकचित्ताने टीव्हीकडे नुसती नजर लावणार पण त्यावर चाललेल्या कार्यक्रमातील एक अक्षरही हिच्या टाळक्यात घुसत नसणार! आपण इथे आहोत हेही मॅडम विसरून जातात कित्येकदा! दिवसातून चार पाच फोन फक्त! कुणाशी बोलतात काय माहीत! झोप आली की झोपायचं, जाग आली की उठायचं, भूक लागली की खायचं आणि उगाचच बाल्कनीत मिनिटभर उभे राहून पुन्हा आत यायचं! एवढेच करतीय ही बाई! आणि आपणही अगदी तेच करायला लागलो आहोत. आराम आराम म्हणजे किती आराम? त्यापेक्षा कामाचा रगाडा बरा! बरं! म्हणताही येत नाही की मॅडम कंटाळा आलाय! काय बोलेल सांगता येत नाही. त्रासलेली मात्र दिसते ही बाई सतत!

पहिल्या दिवशी कुणालातरी खाली जाऊन भेटून आली तेवढेच! नंतर काहीच नाही!

मधुमती या विचारात सकाळी आठ वाजता आवरत असताना तिला आज काहीतरी वेगळेच वाटत होते. गेले तीन दिवस सतत सव्वा नऊला उठणारी मोना आज मधुमती उठायच्या आधी तयारही झालेली होती. मधुमती सात वाजता उठली तर बया झकपक पोषाख घालून टीव्ही बघतीय! हाक नाही का मारायची! एक तर या थंडीत जागेच व्हावेसे वाटत नाही.

ते पाहून मात्र मधुमतीने एक्स्प्रेस गतीने स्वतःचे आवरले. एकच वाक्य बोलली मोना....

"साडे आठला निघायचंय..."

बास! कुठे निघायचंय, का निघायचंय, साडे आठलाच का निघायचंय, नऊ वाजता निघालो तर काय भुकंप होणार आहे का? वगैरे वगैरे वैतागवाडी प्रश्न वेणीच्या पेरांमध्ये बांधून मधुमती आठ वाजता मागे वळून म्हणाली...

"मी तयार आहे मॅडम.."

"बस...."

बस! बस काय बस? म्हणे बस! पण बसली मधुमती एका खुर्चीवर! मोनाने कोणतातरी इंग्लीश चॅनेल लावलेला होता. त्यामुळे समजत काहीच नव्हते. बहुतेक बातम्या चालू असाव्यात! मधुमती वैतागून वाट बघत होती. निदान नाश्ता तरी मागवायला सांगतीय की नाही बाई?

नाही! नो नाश्ता बिझिनेस! आठ वीसला खालून एक फोन आला! ताडकन उठली मोना फोनवर बोलून! आणि म्हणाली...

"चला... "

'निघायचंय', 'बस' आणि 'चला'! कठपुतळी आहे का मी? सगळा वैताग हालचालींमधल्या घाईमध्ये मिक्स करून मधुमती मोनाबरोबर रिसेप्शनमध्ये आली आणि चावी देऊन दोघी बाहेर आल्या. उगाचच बाहेर आलो असे वाटले दोघींना! चार टेंपरेचर होते! एका ड्रायव्हरने अंगुलीनिर्देश केला त्या प्रचंड वॅगनमध्ये दोघी जाऊन बसल्या! सामान सगळे रूमवरच होते त्याचा अर्थ एकच दिवसात बहुधा परत यायचे असावे असा कयास मांडला मधुमतीने मनातच! पण... ... पण...

हा 'पण' फार डिस्टर्बिंग होता! व्हेरी डिस्टर्बिंग!

शी: ! काय माणूस होता तो! ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला! नुसते मागे वळून पाहिले तर या थंडीत घाम फुटावा असली घाणेरडी नजर! हिम्मत कशी झाली त्याची मॅडम इथे असताना आपल्याला असे पाहायची?

मधुमती शहारून खिडकीतून बाहेर बघत बसली होती. ती जुनाट वॅगन हेलिकॉप्टरसारखा आवाज करत डकाव डकाव निघाली तेव्हा त्या माणसाने आणखीन एकदा मधुमतीकडे वळून पाहिले आणि बेरकी हासला! मधुमती हासलीच नाही. तिला त्या माणसाबरोबर मॅडमनी जावे याचाच धक्का बसलेला होता.

रणजीत श्रीवास्तव!

सकाळी सकाळीच ब्रॅन्डी झोकून पुढे बसला होता. कुठे जायचे आहे ते ड्रायव्हरला अर्थातच माहीत असावे. पहिला अर्धा तास कुणीही बोलले नाही. नंतर रणजीतने तोंड उघडले.

रणजीत - ही कोण आहे?

मोना - असिस्टन्ट...

रणजीत - हे घे... हाताला चोळ...

मोना - काय आहे हे??

रणजीत - ब्रॅन्डी...

मोना - छे...

रणजीत - नंतर स्वतःच मागशील म्हणा... तोपर्यंत मी पिऊन संपवली नसली म्हणजे मिळाली...

मधुकडे बघत डोळा मारत हासत रणजीत म्हणाला! हा माणूस मॅडमना 'अरे तुरे' करतोय हे पाहून मधुमती चकीत झालेली होती.

रणजीत - तू काय काय काम करतेस???

अचानक त्याने मधुमतीला हा प्रश्न विचारला हे पाहून मोना भडकलीच!

मोना - यू डोन्ट हॅव टू स्पिक टू हर...

रणजीत - अ‍ॅज यू विश... इथे पावती फाडावी लागते... शंभर रुपयाची...

मोनाने एक नोट पुढे सरकवली. खरे तर पन्नासचीच पावती फाडल्याचे दोघींनी पाहिले. पण मोनाला तमाशा नको होता. पन्नास रणजीतने सरळ ब्लेझरच्या खिशात टाकले. मधुमती बघतच बसली.

रणजीत - लव्ह इन शिमलाचे शुटिंग झाले होते इथे....

त्याने कुठेतरी बोट दाखवले म्हणून दोघींनी पाहिले! का कुणास ठाऊक! मोनाला ड्रायव्हर किंचित गालात हसल्यासारखा वाटला. संवाद हिंदीतच चाललेले असल्याने त्याला सगळेच समजत असणार हे मोनाला माहीत होते.

अत्यंत थकवणारा रस्ता आणि त्याहून थकवणारी वॅगन होती ती! नुसते खड्डे आणि स्पीड तीसच्या वर जात नव्हता.

मोना - दुसरी गाडी नाही मिळाली का??

रणजीत - का?

मोना - अंहं... ही जुनी आहे...

आता ड्रायव्हर मधे पडला..

ड्रायव्हर - मेमसाब मनालीमे इससे बढिया तो गाडीही नही है...

मनालीमे इससे बढिया गाडी नही है हे ठीक होते! पण मनाली तर मागे पडलेही? मग आता ही गाडी कुठे चाललीय?

दोन्ही बाजूंना शंभर शंभर मीटरवर हिमालय होता. बर्फाने झाकलेली शिखरे पाहण्याचा मूड असूनही मधुमतीचे लक्ष सारखे रणजीतकडे जात होते. तोही मधून मधून मागे वळून तिच्याकडे पाहात असल्याने!

मधेच रणजीतने पुन्हा ब्रॅन्डीची निप काढली आणि तशीच तोंडाला लावली. मग ड्रायव्हरलाही राहवले नाही. त्याने स्वतःकडची ब्रॅन्डी घशात ओतली थोडी! संपूर्ण वॅगनमध्ये तो दर्प पसरला.

मधुमती घुसमटायलाच लागली. नाकाला रुमाल लावून ती बसली होती. दोघींनी दोन दोन स्वेटर घालून वर पुन्हा एक एक जर्कीन घातलेले होते. मोनाने तिचे एक जर्कीन आणि तीन स्वेटर्स पुण्यातच मधुला देऊन टाकले होते. मधु तेच वापरत होती. इतके कशाला हा तिचा प्रश्न मनालीला पोचल्यानंतर आपोआप विरला होता. हेही कमी पडावेत अशी थंडी होती बाहेर!

टपरी! या असल्या सुनसान रस्त्यावर आणि हिमालयात टपरी कशाला? पण आहे! तेवढाच आधार! एक जिवंतपणाचं लक्षण!

उतरले रणजीत आणि ड्रायव्हर! या दोघींची बाहेर उतरण्याची मानसिकताच नव्हती आत्ता! मधुमतीला अनेक प्रश्न विचारायचे होते मॅडमना! पण धाडस होत नव्हते तिचे!

रणजीत - घे.. चहा...

मोनाने वाफाळत्या चहाचे दोन ग्लास हातात घेतले. एक मधुला दिला! बरे वाटत होते हाताला! गरम गरम छोटासा ग्लास! चहा म्हणजे साखरेचा पाक होता पण! काहीतरीच चव आली तोंडावर!

पुन्हा हेलिकॉप्टर सुरू झाले.

मोना - किती अंतर आहे?

रणजीत - कितीही असू शकेल....

हे काय उत्तर आहे? कुठे जायचे आहे आइ तिथे कुठून जायचे आहे हे एकदा ठरल्यावर अंतर कसे बदलेल? मूर्खाचा बाजार नुसता! नग होता नग रणजीत म्हणजे! मधुमतीला तो डायलॉगच समजला नव्हता. अंतर कितीही असू शकेल म्हणजे काय?

म्हणजे काय ते समजले. रस्ता बंद झाला होता मध्येच! बर्फामुळे! आत्ता लक्षात आले. पर्यायी रस्ता मागे पडला होता तीन किलोमीटर! म्हणजे कोणत्यातरी रस्त्याने एकदाचे जायचे तिथे इतकेच! विशिष्ट रस्ता वगैरे असे काही नाही. नुसता वैताग!

ते हेलिकॉप्टर तर रिव्हर्समध्येच दोनशे मीटर्स आणले ड्रायव्हरने! कारण टर्न घ्यायला जागाच नव्हती. आनंद होता आनंद सगळा!

ठेचकाळत, धक्के खात कसेबसे ते हेलिकॉप्टर अर्ध्या तासाने एका पर्यायी रस्त्याने पुन्हा मूळ रस्त्याला लागले.

या सगळ्या प्रकाराला रणजीत आणि ड्रायव्हर सरावलेले दिसत होते. या दोघी हादरून एकंदर प्रकार अनुभवत होत्या.

आणि कुठेही काहीही नसताना अचानक वॅगन रस्त्यातच थांबली. रणजीत निवांत उतरला. ड्रायव्हर या दोघींकडे वळून बघत म्हणाला...

"उतरीये.."

इथे? इथे काय आहे? काहीही दिसत नाही आहे. तरी उतरावेच लागले. दगा फटका होण्याची शक्यता मोनाने गृहीत धरलेलीच होती. अर्थात, तिच्याकडे असलेले शस्त्र, म्हणजे एक वस्तर्‍याएवढे पाते म्हणजे रणजीतच्या दृष्टीने खेळणे होते. पण आत्ता तिला त्याचाच आधार होता! आणि काहीसा मधुमतीचा! करून करून काय करणार? पैसे लुटणार! लुटा! पुन्हा हॉटेलला सोडा म्हणजे झाले.

कशाला उतरलो असे झाले दोघींना! सुन्न थंडी होती!

मोना - इथे काय आहे?

रणजीत - गंमत आहे गंमत...

मोना - नीट बोला...

रणजीत खिजट हासला. ड्रायव्हर रस्त्याच्या बाजूला हेलिकॉप्टर पार्क करण्यात गुंगलेला होता. मधुमतीच्या पाठीच्या कण्यातून मात्र भीतीचा एक प्रवाह खाली पोचला मेंदूपासून! रणजीत काहीतरी भयंकर करणार हे आता ती समजून चुकलेली होती. झक मारली अन या मूर्ख स्त्रीच्या नादी लागून तिची नोकरी पकडली.

मधुमती अक्षरशः पुतळ्यासारखी स्तब्ध झालेली होती.

रणजीत - चल.. तिकडे जायचंय...

काहीच नव्हते तिकडे! रस्त्याच्या बाजूला असलेले माळ उतरत उतरत खाली कुठेतरी जात होते. रस्त्यावरून काहीच दिसत नव्हते. पण विश्वास ठेवण्याशिवाय काही चॉईसच नव्हता मोनाकडे!

गेल्या दोघी मागोमाग!

ओह वॉव्ह!

असा घोळ आहे होय! हे माळ उतरत बितरत नव्हते. ती सरळ एक दरी होती. आणि खूप खोलवर... संपूर्ण बर्फात कव्हर झालेल्या चार, सहा झोपड्या! काही माणसे वावरत होती. व्वा! काय दृष्य होते ते!

एरवी या सीनचे फोटो काढण्यात मिनिटेच्या मिनिटे घालवली असती मोनाने! पण आत्ता ती प्रायॉरिटीच नव्हती. एका अत्यंत भीषण वाटेवरून कशातरी दोघी एकमेकींचे हात हातात धरून एक एक पाऊल टाकत उतरत होत्या खाली! रणजीत किती नालायक आहे ते दिसतच होते. एका हातात सिगारेट आणि एका हातात ब्रॅन्डीची निप घेऊन तो बिनदिक्कत वेगात अर्धी वाट उतरून खाली पोचलाही होता.

'आल्या तर आल्या नाहीतर मरतील मधे आणि दोघींच्या पर्सेस मिळतील आपल्याला' असा काहीतरी त्याचा हिशोब असावा! तसेही, खाली गेल्यावर पैसे घेतल्याशिवाय तो आपल्याला सोडणार नाही याची पूर्ण खात्री होतीच मोनाला!

दिड तास कधी लागतो का दरी उतरायला?

लागला होता दोघींना! इतकेच की घाम वगैरे येत नव्हता कारण थंडीनेच घाम फुटावा अशी परिस्थिती होती!

खाली पोचल्या तर समोरच्या तीन झोपड्यांच्या मध्ये एका ठिकाणी तीन काठ्या लावून त्याखाली जाळ करून एक प्राणी भाजायला ठेवला होता तिथल्या लोकांनी! बहुधा डुक्कर असावे! रणजीत दिसतच नव्हता.

एक पिचपिच्या डोळ्यांची जख्ख म्हातारी पुढे झाली.

म्हातारी - इधर बैठ ...

काही आदर वगैरे प्रकारच नव्हता बोलण्यात! निदान पोषाखावरून तरी समजावे ना की आपण कोणत्या परिस्थितीत राहतो? तिने दाखवलेल्या झोपडीमध्ये दोघी जाऊन बसल्या. खरच ब्रॅन्डी हवी होती आत्ता असे वाटले मोनाला! पण स्फटिकासारखे पाणी प्यायला मिळाले दोघींना! आता मात्र मधुमतीला कंठ फुटला.

मधु - इथे काय आहे मॅडम?

मोना - बोलू नकोस...

संपला विषय! आपल्यालाच घातबित करायला तर आणलेले नाही ना अशी वाटले एकदा मधुला!

दहा मिनिटांनी रणजीत आला. त्याच्या हातात दोन बोचकी होती.

रणजीत - हे माझे घर...

मोनाने त्या झोपडीकडे पुन्हा पाहिले. एक चूल, काही वस्तू आणि दोन दारुच्या अर्धवट बाटल्या सोडल्या तर तिथे काहीही नव्हते. इव्हन बिछानाही नव्हता. रणजीतसारखा माणूस इथे का राहात असावा तिला समजेना!

रणजीत - बघतेस काय? तिकडे आणखीन एक झोपडी आहे माझी.. त्यात सगळे सामान आहे... ही झोपडी फक्त दाखवायला...

मोना - कामाचे बोला...

रणजीत - अरे वा? मेरी बिल्ली.. मुझसे म्यांव...

मोना - माईंड यूवर लॅन्ग्वेज..

रणजीत खदखदून हासला.

रणजीत - पाहिजे का?? ब्रॅन्डी???

त्याच्या हातात नवीन बाटली होती आता! मोनाने कसलाही विचार न करता खरच घेतली ती हातात! आत्ता आधी स्वतःला नीट ठेवणे आवश्यक होते. तिने फटाफटा हाताला ब्रॅन्डी चोळली आणि 'तूही चोळ' असे म्हणून ती बाटली मधुकडे दिली.

मधुने वास घेऊन नाक मुरडत चोळली थोडी ब्रॅन्डी!

रणजीत - हिमालयातील हरीण मिळाले काल... भाजतोय... आज दुपारी बडा खाना आहे... थांबणार ना??

मोना - कामाचे बोला...

रणजीत - अच्छा... म्हणजे तुझा शहाणपणा अजून गेला नाही तर...

खरे तर मोनाला उठून त्याच्या कानसुलात भडकावून द्यावीशी वाटत होती आत्ता! पण फार चुकीची हालचाल ठरली असती ती!

रणजीत - हं... तर तुला जे मी सांगत होतो त्यापैकी जेवढ्या वस्तू महत्वाच्या आहेत त्या या पोत्यांमध्ये आहेत... आता मला सांग... भाव कसा ठरवायचा...

मोना - ते काय आहे त्यावर ठरणार ना?

रणजीत - अर्थातच... हे बघ.. हा ग्रूप फोटो... आई, बाबा, मी, सानिया, रोहनचाचा, माधुरीचाची आणि राघव...

मोना - मला नकोय तो...

रणजीत - जशी आज्ञा... तुझ्या अन सुबोधच्या जन्माच्या आधीचा फोटो आहे तो... तुला त्यात इंटरेस्ट कसा असेल .. नाही का?

आत्ता मधुमती हादरली. आपण कुठे आलो आहोत याचा तिला अंधुक अंदाज आला. हा माणूस मॅडमना त्यांच्या जन्मापासून ओळखतो इतकेच नाही तर मॅडमचा फोटोही या राक्षसाच्या पोत्यांमध्ये असू शकेल हे तिला समजले. आता फक्त पाहात राहायचे या भूमिकेवर ती ठाम झाली.

रणजीत - बरं... ही सर्टिफिकेट्स... सुबोधची...

मोना - कसली कसली आहेत??

रणजीत - अं... दहावी... बारावी... वक्तृत्वस्पर्धा.. नाट्यवाचन... हॉकी... अरे वा? बरेच काय काय करायचा बेटा.. हं.. हे बघ... हे आणखीन एक हॉकीचे...

मोना - सिमल्यात एवढ्या अ‍ॅक्टिव्हिटीज???

रणजीत - तुला जन्माला घालताना अक्कल वाटप थांबले होते का?? मुंबईला होता तो...

मॅडमच्या तोंडावर हे वाक्य कुणी बोलू शकेल याची सुतराम शक्यता वाटत नव्हती मधुला! हादरून ती दोघांकडे पाहात बसली.

मोना - नीट बोला...

रणजीत - गप गं... नीट काय बोला? ... इथल्या लोकांना वाटले तर हरणाच्या जागी तुम्ही दोघी भाजल्या जाल.. माणूस खाल्लायस का कधी? इथल्या एकाने खाल्लाय...

मोना - कल्पना सुखद वाटत असेल तुम्हाला.. पण तसले काही मनात आले तरी सगळ्या झोपड्यांमधले सगळे मरतील..

पुन्हा रणजीत खदाखदा हासला! मधुमती मांजराच्या नुकत्याच जन्माला आलेल्या पिल्लासारखी भेदरून बसलेली होती.

रणजीत - हवीयत का?? सर्टिफिकेट्स??

मोना - छे... ती खोटी आहेत...

रणजीत - अच्छा?.. कशावरून??

मोना - ओरिजिनल हेलिक्सच्या रेकॉर्ड्सला आहेत...

आता मात्र पोती बाजूला ठेवून हासू लागला रणजीत! बघतच बसली मोना!

मोना - काय झाले??

रणजीत - अक्कल दिली नसली तरी विनोदबुद्धी नक्कीच दिली आहे तुला देवाने...

मोना - काय झाले ते बोला...

रणजीत - दहा हजाराला वाटेल ती सर्टिफिकेट्स मिळतात हल्ली...

मोना - हो ना? मग एक हजारही देणार नाही मी याचे.. ठेवा ती पोत्यात... हीच खोटी आहेत..

रणजीत - ओक्के... नो प्रॉब्लेम .. हे लोलक आहेत लोलक....

मोना - कसले लोलक??

रणजीत - बाबांच्या लॅबमधले...

मोना - त्याचा काय उपयोग??

रणजीत - उपयोग सांगायचा चार्ज वेगळा आहे...

मोना - आणि उपयोगी नाही असे समजले तर चार्ज नाही द्यायचा ना??

रणजीत - हुषार आहेस की? .. तोंड उघडायचे पैसे आहेत....

मोना - ठेवा ते लोलक पोत्यात.. भंकस काहीतरी दाखवू नका...

रणजीत पुन्हा हासला. आता यावेळेस तो हासून दमल्यासारखा हासला.

मोना - आणि आणखीन एक... हासत जाऊ नका...

खो खो हासत रणजीत एक पाकीट काढले...

रणजीत - यात पत्रे आहेत....

मोना - कसली???

रणजीत - कसलीही असतील...

मोना - तुम्ही वाचली आहेत ना?

रणजीत - अर्थात.... बिनडोकपणा कधीच करत नाही मी.. देवाने दिलेल्या प्रत्येक अवयवाचा पूर्ण वापर करणे या एकाच भांडवलावर मी आजवर टिकून आहे.... त्यात मेंदूही आलाच...

मोना - हिंदी पिक्चरचे डायलॉग्ज ऐकायला मला वेळ नाही.. कसली पत्रे आहेत???

रणजीत - सांगायचे दोनशे रुपये...

मोना - दिले.... .. हे घ्या...

रणजीत - यामध्ये माधुरीचाचीने माझ्या आईला, माझ्या वडिलांनी तुझ्या काकांना वगैरे लिहीलेली पत्रे आहेत...

मोना - दोनशे दिले आहेत तुम्हाला... महत्वाची पत्रे आहेत की नाहीत माझ्यासाठी ते सांगा....

रणजीत - मी काय सचिव आहे का तुझा?? निर्णय सुचवायला??? घ्यायची तर घे नाहीतर चालू लाग...

मोना - किती पैसे???

रणजीत - दिड हजार....

मोनामॅडम असे पैसे वाटत सुटलेल्या मधुमतीने कधीही पाहिलेल्या नव्हत्या.

रणजीत - हं.. पाचशेच्या नोटा बर्‍या पडतात नाही?? सांभाळायला??

मोना - अनावश्यक बडबड थांबवू शकाल का??

हासत हासत रणजीतने ते पाकीट मोनाकडे फेकले आणि पोत्यातून एक झबले काढले...

मोना - हे काय आहे???

रणजीत - पंचवीस वर्षापुर्वी तू यात वावरायचीस... आईने शिवले होते तुझ्या...

मोना - तुम्हाला कसे माहीत???

रणजीत - मी त्यावेळेस सिमल्यात अदृष्यपणे वावरत होतो हे आठवण्याची क्षमता तुझ्या मागासलेल्या मेंदूत नाही आहे का???

मोना - याचे मी काय करू???

रणजीत - मी कुठे काय म्हणतोय??? एक आपले दाखवले.. माझ्याकडे काय काय आहे ते...

मोना - माझ्या आईने माझ्यासाठी शिवलेले झबले तुमच्या घरी कसे काय???

रणजीत - सगळ्यांचे पोस्ट मॉर्टेम होत असताना तू एकटीच बागडतीयस हे पाहून डिपार्टमेंटला संशय आला की तू तर नसशील ना विषबाधा केलेली? म्हणून तुझी तपासणी केली... तेव्हा हे झबले मधे येत होते... म्हणून काढून ठेवले ते माझ्याच घरी राहिले...

मोनाचा संताप होत होता त्याचे बोलणे ऐकून!

मोना - डोके ठिकाणावर ठेवून बोला...

रणजीत - सहा महिन्यांची होतीस तू...

मोना - ते मलाही कळतंय... हे झबले बिबले नकोय मला...

मग तिला काय वाटले कुणास ठाऊक! आपल्या आईने आपल्यासाठी शिवलेले झबले! इतकी वर्षे या राक्षसाने जपले होते. का जपले होते कुणास ठाऊक! तिने ते तीनशे रुपयांना विकत घेतले.

रणजीत - हा गज!

मोना - कसला गज?

रणजीत - सानियाच्या टाळक्यात घातलेला...

शहारलीच मोना! मधुमतीला कसला संदर्भच लागला नाही.

मोना - फेकून द्या तो...

रणजीत - ते मी पाहतो... तुला हवाय का नकोय तेवढे सांग...

मोना - माझा काय संबंध??

रणजीत - ही काही जुनाट संशोधने आहेत...

मोना - कसली??

रणजीत - फालतू कसलीतरी...

मोना - बघू???

रणजीत - अंहं... वस्तू हातात घेतली की विकली गेली असे समजतो मी...

मोना - कसली आहेत ते सांगा आधी...

रणजीत - सैन्याला कमीतकमी वजनाच्या अन्नात कशी भूक भागवता येईल वगैरेची...

मोना - याचा तर तुम्हालाही उपयोग होईल गव्हर्न्मेंटला विकलीत तर...

रणजीत - गव्हर्नमेन्टने फेटाळलेली आहेत ती...

मोना - का??

रणजीत - त्यापेक्षा चांगले उपाय आधीच उपलब्ध होते...

मोना - ते काय आहे??

रणजीत - हिमालयामधला फोटो आहे... तुझ्या कुटुंबाचा....

मोना - हा माझ्याही घरी आहे...

रणजीत - ठीक आहे...

मोना - पण हा काढला कुणी असेल???

रणजीत - माझ्या वडिलांनी काढला असेल बहुधा.. मीही तेव्हा इथे नव्हतोच....

मोना - हा कोण म्हातारा???

रणजीत - हाच मेला... उस्तादचा बाप...

मोना - तुमच्याकडे सगळ्या फालतू गोष्टी आहेत...

रणजीत - चला मग... निघा तुम्ही दोघी...

मोना - नाही.. दाखवा आधी सगळे...

रणजीत - मग बकबक करायची नाही...

मोना - ते काय आहे??

रणजीत - हॉकी स्टिक... सुबोधची... हे पोते संपले... आता हे पोते....

मोना - काहीच मिळाले नाही... ही किरकोळ पत्रे आणि हे झबले...

रणजीत - मी कुठे काही कमिटमेंट दिली होती?? तूच फोन करून फॉलो अप ठेवला होतास....

मोना - ते पोते खोला...

रणजीत - इथे हुकूम बिकूम केलास तर चामडी सोलून बर्फावर ठेवीन तुला... शहाणपण करायचे नाही...

मोना - आणि नीट बोलत जा... आय अ‍ॅम पेयिंग यू...

रणजीत - खड्यात गेले तुझे पैसे... जायचे तर जा...

मोना - बर दाखवा ते पोते... सॉरी

रणजीत - अरे वा? हरणाचा वास आला... खाणार का??

मोना - हे पहा... मी फक्त कामाचे बोलणार आहे...

रणजीत - हीच ती डबी...

मोना समोर मृत्यू दिसत असल्याप्रमाणे त्या डबीकडे पाहात होती. समजले होते तिला! त्याच डबीत होत्या त्या गोळ्या.... बझट!

मोना - ही हवीय मला....

रणजीत - मलाही हवीय...

मोना - म्हणजे???

रणजीत - बरी पडते... माणूस बिणूस मारायला...

मधुमती आता रडकुंडीला यायच्या बेतात होती.

मोना - उगाच घाबरवू नका... यात तसले काहीही नाही...

मधुची अवस्था ओळखून मोनाने हे वाक्य टाकले आहे हे रणजीतला लक्षात आले. तो विकट हासत मधुमतीकडे बघत म्हणाला...

रणजीत - खाणार??.... मस्त लागते...

मोना - माझ्याशी बोला...

रणजीत - हं... तर ही डबी मला हवी असल्यामुळे मी ही विकू शकत नाही...

मोना - प्रत्येक गोष्टीची एक किंमत असतेच...

रणजीत - ही मॅनेजमेन्टच्या पुस्तकातील वाक्ये तेल लावत गेली...

मोना - आपण याच डबीसाठी आज भेटलो आहोत...

रणजीत - अच्छा?? ओ हो... ठीक आहे... पण आता मला ही विकायची नाही आहे...

त्याला बझटचा भाव बराच वाढवून हवा आहे हा मोनाचा अंदाज होता...

मोना - किती रुपयांना देऊ शकाल??

रणजीत - देणारच नाही तर??

मोना - एक मिनीट... तुम्हीच म्हणाला होतात की मला पुढील आयुष्यात तुमची गरज लागणार आहे... आज ती भासत आहे तर तुम्ही मदत नाकारत आहात...

रणजीत - तुला माझी गरज भासणार आहे एवढेच म्हणालो होतो.. मी ती गरज पूर्ण करेन असे म्हणालो नव्हतो.... आणि म्हणालो असतो तरीही मी शब्द बदलताना मागे पुढे पाहात नाही....

मोना - विकणार की नाही???

रणजीत - नाही...

मोना - पुन्हा विचार करा...

रणजीत - तूच कर करायचा असला तर... मी कधी विचारच करत नाही...

मोना - आपण दोघे ज्यासाठी भेटतो आहोत तो उद्देशच सफल होणार नसेल तर भेटायचेच कशाला??

रणजीत - बावळट मुली.. हा प्रश्न तू स्व:ला विचार.. मी कधी म्हणालो मला तुला भेटायचे आहे म्हणून??

मोना - ओक्के... आय रिक्वेस्ट... मला ही डबी द्या... गोळ्यांसकट...

रणजीत - हां! आता आलीस जमीनीवर! एक काम करू... सहा गोळ्या आहेत.. तीन विकतो मी तुला...

मोनाने क्षणभर विचार केला..

मोना - मला चार हव्या आहेत...

रणजीत - अरे वा?? ठरली वाटतं माणसं इतक्यात?? सुबोध आणि जतीन असणारच... बाकीचे दोन कोण??

मधुमती जॉईन झाली तेव्हा सुबोध आणि जतीन कामावरच नसल्याने त्यांची नावे तिने खरोखरच ऐकलेली नव्हती. शामा एक दोनदा ही नावे उच्चारत असावी असे तिला आत्ता या क्षणी वाटले एवढेच! आपली मालकीण मोना ही एक अत्यंत पोचलेली बाई असून ती कदाचित खून बिनही करत असू शकेल अशी रास्त शंका आता तिला यायला लागली होती. पुण्याला पोचल्यावर या नोकरीवर तत्क्षणी लाथ मारण्याचे तिचे निश्चीत झालेले होते.

मोना - त्याच्याशी तुमचा संबंध नाही... चार गोळ्या हव्या आहेत...

रणजीत - ओक्के... चार तर चार... चार लाख...

मोना - कसले चार लाख...

रणजीत - मोनालिसा.. पोरखेळ आहे का हा??? बझट म्हणजे??

मोना - देऊ नका... गरज नाही....

रणजीत - ठीक आहे... बाकी काही बघायचे आहे???

मोना - छे!

मोनाला वाटले तो लाचारपणे 'किमान दोन लाख तरी द्या' वगैरे असे काहीतरी म्हणेल आणि शेवटी दहा वीस हजारात सौदा होईल! तो तर सरळ पोते गुंडाळायलाच लागला होता.

मोना - गव्हर्नमेन्टने डिस्ट्रॉय केलेल्या टॅब्लेट्स तुमच्याकडे आहेत हे सिद्ध होऊ शकते याची कल्पना असेलच....

रणजीत - असल्या धमक्या मी लहानपणी ऐकायचो... निघ तू...

मोना - आय कॅन पे यू ट्वेन्टी थाउझंड....

रणजीत - भिकारी ते भिकारीच....

मोना - मिस्टर... तोंड सांभाळा...

रणजीत - गप्प बस... तुझ्या काकांना मुलगा सोपवला आम्ही आमचा... आमच्या पैशावर हॉटेल चालवलंत... आणि आत्ताही येऊन वीस हजारात ही भीक मागतीयस....

मोना - माझे वडील तसे नव्हते... रोहनचाचा असतीलही... आणि तुम्ही आत्ता हपापल्यासारखे पाच पाचशे रुपये गिळताय त्याचं काय??

रणजीत - गप्पा मारायला मला वेळ नाही....

मोना - ठीक आहे... मलाही वेळ नाहीच आहे... फालतू गेला वेळ माझा...

रणजीत - फालतू गेला नसता... घालवलास फालतू...

मोना - असल्या डबड्या गोळ्यांसाठी कोण पैसे देणार इतके??

रणजीत - ज्याला वाटते.. की आपले आई वडील मरायला नको होते... आणि मला भेटायच्या आधीच प्राईस विचारली असतीस तर माझाही वेळ फालतू गेला नसता...

मोना - इट्स ओके... माझे मी पाहून घेईन... निघते... वर गाडी ठेवलेली आहेत ना?? नाहीतर आमचा जायचा प्रॉब्लेम यायचा...

मधुमती पटकन उठून उभी राहिली होती. मोनाही उभी राहिली.

आता सावकाश रणजीत उठून उभा राहिला.

रणजीत - हे घे... ऑल यूवर्स...

डोळे मिचकावत रणजीतने हात पुढे केला होता. आश्चर्याने थक्क झाली होती मोनालिसा! हातात आलेल्या छोट्याश्या डबीकडे आणि रणजीतकडे अवाक होऊन पाहात होती.

मोना - म्हण.... जे???

रणजीत - तुझे आई वडील खूप चांगले होते... माझेही आई वडील खूप चांगले होते... मात्र... तुझे काका काकू नालायक होते.... आणि... नंतर सुबोध नालायक झाला... लायकी नसताना आणि तुझ्या काकांचा खरा मुलगा नसतानाही तुझ्या वडिलांनी त्याला आपल्या कंपनीत लावून घेतला.. नंतर त्याला समजले.. मी घराचा ताबा घेतला हे... चवताळला होता... कारण मी ते इतके गुप्त पद्धतीने व इतक्या वेगात केले की त्याला काही करताच आले नाही... त्यातच तुझ्या वडिलांना माझ्यामुळे समजले... जयाचाची कशी गेली ते... त्यांनी स्वतःच्या भावावर सूड कधीच उगवला नाही.. इतकेच काय तर सुबोधलाही लांब केले नाही.. मात्र... माझ्या वडिलांनी... सुबोधचे गुप्ता कुटुंबाला दान केल्यामुळे सगळे काही मोठ्या मुलाच्या... म्हणजे माझ्या नावाने लिहीलेले होते... किती थोर माणसे... मी इतका वाईट वागलो तरीही मलाच दिले सगळे.. मी कुठे आहे हे माहीतही नव्हते... तरी मलाच दिले सगळे.. पण... याचा परिणाम वाईट झाला.. सुबोधने सूड घ्यायची तयारी सुरू केली.. त्याला हवे होते सत्तावन्न लाख रुपये आणि बझट.. बझट मात्र काही प्रमाणात त्याला मिळाल्या... पैसा एकही नाही.. बझट मिळण्यामध्ये इन्स्पेक्टर जगमोहन या भ्रष्ट अधिकार्‍याने त्याला मदत केली... आला होता एकदा इथे सुबोध... मला जेवायला चल म्हणत होता.. मी त्याचे बारसे जेवलेलो आहे... गेलो नाही मी... मात्र या बझट मी माझ्याजवळ ठेवलेल्या होत्या... पुढेमागे तो आणि जगमोहन जेव्हा एकत्र असतील तेव्हा वापरण्यासाठी... माझे काहीच वाकडे करता येईना म्हणून इम्मॉरल ट्रॅफिकिंगचे खोटे आरोप लावले.. त्यातून वाचण्यातच माझे कित्येक लाख रुपये खर्च झाले.. जगण्यासाठी पुरेसे पैसे आहेत माझ्याकडे.. पण... मोहनचाचांना असा मृत्यू यावा?? मी मुंबईला खेट्या मारू लागलो.. हळूहळू समजले.. तसाच मृत्यू आला होता... आणि नक्कीच.. त्यात सुबोधचा हात असणार होता..

खरे तर मला काहीच देणेघेणे नव्हते या सगळ्याशी... पण माझ्या एन्काउंटरसाठी सुबोध प्रयत्नशील आहे असे समजले... एच पी गव्हर्नमेन्टमधील एका राज्यमंत्र्याशी त्याचे लागेबांधे होते... माझे हात इतके वरपर्यंत पोचणे शक्यच नव्हते.. मला भीती वाटू लागली.. त्यामुळे मी या अशा निर्जन ठिकाणी राहायला आलो.. इथे लपायला प्रचंड जागा आहे... कुणीही येतानाच लांबूनचह दिसते... इथे मी सेफ आहे असे मला वाटते... तुझ्याकडून घेतलेले पैसे मी ज्या पद्धतीने घेतले.. म्हणजे माहिती देण्यासाठी.. तशाच पद्धतीने मी आजवर जगत आलो आहे.. मी गुन्हेगार आहे... पण खुनी नाही... आणि .. आणि इम्मॉरल ट्रॅफिकिंग हा तर केवळ विनोद आहे...

मला संपवून सुबोधला काय करायचे होते... ते मला फार फार उशीरा समजले.. फार वाईट गोष्ट करायची होती त्याला... त्याला तो फॉर्म्युला... पाकिस्तानमधील एका कॉन्टॅक्टला विकायचा होता..

धिस वॉज टू मच... मला हे समजले कसे तर माझ्याकडे अचानक नियमीतपणे अनोळखी माणसे येऊ लागली... काही ना काही विषय काढून बझटची माहिती विचारू लागली.... हे सगळे खबरे होते जगमोहनचे.. मला अनेकदा आत घेतले... पण गुन्ह्याचे स्वरूप वेगळेच असायचे... मात्र... दोन महिन्यांपुर्वी मला आत घेतले तेव्हा स्वतः जगमोहनने पोलिसी खाक्या वापरला आणि आजूबाजूला दुसरे कुणी नसताना कानात सांगीतले... आमच्या माणसांना पाहिजे ती माहिती द्यायची... दिली नाहीस तर खलास होणार आहेस... मी हळूहळू दिशाभूल करणारी माहिती द्यायला लागलो त्यांना... खरे तर बझटचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे यावरून माझ्यावर भारतातच लीगल केस होऊ शकते... पण.. तशी झाली तर सुबोधच्या हाती काहीच लागणार नाही... आज या पृथ्वीच्या पाठीवर बझटचा फॉर्म्युला बाळगणारा माणूस एकच आहे.. रणजीत... शामताप्रसाद.. श्रीवास्तव...

मोनालिसा... सुबोध डिझर्व्ह्स टू बी किल्ड... द सेम वे... ऑर एल्स... मेनी अदर्स विल बी किल्ड... मेनी अदर्स हू आर इनोसन्ट... दे विल बी किल्ड जस्ट फॉर फिव लॅख डॉलर्स.. दॅट सुबोध अ‍ॅन्ड जगमोहन वुड गेट... बाय सेलिंग दॅट फॉर्म्युला...

तू म्हणशील... हा फॉर्म्युला तुम्ही शासनाकडे देऊन का टाकत नाही... इतकेच काय?? मी स्वतः बझटसाठी आवश्यक असणारे पीक काही प्रमाणात का घेत नाही...

... इट्स अ डेडली वेपन मोनालिसा.. पंधरा मिनिटात खेळ खलास... शासनाला न देण्याचे कारण एकच... वडिलांच्या मृत्यूनंतर आज.. इतक्या वर्षांनीच कसा काय मी तो देतोय.. आधी का नाही दिला.. आजच कसे महत्व समजले?? .. इतके वर्ष मी तो वापरला तर नाही???

पण.. तुझ्याकडे ही डबी का देतोय माहीत आहे?? आत्ता जगात माझ्याकडे बझट आणि त्याचा फॉर्म्युला आहे... हे माहीत असलेले फक्त चार लोक आहेत.. मी स्वतः.. तू... सुबोध... आणि जगमोहन... तू माझी शत्रू नाहीच आहेस.. ते दोघे आहेत.. पण ते मला कधीच भेटणार नाहीत... जगमोहन भेटला तरीही चौकीवरच भेटणार... जिथे मी असणार एक गुन्हेगार... तूच एक अशी आहेस... की जी गुन्हेगार नाहीस... जिला हात लावायचे धाडस त्यांच्या बापात नाही... आणि.. ते दोघेही.. तुझे शत्रूही आहेतच...

मोना - माझे???... कसे काय???

रणजीत - सुबोधने मोहनचाचांवर बझट वापरली म्हणून... आणि... जगमोहनने त्याला मदत केली म्हणून...

मोना - जगमोहनने काय मदत केली???

रणजीत - बंगल्यावरच्या काही बझट घेऊन जाण्यात...

मोना - पण मग... मला जगमोहन असे कसे म्हणाला?? की.. त्याने तुम्हाला सांगीतले की... तुम्ही मला नक्की भेटाल कारण.. तुम्ही त्याला घाबरता??

रणजीत - समजलं नाही अजूनही??? आता तू मनालीला गेलीस की आज किंवा उद्या तुझ्याशी डिटेल्ड बोलेल तो... आणि सगळी माहिती विचारेल... बघ आता काय सांगायचे ते....

मोना - या... फुकट देताय?? गोळ्या???

रणजीत - माझ्याकडे बराच साठा आहे.. सहा गोळ्या गेल्याने काहीच बिघडत नाही माझे..

मोना - साठा??

रणजीत - होय... जा आता.. वर गाडी आहे... आणि हो... पुण्याला गेल्यानंतर मला या नंबरवर फोन करायचा असल्यास करू शकशील...

मोना - मी... मी या गोळ्यांचे काय करणार पण??

रणजीत - काहीच नाही मोनालिसा.. मात्र.. खरच सांगू??? काही काही वेळा मन इतकं उद्विग्न होतं.. की खरच.. काहीतरी करावसं वाटतं.. बिलीव्ह मी.. अर्थात... तशी वेळ तुझ्यावर येऊ नये.. पण एक मात्र लक्षात ठेव.. डोन्ट हॅव फूड व्हेअर दिज बास्टर्ड्स आर प्रेझेन्ट..

मोना - पण.. तुम्ही स्वतःला कसे जपाल??

शेजारी उभ्या असलेल्या मधुमतीला काही समजतच नव्हते. मगाशी एकमेकांना शिव्या देणारे आता एकदम इतके प्रेमात कसे आले?

रणजीत - मी जपेन.. माझी काळजी करू नकोस... मात्र हां.. जाताना एक पाच हजार देऊन जा.. मला लागतात पैसे...

मोना - हो हो.. पाच काय.. हे घ्या...

रणजीतला खूप आनंद झाला. जवळपास सात आठ हजार होते ते!

रणजीत - कधीपर्यंत आहेस?? मनालीला??

मोना - तुम्हाला जर... माझे काम झाले आहे असे वाटत असेल तर... उद्याच निघेन...

रणजीत - हं... माझ्यामते तुझे काम झालेले आहे...

मधुमतीने सुस्कारा सोडला जो कुणालाच जाणवला नाही.

रणजीत - फक्त... एक गोष्ट राहिलीय...

मोना - काय??

रणजीत - हे घे...

रणजीतच्या हातात एक लहानसा चाकू होता..

मोना - काय... काय आहे हे??

रणजीत - इथे... या माझ्या मनगटावर पटकन सरकव ते.. अगदी अलगद...

मोना - काय बोलताय???

रणजीत - जगमोहनचा विश्वास बसायला आवश्यक आहे ते...

आयुष्यात मोनाला कधी वाटले नव्हते की ती असे काही करू शकेल.. पण रणजीत अक्षरशः कोकलत होता.. मोनाला टपला मारत होता... आणि... मोनालिसाला.. वाईट वाटण्याऐवजी...खुदकन हसूच येत होते... मधुमती मात्र हादरून त्य मनगटातून येणार्‍या रक्ताकडे पाहात होती....

ती दरी उतरायला दिड तास लागला होता... मात्र डोंगर चढायला आणखीनच वेळ लागत होता..

मध्यावर गेल्यावर दोघींनी मागे वळून पाहिले... हाताला पट्टी बांधलेला रणजीत खूप खाली कुठेतरी उभा राहून हात हालवत होता... मोनानेही हात हालवला...

रणजीत तिथूनच ओरडला...

"त्या झबल्यात होतीस तेव्हाच बरी होतीस... मारकुटी झालीयस आता... "

तोंडावर हात ठेवून खदखदून हासत मोहन गुप्तांची मुलगी हिमालयाच्या चमचमत्या बर्फांकडे बघत होती...

===============================================

"मॅडम अहो खरच.. मला खूप भीती वाटते..."

"काही नाही गं... एअर होस्टेसेस असतात तिथे... त्या करतील मदत..."

"अहो पण... मला काही कळतच नाही... "

"त्यात काय कळायचंय?? ट्रेनमध्ये बसतो तसे प्लेनमध्ये बसायचे..."

"आणि पडले बिडले तर ते विमान??"

कालपासून मोनालिसा नुसती हासतच होती. मधुमतीला पहिल्यांदाच कळले होते. मॅडम हासल्या इतक्या छान दिसतात ते! आणि हासतातही छान! तिचे खळखळून हासणे पहिल्यांदा ऐकले तेव्हा नकळत मधु म्हणाली..

"मॅडम.. अजून एकदा हासा ना... किती छान हासता..."

आणि मोनालिसा पुन्हा हसायला लागली होती.

त्यात भरीस भर म्हणून सकाळी सकाळी मनालीच्या हॉटेलमधून चेक आऊट करताना फोन आला..

"गुड मॉर्निंग मॅडम..."

अरे?? या नालायकाला कसा काय नंबर मिळाला आपला? हां! खरच की... आपली अजून झोप पूर्ण झालेली नसावी... आपणच दिला होता नाही का... गुप्त ठेव असे सांगून...

रेजिनाल्डोचा तो नेहमीचाच मिश्कील आवाज ऐकून आजचा दिवस मस्त सुरू झाला हे मोनाला समजले.

मोना - मॉर्निंग... काय?? अचानक सकाळी सकाळी???

रेजिना - काही नाही.. चुकून लागला नंबर खरे तर...

मोना - हो का??? मग ठेवू का आता??

रेजिना - कशाला?? लागलाच आहे कॉल तर होऊदेत थोडे बोलणे...

मोना - अच्छा... म्हणजे हेलिक्सचे पैसे झाडाला लागतात तर...

रेजिना - छे छे... या महिन्याचे बिलच नाही लावणार आहे ना मी??

मोना - अरे हो .. खरच की... कारण सिंगापोरचा एकही कॉल नसेल त्यात... नाही का???

दोघेही हसायला लागले.

मोना - बोला... डॅनलाईनचं एखादं मशीन विकलं जातंय की नाही??

रेजिना - तुम्ही मागवलेली वीस च्या वीस विकली की...

मोना - त्याच्या ऑर्डर्स मीच घेतल्या होत्या...

रेजिना - म्हणूनच फोन केला आहे...

मोना - काय??

रेजिना - काल दिल्ली एअरपोर्टची सहा मशीन्सची एन्क्वायरी आली आहे...

मोना - अरे वा?? अभिनंदन.. घ्या आता ती ऑर्डर...

रेजिना - आर आर डिसूझा ऑर्डर घेतल्याशिवाय राहातच नाही...

मोना - हं.. असं मीही ऐकून आहे... पण अनुभवलेलं नाहीये अजून..

रेजिना - तर तेच विचारायला फोन केला होता...

मोना - काय??

रेजिना - प्रायमरी डिस्कशन्ससाठी आज जाऊ का दिल्लीला??

मोना - हो?? त्यात काय??

रेजिना - नाही.. व्हेअर अबाउट्स माहिती असायला हवेत म्हणून सांगीतले..

मोना - नो प्रॉब्लेम... गो अहेड... बट धिस ऑर्डर इज प्रेस्टिजियस... सो डोन्ट मिस इट...

रेजिना - नॉट अ‍ॅट ऑल..

मोना - हं... आणि परत कधी येणार??

रेजिना - काही नाही.. आज रात्रीच... फार तर उद्या सकाळच्या फ्लाईटने...

मोना - फाईन.. ओके देन... ऑल द बेस्ट...

रेजिना - थॅन्क यू मॅम...

मोना - बाय....

रेजिना - बाय...

मोना - ए... हे.. हेलो???

रेजिना - ...... येस?? हॅलो??

मोना - रिको???

रेजिना - यॅह.. टेल मी???

मोना - तुम्ही आज.. दिल्लीत आहात??

रेजिना - हो... का??

मोना - मीही दिल्लीत आहे.. दुपारी दोन ते संध्याकाळी पाच... आत्ता निघतीय इथून तासाभरात...

रेजिना - वॉव्ह.. पण माझी फ्लाईट तिथे पोचणारच मुळी सहा वाजता...

मोना - ओह.. ठीक आहे... ओके देन....

रेजिना - नाहीतर मग.....

याच वळणाची प्रतीक्षा होती मोनालिसाला!

मोना - ... काय??

रेजिना - पुण्याला काही घाईचे काम नसेल तर... व्हाय डोन्ट यू ऑल्सॉ जॉईन द मीटिंग...

मोना - आत्ता या लेव्हलला मी इन्ट्रोड्यूस व्हायला हवं आहे का??

आहा! काय पण साळसूदपणा!

रेजिना - नाही नाही तसं नाही... मी आपलं सुचवलं... एवीतेवी येताच आहात दिल्लीला तर...

मोना - बघते मग... जमलं तर थांबते...

रेजिना - ओक्के.. मी असं करतो... अशोकाला बुकिंग नुसतं करून ठेवतो... कॅन्सल झालं तर कळवा...

मोना - हं..

उडी मारून बेडमधून उठावेसे वाटत होते मोनाला! थांबणारच होती ती दिल्लीला! फोन ठेवला तितक्यात फ्रीजमधला ज्यूस घेऊन मधुमती बेडजवळ उभी होती..

"ज्यूस मॅडम"

मोनाने तिच्या हातातील ग्लास साईड टेबलवर ठेवून मधुमतीला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का दिला...

"थॅन्क्स.. मधु.. तू पुण्याला जा... मला मीटिंग आहे दिल्लीत..."

आणि आत्ता दिल्ली एअरपोर्टवर मधुला सोडून मोनाची आलिशान टॅक्सी अशोकाकडे वळत होती.

मधुमतीला कालपासून दिलेल्या अखंड लेक्चरमुळे मोनालिसा निश्चींत होती. ती एक अक्षरही बोलणार नाही हे तिला माहीत होते.

मीटिंगला कोण जातंय??? फर्स्ट राऊंड तर आहे डिस्कशन्सची... बघेल रेजिना...

तिने फक्त इंटरकॉमवरून आर आर डिसूझा हे बुकींग आहे ना इतकेच कन्फर्म केले.. आणि त्यांना 'मी इथे आहे' असा निरोप ठेवायला सांगीतला...

रात्री साडे दहा वाजता एखाद्या प्रेयसीच्या थाटात ती वाट पाहात बसली होती रेजिनाच्या कॉलची...

.... खूप चिडली होती त्याच्यावर.. पण राग प्रदर्शीत करणे शोभून दिसत नव्हते... उगाचच टी व्ही बघत ज्यूस सिप करत बसली होती... एक दोनदा रिसेप्शनवर विचारलेही... पण रिको आलेला नव्हता....

शेवटी अकरा वाजता ती कंटाळून उठली...

.... फराफरा साडी सोडून फेकून दिली बेडवर आणि कडवट चेहरा करून चेंज करू लागली... तोंडातल्या तोंडात पुटपुटत नावे ठेवत होती रेजिनाला...

मोठा मीटिंग करतोय... मला कशाला थांबवलं... आपल्याला हे असलं वागणं शोभून दिसत नाही.. एकदा या सगळ्यातून पार पडलो की रेजिना साथीदार होईल का हे बघायला हवं.. आत्ता काहीही नाही...

... नालायक! बॉस कधी थांबतो का असिस्टन्टसाठी... डॅड असते तर आपल्याला शिव्यांची लाखोली वाहिली असती आत्ता... आपल्याला काही अक्कलच नाही आहे...

.......आता मात्र हद्द झाली... पावणे बारा?? गेला की काय पुण्याला?? त्याच्या घरी फोन करावा का?? नकोच... काहीतरी गैरसमज पसरायचे... आपण दिल्लीत त्याला भेटायचा प्लॅनच नको होता करायला.. आत्ता एखादा हेलिक्सचा एम्प्लॉयीसुद्धा इथे असू शकतो... बावळट आहोत आपण...

..... बाराला पाच कमी! ... जाऊदेत... त्याला किंमत नाही आहे तर आपण कशाला जागे राहायचे आहे?? आता फोन आला तरी घ्यायचा नाही..

बेडवरची एक उशी पडल्या पडल्याच तिने लांब भिरकावली. झोपही येत नव्हती. निदान त्याचा फोन यावा आणि त्याच्यावर भरपूर तोंडसुख घेऊन त्याला 'न प्राप्त' होण्याचे दु:ख तरी द्यावे आणि सूड उगवावा ही तिची मनोकामना काही पूर्ण होत नव्हती.

कानात उगाचच फोन वगैरे वाजल्याचे आवाज आल्याचे भास होत होते.

शेवटी तिने बॅगमधील ब्लॅक डॉग काढली आणि एक छोटा पेग तयार केला...

ट्रिंग ट्रिंग....

फोनकडे तुच्छ कटाक्ष टाकून तिने चार, पाच रिंग्ज वाजू दिल्या... फोन उचलायची इच्छा प्रचंड होती आणि न उचलायची इच्छाही.. शेवटी मोहाने विजय मिळवला...

जणू 'काय हा वैताग' अशा भूमिकेतून फोन उचलला आणि कानाला लावला...

तोच तो मिश्कील आवाज... ज्याच्यात विरघळून जावेसे वाटते... जणू काही झालेच नाही आहे असा स्वर...

"हेलिक्सच्या एम डीं ना जन्मदिवसाच्या लाखो शुभेच्छा..... आणि त्या सरप्राईज म्हणून देता याव्यात म्हणूनच थांबलो होतो... बुके द्यायला रेजिना येऊ शकतो का आतमध्ये????"

आपण मूर्खासारखा स्वतःचाच वाढदिवस विसरलो????

काय रात्र होती ती! सकाळी दहा वाजेपर्यंत रात्रच चाललेली होती...

रेजिनाच्या मिठीत उभ्या उभ्याच मोनालिसा झुलत होती... तिच्या सर्वांगावर जणू मध असावा तसा रेजिना तिचा रोम अन रोम चुंबत होता... दोघे नुसते हासत होते... मधेच मोनालिसा त्याच्यावरचा राग त्याचा कान चावून व्यक्त करत होती....

....

मोना - प्रेम करायला वेळेवर यायचं यापुढे...

रेजिना - मग ऑर्डर्स कशा मिळणार.. मी बिचारा एकच भूमिका वठवू शकतो... सेल्समॅन... नाहीतर नुसताच 'मॅन'!

मोना - मी असेन तेव्हा सेल्स थांबवायचा...

रेजिना - हं... पर्चेस सुरू करायचा...

मोना - अरे वा? दिल्ली एअरपोर्टच्या मीटिंगसाठी अगदी शेव्हन गिअर्स असतात तशी दाढी केलेली दिसतीय..

रेजिना - छे छे... मीटिंग झाल्यानंतर दाढी केली..

मोना - म्हणजे खुंट तशीच ठेवून गेला होतास मीटिंगला??

रेजिना - हो मग काय... तिथल्या परफॉर्मन्सपेक्षा इथला परफॉर्मन्स महत्वाचा...

मोना - मग सुरू कधी करणार परफॉरमन्स????

रेजिना - वेळ यावी लागते...

मोना - ताबडतोब सुरू करायचा.. आय अ‍ॅम द बॉस...

रेजिना - आय नो दॅट... पण आत्ता या क्षणी... मला तुझा बॉस व्हायचंय...

मोना - ही मी तयार आहे भूमिका काही काळासाठी बदलायला...

रेजिनाने मोनालिसाला तसेच उचलले आणि बेडवर अलगद ठेवले.

रेजिना - आज तुला ऐन रंगात आल्यावर कोणताही फोन येणार नाही अशी अपेक्षा करूयात....

मोना - आज कोणताही फोन आला तरी तू ऐन रंगात यायचे आहेस असा माझा आदेश आहे...

रेजिना - ओक्के बॉस...

आपले अंग कधी रेजिनाच्या मिठीत व्यापले गेले हेही मोनालिसाला समजले नाही...

.. आज ती फक्त एक प्रेयसी होती... नो बिझिनेस बिझिनेस..

भारताच्या राजधानीत एक प्रेमी युगूल सकाळी दहा वाजेपर्यंत एकमेकांशी लढत होते...

... आणि ... सकाळी अकरा वाजता खरच फोन वाजला...

आता तरी चेक आऊट करताय का असे विचारण्यासाठी रिसेप्शनवर्न फोन आला असावा अशा अंदाजाने मोनाने फोन घेतला.. रेजिनाने बावळटासारखा आधी फोन हातात उचलला सवयीने.. मोनाने त्याच्या हातावर थप्पड मारली तेव्हा त्याला समजले... आपण आपल्या रूममध्ये नाही आहोत...

मोना - येस???

रिसेप्शन - मॅम... देअर आर दीज टू जन्टलमेन विलिंग टू टॉक टू यू...

मोना - हु??

रिसेप्शन - वुड यू... लाईक टू टॉक टू देम मॅम...

मोना - हं... गिव्ह द लाईन प्लीज???

तो - हलो...

मोना - येस???

तो - आय अ‍ॅम फ्रॉम लॉ... वुई केम टू नो यू आर पझेसिंग ड्रग्ज हार्मफुल टू ह्युमन लाईफ.. प्लीज कम डाऊन...

गुलमोहर: 

अरे बापरे!!! असे कसे झाले??? Uhoh मोनावर कोण लक्ष ठेवून आहे नेमके??

हिमाचलचे वर्णन वाचतांना मी केलेल्या युथ हॉस्टेल ट्रेकची आठवण झाली... हिमाचललाच गेले होते. ती एकाकी टपरी आणि विचित्र चव असणार्‍या चहाविषयी वाचून आम्ही प्यायलेला बकरीच्या दुधाचा चहा आठवला.... अशीच अतिशय विचित्र चव...
गारठणार्‍या थंडीत स्लिपिंग बॅगमधे कुडकुडत काढलेली झोप आठवली.

आजच्या भागातले मोना आणि रणजीतमधले संवाद वाचायला खुप मजा आली. विशेषतः हा संवाद वाचला आणि खुप हसले...
**********************************************************************************************************************
मोना - माझ्या आईने माझ्यासाठी शिवलेले झबले तुमच्या घरी कसे काय???

रणजीत - सगळ्यांचे पोस्ट मॉर्टेम होत असताना तू एकटीच बागडतीयस हे पाहून डिपार्टमेंटला संशय आला की तू तर नसशील ना विषबाधा केलेली? म्हणून तुझी तपासणी केली... तेव्हा हे झबले मधे येत होते... म्हणून काढून ठेवले ते माझ्याच घरी राहिले...

**********************************************************************************************************************

Rofl

बेफिकिरजी १च नंम्बर, काय लिहावे राव....
आज २ भाग वाचायला मिळाले, खुपच छान, आणि खरच तुमच कोतुक कराव तेवढ कमिच, मनाच्या ह्या अश्या असह्य अवस्थेत हि तुम्हि अफाट लिहिलत, दोन्हिहि भाग तितकेच अप्रतिम, काय म्हणावे ह्याला. ग्रेट परफॉरमन्स....

अजुन एक, एक विचारावेसे वाटते आहे, पण धिर होत नाहि.... Sad