शे(अ)रो शायरी, भाग-७ : वो लब कि जैसे सागर-ए-सहबा दिखाई दे

Submitted by मानस६ on 31 October, 2010 - 06:27

प्रिय मित्रांनो,
शे(अ)रो शायरीच्या ह्या ७व्या भागात आपण कृष्णबिहारी नूर ह्यांच्या एका, अतिशय रोमॅंटीक मतला असलेल्या, गझलेचा आस्वाद घेणार आहोत. ही गझल मी पहिल्यांदा नेटवर, दुबईला झालेल्या एका मुशायऱ्याच्या ऑडियो क्लिपमधे ऐकली, तेथे तिला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.. गझलही तशीच आहे..लाजवाब!
मतला बघा कसा रसरशीत आहे तो,.....एका बहारदार कल्पना-विलासाचा नमुना आहे! तो असा की-

वो लब कि जैसे साग़र-ए-सहबा दिखाई दे
जुम्बिश जो हो तो जाम छलकता दिखाई दे

[ १) लब= ओठ, २) सहबा= मदिरा ३) जुम्बिश= हालचाल ]

शायर म्हणतो की, त्या लावण्यवतीच्या ओठांचे सौन्दर्य काय वर्णावे, ते इतके सुंदर आहेत की जणू रक्तिम रंगाच्या मदिरेचा सागरच भासतोय.. आणि ह्या नंतरचा मिसरा तर कमाल आहे. शायर पुढे म्हणतो की, एखादा लाडिक अविर्भाव करताना किंवा बोलताना, जर ह्या ओठांची किंचितशी जरी हालचाल झाली तर जणू मदिरेने भरलेला एखादा चषकच हिंदकळल्याचा भास होतो !... क्या बात है!

दरिया में यूँ तो होते हैं क़तरे ही क़तरे सब,
क़तरा वही है जिसमें के दरिया दिखाई दे

[ १) क़तरा = थेंब ]

कवि म्हणतोय की समुद्र हा अनेक थेंबांचा मिळून बनलेला आहे, पण त्यातील ज्या थेंबात संपूर्ण सागराचेच दर्शन होईल, त्याच थेंबाच्या अस्तित्वाला अर्थ-पूर्ण म्हणता येईल. पण ह्यातील भावार्थ काय?.. मला स्वत:ला असा जाणवला की जगाच्या सागरात अनेक, अगणित माणसे आहेत,जे त्यातील थेंबांसारखेच आहेत, जे आपापल्या परीने जीवन जगत असतात, पण त्यापैकी खरी दरिया-दिल वृत्ती घेऊन एखादाच मनुष्य जगतो, इतरांना आपल्या मनाच्या विशालतेचे दर्शन घडवितो, आणि त्याच्याच जीवनाला खरा अर्थ आहे. तो एका थेंबासारखा असला तरी तोही सागरच आहे

क्यों आईना कहें उसे पत्थर न क्यों कहें,
जिस आईने में अक्स न उसका दिखाई दे

[ १) अक्स = प्रतिबिंब ]

ह्या शेरात, मला वाटते, कवि मानवी मनाला आरसा म्हणून संबोधतो आहे, आणि ’उसका अक्स’ म्हणजे -परमेश्वराचे प्रतिबिंब! ज्या मनाच्या आरश्यात ईश्वराचे प्रतिबिंब पडत नाही, ज्या मनात डोकावल्यावर दैवी सदगुणांचा अंश देखील दिसत नाही, त्या मनाला दगड नाहीतर दुसरे काय म्हणायचे? अश्या मनाला आरसा म्हणून का संबोधावे? तो निव्वळ एक जिवंत पाषाणच म्हणावा लागेल...माणसाने आपले मन:पटल नेहमी मानस-सरोवरासारखेच निर्मल ठेवावे, असेच बहुदा कविला सुचवायचे असावे.

उस तश्ना-लब की नींद न टूटे दुआ करो,
जिस तश्ना-लब को ख़्वाब में दरिया दिखाई दे

[ तश्ना-लब= तहानेने ज्याचे ओठ कोरडे पडले आहेत असा ]

येथे तश्ना-लब ह्या शब्दाला आशयाचे अनेक तरल संदर्भ वाचकाला जाणवू शकतात.. जसे की, असा एखादा मनुष्य, ज्याच्या इच्छा-आकांक्षा आयुष्यात कधीच पूर्ण झालेल्या नाहीत, एखाद्या व्यक्तीचे प्रेम, सहवास मिळणे हे त्याच्यासाठी निव्वळ मृगजळ लाभण्यासारखेच आभासमय राहिले आहे. वास्तव जीवनात त्याला जे हवे ते कधीच मिळाले नाहीय. जणू असा एखादा व्यक्ती, जो युगानुयुगे भावनिक ओलाव्यासाठी तहानलेला आहे, पण प्रेम-रुपी पाण्याचा एक थेंबही त्याच्या वाट्याला आलेला नाहीय. मग अश्या तृषार्त व्यक्तीला जर स्वप्नांच्या जगात एखादा प्रेम-रुपी, भावना-रुपी दरिया दिसला तर तो किती आनंदून जाईल. त्याला जे वास्तवात मिळाले नाही, ते जर त्याला, स्वप्नांच्या जगात काही क्षणांसाठी का होईना, पण मिळत असेल, तर त्या बिचाऱ्याची निद्रा उघडून त्याचा स्वप्न-भंग न होवो, अशीच पार्थना आपण देवाकडे करायला हवी, असे कवि म्हणतोय.

कैसी अजीब शर्त है दीदार के लिये,
आँखें जो बंद हों तो वो जल्वा दिखाई दे

[ १) दीदार = दर्शन , २) जल्वा = शोभा, दर्शन, तेजो-वलय ]

ह्या शेर शायराने अतिशय खुबीने लिहिलाय,...अर्थाचे एकाहून अधिक पदर दिसू शकतात. माझ्या मते ह्यात एक अध्यात्मिक आशय आहे. कवि म्हणतोय की परमेश्वराचे रूप बघायाचे असेल, त्याचे खरे-खुरे दर्शन घ्यायचे असेल तर, एक मोठी विचित्र अट आहे, ती म्हणजे आपले चक्षू, ज्यांनी आपण नेहमी बाहेरचे भौतिक जग बघतो, तेच काही वेळासाठी बंद करावे लागतील. म्हणजे डोळे बंद करून, सर्व वृत्तींना अंतर्मुख करुन, आपल्या अंतरात्म्याच्या गहराईत जर डोकावून बघितलेत, तर तिथेच तुम्हाला अल्लाहचे दर्शन होईल. वा वा!
हा शेर तसा प्रेयसीला देखील लागू पडू शकतो. प्रेयसी प्रियकरापासून दूर निघून गेल्यामुळे त्यांच्या गाठी-भेटी होऊ शकत नाहीत, त्याच्या डोळ्यांना तिची छबी दिसू शकत नाही. पण तिची प्रतिमा मात्र त्याच्या अंतर्मनात खोलवर कोरल्या गेली आहे.., इतकी की प्रियकराने जर डोळे बंद केले तर लगेच तिचे रुप त्याच्या मन:चक्षूसमोर उभे राहते, आणि तिचे दर्शन होते,..परंतु डोळे बंद केल्याविना नाही! म्हणून शायर म्हणतोय की मला माझ्याच प्रेयसीला बघण्यासाठी परिस्थितीने बघा किती विचित्र अट घातलीय, की तिचे दर्शन घ्यायचे असेल तर आधी डोळे बंद कर!

क्या हुस्न है, जमाल है, क्या रंग-रूप है,
वो भीड़ में भी जाये तो तनहा दिखाई दे

[ १) जमाल= सौन्दर्य २) तनहा= एकटी, एकटा ]

ह्या शेरात एका रुपवान तरुणीच्या सौन्दर्याचे वर्णन कविने एका अनोख्याच ढंगाने केलेय. कवि म्हणतो की त्या मदालसेचे रंग-रुप, लावण्य, त्यातील जादू, हे इतके एकमेवाद्वितिय आहे, की ती गर्दीत जरी उभी असेल, तरी, तिच्या अवती-भवती कुणीच नसून, ती एकटीच आहे असेच भासमान होते. तिच्या स्वर्गीय लावण्यामुळे, त्या गर्दीत ती इतकी उठून दिसते की नजर फक्त तिच्यावरच खिळून राहते, आणि तिच्या आजूबाजूला कुणीच नाहीय, असा दृष्टीला भास होतो...तिच्या सौन्दर्यापुढे आजूबाजूच्या जगाचे अस्तित्वच जणू विरघळून जाते, आणि बघणाऱ्याला ती एकटीच फक्त दिसते...क्या बात है!
ह्या गझलेची साऊंड क्लिप आपण www.mushaira.org ह्या संकेत-स्थळावर ऐकू शकता, जरूर भेट द्यावी.
चला तर, आता आपला निरोप घेतो, पुढील भागात भेटूच! सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

-मानस६

गुलमोहर: 

फार छान गझल.... मानसजी,कृष्णबिहारींच्या अजुन गझला कुठे मिळतील?
ही लेखमाला संपूच नये.. Happy

कैलाशजी, मयुरेश..धन्यवाद
कैलाशजी, गुगलवर शोधावे, तेथे नक्कीच सापडतील
-मानस६

व्वा मानस फार छान गझल आणि तितकेच मस्त विवेचन...

कैलासना अनुमोदन... ही लेखमाला अशीच चालू ठेवा

सुंदर मालिका! नेहमीप्रमाणेच सुंदर विवेचन!

अभिनंदन!

क्या हुस्न है, जमाल है, क्या रंग-रूप है,
वो भीड़ में भी जाये तो तनहा दिखाई दे>>>

काय उपयोग त्या रुपाचा, सौंदर्याचा! इतकी माणसे आजूबाजूला असून शेवटी एकटीच राहिलीस (गर्वाने)!

(असा एक अर्थ मी लावला - लावला म्हणण्यापेक्षा वाटला.)

अजून गझलांच्या प्रतीक्षेत! आपण खूप जिवंत विवेचन करता हे लिहायला हवेच!

-'बेफिकीर'!

अरे वा.. इतका प्रोत्साहनपर प्रतिसाद बघून हुरूप वाढलाय.. नक्कीच अधिक चांगल्या गझला आपल्या सोबत शेअर करीन..मन;पूर्वक धन्यवाद..सर्वांचेच
-मानस६

एक अत्यंत सुंदर गझल वाचल्याचा अनुभव!! उत्तम!
अर्थ सांगतानाही त्याला परमेश्वराचे, अध्यात्माचे पदर जोडून उत्तम रसग्रहण केले आहे.

कैसी अजीब शर्त है दीदार के लिये,
आँखें जो बंद हों तो वो जल्वा दिखाई दे

लाजवाब!

उस तश्ना-लब की नींद न टूटे दुआ करो,
जिस तश्ना-लब को ख़्वाब में दरिया दिखाई दे

कैसी अजीब शर्त है दीदार के लिये,
आँखें जो बंद हों तो वो जल्वा दिखाई दे

क्या हुस्न है, जमाल है, क्या रंग-रूप है,
वो भीड़ में भी जाये तो तनहा दिखाई दे

हे तीन शेर अक्षरशः भिडले. सुंदर गझल आणि त्याहून सुंदर विवेचन!!!

मतल्याबद्दल एक प्रश्न (सर्व जाणकारांनी आपापली मते मांडावीत....)

उर्दू गझलेत प्रेयसीच्या सौंदर्याचे वर्णन करणारे शेर दर्जाच्या दृष्टीने सामान्य मानले जात असे वाचले आहे..(संदर्भ : "गजल" प्रा. डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी), हे प्रमाण मानावे का? इतर तज्ञांची काही मते इथे कळाली तर आनंद होईल.

धन्यवाद

- विजय दि. पाटील

दरिया में यूँ तो होते हैं क़तरे ही क़तरे सब,
क़तरा वही है जिसमें के दरिया दिखाई दे
या शेराची उकल फारच भावली.....
एक तर मुळ गझलच अफाट ,त्यात आपल्या लिहिण्याने चार चॉंद लागले....
क्यों आईना कहें उसे पत्थर न क्यों कहें,
जिस आईने में अक्स न उसका दिखाई दे>>> हा शेर प्रेयसीसाठीही लागू होऊ शकेल ना?
तेरी तस्वीर न हो वो शीषा तोड देंगे हम ....टाईप