डाळ बाटी

मसाला डालबाटी

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

बाटिसाठी
दोन कप बरिक रवा. एक मोठे गाजर, अर्धा टिन स्वीट कॉर्न, अर्धा कप दूध, मीठ
सारणासाठी
तीन मोठे बटाटे उकडून, अर्धा टिन स्वीट कॉर्न, धणे जिरे पावडर एक चहाचा चमचा, लाल तिखट एक चहाचा चमचा, मूठभर बेदाणे, हवे तर काजू तूकडा मुठभर
डाळी साठी
एक कप तुरिची डाळ, अर्धा कप इतर कुठलीही डाळ, अर्धा कप आवडले कडधान्य ( मूग, चवळी आदी ), तीन चार लाल मिरच्या ( सांडगी असल्या तर उत्तम ) तीन चार हिरव्या मिरच्या, धणा जिरा पावडर, दोन चहाचे चमचे, हळद, हिंग, मीठ, लाल तिखट व कोथिंबीर

लागेल तसे तेल व तूप

क्रमवार पाककृती: 

बाटिसाठी
रव्यात तीन चहाचे चमचे तूप वा तेल घालून हाताने चोळून घ्या. मग त्यात गाजर बारिक किसून घाला. स्वीट कॉर्न बारिक वाटून घाला. दुध व मीठ घालून शक्यतो पाणी न वापरता फार घट्ट नाही वा फार सैल नाही असे मळा ( रवा असल्याने थोड्या वेळाने मिश्रण घट्ट होणार हे लक्षात ठेवा )

सारणासाठी
उकडलेले बटाटे कुस्करा, पण फार बारिक करु नका. त्यात स्वीट कॉर्नचे अख्खे दाणे व बाकीचे जिन्नस घालून हलक्या हाताने एकत्र करा. मळू नका.

रवा निदान अर्धा तस तरि भिजवून ठेवा. मग त्याचे लिंबाएवढे गोळे करा. तेलाचा हात लावून त्याची पारी करा. त्यात सारण घाला. मग बाट्याचे तोंड बंद करा. हलक्या हाताने दाबून पेढ्यासारखा आकार द्या.
एका डिशला तेलाचा हात लावा. त्यावर बाट्यांचा एक थर द्या. वरुन थोडे तूप वा तेल लावा. गरम ओव्हनमधे दहा मिनिटे ठेवा. एका बाजूने झाल्या की परतून घ्या. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग यायला हवा. ओव्हन नसेल तर या बाट्या तव्यावर वा पॅनमधेही भाजता येतात. आधी थोडा वेळ झाकण ठेवा, मग झाकण काढून भाजा.

डाळीसाठी
सर्व डाळी व कडधान्य हळद व हिंग घालून शिजवा. तेल वा तूप तापवून त्यात लाल वा सांडगी मिरच्या तळून घ्या व कुस्करा. त्यातच हिरव्या मिरच्या परता. टोमॅटोचे तूकडे घाला, तेल वा तूप सुटेपर्यंत परता.
मग त्यावर शिजलेली डाळ घाला. मीठ घाला. तिखट व मसाले घालून उकळा. शक्यतो साखर वा गुळ घालू नका. सारण उरले असेल तर तेहि डाळीत घाला. वरुन कोथिंबीर घाला.

डिशमधे बाट्या घ्या, चमच्याने जरा दाबून तूप घाला व वरुन डाळ घालून खा.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

पारंपारि़क डाळ बाटी करताना, भाजण्याचे तंत्र जमवावे लागते. निखार्‍यावर भाजल्याची चव घरी आणता येत नाही. त्या मानाने या बाट्या भाजायला सोप्या आहेत. लवकर भाजल्या जातात.
मसाल्याची डाळ नको असेल तर साधे वरण करता येते. त्याला तूपाची जिर्‍याची फोडणी द्यायची. व हिरव्या मिरच्या आणि दाणे यांची चटणी घ्यायची. वरुन लिंबाचा रस पिळायचा.

माहितीचा स्रोत: 
सलत सूर सनईचा, हि कादंबरी वाचल्यापासून मला डाळबाटीचा ध्यासच लागला. एका राजस्थानी ढाब्यावर अस्सल चीज खाल्ली. ते बघून प्रयोग करु लागलो. आणि ..