इथल्या कविता कोठे नेऊ?

इथल्या कविता कोठे नेऊ?

Submitted by बेफ़िकीर on 16 December, 2014 - 23:25

कविता - इथल्या कविता कोठे नेऊ?

लाजिरवाण्या आतंकाच्या
केविलवाण्या माणुसकीच्या
ओंगळवाण्या मृतदेहांच्या
इथल्या कविता कोठे नेऊ?

बालपणी ते सांगत होते
कविता इतकी सुंदर असते
हिरव्या हिरव्या टेकाडावर
लाडिक हृदयांचे घर असते

आजूबाजू झाडी असते
फुललेली शेताडी असते
आपुलकीच्या तालावरती
एक थिरकती वाडी असते

तिथले जगणे उत्सव असते
नुसते असणे वैभव असते
देहांमधुनी फसफसलेले
माणुसकीचे लाघव असते

लहानपण गेलेही मागे
स्नेहाशी तुटलेही धागे
सुंदर मी होईन कधी ह्या
प्रतीक्षेतली कविता जागे

पण मग येतो तो अतिरेकी
ज्याला नसते नांव एकही
अन् त्याची कृत्ये उद्रेकी
सोडतात ना गाव एकही

Subscribe to RSS - इथल्या कविता कोठे नेऊ?