इथल्या कविता कोठे नेऊ?

Submitted by बेफ़िकीर on 16 December, 2014 - 23:25

कविता - इथल्या कविता कोठे नेऊ?

लाजिरवाण्या आतंकाच्या
केविलवाण्या माणुसकीच्या
ओंगळवाण्या मृतदेहांच्या
इथल्या कविता कोठे नेऊ?

बालपणी ते सांगत होते
कविता इतकी सुंदर असते
हिरव्या हिरव्या टेकाडावर
लाडिक हृदयांचे घर असते

आजूबाजू झाडी असते
फुललेली शेताडी असते
आपुलकीच्या तालावरती
एक थिरकती वाडी असते

तिथले जगणे उत्सव असते
नुसते असणे वैभव असते
देहांमधुनी फसफसलेले
माणुसकीचे लाघव असते

लहानपण गेलेही मागे
स्नेहाशी तुटलेही धागे
सुंदर मी होईन कधी ह्या
प्रतीक्षेतली कविता जागे

पण मग येतो तो अतिरेकी
ज्याला नसते नांव एकही
अन् त्याची कृत्ये उद्रेकी
सोडतात ना गाव एकही

रक्तमाखल्या धरतीवरती
तुटलेले अवयव पडलेले
अजून जे फुलले नव्हते ते
केविलवाणे वय पडलेले

मगाशीच जो खेळत होता
डबा खाउनी हासत होता
काळाने नेलेला आहे
तो आता मेलेला आहे

आक्रोशाच्या सन्नाट्याने
मृतदेहांच्या दुर्गंधाने
मांसाच्या लगद्यालगद्याने
रक्ताच्या त्या शिडकाव्याने
बरबटलेल्या इथल्या कविता
इथल्या कविता कोठे नेऊ?

कविता तर सुंदर असते ना?

असल्या कविता कोठे नेऊ?

===================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरय बेफिजी,कालच्या सारख्या घटनांचा निषेध व्यक्त करायला योग्य शब्दसुध्दा सापडत नाहीत...
हे सगळ काय चाललय?डोळ्यात जमणारया अश्रूंचीदेखील संतापाने वाफ होऊन जाईलसं वाटतंय.

बेफी Sad