जुनाट कपडे

एकांत (बालविक्रिडीत वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 20 January, 2014 - 09:57

काढत बसते जुनाट कपडे कपाटातले,
गोंडस झबले विजार इवली जरी फ़ाटले...
लाजत पहिला खट्याळ गजरा हळू पाहते,
रेशम लुगडी कधी पसरते घड्या घालते....

गोल वळकटी निखार भरल्या तरी खोलते,
पत्रविवरणे मला खरडली पुन्हा मोजते....
पान निसटले कुठून जरका तिथे खोचते,
खंगत पडल्या उदास कविता कधी वाचते,

आठव सगळे जमून मजला उगा टोचती,
थेंब निथळते भकास नयनी सदा वाहती...
रोज गवसते जरी कवडसा भुयारात मी
खोदत हसते मनात दडली जुनी खाण मी....

भग्न तसविरी विराण पुसते दिसाया जरा,
हार बदलते कृत्रिम पिवळा जसा की खरा .....
बांधव नवरा मुले विलगली अनायास का,
आत तडपण्या उरात उरले अता श्वास का.....

Subscribe to RSS - जुनाट कपडे