निमूट माझे जिणे

निमूट माझे जिणे...

Submitted by आनंदयात्री on 12 August, 2013 - 03:15

(या गझलेची प्रेरणा - सुरेश भटसाहेबांची "निमूट माझे जिणे मला सोसता न आले" ही ओळ)

मनातलेही मनामध्ये ठेवता न आले
निमूट माझे जिणे मला सोसता न आले

सुरेख होत्या छटा तरीही उदासवाण्या!
नभास वेळीच हुंदके रोखता न आले

चिकार केला प्रवास पण ना स्मरे कुणाला!
कुठेच माझे ठसे मला सोडता न आले

म्हणायची ती, "नकोस मागू, कुठून आणू?"
तिच्यात होते, तिला मुळी शोधता न आले

तिला मिळाला हळूच झोका कुठुन तरी, मग -
जमीन सुटली, हवेतही थांबता न आले

कधीच समजून घेत नाहीस ना मला तू?
म्हणा, मलाही कधीच समजावता न आले

तुला हवे जे तसे वागुनी मला बघू दे
मला हवे जे तुला कधी वागता न आले

Subscribe to RSS - निमूट माझे जिणे