निमूट माझे जिणे...

Submitted by आनंदयात्री on 12 August, 2013 - 03:15

(या गझलेची प्रेरणा - सुरेश भटसाहेबांची "निमूट माझे जिणे मला सोसता न आले" ही ओळ)

मनातलेही मनामध्ये ठेवता न आले
निमूट माझे जिणे मला सोसता न आले

सुरेख होत्या छटा तरीही उदासवाण्या!
नभास वेळीच हुंदके रोखता न आले

चिकार केला प्रवास पण ना स्मरे कुणाला!
कुठेच माझे ठसे मला सोडता न आले

म्हणायची ती, "नकोस मागू, कुठून आणू?"
तिच्यात होते, तिला मुळी शोधता न आले

तिला मिळाला हळूच झोका कुठुन तरी, मग -
जमीन सुटली, हवेतही थांबता न आले

कधीच समजून घेत नाहीस ना मला तू?
म्हणा, मलाही कधीच समजावता न आले

तुला हवे जे तसे वागुनी मला बघू दे
मला हवे जे तुला कधी वागता न आले

मनात होत्या गगन भरार्या, समुद्र-सफरी
मनास पाऊल एकही टाकता न आले

बसून रात्री दिवसभराचा हिशेब केला
सुटे सुटे सुख खिशातले मोजता न आले

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/08/blog-post_6918.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो आया काय सुरेख शेर केलेत आज ...काय बोलू किती छान आहेत आहा!!मस्त!!
धन्स !!!

कुठला कोट करू सगळेच खोलवर आत घुसलेत ....हं.. हा...झोक्याचा माझ्यासाठी एकदम एकदम काळीज हेलावणारा

सुरेख होत्या छटा तरीही उदासवाण्या!
नभास वेळीच हुंदके रोखता न आले

चिकार केला प्रवास पण ना स्मरे कुणाला!
कुठेच माझे ठसे मला सोडता न आले

बसून रात्री दिवसभराचा हिशेब केला
सुटे सुटे सुख खिशातले मोजता न आले<<<

सुरेख शेर. खूप आवडले.

तुला हवे जे तसे वागुनी मला बघू दे<<< तुला हवे जे तसे मला वागुनी बघू दे ! असे केल्यास वृत्त बदलणार नाही.

तिला मिळाला हळूच झोका कुठुन तरी, मग -
जमीन सुटली, हवेतही थांबता न आले<<< वा, हाही शेर आवडला.

तिच्यात होते, तिला मुळी शोधता न आले - या शेरावर विचार करत आहे, नीट लक्षात आला नाही.

गझल आवडली.

(मनामध्ये मधील 'ध्ये' चा उच्चार तुम्ही जोर न लावता करता हे मागील एका गझलेवरील चर्चेतून माहीत झालेले आहे)

क्या बात है...प्रत्येक शेर काबिले तारीफ..

तिला मिळाला हळूच झोका कुठुन
तरी, मग -
जमीन सुटली, हवेतही थांबता न आले

चिकार केला प्रवास पण ना स्मरे
कुणाला!
कुठेच माझे ठसे मला सोडता न आले

तुला हवे जे तसे वागुनी मला बघू
दे
मला हवे जे तुला कधी वागता न आले

हे तर फार फार आवडले ..:)

मनातलेही मनामध्ये ठेवता न आले
निमूट माझे जिणे मला सोसता न आले>> वोक्के लगा

सुरेख होत्या छटा तरीही उदासवाण्या!
नभास वेळीच हुंदके रोखता न आले>> जबरा!!

चिकार केला प्रवास पण ना स्मरे कुणाला!
कुठेच माझे ठसे मला सोडता न आले>> व्व्व्व्वाह!

म्हणायची ती, "नकोस मागू, कुठून आणू?"
तिच्यात होते, तिला मुळी शोधता न आले>> ज्जे ब्बात

तिला मिळाला हळूच झोका कुठुन तरी मग -
जमीन सुटली, हवेतही थांबता न आले >> हॅट्स ऑफ!

कधीच समजून घेत नाहीस ना मला तू?
म्हणा, मलाही कधीच समजावता न आले>> हाहा.. टू गुड..

तुला हवे जे तसे वागुनी मला बघू दे
मला हवे ते तुला कधी वागता न आले>> सुंदर... (तक्रार असूनही)

मनात होत्या गगन भरार्‍या, समुद्र-सफरी
मनास पाऊल एकही टाकता न आले >> अप्रतिम...

बसून रात्री दिवसभराचा हिशेब केला
सुटे सुटे सुख खिशातले मोजता न आले>> खासम खास, इट्स यू हिअर.......

मजा आणलीस, जियो!

तिला मिळाला हळूच झोका कुठुन तरी, मग -
जमीन सुटली, हवेतही थांबता न आले ..
यावर काय बोलणार अधांतरातून ! ले.शु.

म्हणायची ती, "नकोस मागू, कुठून आणू?"
तिच्यात होते, तिला मुळी शोधता न आले... क्या बात !

ह्याची नशा उतरल्यावर पुढच वाचते रे Happy

सुरेख होत्या छटा तरीही उदासवाण्या!
नभास वेळीच हुंदके रोखता न आले >> खूप सुरेख!
पूर्ण गझल अतिशय आवडली, नचिकेत!

सर्वांना मनापासून धन्यवाद! Happy

बागेश्री, बर्‍याच दिवसांनी?? Happy
सुप्रिया, उतरली की नाही अजून नशा? Wink
रिया, Happy

बेफिकीर, सुचवणी चांगली आहे.
तिच्यात होते, तिला मुळी शोधता न आले - या शेरावर विचार करत आहे, नीट लक्षात आला नाही.
>> एकदम सोप्पा आहे... सापडेल अर्थ... Happy