राजहंस

Submitted by SharmilaR on 22 March, 2024 - 01:41

(अन्यत्र पूर्वप्रकाशित)
राजहंस

‘वाहत्या गंगेत हात धुतले, तर निदान पापातून मुक्त झाल्याचं मानसिक समाधान तरी मिळत असेल. पण गटारातल्या पाण्याचे शिंतोडे दुसऱ्यांवर उडवून, काय.. मिळतं काय लोकांना..? कसलं आसुरी समाधान शोधतात ही सगळी माणसं..? आणी आज जे पाणी आपण दुसऱ्यांवर उडवतोय, अगदी मजेत.. तेच उद्या आपल्या अंगावर येणार नाही. ह्याची एवढी खात्री असते लोकांना..?’ संतापाने शलाकाच्या कपाळावरची शिर ताडताड उडत होती.

मॅडम च्या केबिन मध्ये जाऊन आल्यापासून शलाका अस्वस्थ झाली होती. एवढ्या सीनियर पदावर काम करणारी व्यक्ती पण, ऑफिसातलं राजकारण समजावून घेऊ शकत नाही, ह्या विचारांनी तर शलाकाला आणखीच त्रास होत होता. एवढी कशी हलक्या कानांची ही बाई? नुसत्या कुणाच्या गोड बोलण्याला भुलते..? की तिला फक्त तिच्या सोईची भूमिका घ्यायची असते?

आज सकाळी शलाका नेहमी प्रमाणे मॅडम च्या केबिन मध्ये गेली होती, काही महत्वाच्या मुद्दयांवर चर्चा करायला. तेव्हा सगळं कामाचं बोलून आटपल्यावर, चहा पिता पिता त्या सहज म्हणून तिला म्हणाल्या,
“शलाका, आय वॉन्टेड टु टेल यू.. मी सुजाता ला ट्रान्सफर करायचं ठरवलय. आणी तिने नाही अॅक्सेप्ट केली ट्रान्सफर, तर मी तिला रिजाइन करायला सांगणार आहे. तुझं काही काम अडायला नको नंतर तिच्याशिवाय, म्हणून आताच तुझ्या कानावर घातलं.”
“का..? ट्रान्सफर कशाला? शी इज टू गुड ईन हर वर्क. ईन फॅक्ट ती तिच्या कामांमध्ये इतर कुणापेक्षाही जास्त चांगली आहे.” शलाकाने थोडं बरोबरीच्या नात्यानं.., आश्चर्याने विचारलं. शलाकाच्या डोळ्यांसमोर सतत उत्साहाने सळसळणारी हसतमुख सुजाता आली.
“ओ येस.... मला माहीत आहे, तू फारशी कुणात मिसळत नाही. म्हणूनच तुझ्या केबिन बाहेर काय चालू असतं, ते तुला कळतच नाही....” मॅडम म्हणाल्या.

आता हे बरोबर होतं की, शलाका खरच ऑफिस ग्रुपस मध्ये अवांतर गोष्टींकरिता फारशी जायची नाही. तिची पोस्ट आणी तिची असलेली सिनियारिटी दोन्हीही जरा आड यायचं. बाहेर कधीतरी ती चहा बिहाच्या वेळी गेलीच तर चालू असलेल्या गप्पा जरा थांबायच्या तिच्या उपस्थितीत. बसलेली लोकं लगेच जरा सावरून बसायची..... ती लोकं जरा तिच्या वया बिया चा आदर दाखवत असतील.. नको त्यांना डिस्टर्ब करायला.. असं वाटून मग त्यांचं अवघडलेपण टाळण्या करता, ती त्यांच्यात सामील व्हायचीच नाही मग.

पण तरीही वैयक्तिक पातळीवर बऱ्याच लोकांशी चांगले संबंध होते शलाकाचे. कधीतरी पाच दहा मिनिटे कुणी तरी येऊन बसायचं तिच्या केबिन मध्ये, आधी जरा कामाचं निमित्त काढून.. पण खरं तर जरा थोडं मन मोकळं करायला. शलाकाही ऐकून घ्यायची सगळं.. सोडवण्या सारखा काही प्रश्न असेल.. तर, करायची काही मदत. शक्य असेल तेव्हा, अन् कुणी मागीतला तर, सल्लाही द्यायची... आणी काहीच नाही तर, समोरच्याला मोकळं बोलण्याचं समाधान तरी मिळायचं. हल्ली असे नुसते ऐकून घेणारे कान राहिलेत कुठे?

“झाल काय पण एवढं, मॅडम? म्हंणजे अगदी सुजाताच्या रेसिगनेशन पर्यंत? मला तर वाटत होतं, तिला ह्या वर्षी प्रमोशन मिळेल... आपली पिंआरओ ची पोस्ट पण भरायची आहे.. शी इज अ गुड कॅन्डीडेट. अँड शी इज कपेबल ..” शलाकाने विचारलं.
“हो. मलाही तसंच वाटत होतं. अॅक्चुअल्ली दोन नावं होती माझ्यासमोर, सुजाता आणी मेघा..”
मेघा चं नाव निघताच शलाका चमकली. ‘हं.. म्हणजे इथेच पाणी मुरत असणार.... म्हणजे काही तरी कुंणकुण ऐकू येत होती..., तिचा उगम येथूनच झाला असणार.. ’ कारण मेघाची गोड बोलून दुसऱ्यांना भुलवण्याची, आणी आपलं म्हणणं पटवून देण्याची वृत्ती मॅडमना नवीन असली, तरी शलाकाला नवीन नव्हती.
“मग? काय झालं? सुजाता नाही म्हणाली का?” तिने विचारलं.
“छे गं. मी फक्त ह्या दोघींपैकी कुणाचं नाव रेकमेंड करावं, ह्याचा विचार करत होते. तर सुजाता बद्दल काय काय कानावर यायला लागलं.. पिंआरओ म्हणजे कंपनीचा चेहरा असतो. त्यावर डाग असून कसं चालेल?”
“..?”
“सुजाता आणी अजय बद्दल काय काय कानावर यायला लागलं..” मॅडम सांगत होत्या.

अजय म्हणजे परचेसचा हेड. बऱ्यापैकी अनुभवी आणी कंपनीच्या आत, बाहेर संगळ्यांशी चांगले संबंध असणार उमदं व्यक्तिमत्व.

“अजय छान मित्र आहे सुजाताचा. एकाच कॉलेज मधे होती ती दोघं. तो सीनियर होता तिला. पण त्यांची ओळख तेव्हापासूनची आहे.” शलाका त्या दोघांनाही चांगली ओळखत होती.
“पण ते प्रकरण नुसतं मैत्रीशी थांबत नाहीय.. बरच पुढे गेलंय..” जवळपास आणखी कुणी नसून सुद्धा मॅडम चा आवाज कुजबुजता झाला.
“काहीतरीच काय बोलताय तुम्ही मॅडम? मी ओळखते सुजाताला चांगली. दोन मुलांची आई आहे ती. चांगल घर, संसार आहे तिचा...” समोर मॅडम बॉस असल्या तरी, कधीतरी शलाका तिच्या वयाचा अधिकार वापरायची. मॅडम तशा तिच्या बरोबरीच्याच होत्या. कामा व्यतिरिक्त बोलणं पण व्हायचं कधीतरी.

हीच कुजबुज शलाका ने पहिल्यांदा ऐकली होती, तिच्या कडे आलेल्या एका सहकारी बाई कडून, तेव्हा तिला असंच बोलून तिथल्या तिथे थांबवलं होतं शलाकाने. पण त्यामुळे परिणाम एवढाच झाला होता, की ती कुजबुज तिच्या पर्यंत येणं बंद झालं होतं. पण म्हणून लोकं बोलायची थांबली नव्हती. रोजच्या सपक आयुष्यात गॉसिप ची खमंग फोडणी तर हवीच असते लोकांना.

“तुम्हाला कुठून कळलं मॅडम? मेघा कडून नं?” शलाकाने विचारलं. तिला जरा रागच आला होता.
“असंच कुठून कुठून.. म्हणजे मेघाही बोलली होती.. बट बिलीव मी.. निदान मी म्हणतेय म्हणून तरी.. बघितलय लोकांनी त्यांना बरेचदा .....” त्या थोड्या गुळमुळीत पणे म्हणाल्या.
“चांगले मित्र आहेत हो ते एकमेकांचे.. आणी अजय चं काय? त्याला पण रिजाइन करायला सांगणार का..?” उत्तर माहीत होतं तरी, जरा रागानेच शलाकाने विचारलं.
“नाही गं. त्याला कुणी दूसरा पर्याय नाहीय. त्याचे बाहेर सगळ्या सप्लायर शी चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत. त्याला घालवून नाही चालणार. शिवाय सुजाता गेली की प्रश्नच मिटला.. एनी वे, बघू या.. तुला माहीत असावं.. तुझं काम अडायला नको.. म्हणून कल्पना दिली तुला..” मॅडमनी बोलणं आवरतं घेतलं.

आपल्या जागेवर येऊंन बसली, तरी शलाका संतापलेलीच होती. हे सगळं कारस्थान मेघानेच रचलं असणार, सुजाताला आपल्या मार्गातून बाजूला करायला. तिला सहन होणं शक्यच नसतं, तिच्या स्पर्धेत बरोबर कुणी असणं..

शलाकाची इथे खास मैत्री अशी कुणाशीच नव्हती. पण कामामुळे संगळ्यांशी ओळख.. त्यांच्या कामावरूनच लक्षात येत गेलेले त्यांचे स्वभाव.. क्वचित कुणी केलेले घरचे उल्लेख.. प्रसंगी मोकळी होत गेलेली काही माणसं.. त्यातूनच तिला सुजाता कळत गेली होती.. तशीच मेघाही कळत गेली होती. मेघाचा धूर्तपणा लक्षात आला, तसा सुजाताचा मोकळा ढाकळा स्वभावही.

एरवी इथल्या कुणाच्या घरच्यांशी कधी संबंध येत नव्हता. पण सुजाताच्या बाबतीत मात्र तो आला होता. त्यांच असं झालं, गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या दिवशी शलाकाच्या सासूबाई अचानक घरातच पडल्या. त्यांचा खांदा दुखावला. दिवाळी मुळे नेहमीचे डॉक्टर उपलब्ध नव्हते. आता कुठे न्याव असा विचार करत असतांनाच तिला एकदम आठवलं, सुजाताचा नवरा डॉक्टर आहे. विचारावं का तिला..?

शलाकाने थोडं संकोचतच सुजाताला फोन लावला. शलाकाची अडचण ऐकताच सुजाताने ताबडतोब मदतीचा हात पुढे केला. नवऱ्याला लगेच शलाकाच्या घरी घेऊन येण्याची तयारी पण दाखवली. पण सासूबाई चालू शकत होत्या. मग शलाकाच नवरा आणी सासूबाईं बरोबर सुजाताच्या घरी गेली. डॉक्टरांनी सासूबाईंना तपासलं, धीर दिला. क्रेप बॅंडेज केलं आणी मेडिसीन दिलं.

पहिल्यांदाच शलाका सुजाताच्या घरी गेली होती. इतकं गोड कुटुंब होतं ते. प्रेमळ डॉक्टर नवरा,सुहास.... दोन्ही गोड मुलं.. तेव्हाच शलाकाला त्यांच्या कुटुंबातला आपलेपणा भावून गेला होता. सासूबाईंना ट्रीटमेंट दिल्यावर सगळ्यांच्या छान गप्पा पण झाल्या होत्या. वाटलच नाही शलाकाला आपण तिच्याकडे पहिल्यांदाच गेलोय असं.

आता त्याच सुजातावर कुणीतरी भलते सलते आरोप करत होतं. शलाकाला प्रचंड त्रास होत होता ह्या गोष्टीचा. मॅडम ना इथे येऊंन, फार दिवस नाही झालेत, पण शलाका बऱ्याच पूर्वी पासून होती इथे. मेघाची पुढे पुढे करण्याची वृत्ती, पदाची हाव.. त्या करता वाट्टेल त्या थराला जाण्याची तिची तयारी.. शलाकाला काहीच नवीन नव्हतं. पण आपल्या स्पर्धेत कुणी आहे असं वाटल्यावर त्याच्याबद्दल उलट सुलट कंड्या पिकवणं .. तेही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन, दुसऱ्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं.... आणी तिच्यावर इतरांनी विश्वास ठेवणं.. शलाकाचा संताप वाढत होता. हलकं फुलकं वॉटर कूलर गॉसिप करायला कुणाची काहीच हरकत नाही.. पण अशी कुणाची आयुष्य उधवस्त करू शकणारी गॉसिप..?

सांगावं का सुजाताला काही..? तिला जरा सावध करावं का..? किती त्रास होईल तिला हे सगळं ऐकून..? सहन करू शकेल ती, असले घाणेरडे आरोप..? उलट सुलट विचारांनी चार दिवस शलाकाचं डोकं भंडावून गेलं होतं.

सुजाता केबिन मधे आली तेव्हा शलाकाने नुकतीच कामाला सुरवात केली होती. आज एकदा सुजाताशी बोलायचच असं ती ठरवतच होती, त्यामुळे सुजाता आल्यावर तिला बरंच वाटलं.

“हाय! कशी आहेस?” शलाकाने सुरवात केली.
“एक बातमी द्यायला आलेय. म्हटलं मेल वर नंतर तुला कळण्याआधी मी स्वत:च सांगावं.. मी रिजाईन करतेय....”
“ओह!..”
“गेले काही दिवस प्रयत्न करतच होते.. काल शेवटी सगळं फायनल झालं. मनासारखं काम मिळालं.. सॅलरी मध्ये जवळपास २५% वाढ मिळतेय.. नॉट दॅट मनी वॉज द मेन थिंग.. पण, काम मला आवडेल असं आहे.. इथल्या वातावरणाला कंटाळले होते गं मी..”
“कशाबद्दल सांगतेयस तू? कुठलं काम..?” शलाकाने विचारलं.
“माझ्या नवीन जॉब बद्दल.. अजयची खूप मदत झाली मला नवीन जॉब मिळवण्यात. तो म्हणतच होता, इथे तुला ग्रो होऊच देणार नाही कुणी. सुहास पण म्हणाला मग... काम करणारच असशील तर जिथे तू कोंफरटेबल असशील.. जे तुला आवडेल तेच कर. कशाला उगाच त्याच त्या डंबक्यात रहातेस..” सुजाता सांगत होती.
“डंबक्यात..?”
“तुला माहीत नसेल, बाहेर काय चालू असतं ते.. काय काय बोलताहेत माझ्याबद्दल अन् अजय बद्दल..”
“तुला माहीत होत..?”
“तर काय..? मिळणारे रिमार्क्स.. लोकांच्या खाणाखुणा.. कंटाळले होते मी.. बोलणाऱ्यांची तोंड धरता येत नाहीत.. आणी अशी फालतू लढाई करण्यात मला काही स्वारस्य पण नाही. अजय सारखा चांगला मित्रही मला गमवायचा नाही, बाकी लोकांच्या नादी लागून.. सुहास, माझा नवरा माझ्या बरोबर आहे.. मग कशाची भीती? अगं, कधीतरी अजय मला घरी सोडायला यायचा.. माझ्या नवीन नोकरीत त्याने मला मदत केली.. असायचो आम्ही कधी बरोबर.. तर केवढं भांडवल केलं सगळ्यांनी.. आधी सर्वांसमोर खोचकपणे बोलण्याची सुरवात तर मेघानेच केली.. सुरवातीला मी नीट सांगायचे समजावून..... पण.. जाऊ दे.. मला निदान समजूतदार नवरा आहे.. अजय च्या घरीही आमचं जाणं येणं आहे चांगलं, म्हणून बरय.. नाहीतर संसार मोडला असता कुणाचा तरी..”

शलाकाने निश्वास सोडला. कुणाला नामोहरम करायचं असेल तर त्याच्या चारित्र्यावर घाला घालणं, हा अघोरी पण सोपा मार्ग मेघाने पत्करला होता. पण सुजाताने शांतपणे सगळ्याला तोंड दिलं होतं. कुठेही ती हरून.. रडत, खडत बसली नव्हती. ताठ मानेने ती जाणार होती इथून. सगळ्यांपेक्षा वेगळी होती ती. सगळ्या केकाटणाऱ्या बदकां मधे ती एक राजहंस होती.

******************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान
एका व्यक्तीमुळे पूर्ण ऑफिस चं वातावरण खराब होऊ शकतं.
अशा लोकांना चालना दिली गेली हे चुकलं. Gossip का करतात लोकं अशा प्रकारे?

कुणाला नामोहरम करायचं असेल तर त्याच्या चारित्र्यावर घाला घालणं> काही विघ्नसंतोषी लोकांची मानसिकता अचूक हेरलीयं.
छान कथा.. आवडली.

छान++१११
एका व्यक्तीमुळे पूर्ण ऑफिस चं वातावरण खराब होऊ शकतं.>>> हो आणि प्रत्येक ऑफिसमध्ये अशा टाईपचं कोणी ना कोणती असतंच

मेधाला नामोहरम केल्याबद्दल >>> असे toxic लोकं असतात त्यांचं फार काही वाकडं आपण करू शकत नाही.
ते ज्या ठरला जातात, विचार करतात त्याच्या जवळपासही आपण जावू शकत नाही.

त्यांना टाळणं हाच उत्तम उपाय जो सुजताने केलाय.

TWAIN: “NEVER ARGUE WITH STUPID PEOPLE. THEY WILL DRAG YOU DOWN TO THEIR LEVEL AND BEAT YOU WITH EXPERIENCE.”
हे कारस्थानी / कपटी/ toxic लोकांनाही लागू पडत.

खूप relate झाली ही कथा. Corporate क्षेत्रात अशा खूप घटना ऐकून आहे.
<<<असे toxic लोकं असतात त्यांचं फार काही वाकडं आपण करू शकत नाही.
ते ज्या थराला जातात, विचार करतात त्याच्या जवळपासही आपण जावू शकत नाही. >>
अगदी खरे आहे. सर्व करून सवरून नामानिराळे रहाणे आणि पुढची शिकार शोधणे यातच ह्यांची कारकीर्द पुढे जात रहाते.

छान कथा
ज्या उपायाने आपल्याला मन:शांती मिळेल तो करावा..

प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.

Gossip का करतात लोकं अशा प्रकारे? >> दुसऱ्यांबद्दल वाटणारा हेवा.., स्वत:च खुजेपण लपवणं.., सपक दैनंदिन आयुष्यात हवा असलेला मसाला.. आणि मुख्यत: स्वत:ची रेषा मोठी करण्या करता इतर रेषा लहान करणं.. अशी किती तरी..

सगळी कडे अश्याप्रकरचे लोक असतात. असं करुन त्यांना कसलं समाधान मिळतं काय माहीत.>> फक्त एका (तरी) वर्तुळात स्वत:ला मोठं झालेलं पहाणं. त्या डबक्याबाहेर त्यांची ओळख शून्य असते.

त्या मेधाला नामोहरम केल्याबद्दल दुसरा भाग वाचायला आवडेल >> बरेचदा अशा लोकांना नामोहरम झालेलं पहाणं ही केवळ फॅंटसी असते. त्यामुळे कथेचा दूसरा तिसरा भाग आला तरी मेघाला ही मेघाच रहाणार असते, आणखी वर चढलेली.

विशेषत: साध्या सरळ मध्यवर्गात ‘ज्याचं कर्म त्याच्यापाशी... तो वरून सगळं बघतोय..’ असं म्हणत गप्प बसणच होतं.
प्रयत्न करूनही सरळ लोकांना मेघा सारखं वागणं जमणार नसतं. किंबहुना साधी दोपई तत्व असणारी लोकं मेघासारखे वागण्याचा प्रयत्न करणारच नसतात.

असे toxic लोकं असतात त्यांचं फार काही वाकडं आपण करू शकत नाही.
सर्व करून सवरून नामानिराळे रहाणे आणि पुढची शिकार शोधणे यातच ह्यांची कारकीर्द पुढे जात रहाते.

ह्या वरून मला सई परांजपे च्या ‘कथा’ सिनेमातला फरूख शेख चा ‘बाशू’ आठवला.