शैतान चित्रपट

Submitted by प्रथमेश काटे on 16 March, 2024 - 10:04

चित्रपटाचे नाव - शैतान

दिग्दर्शक - विकास बहल
रिलीज डेट - ०८ मार्च २०२४

कलाकार :- अजय देवगण, आर माधवन, ज्योतिका, Janki Bodiwala

•••••

जरा वेगळ्या विषयांवर चांगले, बघण्यासारखे चित्रपट आपल्याकडे जरा कमीच बनतात. नुकताच ' शैतान ' नामक एक बॉलिवूडचा चित्रपट रिलीज झाला. जो ' वश ' या गुजराती मूव्हीचा रिमेक आहे. या चित्रपटातून जवळजवळ आपल्या सर्वांच्याच माहितीतला, तरी पडद्यावर एका काल्पनिक कथेच्या स्वरूपात बघण्याच्या दृष्टीने अगदी अनपेक्षित व निराळा असा विषय हाताळण्यात आला आहे. आणि तो विषय आहे, वशीकरण. आता असा विषय चित्रपटातून उभा करताना त्यातील मला बऱ्यावाईट गोष्टींचा मी माझ्या परीने आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

•••••••

कबीरच्या सुखवस्तू आणि मॉडर्न कुटुंबापासून चित्रपटाची सुरुवात होते. फिरण्यासाठी आपल्या फार्म हाऊसकडे जात असताना ते एका हॉटेलमध्ये अल्पोपहारासाठी थांबतात. जिथे त्यांची वनराज नामक व्यक्तीशी ओळख होते. त्यांच्या सोबतीने जेवण घेत असताना वनराज, कबीरची मुलगी जान्हवीशी सहजरीत्या प्लेट exchange करतो. कबीरची फॅमिली त्यांच्या फार्महाऊसवर पोचल्यावर थोड्याच वेळात वनराजही तिथे येऊन पोहोचतो. आणि आपला डेड झालेला मोबाईल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने तिथे थांबतो.
मात्र थोड्याच वेळात काही भयंकर अनुभवानंतर कबीर व त्याच्या फॅमिलीला समजते की, वनराज दिसतो तसा साधा सरळ नाही. त्याने जान्हवीवर वशीकरण केले आहे. आणि तिला आपल्या सोबत कायमस्वरूपी आपल्या बरोबर घेऊन जाण्याची त्याची दुष्ट इच्छा असते. हे धक्कादायक सत्य समोर आल्यावर कबीर व त्याची पत्नी या परिस्थितीला कसे तोंड देतात, वनराजशी कसा सामना देतात ? हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पहावा लागेल.

•••••

चित्रपटाच्या कथेत नक्कीच वेगळेपणा आहे. सुरूवातीला फारच अनपेक्षित वेग घेतलेली पटकथा मात्र पुढे जरा रेंगाळत जाते.

•••••

अभिनय हा चित्रपटाचा सर्वात मोठा स्ट्रॉंग पॉइंट म्हणता येईल. विशेषतः आर माधवन यांनी वनराज हे पात्र फारच ताकदीने पार पाडले आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी वनराजचे अंतरंग चाणाक्षपणे लपवलेले आहेत. जे हळूहळू जेव्हा उलगडत जातात तेव्हा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.

सर्वात चकित करून सोडले ते जान्हवी हे पात्र साकारणाऱ्या जानकी बोदीवालाने ( नावाची नीट कल्पना नाही.) मूळ चित्रपटातील पात्रही तिनेच साकारले आहे‌. वशीकरणाच्या अंमलाखाली वनराज चे क्रूर आदेश मानण्याचा निग्रही हिंस्रपणा, स्वतःबरोबर आपल्या आईवडिलांना, लहानग्या भावाला यातना देताना जान्हवीला होणारे अतोनात दुःख, तिची असहायता, अगतिकता या भावभावनांचे चित्रण तिने अत्यंत सुरेख पणे केले आहे‌.

अजय देवगणचा अभिनय नेहमी प्रमाणे उत्तमच आहे ; पण त्यात नावीन्य, वेगळेपणा नाही. उलट त्याच्या भूमिकेवर दृश्यम मधील पात्राची छाप पडल्यासारखी वाटते.

यांशिवाय कबीरची पत्नी ज्योती हे चित्रपटातील उर्वरित प्रमुख पात्र साऊथ इंडियन अभिनेत्री ज्योती यांनी बऱ्यापैकी निभावले आहे ; पण पूर्ण चित्रपट त्यांचे पात्र अकारणच फार गंभीर वाटते.

•••••

चित्रपटातील संवाद ( Dialogues ) अर्थपूर्ण आहेतच. कुठेही illogical अथवा नाटकी वाटत नाहीत ; पण लक्षात राहण्यासारखेही नाहीत.

•••••

वैशिष्ट्य :-

१. वेगळ्या विषयावर आधारित कथानक.

२. सर्व प्रमुख कलाकारांचा उत्तम अभिनय.

३. चित्रपटात थरारकता पुरेपूर भरलेली. जी शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

४. प्रभावी, अनपेक्षित क्लायमॅक्स

•••••

उणीव :-

१. वेगवान सुरूवातीनंतर धीमी होत गेलेली पटकथा.

२. लॉजिक च्या बाबतीत काही मोजक्या ; पण ठळक चुका आढळून येतात. उदा. सिच्युएशन वरचा साधा सरळ तोडगा इतका स्मार्ट असणाऱ्या कबीर किंवा त्याच्या पत्नीला लक्षात येत नाही, हे अजिबात पटत नाही.

३. संवाद ( Dialogues ) अजून प्रभावी होऊ शकले असते का ? असे वाटते.

•••••

एकूण निराळ्या विषयावर बनलेला ' वशीकरण ' लॉजिक च्या दृष्टीने बऱ्यापैकी गंडलेलाच म्हणावा लागेल ; पण थ्रीलर मूव्हीजच्या चाहत्यांना मात्र अंगावर काटा आणणाऱ्या थरारकतेचा चांगलाच अनुभव घेता येईल.

© प्रथमेश काटे

Group content visibility: 
Use group defaults

उत्तम चित्रकृतीचा प्रयत्न! मला सुरुवातीचा अनपेक्षित वेग आणि शेवटची उत्कंठा वाढवणारी लय आवडली. रिमेकचा उत्तम प्रयत्न!!

ओरिजिनल गुजराती वश पाहिला काल. हिंदी व्हर्जन मध्ये थोडा आरडाओरडा कमी केलाय, काही सिन सुंदर किंवा व्हिज्युअली रंगीत केलेत, आणि शेवट एकदम आशावादी सोबर अप केलाय.

फक्त खायला घालून एखाद्यावर ताबा मिळवणे, इतके तीव्र टिकणारे संमोहन शक्य असेल का?खाण्यात एखादे एकदम कडक ड्रग असेल का, lsd, धोतरा बिया वगैरे?