द्वेष : एक भय गूढकथा, भाग ९

Submitted by प्रथमेश काटे on 2 March, 2024 - 00:56

वेळ हळू हळू पुढे सरकत होता. अस्वस्थता... चित्त विचलित करणारी. शिवाय या अस्वस्थतेसोबत काहीशी भीतीही होतीच. ' करावं तरी काय ?' - राजाभाऊंना उमजत नव्हतं. ते फक्त तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होते. निष्फळ प्रयत्न. परिणाम काही नाही. उलट हे मळभ कणाकणाने दाटतच चाललं होतं.

आणि कदाचित हेच कारण असेल. तो भास होऊ लागण्यामागे. जणू काही अंतरावरून, अंधारातून कुणीतरी आपल्याकडेच पाहत आहे, अगदी निरखून पाहत आहे. अशी एक भावना होत होती. 'अर्थात भासच. दुसरं काही नाही.' ते स्वत:शीच म्हणत होते ; पण कुठेतरी त्यांनाच ते पटत नव्हतं. जर खरच कुणी...? नाही. तो विचारच अशक्य होता. भयानक होता ; पण ही फीलींग ! इतक्या प्रकर्षाने जाणवणारी, की त्यांना भास तरी कसं म्हणावं ? पाहायचं तर मुळीच नव्हतं. ( न जाणो त्या अंधारात काय दिसेल ? ) आणि सहजपणे दुर्लक्षही करता येत नव्हतं.

पण ही स्थिती जास्त वेळ टिकली नाही. कारण एकदमच, डाव्या बाजूने शुक् शुक असा एक आवाज त्यांच्या कानावर पडला. स्वतःच्याच विचारात अडकलेल्या राजाभाऊंनी दचकून अगदी नकळतपणे, अभावितपणे तिकडे नजर वळवलीच. मग इच्छा नसतानाही नजर थोडं बारकाईने बघण्याचा प्रयत्न करू लागली ; पण नाही... कुणी नाही. जशी नजर आपोआप त्या अंधारावर खिळली गेली तशीच आपोआप हळूहळू सरकत गेली. थांबली.
श मेणबत्तीचा मंद प्रकाश खालच्या फरशीवरून परावर्तित होऊन त्या भिंतीवर पडला होता. तिथे काहीतरी, कुणीतरी आहे का ? अगदी अंधूक उजेडात त्या भिंतीपाशी, कोपऱ्यात एक काळपट आकृती दिसल्या सारखी त्यांना वाटली. पण ती इतकी धूसर, अस्पष्ट होती की खरंच तिथे काही आहे की नजरेला भास होतोय हे त्यांचं त्यांनाच समजेना. त्यांनी थोडंसं बारकाईने बघण्याचा प्रयत्न केला. अगदी कमी प्रकाशामुळे फारसं नीट दिसत नव्हतं ; पण इतक्यात ती आकृती सावकाशपणे पुढे सरकत असल्यासारखी वाटू लागली का ? नकळतपणे श्वास रोखून राजाभाऊ एकटक तिकडे पाहत होते.
" द...ल्ळ...वी..ह्ह..."

शब्द त्यांना नीट समजले नाहीत. मात्र ते या आकृतीच्याच तोंडून आले असल्याबद्दल त्यांना शंका नव्हती. तो प्रकार पाहून, तो कुजबूजता, खरखरीत आवाज ऐकून राजाभाऊंच्या अंगावर काटा उभा राहिला. त्या आकृतीचा हात त्यांच्या दिशेने पुढे झाला होता. मागोमाग आवाज आला -

" येह...ह्ह.."

यावेळी त्यांना शब्दही नीट ऐकू आला. तो आकार त्यांना खुणावत होता. जवळ बोलावत होता. त्या आकाराच्या जवळ जायचं...? छे. स्वतःशीच नकारार्थी मान हलवत त्यांनी अंग चोरून घेतलं. भीतीने श्वासोच्छ्वासाची गती वाढू लागली. एवढ्यात पुन्हा तो आवाज आला -

" ये...ह्ह" यावेळी त्या आवाजात धार होती. जरब होती. राजाभाऊ चरकले. बावरले. या घरात प्रवेश केल्या क्षणापासून आतापर्यंत काय काय अनपेक्षित, रोमांचकारी गोष्टी घडल्या होत्या. घडत होत्या. आधी श्री सोबत असल्यामुळे जरा आधार वाटत होता. आतातर ते अगदी एकटे होते. आणि ही अकल्पनीय, भयानक अशा घटनांची मालिका इथेच थांबणारी नव्हती. ती आता‌ पुढचा टप्पा गाठत होती. राजाभाऊ भितीने सोफ्यावर पाठ दाबून, शरीर आक्रसून बसले होते. मात्र एकदम कुणीतरी खेचल्याप्रमाणे ते खाली उतरले.

काही कळण्याच्या आत ते दोन्ही पायांवर ताठ उभे राहिले होते‌. आणि पुढे चालू लागले होते. त्या आकृतीच्या दिशेने. त्यांचे डोळे विस्फारले गेले. त्या डोळ्यांत आश्चर्य आणि भीती साकळली होती. संथगतीने, सरळ त्यांची पावलं पडत होती. थांबायला हवं होत. इथेच थांबायला हवं होतं. पण जमत कुठे होतं ?

बावरलेले, भ्यायलेले राजाभाऊ जोरजोरात ' नाही,' ' नाही ' अशा अर्थी मान हलवत होते. पण हा विरोध फक्त मनापुरता मर्यादित होता. शरीरावर नियंत्रण ठेवणंच शक्य होत नव्हते. असं वाटत होतं जणू त्यांच्या दोन्ही हाता पायांना कुणीतरी जाड दोरखंड बांधून पुढे खेचत आहे. त्यांना दिसत होतं समजत होतं की पुढे धोका आहे. पुढे जायला नको
मात्र पावलं पुढे पडतच होती. हळूहळू, त्या आकाराच्या दिशेने. मघाशी एका कडेला असणारा आकार आता समोर होता. राजाभाऊंनी त्याच्याकडे पाहिलं. त्या... त्या काळपट आकृतीला एक विशिष्ट आकार होता का ? एखाद्या माणसासारखा ; पण किती धूसर. एखाद्या धूरा सारखा. आणि...आणि.. त्या आकाराच्या चेहऱ्यासारख्या गोलाकार जागेवर त्या दोन लालभडक ठिणग्या ! ते दृश्य बघून त्यांच्या काळजात धडकी भरली. असंच मागे वळून पळून जावं असं त्यांना वाटलं ; पण त्यांची काहीही इच्छा असून काय उपयोग होता ? मन भीतीने पिचून जावू लागलं होतं. मेंदू सैरभैर झाला होता.

" देवा रे... वाचव." शेवटी मनाची, बुद्धिची मर्यादा आल्यावर शेवटची आशा म्हणून देवाकडे प्रार्थना केली. आणि त्याचवेळी कसल्यातरी मोठ्या आकाराच्या वस्तूला अडखळून ते एकदम खालीच कोसळले. अचानकपणे असा तोल गेल्यामुळे त्यांनी दचकून डोळे गच्च मिटून घेतले. तोंडून एक अस्फुटशी किंचाळी निघाली.
काही क्षण ते असेच पडून राहिले. 'काहीच' घडत नव्हतं. शांतता होती. त्यांनी डोळे उघडले. मग हळूच ते उठून उभे राहिले. त्यांच्या शरीरावरचं ते अमानवी बंधन गळून पडलं होतं. आता त्यांना मोकळं मोकळं वाटत होतं. मान वर करून तिकडे, जिथे त्यांना ती धूसर आकृती दिसली होती, तिकडे बघायला त्यांना जरा धीर गोळा करावा लागला ; पण आता तिथे काहीही नव्हतं. इतकावेळ मनावर वागवलेला चिंतेचा, अनिश्चिततेचा, भीतीचा अवजड भार एकदम उतरला होता. त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मागे सोफ्यापाशी जाता जाता त्यांच्या मनात विचार आला. खरंच पूर्णपणे सुटका झाली आहे का ? नाही. खात्रीने सांगता आलं नसतं. पुन्हा कदाचित त्यांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न झाला असता. कदाचित पुन्हा काही चाहूल लागली असती. आवाज आले असते. दुर्लक्ष करू म्हणून दुर्लक्ष करता आलं नसतंच उलट निष्फळ प्रयत्नांनी मन, मेंदू थकून गेला असता. त्यांची फार वाईट अवस्था झाली असती. 'मग करावं काय ?' एक साधा सोपा उपाय त्यांना सुचला. प्रयत्न करून पाहायला हरकत नव्हती. ते सोफ्यावर जाऊन बसले. आणि डोळे मिटून आपल्या संथ लयीत चालणाऱ्या श्वासावर लक्ष एकाग्र करायचा प्रयत्न करू लागले.

•••••••

मध्ये किती वेळ उलटला असेल हे त्यांना समजलं नाही ; पण मध्येच एकदम त्यांची एकाग्रता भंगली. एक अगदी खालच्या आवाजात कण्हण्याचा आवाज येत होता. त्यांनी चटकन डोळे उघडले. त्यांच्यासमोर, खाली जमिनीवर श्री पाठमोरा बसला होता. त्याचाच तो आवाज होता. त्याच्या शरीराची जरा हालचाल होत असल्याचंही राजाभाऊंच्या लक्षात आलं. ते सोफ्यावरून उठले, आणि त्याच्या समोरच्या बाजूला येऊन उभे राहिले. श्रीच्या बळकट शरीराची किंचितशी थरथर होतं होती. भव्य कपाळावर आठ्या पडल्या होत्या. दाट भुवया आक्रसल्या होत्या. डोळे गच्च मिटले होते. ओठ थरथरत होते. त्याची ही अवस्था पाहून राजाभाऊ चपापले. काहीतरी बोलण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं. मात्र लगेच त्यांनी स्वतःला थांबवलं. पण श्रीला नक्की काय होत असावं याचा त्यांना काही अंदाज करता येईना. त्यांना त्याची काळजी वाटू लागली. दीड दोन मिनिटांचा अवकाश झाला असेल.‌ श्रीच्या अवस्थेत तिळमात्र फरक पडला नव्हता ; पण एकदम तो म्हणाला -

" राजाभाऊ, जा. प्रिया आणि सोनालीला घेऊन या." त्याचा आवाज जरा क्षीण झाला होता. त्यात थकवा स्पष्ट जाणवत होता.

" नाही श्री. मी तुम्हाला या अशा अवस्थेत कसा सोडून जाऊ ? "

" राजाभाऊ... माझी काळजी करू नका. जा तुम्ही."

" अहो, पण..."

" पण नाही. राजाभाऊ, तुम्हाला जायला हवं. " श्रीचा आवाज जरा कठीण झाला होता.

निरूपाय होऊन राजाभाऊ उठले. आणि बाहेर पडले.
राजाभाऊ स्वतःला श्रीचा फक्त एक सोबती म्हणवून घ्यायचे. त्याला त्याच्या कार्यात कोणत्याही प्रकारे मदत वा सहकार्य करण्याची आपली कुवत नाही असं त्यांना वाटे ; पण श्री त्यांना आपला सहकारी मानायचा. त्यांच्याशिवाय आपलं कार्य पुरं करणं फार अवघड जाईल असं तो त्यांना कित्येकदा म्हणायचा. ते स्वतःला श्रीच्या समोर जरा कमी लेखत ; पण श्री त्यांना खूप आदराची वागणूक द्यायचा. आज पहिल्यांदाच त्यांच्याशी बोलताना त्याचा आवाज जरा मोठा झाला होता ; पण राजाभाऊंना मुळीच राग आला नाही की वाईट वाटलं नाही. त्याच्या स्वरात आज उमटलेला कठीणपणा हा रागामुळे नसून याक्षणीच्या त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी होता आणि. या क्षेत्रातील अधिकारी म्हणून श्रीचा तो अधिकार त्यांना अगदीच मान्य होता. त्यामुळे श्रीबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर अजून वाढला.

क्रमशः
© प्रथमेश काटे

Group content visibility: 
Use group defaults

@किल्ली - खूप आभार

छान......पुढील भाग लवकर टाका >>> थॅंक्यू. लवकर पुढचा भाग पोस्ट करेन.