गर्वहरण

Submitted by प्रणव साकुळकर on 27 February, 2024 - 23:09

सुश्रुतला रोज रोज सांगून आता गोष्टींचा ऐवज संपायला आला आहे. ‘एकीचे बळ’, ‘जशास तसे’, ‘दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ’ अश्या नेहेमीच्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्या आहेत. आता कधी कधी याच अर्थाच्या नवीन गोष्टी रचाव्या लागतात. परवा ‘गर्वाचे घर खाली’ या तात्पर्याची अशीच एक नवीन गोष्ट तयार केली.

मोराला पक्ष्यांचा राजा म्हणायला लागल्या पासून मोराच्या डोक्यात हवा गेली. तो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजायला लागला. “माझा डौलदार पिसारा बघा, त्यावरचे सुरेख रंग बघा”, असं तो सतत इतर पक्ष्यांना सांगायला लागला आणि त्यांना त्यांच्या रंगावरून चिडवायला लागला. असाच एकदा तो पक्ष्यांच्या घोळक्यात वल्गना करत होता. जवळून एक वाघ जात होता. मोराचा आवाज ऐकून तो दबक्या पावलांनी चालत आला आणि संधी साधून त्यानं पक्ष्यांवर झेप घेतली. वाघाची चाहूल लागताच पक्षी घाबरून उडायला लागले. कावळा उडाला, चिमणी उडाली, पोपट उडाला. पण… “बाबा!”, सुश्रुतनं मला थांबवलं, “मोर उडाला पाहिजे, नाहीतर मला वाईट वाटेल.” सुश्रुतच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले होते. मोर उडणार की नाही ही शंका त्याच्या चिंतातुर चेहेऱ्यावर दिसत होती. मला काही बोलायलाच सुचेना. सुश्रुतला मी जवळ घेतलं. किती विचार करतात मुलं! गोष्टीत पुढे काय होणार, ते आपल्याला आवडणार की नाही. बाप रे! गोष्टीचा शेवट बदलणं मग मला भागच होतं. गोष्टीत मी मोर उडवला. सुश्रुतचा चेहेरा खुलला. मोराचा जीव वाचला हे ऐकून तो हसायला लागला. या आनंदातच मग तो माझ्या कुशीत शांत झोपी गेला.

या प्रसंगानं माझी शांतता मात्र हिरावल्या गेली, मला अंतर्मुख केलं. मुलं किती हळवी, संवेदनशील असतात याचा पुनःप्रत्यय आला. जगाच्या रहाटगाडग्यात निरागसता गमावून बसलेली मोठी माणसं लहानांना काय शिकवणार? तो अधिकार तरी त्यांना आहे?


सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:खमाप्नुयात्।

यात ‘सर्व’ कोण? केवळ मनुष्य? की सर्व सजीव? लहानपणी आईनं शिकवलेल्या श्लोकाचा खरा अर्थ मुलाकडून शिकायला मिळाला.

गर्विष्ठ असला तरी काय झालं? तोही एक प्राणी आहे आणि त्याचंही वाईट होता कामा नये. किती गहन विचार हा! बायबलमध्ये लिहिलंच आहे: ‘Hate the sin, not the sinner’. गर्विष्ठपणाचा तिरस्कार करतानाही त्या व्यक्तीचा द्वेष करून चालणार नाही. गांधीजींनीही हा विचार समजायला कसा सोपा पण आचरणात आणायला किती कठीण आहे हे आपल्या आत्मचरित्रात नमूद केलंय.

मुलाला ‘गर्वाचे घर खाली’ ही म्हण शिकवायला म्हणून सांगितलेली गोष्ट बदलायला लावून शेवटी मुलानेच मला खूप काही शिकवलं होतं. आपल्याला खूप काही कळतं असं समजणाऱ्या बापाचंच जणू मुलानं गर्वहरण केलं होतं.

असाच एक अनुभव: अश्वत्थामा

Group content visibility: 
Use group defaults

छान लेख आवडला Happy
तुमच्या आधीच्या लेखात सुद्धा छान विचार मांडला होता.
या लेखातील विचार सुद्धा पटला आणि कुठेतरी माझ्याच डोक्यातील वाटला.

गंमत म्हणजे मागे एकदा हावऱ्या सशाची गोष्ट बघत होतो. हावरटपणामुळे कसे त्याला जीवास मुकावे लागते. तेव्हाही हाच विचार मनात आला. काय हे, हावरटपणा आहे तर ठीक आहे, शिक्षा मिळावी, पण जीवास मुकला वगैरे इतके दाखवायची काय गरज. थोडक्यात वाचला, धडा मिळाला आणि त्यानंतर त्याने तो दुर्गुण कायमचा सोडला असाच शेवट बालकथात हवा.

>>>गर्विष्ठपणाचा तिरस्कार करतानाही त्या व्यक्तीचा द्वेष करून चालणार नाही>>>>>
माऊलींचं पसायदान ही हेच सांगते. खळांचा विनाश व्हावा असं माऊली म्हणत नाहीत तर....
जे खळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो

खळांची व्यंकटी सांडो म्हणजे जे खल आहेत त्यांची वक्र( वाईट) बुध्दी नष्ट होवो आणि ती सत्कर्मी लागो...

छान

धन्यवाद, मीरा.., urmilas, SharmilaR, दक्षिणा, सामी, साद, मेघना., स्वाती२!

दत्तात्रय साळुंके, तुम्ही दिलेला पसायदानाचा दाखला इथे चपखल बसतो. धन्यवाद!

ऋन्मेऽऽष, अगदी बरोबर! बालकथेत हिंसा नसावी. मला तुमचा मुद्दा पटला. मी आता तश्या कथा सांगायचं सोडलंय.