भाग १
मधुवंतीचा मेसेज जेव्हा whatsapp वर पॉप झाला तेव्हाच मन स्पितीकडे धाव घ्यायला लागलं. तर झालं असं की लेडीज स्पेशल स्पिती टूर प्लॅन केली होती our only planet च्या मधुने. १५-१६ बायकांचा ग्रुप घेऊन जायचं धाडस नव्हे, वेडं धाडस करायचं मधुने ठरवलं होतं, त्यात आम्ही घरच्या ६ जणी. खरंतर हे ग्रुप टूर प्रकरण मला मुळीच पसंत नाही, मुक्त स्वछंदपणे फिरण्यावर बंदी म्हणजे अशा ग्रुप टूर असतात असं माझं मत! आपण मुक्त मुसाफिर, मन सांगेल तिथे मुक्काम आणि पळेल तिथे पुढचं गाव. अशा साचेबद्ध ट्रिपचं बुकिंग करायची हिम्मत शेवटी मी केलीच.
बघता बघता जायचा दिवस उजाडला. आमची ट्रिप सुरु होणार होती दिल्लीच्या ISBT हुन. पहाटे उठून मुंबई हुन आम्ही दिल्ली गाठलं, त्या आधी RTPCR आणि ऐनवेळी बदलणारी विमानाची वेळापत्रकं आणि इतर बारीक सारीक गोष्टी पार करत शेवटी आम्ही दिल्ली गाठलं. आम्ही सगळ्या प्रचंड excited होतो. एकतर घरातल्या ६ जणी प्रथमच एकत्र अशी ट्रिप करत होतो, त्यात मायलेकींच्या जोड्या म्हणजे भांडणं आलीच हे माहीतच होतं पण मजाही तितकीच करणार होतो. दिल्लीच्या भयंकर ट्रॅफिक ची प्रचिती लगेचच आली. आणि आम्ही 'दिल्ली दूरही' बरी म्हणत कसेतरी एकदाचे त्या बस स्टॅन्ड वर पोचलो. सकाळी ८. ३०ला शिमला गाठलं. लाल-हिरव्या छपरांच्या टुमदार घरांनी आमचं स्वागत केलं. हिमालयाची हि वेगळीच जादू आहे, तो पहिल्याच वेळी इतकं आपलंसं करतो की पुन्हा परतवंसं वाटत नाही. बबलूजी त्यांची टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन आमची वाट पाहत थांबले होते, पुढचे काही दिवस हि आमची धन्नो आम्हाला स्पितीच्या खोऱ्यात सांभाळून नेणार होती.
आमचा प्रवास आता स्पिती च्या दिशेने सुरु झाला, शिमल्यात प्रथमतः भेटायला आलेली हि पाईन ची सुंदर सुंदर उंच झाडं आता आम्हाला प्रवासात सोबत करणार होती. थिऑग नावाच्या छोट्याश्या ठिकाणी पराठ्यांवर येथेच्छ ताव मारून आम्ही पुढे जात राहिलो, आजचा मुक्काम रकच्छम गावात असणार होता. ते अजून बरच लांब होतं, ह्या भागात छोटंसं अंतर कापायला पण खूप वेळ लागतो.
स्पितीचं खोरं इतकं अवघड का आहे ह्याचा अनुभव पहिल्या दिवसापासून यायला लागला. ह्या पहाडी भागात अगदी कसलेल्या डड्राइव्हर कडून सुद्धा चुका होऊ शकतात; आमच्या आयुष्याचं स्टेरिंग आम्ही बबलूजींच्या हातात देऊन रकच्छम ची वाट पाहत शांत बसून होतो, संध्याकाळी ७ च्या दरम्यान आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो, खूप प्रवास झाल्याने सगळेच खूप थकले होते. बस मधून उतरलो तर थंडीने अक्षरशः वाजायला लागलो, थंडी म्हणजे काय रे भाऊ म्हणणारे मुंबईचे आम्ही बापुडे अचानक बर्फात बुचकळले जातोय कि काय म्हणत कुडकुडत आवरायला गेलो. जेवण वगरे आटपून आजचा दिवस संपला.
पहाटे लवकर उठायच होतं. ४-४.३० ला जाग आली, रात्री अंधारात आल्याने आजूबाजूचा परिसर पाहता आला नव्हता. उजाडल्यावर नजरेसमोर जे दृश्य होतं ते मी आत्तापर्यंत च्या आयुष्यात पाहिलेलं सगळ्यात सुंदर दृश्य असावं. लाकडी टुमदार गेस्ट हाऊस, मागे हे मोठे पहाड, वरती खोबरं टाकून गार्निश केल्यासारखं बर्फ आणि गेस्ट हाऊस च्या बाजूला नाजूक गुलाबी फुलांची चादर. काय वर्णन करावं?कुठून शब्दं जमवावे? समोर बास्पा नदीचं पात्र. जसा प्रवास पुढे गेला तश्या गोष्टी अणिकच सुंदर होत गेल्या, ठिकाणं अधिकच अभूतपूर्व होत गेली पण रकच्छमने मनावर जी छाप उमटवली ती कायमची.
गोबरी गोबरी लाल चुटुक सफरचंद लगडलेली झाडं आणि बागा बघून, "भैय्या, मिठा है ना?" म्हणून सफरचंद विकत घेणारे आम्ही अक्षरशः अधाशासारखे बघतंच राहिलो. एक साधं ते सफरचंद, ते खाली पडलं काय आणि न्यूटन ने शोध लावला काय! माझ्या मनात विचारत येऊन गेले, न्यूटन जर रकच्छम च्या सफरचंदाच्या बागेत बसला असता, तर कदाचित वैज्ञानिक न होता एखादा कवी किंवा चित्रकाराच झाला असता.
किती आणि कोणत्या शब्दांत वर्णन करू शकणार आहे मी ह्या बागांचं ? या परिसराचं? मुळात सफरचंद ही झाडावर तयार होत नसून न्यूटन थेट मुंबईत भैय्याला पाठवत असेल इतपत झाडं पाहिलेले आम्ही, या बागा बघून वेडे झालो नसतो तरंच नवल होतं.
आज आमचं पाहिलं ठिकाण भारताचं सगळ्यात शेवटचं गाव, छिटकूल! छिटकूल, ११३२० फुटांवर स्थित, भारत-तिबेट बॉर्डर वरचं भारतातलं तुरळक लोकसंख्येचं शेवटचं गाव!पांढऱ्याश्या वाळूचे रस्ते, समोर नजर जाईल तिथपर्यंत हिरव्या रंगात न्हालेले अणिकच उंच डोंगर, आणि ह्या सगळ्यांमधून नजाकतीने वाहणारी बास्पा नदी! बाईंचा डौलच निराळा. काही गोष्टी किंवा माणसं इतकी सुंदर इतकी चांगली असतात आणि आपण असे आहोत हे त्यांना माहित असतं आणि त्या डौलातच ती लोकं वावरत असतात पण त्यांना तो डौलच मुळी शोभत असतो, त्यापैकी एक म्हणजे हि बास्प नदी! पुढे ती सतलज ला मिळते.
त्या नंतर चा मुक्काम नाको गाव, इथून अंदाजे १५० किमी.
भाग २-https://www.maayboli.com/node/81449
१
२
३
४
५
६
डोळ्यांचे पारणे फिटले. अहाहा
डोळ्यांचे पारणे फिटले. अहाहा !
वॉव!
वॉव!
मस्त मस्त...! पुढच्या भागाची
मस्त मस्त...! पुढच्या भागाची उत्सुकता!
सुंदर!
सुंदर!
... मुक्त मुसाफिर, मन सांगेल
... मुक्त मुसाफिर, मन सांगेल तिथे मुक्काम आणि पुढचं गाव....
हिमालयात असे काही दिवस फिरण्याचे अनेक दिवसांचे स्वप्न आहे.
लेख आवडला.