"द ग्रँडडॉटर प्रोजेक्ट"

Submitted by स्वेन on 15 July, 2021 - 00:10

इंडो-ब्रिटीश लेखक आणि जागतिक शांतता या  बद्दल  आपली   ठोस  मते  मांडणारे  शाहीन चिश्ती यांची पहिली कादंबरी, "द ग्रँडडॉटर प्रोजेक्ट"  (The Granddaughter Project),  नुकतीच प्रकाशित झाली . वेगवेगळ्या  तीन भिन्न महिलांच्या ऐतिहासिक शोकांतिकेच्या एकत्रित अनुभवाचा मांडलेला लेखाजोखा, या स्त्रियांच्या वाट्याला आलेले कष्ट, त्यांनी भोगलेल्या हाल अपेष्टा,  त्यांच्या  नातींसाठी त्यांनी, सामाजिक  पूर्वग्रह  बदलावेत  म्हणून  पुकारलेला  आवाज , असा  विषय  घेऊन  प्रकाशित  झालेली ही कादंबरी  वाचकांना  एक वेगळया जगाची सफर घडवून आणते .  

या कादंबरीत ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या सोबत   असणाऱ्या  पुरुषांनी त्यांना वाईट   परिस्थितीत ठेवले: तरुण आणि एकटे असणाऱ्या  या  स्त्रियांनी  अश्या  हलाखीच्या  परिस्थितीवर   काबू मिळविण्यासाठी  बराच  संघर्ष केला.

या कादंबरीतली हेल्गा,लाडात  वाढलेली मुलगी,  दुसऱ्या महायुद्धात हिटलरने केलेल्या विनाशात ( होलोकॉस्ट)   मध्ये  सापडते  .  औशविट्झमधल्या छळ छावण्यात  ती  तिच्या कुटूंबापासून वेगळी  पडते  . मरण केंव्हाही येणार अशा   भयानक    परिस्थितीतून  ती  वाचते आणि मग   इस्राएलमध्ये ती   नव्या  जीवनाची सुरुवात करते.

याउलट, कमला एक  अत्यंत   गरीब शेतकऱ्यांची मुलगी  बंगाल मधल्या भयानक दुष्काळात वाढते . दारुड्या  बाप  आईला  मारहाण करत असतो . घरात  अठराविश्वे  दारिद्र्य . अखेरीस दुष्काळात  आई  वडील मरतात पण कमला जिवंत  राहते  आणि  एका  महिलाश्रम  मध्ये  कामाला लागते . राजीव  नावाच्या  मुलाशी  लग्न  करते  पण  तो  ही  तिला एकटेच टाकून  निघून  जातो .

लीनेट आणि  तिची आई पाम, कॅरेबियन  किनारा सोडून १९५० च्या दशकातल्या  लंडनमध्ये येतात पण त्यांना आपण उगाच आलो हे पदोपदी जाणवत राहते . भयानक परिस्थितीचा सामना करत असताना आई आणि  मुलगी   सतत भेदभाव करणाऱ्या  समाजाशी   संघर्ष करत आयुष्य  जगत  राहतात . जेव्हा लिनेटची आई मरते, तेव्हा ती अगदी एकाकी पडते. तशातच भोवतालचा  समाज  तिची  अवहेलना  करू  लागतो . त्याच  वेळी   नॉटिंग हिलला पेटलेल्या दंगलीत तिला  जबरदस्त   मारहाण केली जाते   आणि ती  मेली  असे  समजून  जमाव पुढे निघून जातो, परंतु ती  जिवंत राहते.

मनावर घाव  करून सोडणाऱ्या  या  पुस्तकात  लेखक लैंगिक असमानता, वांशिक दडपशाही, युद्धकाळातील आघात आणि स्त्री मुक्ती यासारख्या कालातीत  विषयावर समर्पक  भाष्य  करतो.  दुसर्‍या महायुद्धातील   होलोकॉस्टसह छळछावण्या , १९५८  सालात  ऑगस्ट-सप्टेंबर  
मध्ये  इंग्लंड मधील नॉटिंग हिल येथे  झालेल्या  जातीय   दंगली ,१९४३  चा  बंगालचा विनाशकारी दुष्काळ, ज्यात भूक  आणि  उपासमार, मलेरिया आणि इतर प्राणघातक आजारांमुळे अंदाजे दहा   लाख लोकांचा बळी गेला,  अशा   इतिहासातल्या  काही महान शोकांतिकांचा  लेखकाने या  पुस्तकात सविस्तर  आढावा  घेतलेला  आहे .

अशा  परिस्थितीत    तावून  सुलाखून  निघालेल्या या   महिला पहिल्यांदाच   त्यांच्या नातींना   त्यांच्या कथा सांगतात.  आपण ज्या वळणावर   अयशस्वी झालो  त्यावरून  धडा घेऊन  ते यशस्वी होऊ शकतील आणि स्वत: साठी जे योग्य आहे ते करण्यास त्यां सक्षम होतील , त्यांना   प्रेरणा मिळेल ,  आपण  लढायला   समर्थ आहोत  असे  वाटेल  या आशेने  या  स्त्रिया  हे कथन  करत  आहेत.

स्त्रियांवरील अत्याचार आणि त्याविरुद्ध त्यांचा संघर्ष या ना त्या कारणाने जगात कुठेतरी सुरूच आहेत. अशी आणि असली अनेक पुस्तके वाचल्याने महिला सशक्तीकरण आणि वांशिक समानतेचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण होईल अशी आशा करणे भाबडेपणाचे ठरेल. बाल्यावस्थेत पुरुष असताना त्यांचे संगोपन स्त्रियाच करत असतात आणि एक प्रकारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असतात, प्रेरणा देत असतात, तरीही स्त्रियांना दुय्यम दर्जा देणे ही मानसिकता काही संपत नाही. हे बदलणे आवश्यक असेल तरीही हा बदल घडून येताना दिसत नाही. या पुस्तकात हेल्गा, कमला आणि लिनेट हे पूर्णतः  वेगळ्या  जगातील   आहेत, तरीही त्यांच्या अनुभवाचा एक  सामान धागा आहे आणि तो  म्हणजे  . त्यांच्या  आयुष्यात  पुरुषांनी त्यांना  दिलेले  दुःख.

ब्रिटीश-भारतीय परंपरेच्या अनेक लेखकांपैकी एक असणारे ,शाहीन  चिश्ती, अजमेर येथील प्रसिद्ध अजमेर शरीफ दर्ग्याचे  सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचे वंशज आहेत. चिश्ती लंडनमधील साहित्यिक संस्था आणि लंडनमधील मुस्लिम-ज्यू फोरमचे  सदस्य आहेत. वयाच्या १५व्या वर्षी आपल्या आई वडीलां समवेत लंडनला स्थायिक होण्यापूर्वी शाहीन अजमेरच्या मयूर स्कूलमध्ये शिक्षण घेत होते.

Group content visibility: 
Use group defaults

चांगला परिचय.
किंडलवर याचं कव्हर पाहिलं होतं. पण त्यावरून कंटेंट असं असेल असा काहीच अंदाज आला नव्हता.