गर्लफ्रेंड ट्वेन्टी-ट्वेन्टी - भाग २

Submitted by मी_किशोरी on 10 January, 2018 - 21:40

भाग १ ची लिंक
https://www.maayboli.com/node/64941

भाग २
"गणपत, अरे ती जाहिरात बघितलिस काय?" - रम्या .
"कुठली रे?" - गणपत.
"अरे एकदम मागच्या पानावर बघ." - रम्या .
गणपतने पेपरचे मागचे पान समोर पसरून धरले. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झराझर बदलत गेले. आश्चर्य, गम्मत, सुक्ष्म आनंद आणि मग त्याची जागा थोड्याशा विषन्नतेने आणि वैतागाने घेतली. पेपर झटकन बाजूला ठेवून त्याने रम्याला विचारले, "मग? आपल्याला काय त्याचं ?"
रम्या काहीच बोलला नाही. इतक्यात त्याचा चहा आला. रम्याने खाली बघत चहाचा एक भुरका मारला आणि हळूच मित्राच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळू लागला. गणपत विचारात पडला होता. "भारी हाये रे हे. खरंच असं आसल का?"
गणपत आता हात पाठीमागे बांधून दिवाणखान्यात येरझाऱ्या मारू लागला, थेट हणमंतरावांसारखाच.
थोड्याच वेळात स्वयंपाकघरात डोकावून तो रम्याच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला, "झाला का न्हाई तुजा च्या पिऊन? आटप की लेका. चल जरा शेताकडं चक्कर मारून येऊ. "
रम्याने एका घोटात उरलेला चहा संपवला आणि ते दोघे चप्पल अडकवून घराबाहेर पडले. जाताजाता रम्यानं हळूच पेपरचं तेवढं एक पान पटकन घडी करून खिशात टाकलं. गावाबाहेर पडून शेताच्या रस्त्याला लागेपर्यंत दोघे गप्पच होते. आपल्याआपल्या विचारात झपझप चालत होते. मग रम्या हळूच म्हणाला,"हां, बोल आता."
"आता मी काय बोलू? तूच सांग. तू का जाहिरात दाखवायला गडबडीनं माज्याकडं आल्तास?"

यावर रम्याने परत मौन धारण केले. चारपाच पावलं चालल्यावर गणपत त्याच्यावर करवादला.
"आता बोलणार हाईस का जाऊ मी परत घरला?" असं म्हणून तो मागं वळला.

"ये लेका. थांब जरा. मी जाहिरात दाखवली खरं, पण ती बघून तुला बी काई तरी इचार आलाच असलं की?" - रम्या.
"हं. ...... अशी गर्लफ्रेंड मिळती व्हय? आनी आपल्याला काय गर्लफ्रेंड-बिंड नकोय. गावात ऱ्हायचं हाय आपल्याला." - गणपत.
"आर काय सांगाय लाग्लाईस तू मला. आपल्या गावातली बारकीसारकी पोरं पोरी आता गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड खेळाय लागल्यात. परवा माज्या भावाचं पाच वर्षाचं पोरगं, शेजारच्या पोरीला खेळायला घेऊन आलं आनी आईबापाला म्हणलं,'ही माजी गर्लफ्रेंड हाय.' आमची सगळ्यांची हासून फुरेवाट झाली." - रम्या.
"हे टिव्ही मोबाइलनं सगळ्यांची डोस्की पार बिगडल्यात. आरं आनी काय माज्या पोजीशनचा इचार करशील का न्हाई. चेअरमन हाय लेका मी कारखान्याचा! हिथं लोकं टपल्यालीच असत्यात. कधी गडी कसल्या लफड्यात गावतोय बगायला. आमच्या घराण्यात मागच्या दहा पिढ्यात कुनी अंगावर शिंतोडा उडवून घेतला न्हाई." - गणपत.
"ते सगळं खरं हाय गणपत. पर आपन तरी काय असं येडं वाकडं करू का? तूच इचार कर, ही अशी पानभर जाहिरात द्यायला ही लोकं काय येडी हाईत का? सगळं लिगल आसल म्हणूनच दिली आसल नव्ह?” -रम्या.
"नुसतं लीगल असून भागत न्हाई लेका. समाजाला बी मान्य असावं लागतं. " - गणपत.
"तूज म्हणणं खरं हाय. पन मी काय म्हंतो, आपन गर्लफ्रेंड म्हणून कशाला आनायची? रितसर कारभारीन करून आनू की?" - रम्या.
"काय लेका? ही असली कारभारीन पायजे व्हय तूला? तूजा बापू घरात घील काय तूला?" - असं म्हणून गणपत खो खो हसायला लागला.
"ये, आता तू माजीच फिरकी घे. आमी गरीब मान्स कशाला असलं काय करतोय. तुज्यासाठी सांगत हुतो. पर जाऊदे, चल घरला जाऊ." - रम्या.
"आर हे असलं ध्यान आमच्या घरात चाललं का? आबा फोटूतनं भाईर यिऊन फुकनीनं हानतील मला. लागलाय सांगायला." - गणपत.
"ये शान्या, तू जाहिरात नीट वाचली बी न्हाईस. नुस्ताच त्यातला फोटु बघून बिथरलाईस." - रम्या.
"म्हणजे?" - गणपत.
रम्यानं खिशातलं पेपरच पान बाहेर काढून त्याच्यासमोर जाहिरात धरली.
"हे बघ, इथं लिहिलय इंग्लिशमध्ये. 'टू द स्पेसिफिकेशन' करून देऊ म्हणून. तू सांगशील तशी पोरगी तुला मिळलं. तू सांग की नऊवारी नेसनारी, नाकात नथ घालनारी पायजे म्हनून." - रम्या
"ये असलं काय नकोय मला. तुला माहिती हाय नव्ह, आबास्नी शिकल्या सावरल्याली सून पायजे होती. पन मला एक गोष्ट कळत न्हाई, ही जाहिरात देनारे काय देव हाईत का देवदूत? अशी कशी पायजे तशी पोरगी करून देतील?" - गणपत.
"अरे तसलं काय न्हाई. सगळा विज्ञानाचा चमत्कार हाय. आनी हे बघ, मला बी ह्यातलं सगळंच कळतंय असं न्हाई. पन थोडं फार वाचलेलं सांगतो तुला. रोबो म्हणत्यात याला. म्हंजे यंत्रमानव. आनी सहा महिन्यामागं, सरकारनं कायदा बी केलाय की मानसाचं आनी यंत्रमानवाचं लिव इन लिगल हाये म्हनून." - रम्या.
"लिव इन म्हंजे लगीन नव्ह रम्या. येवड तर मला बी कळतंय." - गणपत.
"अरे पन जिथं लिव इन चालतं तिथं लगीन चालनारच की! हे बग, आपन वकिलाला इचारू. त्यो आपल्या गावचा पवाराचा पोरगा जिल्हा कोर्टात वकिली करतो. मी त्येला फोन करून इचारतो" - रम्या.
"आनी त्येला काय सांगशिल? ही जाहिरात आनी सगळ सांग. म्हंजे लगेच सगळ्या गावभर बोंबाबोंब!" - गणपत.
"ये, त्येला सगळं सांगायची काय गरज न्हाई. आपन फकस्त मुद्याचं इचारू. जिथं लिव्ह इन चालतं तिथं लगीन चालत का?" - रम्या.
"बरं, इचार बाबा.” असं म्हणून गणपत थोडा वेळ गप्पच राहिला. रम्या पण काठीनं बांधावरची माती खरडत इकडं तिकडं बघत राहिला.
रम्या मग गणपतला तिथंच सोडून थोडं दूर शेताच्या दुसऱ्या टोकाला गेला. बराच वेळ फोन वर बोलत राहिला. तो परत आला तेंव्हा गणपतने त्याला विचारले,"झालं का बोलनं?"
"व्हय झालं. आनी वकिल बी म्हणाला की काई प्रॉब्लेम न्हाई म्हणून!" - रम्या .
"म्हंजे तू त्येला सगळंच सांगितलंस नव्ह? तरी मी म्हणतोय इतका येळ काय बोलतोय?" - गणपत.
"ये...गप आता. कायबी सांगितलं न्हाई. जेवढं इचारायचं हुतं तेवढंच इचारलं. आनी कॉल लागत नव्हता म्हणून येळ लागला, कळलं? " - रम्या.
"खरच वकिल म्हणाला, लगीन पन चालतंय म्हणून?" - गणपत.
"व्हय, आनी आता तुला काय करायचं ते तू कर. मी घरला चाल्लो. मला आता भूक लागलिया." असं म्हणून रम्या चालू पन लागला.
"अरे थांब, थांब" म्हणत गणपत त्याच्या मागे जाऊ लागला.
रम्याला गाठून त्याचा हात पकडून म्हणाला,"येनार नव्ह तू उद्या, तुझी वैनी बगायला?"
"हां आता कसं? येनार म्हंजे येनारच." – रम्या.
==================================================================================
"हाऊ कॅन आय हेल्प यु, सर?" रिसेप्शनिस्ट ने पुन्हा तोच प्रश्न विचारला.
"ही जाहिरात ... म्हंजे ते आपलं ... गर्लफ्रेंड ... म्हंजे ..." रम्याला नक्की काय सांगावे ते कळेना.
"आमाला ती जाहिरातीतली गर्लफ्रेंड पायजे हाये... म्हंजे गर्लफ्रेंड म्हनून न्हाई ..." - रम्या.
आता चकित होण्याची रिसेप्शनिस्टची वेळ होती.
"आर यू शुअर? ... आय मीन ... तुम्ही नक्की काय म्हणताय? तुमचा काहितरी गोंधळ ….”- रिसेप्शनिस्ट.
"गोंधळ न्हाई मॅडम. ही जाहिरात वाचूनच आलो आमी." - रम्या.
"तुम्हाला ही गर्लफ्रेंड पाहिजे असंच म्हणायचंय ना?" - रिसेप्शनिस्ट.
"मला न्हाई, माज्या ह्या मितराला. ह्याच्यासाठी पायजे." - रम्या.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चाललंय Happy
हा भाग पण आवडलाय.
उत्सुकता वाढली आहे पुढे काय होइल याची.

दक्षिणाजी, मी तुमच्या लिखाणाची फॅन आहे.
तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी नक्कीच प्रोत्साहनदायक आहे.
खूप धन्यवाद.