मिनिमलिस्ट जीवनशैली भाग १, भाग २

Submitted by स्मिता द on 1 March, 2017 - 03:20

मिनिमलिस्ट जीवनशैली

मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजे काय ? थबकायला होत ना शब्दाशी. मलाही असेच झाले . मिनिमलिस्ट म्हणजे काय असेल..जरा शोध घेतला..लोकमतला येणारे शर्मिला फडक्यांचे लेख वाचले जरा जरा उलगडत गेले.मिनीमलिस्ट म्हणजे कमीत कमी. कमीत कमी कशांत? तर सगळ्याच बाबतीत कमीत कमी. आपल्या गरजांच्या बाबतीत ही कमीत कमी. आता अन्न, वस्त्र , निवारा या आपल्या प्राथमिक गरजा आहे. हे तर आपण अगदी लहानपणा पासून शिकलो . कलायला लागले तसे अनुभवलेही. कमीत कमी वापरात गरजेपुरते जमवत जगणे म्हणजे मिनिमिलिस्ट . पण गंमत म्हणजे या गरजा आपण खुप वाढवलेल्या आहेत. त्यापाठी मानसिक स्वास्थ तर घालवलेच आहे आणि मानसिक स्वास्थ हा शारीरिक स्वास्थ्याचा पाया. हेच आपण विसरलो आहोत. जन्मभर धावत धावत आपल्याला अधिक काही मिळवायचा हव्यास असतो. आणि त्या हव्यासापायी आपण खरंच सुख आणि आनंद मिळवतो का. चार घटका थांबून यावर चिंतन केलं तर मला वाटत नव्व्दटक्के उत्तर नकारार्थी ये ईल. मला स्वतः: कितीसा आनंद मिळाला आणि किती त्रास झाला याचे उत्तर स्वतःला त्रास जास्ती झाला असेच ये ईल. इथे त्रास हा शब्द मी दोहो बाबत वापरते. प्रत्येक गोष्ट करताना फक्त एक प्रश्न मनाला विचारला “खरंच गरज आहे का? अगदी मनापासून दिलेले उत्तरे होकार्थी पेक्षा नकारार्थी जास्त येतील.

मिनिमिलझम ची व्याख्या ही काही एकमेव किंवा एकच असणार नाही फक्त मिनिमिझम चौकटीचे सूत्र मात्र एक असेल गरजेपुरते आणि कमीत कमीहेच सूत्र आपण आता आपल्या अन्न वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांवर लावून पाहू, अन्न हे किती साधेसे उदाहरण..अन्नासाठी दाही दिशा फिरवीशी जगदिशा म्हणतो आपण खरच. पण इतकी गरज आहे का दाही दिशा फिरायची. उत्तम अन्न ताजे सकस आणि आपल्या आरोग्यासाठी सभोतालासाठी कुठले अन्न हवे ? कुठले नको? त्याचे आरोग्यावर होणारे चांगले किंवा वाईट परिणाम याचा विचार आपण केलाय का ?

मिनेमिलिस्ट जीवनशैली- अन्न

आता मिनेमिलिस्ट जीवनशैलीमध्ये अन्न कमी खा , डाएट करा असा अर्थ होतच नाही.आपल्या शरीरारोग्याला आवश्यक अन्न कुठले . याचा विचार व्हायला हवा. जिभेचे चोचले म्हणून खाल्लेले अन्न वेगळे आणि जगण्यासाठी खाल्ल्लेले अन्न वेगळे . हा निश्चित फरक आहेच दोहोतही. आपली पारंपरिक जीवनशैली , अन्न विषयक अतिशय सुंदर आणि आरोग्यपुर्ण होती असेच म्हणावे लागेल.
आज एकविसाव्या शतकात आपण सगळेच खाद्य पदार्थ खातो इटालियन मेक्सिकन थाई ..खातो म्हणजे तो आपल्या प्रतिष्ठेचा भाग केलाय आपण. पण खरंच आपल्या हवामानाला , जीवनशैलीला ते पोषक आणि अवश्य आहे का याचा जरा थबकून विचार करायला हवा आपण राहतो महाराष्ट्रात. आपले हवामान कसे आहे. आपल्या इथे आपल्या हवामानाला योग्य अशीच पिके येतात. आणि तीच आपल्या आरोग्यासाठीही उपयुक्त असतात. हा साधा सरळ विचार जरी केला आणि अमलात आणला तर आरोग्याची चतु:सुत्री आपल्याला सापडेल
.काय पिकते आपल्या हवामानात तर तांदूळ, आंबेमोहर , इंद्रायणी, जिरे साळ काळभात वैगरे अनेक जाती महाराष्ट्रात आहेत.
ज्वारी, बाजरी, आणि अजून एक पीक आता काळाच्या पडद्याआड झाले मी वाचले होते त्या बद्दल मिलेट. ही धान्ये
पालेभाज्या आंबा, जांभूळ, बोरे, सीताफळ, चिक्कू, अंजीर, करवंदे, फणस इ नेक फळे जी आपल्या मातीत सहज येतात आपल्या हवामानात टिकतात.
या सगळ्या अन्नधान्याचा समावेश आपल्या आहारात केला तर ते उपयुक्तच ठरेल ना? बरेच रोग आपण आपल्या आहारा विहाराच्या चुकीच्या सवयीने मागे लागून घेतले आहेत. ते कमी होतील हे निश्चित .
शुद्ध गायीचे तूप, करडई, शेंगदाणा अशी तेल बियांपासुन मिळणारी तेले. जी आपल्या भूमीत पिकतात. त्याचा शोध घ्यायला हवा. तेल पण मशीन मध्ये न करता घाणीवर केले असेल तर उत्तमच.
धान्ये पण पॉलिश न करता, हातसडीची वापरायला हवीत.
डाळी, कडधान्ये जी महाराष्ट्रातून अता नामशेष होते चालली आहे, कडधान्याला बाजारपेठ नाही म्हणुन शेतकरीही कडधान्याचे उत्पादन घेत नाही.
असे रासायनिक प्रक्रिये विरहित. साधे आपल्या जवळपास पिकणारे अन्न्धान्य आपण खाल्ले तर कित्येक आरोग्याचा तक्रारी दूर होतील

हा भाग झाला अन्न्धान्ये निवडीबद्दल. दुसरा आपल्या मिलिमनिस्ट जीवनशैली बाबत करायचा झाला तर हे अन्न सेव किती करायचे तर आपल्या गरजेपुरते. अगदी मूठभर अन्नाची खरे तर आपल्याला गरज असते. आपण आवडीपोटी गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन करतो हे निश्चित. ते ही केवळ आवड म्हणून फास्ट फूड, आणि हौस म्हणून रेडी टू इट अन्न पदार्थ. मोठेपणा मिरवायला म्हणुन परदेशी पदार्थ हे त्यात ओघाने आलेच. लोकसत्ता मध्ये आले होते तीन शुभ्र शत्रू मीठ, साखर आणि मैदा. ह्याचे अतिरिक्त सेवन हे आपल्या आरोग्यासाठी शत्रू सारखे ठरत असेल तर निश्चित आपण ते शक्य असेल तिथे टाळायला हवे. मीठ चवी साठी गरजेचे असतेच ते पण चवीपुरतेच असावे. मैदा तर पुर्णपणे वर्ज्य करू शकतोच आपण. साखरेला गूळ हा पर्याय होऊ शकतो. ह्या अगदी वर वर सहज दिसणाऱ्या गोष्टी. यातील जाणकार, तज्ज्ञ यात भर घालूच शकतील आणि त्यांचे ज्ञान आपल्याला निश्चितच फायदेशीर आणि मार्गदर्शक ठरेल.

ही झाली अन्न विषयक गरजेवर अगदी वरवर चर्चा. आपण अजून वस्त्र आणि निवार या बाबीबद्दल ही बघू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीही नविन घरात आल्यापासून बऱ्याच गोष्टी घेताना आधी विचार करतेय. अर्थात या लेखात दिलीये त्याप्रमाणे एकदम बेसिक लेव्हलला गेले नाहीये पण बऱ्याच गोष्टीत बदल करता येत आहेत:

१. आजकाल सेल आहे म्हणून एखादी गोष्ट किंवा वस्तू किंवा खायचे पदार्थ इत्यादी जास्त आणून ठेवले जाते. मग त्यातील बरेचसे एक्सपायरी डेट आली कि फेकून दिले जाते. असे पूर्वी व्हायचे. उदा: अमेरिकेत मोठ्या होलसेल दुकानांत चीज, फळे, प्लॅस्टिकच्या झिपलॉक बॅग, ऍल्युमिनियम फ़ॉइल अशा अनेक वस्तू पदार्थ मिळतात, मोठ्या प्रमाणावर. मग सूट आहे म्हणून घेतले जाते उगाचच. या सर्वांवर बंदी आणली आहे. लागले तर दुकानात जाऊन पुन्हा आणू पण घरात नको, असा विचार त्यामागे आहे.

२. इथे थंडीत जास्त वेळा बाहेर पडता येत नाही म्हणून भाज्या, ब्रेड इत्यादी ३ आठवड्याचे तरी आणतो. पण सध्या त्यात कुठल्या भाज्या, वस्तू खराब होतील हे पाहून त्यानुसार ते आधी संपवत आहे. अन्नाची कमीत कमी नासाडी व्हावी हा हेतू. पूर्ण फ्रिज रिकामा झाल्याशिवाय आणायला जात नाही.

३. मुलांचे कपडे लवकर लहान होतात. पण आधी हौस म्हणून एकाच टाईपचे अनेक कपडे घेऊन यायचो आणि बरेच लहान होतात कारण इथे उन्हाळा आणि थंडीचे कपडे त्या त्या ऋतूमध्येच वापरावे लागतात. मग आता दरवर्षी नवीन सीजन सुरु झाल्यावरच कपडे घ्यायचे, आठवडा भर पुरतील इतकेच.

४. खेळणी: उगाच हट्ट करत आहेत म्हणून घ्यायचे नाही. यात नवऱ्यालाही थांबवावे लागते. कारण त्याला डील चांगली वाटली तर उगाच घ्यायची म्हणतो. वाढदिवसाला घेतो खेळणी आणि दिवाळी-नाताळच्या वेळी. पण त्यातही शक्यतो शिकता येईल अशी खेळणी घेण्याचा प्रयत्न करतो. पण एकूण प्रमाण बरेच कमी झाले आहे. लोकांच्या मुलांकडे अमुक तमुक महाग खेळणे आहे म्हणून घेऊन देत नाही. ज्याची किंमत योग्य वाटते तेच घेतले जाते.

५. चपला, पर्स यांत जास्त गुंतवणूक करत नाहीये. ५ वर्षांपूर्वी हौस म्हणून एकदम २-३ घेतल्या होत्या. त्याच आलटून पालटून वापरत आहे. शूज मात्र कमी केले पाहिजेत. अर्थात त्यात उन्हाळ्याचे, हिवाळ्याचे वेगळे असावे लागतात आणि रनिंगचे असे तीन प्रकार असल्याने एकदम जास्त होतात असे वाटते. पण ते एकदा घेऊन पुन्हा ५ वर्ष तरी ते घ्यायचे नाहीत असे केले पाहिजे.

६. घरात डेकोरेशन इ साठी पूर्वी हौस म्हणून वस्तू घेऊन ठेवायचे. पण आता नवीन घर घेतल्यावर सुरुवातीला जे सामान घेतले त्यानंतर आवडले काही तरी घेत नाही. छान आहे म्हणून सोडून देते. घरात आधी भांड्याचेही तेच व्हायचे, मोठी भांडी, छोटी भांडी, ओक आल्यावर लागणारी असे गोळा करत बसायचे. आता एकदाच हवी ती घेतली आहेत आणि ती खराब होतील तेव्हाच नवीन, तोवर समोर काही आले तरी घायचे नाही.

७. मला वाटते पाहुणे येतील किंवा ४ लोकांसाठी जास्त वस्तू घरात ठेवणे यात गैर काही नाही. पण ते किती त्याला मर्यादा हवी. उगाच पाहुण्याला हॉटेलमध्ये राहल्यासारखे वाटायची गरज नाहीये. पण ज्यादा अंथरूण, पांघरूण असावे असे वाटते.

८. फोन, टीव्ही, लॅपटॉप इ वस्तू गरज असली तरच घ्यावे नाहीतर उगाच नवीन बाजारात आला आहे म्हणून जुना विकायची गरज वाटू नये लोकांना, असे मला वाटते. गेले ५ वर्ष एक फोन वापरत आहे. त्यात लोकांचे ४ नवीन फोन पाहिलेत. त्याची गरज नसावी असे वाटते.

९. माझा वीक पॉईंट म्हणजे 'कपडे' आणि 'घड्याळे': कपडे लहानपणी मोजकेच होते आता कमावतेय तर का नाही घ्यायचे असे वाटते. तेच घड्याळाबाबत. कदाचित तिथे काटछाट करायला हवी पण अजून मन भरले नाहीये. ज्या दिवशी 'मी हा ड्रेस कधी विकत घेतला' हे आठवणार नाही त्यादिवशी बंद करेन असे नवऱ्याला म्हणते.

१०. आमच्याकडे दोघेही नियमितपणे आय टी मध्ये चांगली नोकरी करतो. जिथे राहतो तिथे भारी गाड्या (सध्या एक आहे दोन)घेऊ शकतो. पण सगळे घर महिनाभर एकाच्याच पगारावर चालवता आले पाहिजे इतकाच खर्च करायचा हे डोक्यात पक्के ठेवलेले आहे. त्यामुळे एकच गाडी घेऊन स्टेशनला जातो आणि ट्रेनने, बसने प्रवास करतो. उगाच पार्किंगचे ज्यादा पैसे देत नाही.

११. खाण्याच्या बाबतीत जेवढे ४ लोकांना लागेल तितकेच मोजकेच बनवतो, शिल्लक राहिलेले डब्यात घेऊन जातो, टाकून देत नाही. बाहेर हॉटेलमध्ये मुलांना हौस म्हणून आठवड्यातून किंवा १५ दिवसातून एकदा घेऊन जातो. बाकी जंक फूड एकदम कमी. चिप्स, कोल्ड्रिंस, इ वस्तू घरात आणत नाही. रोजचे ताजे जेवण बनवून जेवतो. (अमेरिकेत त्यासाठी जरा जास्त कष्ट पडतात म्हणून हे नमूद केले आहे.)

१२. सर्वात महत्वाचे म्हणजे सध्या अगदीच गरज आहे असे वाटले तरच नवीन वस्तू घरात आणत आहे नाहीतर वेळ पडेल तेंव्हा बघू म्हणून सोडून देतो.

यांत कुणाला अतिशयोक्ती वाटण्याची शक्यता आहे पण सध्या अमेरिकेतील वास्तव्य पाहता बऱ्याच गरजा कमी केल्या आहेत असे मला वाटत आहे आणि अर्थातच अजून कमी करता येतील यात शंका नाही. पण या लेखाने पुन्हा विचार करायला प्रवृत्त केले आहे.

धन्यवाद.

विद्या.

सिंबा, 'स्वस्त/महाग' आणि 'कमी/गरजेपुरतं' यामधे थोडी गल्लत होते आहे की काय? असे वाटते आहे तुमची पोस्ट वाचून.
उदा. तुमच्याच पोस्टमधले 'तुम्हाला संगीत ऐकायला आवडते आणि जाणही आहे तर तुम्ही तुम्हाला परवडणार्‍या किमतीचे हेडफोन घेणे, आणि ते मनसोक्त पूर्णपणे आनंद घेत वापरणे' हे एका बाजूला आणि ते हेडफोन्स तुमची गरज पूर्ण करत असताना शिवाय अजून हेडफोन्स अ‍ॅड करत राहणे हे दुसर्‍या बाजूला. ह्या दोन्ही गोष्टीतला फरक लक्षात येणे/घेणे आवश्यक आहे.

@ वाढदिवस उदाहरण - हा मुद्दा मिनीमलीस्टीक जीवनशैलीचा नसुन बॅड प्लॅनींगचा आहे.
जर घरात ४ भांडी आहेत, आणि मुलाचा वाढदिवशी अमुक तारखेला १५ लोक येणार असतील, तर प्लॅन करून हवी तितकी भांडी रेंट करण्याची किंवा मित्र-नातेवाईंकाकडून 'त्या दिवसासाठी म्हणून वापरायला' जमा करण्याच्या सोयी आहेतच.

@ कामाचं ठिकाण सोडता, इतर ठिकाणी तुमच्या मित्रमंडंळींमधे- नातेवाईकांमधे तुमची ओळख तुमच्या विविध /खूप कपड्यांनी, गॅजेट्सनी, दागिन्यांनी इ. ठरत असेल आणि विचारांनी नाही, तर हे लोक खरंच आपले मित्र आहेत का? यावर विचार आवश्यक आहे. मिनीमलीस्टीक लाईफस्टाईल फिलॉसॉफीला वगळून मांडणं म्हणूनच अवघड वाटत मला अनेकदा.

@ ट्रॅव्हलबद्दल बोलायचं तर मी स्वतः कामासाठी, हायकींग करत, व्हेकेशन म्हणून इतकी फिरलीये आणि फिरते की 'जितकं लाईट ट्रॅव्हल कराल, तितकं ट्रॅव्हल कमी स्ट्रेसफुल आणि जास्त एंजॉय करता येतं' हा माझा ट्रॅव्हल मंत्र आहे.

हे सगळं अती झालं आणि वैराग्य आलं टाईप चाललंय असं वाटतंय मला.
यापुढे जे नवे शोध लागतील (सेल्फ ड्रायव्हिंग कार, इलेक्ट्रिक कार, अलेक्सा, ऑडीओ बुक्स, वेअरेबल इलेक्ट्रोनिक्स, नव्या बाईक्स हे सगळ आजच कमर्शिलाईज्ड आहेतच, त्यापुढे लागतील ते शोध) या आणि पुढे येणाऱ्या प्रत्येकात नव्या गोष्टीत काहीना काही उपयोगी फिचर असणारच आहे. आज त्या विना जगलं जात असलेलं जीवन, त्या नव्या गोष्टी आल्याने नक्कीच अजून सुखकर बनणार आहे. तर त्यातील कुठलीही गोष्ट घेण्यापूर्वी ती गोष्ट मिनिमलिस्ट नाही हे ठरणार का घेऊन वापरून कंटाळा आला की ती बुद्धी सुचणार?
का दोन च्या वर फिटबिटस म्हणजे टू मच, त्या खाली मिनिमलिस्ट, गराज डोअर ओपनर घ्यायचा तर मग वायफायचं फिचर नसलेला म्हणजे मिनीमलिस्ट ?
मला तर वाटायला लागलंय की सगळं घ्यायचं फक्त काही फुकट दवडायच नाही ही मिनिमलिस्टची व्याख्या बनणार की काय!.

मिनिमलिस्टिकचा विठोबा हा अपॉर्च्युनिटीजचा पोटोबा भरल्यावरचा आहे

>> लाख प्रतिसादातला एक प्रतिसाद!

इथे सर्व प्रकारचे प्रतिसाद देताहेत लोक, त्या सगळ्याचा मान ठेवून इतकंच लिहावसं वाटतंय - की जगात 'सुटसुटीत, साधं, कमी पसार्‍यात, कमी कचर्‍यात क्रीएटीव्ह जगावं' असं वाटणारे लोक देखील असतात. त्या दिशेने लोक प्रयत्नही करत असतात.
'कमी गोष्टी म्हणजे वैराग्य' इतकं साधं सोपं सरळ समीकरण न मांडताही अत्यंत कमी गोष्टींमधे आयुष्य रसरसून जगणारी आणि जगू पाहण्याचा प्रयत्न करणारी माणसंही असतात. त्यांना त्यांच्या मार्गानं जगू द्या. तुमचा मार्ग तो नाही, याचा अर्थ दुसरे सगळे मार्ग अर्थहीन, किंवा भंपक आहेत असं म्हणणं कितपत योग्य आहे? यावर खरंच विचार व्हावा ही इच्छा.

भले वजन कमी करणं असो, डाएटींग असो, व्यायाम करणं असो किंवा लाईफस्टाईल चेम्ज असो - तुम्हाला करायचं आहे का नाही? इतकाच प्रश्न असतो.

करायचं नसेल/विचारात पटत नसेल - हे विषय तुमच्यासाठी नाहीत. विषय संपला.
करायचं असेल - मार्ग असतात, आणि सरळ दिसले नाहीत तर इच्छा असणारी माणसं ते शोधतात.

इतिश्री !

कमी गोष्टी म्हणजे वैराग्य' इतकं साधं सोपं सरळ समीकरण न मांडताही कमी गोष्टींमधे आयुष्य रसरसून जगणारी आणि जगू पाहण्याचा प्रयत्न करणारी माणसंही असतात. त्यांना त्यांच्या मार्गानं जगू द्या. >> अ‍ॅग्री!

बाकी "पोट भरल्यानंतरच्या" कॉमेण्ट्स बद्दल - पण हे तर ऑब्व्हियस आहे. ज्यांना हे मुळातच मिळत नाही त्यांना हा प्रश्नच येणार नाही. ज्यांच्या लाइफस्टाइल मधे असंख्य गोष्टी भरलेल्या आहेत त्यांनाच हा प्रश्न पडणार. मला स्वतःला मिनिमलिस्ट वगैरे जमेल असे अजिबात वाटत नाही. पण ज्यांना जमते किंवा ज्यांना महत्त्वाचे वाटते त्यांना good for them!. नाहीतर या लॉजिक ने कोणी आहारावर्/डाएट वर लेख लिहीला तर "हॉ हॉ हॉ, म्हणजे तुमचे वजन वाढलेले दिसते" म्हणण्यासारखे आहे.

मिनेमिलिस्ट जीवनशैलीसाठी Sport Illustrated च्या मॉडेल्स माझे आदर्श आहेत. उगाच भारंभार कपडे नाहीत आणि अंगकाठीवरुन तरी वाटते की जेवणावर वायफळ खर्च होत असेल.

माझ्या एका कलीगची याबाबतीत निराळी व्याख्या आहे. त्याच्या मते मिनेमिलिस्ट जीवनशैली म्हणजे "कमीत कमी" जीवनशैली. म्हणजे, हनिमून साठी युरोपला जाता नाही आले तरी "कमीत कमी" सिंगापूर ला जाईन, ताजमध्ये जाता नाही आले तरी "कमीत कमी" बार्बेक्यु नेशन मध्ये डिनर घेईन, बंगला घेता नाही आला तरी "कमीत कमी" २ BHK फ्लॅट तरी घेईन.

कंजुसपणा १०% आणि उर्वरित ९०% भारतीय जनतेला काटकसर हे गुण जन्मजात लाभतात. त्यालाच मिनेमिलिस्ट जीवनशैली असे गोंडस नाव आहे काय?

मला वाटलं लेख फक्त आणि फक्त जपान मधल्या जीवन्पद्धती बद्दल एक माहिती म्हणून असेल पण तेच तेच ते आहे.

माझी आजी, पणजी आणि लहानपणी आम्ही काय करत असु आणि आम्हाला कशी पर्यावरणावरील होणार्‍या परीणामांची जाणीव आहे... ब्ला ब्ला.. ब्ला असे प्रतिसाद आले नाही म्हणजे मिळवलं.
आधी परवडत नसल्याने एका शर्टावर राहिलो असे सांगण्याएवजी आम्ही कसे संवेदनशील आहोत असा मोठेपणा सांगतात.

कमीत कमी गरजा हा खूपच खाजगी होत चाललेला विषय आहे ... हिच गोची आहे. लोकं आपापली बहाणे बनवतात की पुस्तकं काय चांगली आहेत, ऑर्गॅनिक काय चांगले आहे म्हणून सपोर्ट करतो वगैरे उगीच...

लोकांना संवाद साधायला मायबोली लागते.... त्याचे काय?

>>'कमी गोष्टी म्हणजे वैराग्य' इतकं साधं सोपं सरळ समीकरण न मांडताही >> असं कोणी आणि कधी मांडलय समिकरण?
>>अत्यंत कमी गोष्टींमधे आयुष्य रसरसून जगणारी आणि जगू पाहण्याचा प्रयत्न करणारी माणसंही असतात. त्यांना त्यांच्या मार्गानं जगू द्या. >> हल्ली मायबोलीवर जराही वेगळं मत मांडलं की डायरेक्ट जगण्याच्या अधिकारावर गदा आणली आहे समजून का लिहिलं जातय? एकुणच दुसरं मत जाणून/ समजून घ्यायचे प्रयत्न का केले जात नाहीयेत. का जग एकारलं जातयं त्याचाच परिपाक?
माझा मुद्दा आणखी सोपा करुन सांगायचा तर चिकू विकताना तो आंबा आहे सांगून विकण्यात काय हशिल?

>>ज्यांच्या लाइफस्टाइल मधे असंख्य गोष्टी भरलेल्या आहेत त्यांनाच हा प्रश्न पडणार. मला स्वतःला मिनिमलिस्ट वगैरे जमेल असे अजिबात वाटत नाही. पण ज्यांना जमते किंवा ज्यांना महत्त्वाचे वाटते त्यांना good for them!. नाहीतर या लॉजिक ने कोणी आहारावर्/डाएट वर लेख लिहीला तर "हॉ हॉ हॉ, म्हणजे तुमचे वजन वाढलेले दिसते" म्हणण्यासारखे आहे.>> फा, पहिल्यांदा ज्यांच्या जीवनशैलीत कचरा भरलेला आहे त्यांनाच तो स्वच्छ करावा वाटणार हे अगदी बरोबर आहे. पण म्हणूनच मी प्रश्न विचरलेला की आज जर जीवन सुखी आहे आणि आता जे 'मी मिनिमलिस्ट शैली स्वीकरतो आहे' असं ठरवतील ते यापुढे ज्या सुखसोयी येतील मग त्या दळण वळण, दैनंदिन उपकरणे किंवा स्पेस ट्रॅव्हल असं काहीही असो, त्यासाठी हे मिनिमलिस्ट लोक याची गरज नाही समजून पुढे जाणार का त्या वापरुन मगच त्यातले तोटे कळणार? आणि मग हे कसं थोतांड आहे आणि खरं सुखं कसं सगळं सोडून पर्यवरण रक्षणात आहे आणि त्यासाठी मी काय करतो/ते ते सांगणार?
स्वत: भोग भोगून नंतर दुसर्याला शिकवणे हे मला स्वतःला आवडत नाही. अनुभव ज्याचे त्याला घेउ द्यावे अशा मताचा मी आहे. त्यातही हे एकदा केलं तर ठीक आहे, पण दरवेळी हा लर्निग कर्व असेल तर ती भंपक आत्मप्रौढी आहे.

<<<<पण गंमत म्हणजे या गरजा आपण खुप वाढवलेल्या आहेत........................ होकार्थी पेक्षा नकारार्थी जास्त येतील.>>>>

हे सगळे खरे आहे. जोपर्यंत धडपड करण्याची ताकद अंगात आहे तोपर्यंत मात्र सगळ्याची हाव असते.
नंतर जसे जवळ पैसे असतील त्याप्रमाणे लोक आपली हौस मौज चैन पुरवून घेतात. त्याला कुणाचा आक्षेप असू नये, जोपर्यंत त्याचा त्रास इतरांना होत नाही.
काही लोक जसे लेखक, कवि, कलाकार, परोपकारी माणसे मरेस्तवर धडपड करत रहातात. मग त्या साठी जे लागेल ते करण्यात गुंतले असतात, शरीर स्वास्थ्याची, मानसिक स्वास्थ्याची त्यांना काळजी नसते.
कदाचित स्वस्थ बसले तरच त्यांना मानसिक अस्वस्थता जास्त वाटत असेल.

अमित तुझा प्रश्न त्याच्या पुढचा आहे. फेअर पॉईण्ट. मला मिनिमलिस्ट मधले काही कळत नाही, पण येथे वाचले आहे त्यावरून तरी असेच वाटते की नवीन गोष्टीलाही हेच लागू होईल. तुम्हाला जर नक्की माहीत असेल ती गोष्ट काय करते, तर ती "आपल्याला गरज असलेल्या गोष्टी" मधे मोडत असेल तर तुम्ही वापरून पाहाल, नाहीतर इग्नोर कराल. ड्रायवरलेस वगैरे सोडा, साधी कार सुद्धा एका मिनिमलिस्ट च्या दृष्टीने गरज असेल तर दुसर्‍याच्या दृष्टीने टाळता येणारी चैन.

कदाचित तुझा प्रश्न "ज्याचा उपयोग अजून नक्की झालेला नाही" अशा नवीन गोष्टींबद्दल असेल. अलेक्सा वगैरे. यांच्याबाबतीत त्या वापरून पाहिल्यावरच कळेल. त्यामुळे

मग हे कसं थोतांड आहे आणि खरं सुखं कसं सगळं सोडून पर्यवरण रक्षणात आहे आणि त्यासाठी मी काय करतो/ते ते सांगणार? >>> हे टोटली शक्य आहे, आणि मला त्यात चुकीचेही काही वाटत नाही.

चुकीचं म्हणजे, त्यातून मिळणारे फायदे त्या व्यक्तीने घेतलेले असतात. १००% वाईट काही नसतं, काही तरी चांगलं होतय म्हणूनच ते मुळात आलेलं असतं. आणि मग त्यातले अगदी जरी २०% फायदे असतील आणि बाकी ८०% तोटे असतील तरी त्या २०% फायद्याने त्या व्यक्तीने/ समूहाने कदाचित मोठी उडी घेतलेली असू शकते.
अगदी ढोबळ उदाहरण द्यायचं झालं तर भारताला फॉसिल फ्युएल बद्द्ल ते गेली ६० वर्षे पुरेपूर वापरुन त्यातून विकास घडवून जेव्हा पाश्चात्य जग शिकवते आणि तेच नियम (वापर २००० साली होता तेवढा करणे इ.) लावते तो भंपकपणा आणि चला़खी असतो.

<यापुढे ज्या सुखसोयी येतील मग त्या दळण वळण, दैनंदिन उपकरणे किंवा स्पेस ट्रॅव्हल असं काहीही असो, त्यासाठी हे मिनिमलिस्ट लोक याची गरज नाही समजून पुढे जाणार का त्या वापरुन मगच त्यातले तोटे कळणार? > हा प्रश्न बरोबर आहे.
<कमी गोष्टी म्हणजे वैराग्य' इतकं साधं सोपं सरळ समीकरण न मांडताही अत्यंत कमी गोष्टींमधे आयुष्य रसरसून जगणारी आणि जगू पाहण्याचा प्रयत्न करणारी माणसंही असतात. त्यांना त्यांच्या मार्गानं जगू द्या. > म्हणजे नक्की काय ते नीट कळाले नाही.
एखादा प्लग इन मर्सेडिझ (एकच) चालवतो, बोसचे हेडफोन्स (एकच )वापरतो, फार्मर्स मार्केट मधील ऑरगॅनिक फळे भाज्या खातो, कपडयांचे चारच जोड वापरतो पण ते उत्तम ब्रँडचे, वेगवेगळ्या देशात फिरायला जातो तर तो मिनिमलिस्ट का ?

चुकीचं म्हणजे, त्यातून मिळणारे फायदे त्या व्यक्तीने घेतलेले असतात. >> अशी व्यक्ती दुसर्‍यांना, त्यातही ज्यांनी अजून हे फायदे घेतलेलेच नाही अशांना, हे वापरू नका सांगत असेल तर तो भंपकपणा आहे हे बरोबर. पण इथे अशी व्यक्ती स्वतःच ते बदलत असेल तर ते सेल्फ-रिअलायझेशन आहे.

जगात 'सुटसुटीत, साधं, कमी पसार्‍यात, कमी कचर्‍यात क्रीएटीव्ह जगावं' असं वाटणारे लोक देखील असतात. त्या दिशेने लोक प्रयत्नही करत असतात.
'कमी गोष्टी म्हणजे वैराग्य' इतकं साधं सोपं सरळ समीकरण न मांडताही अत्यंत कमी गोष्टींमधे आयुष्य रसरसून जगणारी आणि जगू पाहण्याचा प्रयत्न करणारी माणसंही असतात. त्यांना त्यांच्या मार्गानं जगू द्या. तुमचा मार्ग तो नाही, याचा अर्थ दुसरे सगळे मार्ग अर्थहीन, किंवा भंपक आहेत असं म्हणणं कितपत योग्य आहे? यावर खरंच विचार व्हावा ही इच्छा. >>>>> +१

नवीन विचार मांडला आहे. प्रत्येक वेळी लेखकाला आपले म्हणणे सुसंगत पद्धतीने मांडता येतेच असे नाही. नेटवर या जीवनशैलीबद्दल पुष्कळ संदर्भ उपलब्ध आहेत. पुस्तके आहेत. हे खूळ म्हणून सोडून देण्याआधी त्याचे फायदे तोटे समजून घेतले तर नुकसान काहीच नाही. सगळेच लेख वाचत बसा असे कुणी म्हणत नाही. किमान दहा (चांगले) लेख वाचले तरी असे दिसेल की अमूक एक नियम पाळा असा आग्रह यात कुठेही नाही.
सर्वात आधी आपल्यासब्वयी लिहून काढायच्या आहेत. काही ठिकाणी जी प्रश्नावली दिलेली आहे तिची उत्तरे लिहून काढल्यास यातले काय काय सोडून देणे शक्य आहे हे आपले आपल्याला समजते.

उदा. एका ठिकाणी असा प्रश्न आहे की जाहीराती पाहील्यानंतर तुम्हाला ती वस्तू विकत घ्याविशी वाटते का ? - इथे मला माझी कमजोरी लक्षात आली. ही गोष्ट सोडून देता आली तरी आपल्यापुरती सुरूवात झाली. कमीत कमी गरजा हे वैयक्तिक पातळीवर ज्याचे त्याने ठरवून त्याचा अंगिकार करायचा आहे. खूप अवघड नाही हे.

{हल्ली मायबोलीवर जराही वेगळं मत मांडलं की डायरेक्ट जगण्याच्या अधिकारावर गदा आणली आहे समजून का लिहिलं जातय?}

+४२

मिनीमलिस्टिक (याला कोणीतरी सोपा मराठी शब्द सुचवा रे) आणि अँटी-कंज्युमरिस्टिक (चंगळवाद?) यामध्ये लोकं गल्लत करताहेत असं वाटतं.
मुळात चंगळवादी असलेले इथले काहीजण (जाहिरातीत नाहीतर सेल मध्ये आहे किंवा फक्त दुकानात समोर दिसतंय म्हणून गरज नसताना पर्स, चपला, कपडे, घड्याळं, स्टेशनरी इ. इ. घेणारे) त्यांची चुकीची जीवनपद्धती सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत (जो योग्यच आहे) पण त्याला ते मिनीमलिस्टिक म्हणताहेत.

मी चंगळवादी कधीच नव्हतो, म्हणजे इंपल्सीव खरेदी कधीच करत नाही. पण मिनीमलिस्टिक नक्कीच नाही. घरातल्या बहुतेक सगळ्या साठवणीच्या जागा ओसंडून जाताहेत. माझ्या लहानपणीच्या गोट्या, भोवरे, पतंगीची फिरकी, माझ्या मुलांची दुपटी, गोधड्या, आजोबांच्या काळातली हातोडी, कानस, कोयते आणि काय काय हत्यारं, ढीगभर फोटो अल्बम, ढीगभर ग्रीटिंग कार्ड्स, थंडीचे कपडे, पाहुण्यांसाठी ठेवलेल्या उशा, अंथरुण/पांघरुण, वेळप्रसंगी मोठा स्वयंपाक करावा लागतो त्यावेळची मोठ्ठी भांडी, बाजूला ठेवलेली ताटं वाट्या, चमचे, क्वचित कधीतरी वापरला जाणारा सँडविच मेकर, भेट मिळालेले सुंदर डिनर सेट काय काय नी काय काय.
नेमाड्यांच्या भाषेत सांगायचं तर माझ्या जगण्यातली ही समृद्ध अडगळ आहे. एखादी दुसरीच गोष्ट शोधताना तिसरीच समोर येते आणि हरखून जायला होतं. कधी वर्षा दोन वर्षातून एखाद्या निवांत दुपारी मी खण लावायच्या निमित्ताने घरभर पसारा मांडतो, मला ओरडता ओरडता बायको पण जवळ येऊन बसते, जुन्या आठवणी/ किस्से आठवतात.
असो. सांगायचा मुद्दा असा की चंगळवाद विरोध आणि मिनीमलिझम या जवळच्या तरीही वेगवेगळ्या विचारधारा आहेत आणि त्यात गल्लत होऊ नये

वस्तुसंचय भरपूर आहे पण पिअर प्रेशर नाही. जास्त जास्त असा हव्यास नाही. देशोदेशीचे पदार्थ चाखायला आवडतात, जिभेचे चोचले पुरवायला आवडतात पण यात प्रतिष्ठेचा भाग कुठेच नाही कारण आम्ही काय आणि कुठे जाऊन खातो हे कोणाला सांगायचा फारसा संबंध येत नाही. घरातली अनुभवसमृद्ध अडगळ दिवसेंदिवस वाढतेच आहे पण त्याचा ताण येण्याऐवजी समाधानच आहे. त्यामुळे माझ्यासाठी मिनीमलिझम हे एक फॅड आहे.

कंजुसपणा १०% आणि उर्वरित ९०% भारतीय जनतेला काटकसर हे गुण जन्मजात लाभतात. त्यालाच मिनेमिलिस्ट जीवनशैली असे गोंडस नाव आहे काय?>>>> अगदी ! मलाही हेच वाटलेलं .
अमितच्या सगळ्या पोस्टसना +१ . स्वतः सगळं उपभोगून झाल्यावर लोकांना मिनिमिलिस्टिकचे धडे देणे हा शुद्ध कांगावा वाटतो.
टग्याची लेटेस्ट पोस्ट् देखील आवडली .

अमितव आणि टग्याच्या बहुतेक पोस्ट्स पटल्या. विशेषतः टग्याने लिहिलेला चंगळवादविरोध आणि मिनिमलिझम यातला फरक अचूक आहे...

माझ्या गरजा
अन्न- जगण्यासाठी व जगण्यापुरत खातो. अघिक आवडत व मानवत नाही
वस्त्र- उन थंडी वारा पाउस यापासून स्वतःचे संरक्षण व इतरांचे लज्जा रक्षण
निवारा- शांतपणे झोपता येईल वाचता येईल शारिरिक गरजा पुर्ण करता येईल असे निवासथान

No one is writing here about FD, mutual funds, stock, gold, land and insurance, hope all the minimalist are not hoarding on to these perishable worthless things.

चंगळवाद आणि न्यूनतम / किमान जीवनशैली यात गल्लत होणे स्वाभाविक आहे. न्यूनतम जीवनशैलीशी फारकतीचं कारण चंगळवाद आणि आधुनिक जीवनशैली हेच आहे. इथे काही जण आजच्या जगात न्यूनतम जीवनशैली शक्य आहे का यापासून ते थेट हे थोतांड आहे इथपर्यंत मतं मांडत आहेत. हा धागा पाहिला तेव्हांच डॉ. अभय बंग यांच्या हृदयरोग या पुस्तकातील उतारे आठवले. त्याच्याशी या जीवनशैलीची सांगड नक्कीच घालता येईल.

उलटसुलट लेख उपलब्ध असल्यामुळे गोंधळ होणार. पण आपल्याला यातले काय चांगले हे ठरवायला कुणीही अडवू शकत नाही. डॉ. दीपक गधिया यांच्या घरी गेल्या चाळीस वर्षांपासून टीव्ही, फ्रीज या गोष्टी नाहीत. या मागे चंगळवादाचा विरोध हे कारण नसून त्याच्या आहारी त्यांना जायचे नाही. त्यांचे जीवन त्यांनी सोलर एनर्जीला वाहून घेतलेले आहे. गुजरातेत त्यांनी सौर उर्जेचा चांगला प्रचार केला आहे. त्यांची उपयुक्त संशोधने त्याला पूरक आहेत. ही उत्पादने ज्यांना वापरता येऊ शकतात , महत्वाचे म्हणजे ज्यांना त्याची आवश्यकता पटली आहे ते गॅस, केरोसीन, लाकुडफाटा यांचा वापर टाळून पर्यावरणाला हातभार लावत असतात.

पॉंडीचेरी येथील आरुविले गावचे महापौर सायकलवरून प्रवास करतो. इथे उर्जेचे एक मंदीर आहे. त्याचा धर्म, देवदेवता यांच्याशी संबंध नाही. इथली जीवनशैली "गरजेनुसार वापर" या तत्वाशी निगडीत आहे. या गावात सौर आणि पवन उर्जेला प्रोत्साहन देण्यात येते. कदाचित हे सर्व लेखाच्या विषयाच्या व्याख्येत येत नसेल. पण सूत्र लक्षात घेतले तर आपण अनेक चांगल्या गोष्टींची सांगड घालू शकतो.

न्यूनतम जीवनशैलीचा उद्देश आनंदी राहणे हा आहे. स्ट्रेस कमीत कमी घ्यायची असेल तर ज्या ज्या गोष्टींचा स्टॉक आपण करून ठेवतो त्यावर नियंत्रण आणायचे. पुन्हा याचा चंगळवादाशी संबंध नाही. बाजाराचे पिअर प्रेशर हा स्ट्रेस आहे. वस्तू आणली कि एक स्ट्रेस इनपुट वाढवला जातो. जीवनशैलीमधेही असेच ताण असतात. इथे विपश्यना, आर्ट ऑफ लाईफ, गांधीवादी जीवनशैली, आचार्य विनोबा भावे यांचे विचार यापैकी अनेक गोष्टींची आपोआप सांगड घातली जाते.

हे सर्व थोतांड आहे असे समजले तर प्रश्नच संपला. पण यातून काहीतरी लाभकारक असेल असे ज्यांना वाटते त्यांनी विचार करायला हरकत नाही.

<पॉंडीचेरी येथील आरुविले गावचे महापौर सायकलवरून प्रवास करतो. इथे उर्जेचे एक मंदीर आहे. त्याचा धर्म, देवदेवता यांच्याशी संबंध नाही. इथली जीवनशैली "गरजेनुसार वापर" या तत्वाशी निगडीत आहे. या गावात सौर आणि पवन उर्जेला प्रोत्साहन देण्यात येते. कदाचित हे सर्व लेखाच्या विषयाच्या व्याख्येत येत नसेल. पण सूत्र लक्षात घेतले तर आपण अनेक चांगल्या गोष्टींची सांगड घालू शकतो.>

ऑरोविल. आणि तिथे महापौर नाही. तिथे अनेकजण सायकलीवरूनच प्रवास करतात. मातृमंदिरातल्या 'ऊर्जे'चा आणि राहणीमानाचा अजिबात संबंध नाही. तो एक कल्ट आहे. तिथे सौरऊर्जेला आणि पवनऊर्जेला प्रोत्साहन इत्यादी मिळत असलं, तरी तिथे राहणं हे बर्‍यापैकी खर्चिक आहे.

Are yaar! majhya phone chya marathi keyboard cha problem jhalay.
Twice disabled and enabled Sad

Pages