जुने भागः http://www.maayboli.com/node/59488
ती (लाडाने) : तुला लक्षात आहे ना माझा वाढदिवस?
तो: म्हणजे काय? मला जगायचंय अजून.
ती: ह्या ह्या ! फालतू जोक मारू नकोस.
तो: मग काय करू? तुझा बड्डे म्हणजे महिन्यभराचा प्रोग्रॅम असतो. कसं विसरेन?
ती(हिरमुसून): हे बघ असं असतं. काहीही बोलायची सोय नाही.
तो: बरं सांग, त्याचं काय?
ती: हां ! मला या बड्डे ला सरप्राईज हवंय.
तो: सरप्राईज? आणि ते असं सांगून?
ती: मग काय? इतक्या वर्षात न सांगून तुला कळत नाही, म्हणून आता सांगून, मागून घेतेय.
तो: आता हे असं सांगितल्यावर ते सरप्राईज होत का?
ती: मला ते काही माहित नाही. मला हवंय म्हणजे हवंय.
तो: बरं आता हे मागूनच घ्यायचंय तर काय हवंय ते पण सांग ना?
ती: ते मला नाही माहित. काय द्यायचं ते तू ठरव.
तो: हे बघ, हे असलं त्रास द्यायचं काम मला सांगू नकोस.
ती: म्हणजे माझा बर्थडे तुला त्रासदायक वाटतो?
तो: तसं नाही, पण तुला जे हवं ते आपण एकत्र जाऊनच घेऊन येऊ ना?
ती: शी ! त्यात काय मजा?
तो: म्हणजे काय? का मजा नाही? आता तू इतकी शॉपिंग करतेस, त्यात मजा नाही वाटत? मग बर्थडे ला पण केली तर काय होणारेय?
ती: मला आवडतं सर्वांच्या वाढदिवसाला स्पेशल करायला. तेव्हढंच स्पेशल वाटतं माणसाला.
तो: अगं पण तू कायमच स्पेशल आहेस माझ्यासाठी. त्यासाठी सरप्राईजची काय गरज आहे?
ती: पण मी म्हणते का नाही?
तो: कारण मला कळत नाही, तुला काय हवं आणि काय नको असतं. मागच्या वेळी आणलेला टॉप तू बदलून आणलास.
ती: अरे मोठा होत होता तो. मग नको आणू?
तो: हो पण तू दुसराच घेऊन आलीस.
ती: अरे हो, तिथे गेले तर मग आवडला दुसरा. पण तू आणलेला छानच होता.
तो: हम्म.. जाऊ दे. तर मी म्हणत होतो, त्यापेक्षा तुला हवं ते आपण बरोबरच घेऊन येऊ.
ती: नाही नको. तुला हवं ते कर, मी काही सारखं असं बदलून आणणार आहे का? आणि मुळात गिफ्टच असं नाही, काहीही चालेल सरप्राईज म्हणून.
तो: तू ना वेडी आहेस. काय सरप्राईज? सरप्राईज?
ती: चिडतोस काय? अरे, मला काय वाटतं?
तो: काय?
ती: आपल्या माणसाला काय आवडतं, नाही आवडत हे आपल्याला तसं माहीतच असतं. आपण प्रत्येकासाठी हे खास असं काही करत नाही. आपल्याच माणसासाठी करतो.
तो: हम्म !
ती: त्याला काय आवडेल याचा जो विचार आपण करतो ना, तो महत्वाचा असतो. एखादे गिफ्ट किंवा सरप्राईज दिल्यावर जो आनंद तिला/त्याला मिळेल याची कल्पना करूनच भारी वाटतं. आणि प्रत्यक्षात केल्यावर अजूनच छान वाटतं, दोघांनाही. दुकानात सोबत जाऊन काही घेण्यात मध्ये, ते विचार करणं हरवून जातं. मला तुझ्याकडून तो विचार हवाय, माझ्यासाठी केलेला.
तो: वेडाबाई, मी तर तुझाच विचार करत असतो दिवसभर. आणि तुला तुझ्या आवडीने एखादी आवडीची गोष्ट घेतली तर त्यात तरी काय वाईट आहे?
ती: जाऊ दे, सोड.
तो: बरं !
ती(मनातल्या मनात) : माझ्यासाठी तो इतके कष्ट घेऊ शकत नाही का? त्याला कधीच नाही कळणार मला काय म्हणायचंय.
तो(मनातल्या मनात): हिला समजावणं अवघड आहे. नको असलेली वस्तू घेऊन वेळ आणि कष्ट का घालवायचे? त्यापेक्षा सरप्राईज न दिलेले बरे ना?
तर अशा रीतीने, आज पुन्हा एकदा स्वप्नं आणि सत्याचं भांडण झालं होतं. आज पुन्हा एकदा दोघेही आपापल्या जागी बरोबर वाटत होते.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
आमच्याकडे सरप्राईझ वरुन बरेच
आमच्याकडे सरप्राईझ वरुन बरेच काही झालेले आहे. सरप्राईझ म्हणून आणलेले काहीही माझ्या आवडण्याच्या मिनीमन अॅक्सेप्टेबल रेंज मध्ये पण नव्हते.
आता एकमेकांबरोबर आणतो किंवा एकमेकांनी आणल्यावर पैसे रि एंबर्स करतो
Anu been there, done that.
Anu been there, done that.
पण सुरुवात अशीच होती. आता वाद होत नाहीत. बाकी बरेच विषय आहेत वाद घालायला.
विद्या.