सत्तर व ऐंशीच्या दशकातील जीवनशैली

Submitted by स्मिता द on 24 February, 2016 - 04:33

साधारणत: सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या माझ्या सारख्या लोकाना आज मागे वळून पहाताना खरेच जाणवते की वाह ! वो दिन भी क्या दिन थे. एकुणातच समाजजीवन संथ अन खुप छान घडी दार होते. फारसे तरंग न उठणारे. शांत. कदाचित माझ्या सारख्या मध्यमवर्गीय आणि निमशहरी भागातील लोकाना तसे जाणवत होते की सगळ्यानाच हा प्रश्न मला राहुन राहून पडतो. नव्वदीच्या जागतिकीकरणामुळे झालेले हे बदल अतिशय झपाट्याने एखादा झंझावात यावा तसे समाजभर पसरले. पण आजचे पुन्हा गो टु रुटस ही जीवनशैली नव्याने उभारताना पाहून मनात असे वाटते हो ते त्या शांत चौकटीतले चौकट भर मनापासून जगणे होईल शक्य? की आमच्या वेळी असे होते हाच सूर मुलांसमोर आळवत बसावे लागेल. पण मनात कुठेतरी मुलांना पण ते जग उलगडून दाखवावे असे वाटते. ते शांत , संथ जगणे, आणि समाधानाने रहाणे म्हणजे काय हे कळावे असे वाटते. अर्थात हे अनुभव फक्त माझे एकटीचे होते की त्या काळातील सगळ्यांचेच हे आपण इथे गप्पा मारुन उजळून काढूया . जमल तर पुन्हा नव्याने तो भवताल तसा करुया. अगदी तसा नाही पण त्यातील चांगले चांगले मोती निवडुन छानसा हार तर गुंफता येईल...कदाचित त्या काळातले जीवन जगता येईल हा आशावाद मनात पालवेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या काळात जायच म्हटल की अगदी खाण्या पासून खेळण्यापर्यन्त सगळे नजरेसमोर येते. आमचे गाव तसे फार मोठे ही नाही अन छोटेही नाही असे तालुक्याचे गाव होते. शाळा घर हे आमचे विश्व. रविवारी आईने केलेली वेगळी डिश म्हणजे मोठा आनंदाचाच भाग. बरोबरच मग रविवारी रेडिओवर लागणारी बालगीते ऐकणे, दुपारी मस्त आईला लपुन गच्चीत जाऊन खेळणे. संध्याकाळ झाली की मग आता उद्या शाळेत जायचे, सुट्टी संपली अशी जाणवलेली हुर् हुरहुर. सोमवारपासून पुन्हा शाळेच्या , मित्रमैत्रिणींच्या मध्ये जाऊन नवा आठवडा. अर्थात महिने महिने गेले तरी फारसा फरक न पडलेले रुळ ते, पण एक लय असलेले. त्या रुळावरुन चालण ही ही एक सुखाचा ठेवाच होता. आजही तशी हवा पडली , एखादा सूर कानी पडला की भुर्र्कन मनपाखरु पुन्हा त्या फांदीवर जाउन बसते. अंगणात घातलेल्या सड्याचा वास दरवळतो, अन कुठूनशी आजी येईल अगदी प्रसन्नपणे अन हातात एखादा खाऊ किंवा प्रसाद देईल असे वाटते.

स्मिता, बरोबर. त्या काळातले एकूणच जीवन खूप वेगळे होते. आज जीवाला जितकी अशातंता आहे खास करुन मोठ्या शहरात तितकी अशातंता पुर्वी कधीच नव्हती. असे अनेक जण आहेत जी लोक सुर्योदय आणि सुर्यास्त हे दोन्ही पाहत नाही. कधीही झोपतात कधीही उठतात. कधीही खातात कधीही पितात. वेळेचे नियम राहिले नाही. भारतीय लोक तर फार फार उशीर रात्री जेवण करतात जे की एकदम चुकीचे आहे. आपल्या गरजा इतक्या वाढल्या आहेत की त्या पुर्ण करायला रोजचे २४ तास कमी पडतात आणि मग धावपळ आणि तगमग ह्यातून जावे लागते. ह्याचा एक हताश असा सराव होतो पण जोवर आयुष्य एका सुरक्षित ठिकाणी पोचलेले असते तोवर आपण आपली जी ससेहोलपट केलेली असते त्याचे परिणाम मग दिसायला लागतात.

बी, हा जीवनशैलीतला फरक की वाढलेल्या गरजा की वाढलेला हव्यास असे मोठे प्रश्नांचे भेंडोळे उभे रहाते समोर. पण हा वेग थोपवायचा नाही तर जरा सुसह्य, आरामदायी करता येईलच ना आपल्याला असेही वाटायला लागते.

आपल्या गरजा इतक्या वाढल्या आहेत की त्या पुर्ण करायला रोजचे २४ तास कमी पडतात आणि मग धावपळ आणि तगमग ह्यातून जावे लागते. ह्याचा एक हताश असा सराव होतो पण जोवर आयुष्य एका सुरक्षित ठिकाणी पोचलेले असते तोवर आपण आपली जी ससेहोलपट केलेली असते त्याचे परिणाम मग दिसायला लागतात.
>>>>> अगदी अगदी. हताश सराव आपणच कुठेतरी थांबवायला हवा असे मात्र मनाच्या तळातून वाटायला लागते.

आपण ते जग अनुभवलेली मंडळी असे ठरवून काही करू शकतो अशी एखादी जीवनशैली पुनश्च आरंभू शकतो असे मात्र वारंवार वाटते.

माझ्या मनात सतत हे विचार घोळत असतात. खूप छान आयुष्य होते ते असे आज या वेगवान लाईफ स्टाईलचा भाग बनलेल्या मला वाटतेच. खरतर त्यासाठी गेले दोन वर्षे काही आवर्जून केले. जे बदल करणे मला सुरुवातीला जड गेले जसे गरज नाहीये तर स्मार्ट फोनचा वापर करायचा नाही. शक्यतो मोबाईल फोन वापरणे टाळायचे. कपडे ही खरेदी करणे कमी केले. गरज नसलेल्या गोष्टी सरळ कोणाला हव्या असतील तर दिल्या किंवा स्क्रॅप केल्या. कमीत कमी जागा वापरणे जसे अगदी तीन खोल्या पण वापरू शकतो तसा प्रयोग केला ..गरजा कमी, वापर मर्यादित असे धोरण ठेवले पण एक झाले त्याने मनात, घरात जो पसारा पसारा झालेला तो बरच कमी झाला . मनातला पसारा पण कमी केला. गरज नसलेल्या गोष्टी मनात साठलेल्या सरळ डिलीट केल्या. जरा मोकळा झाला मनाचा गाभारा. सत्तरी ऐशीच्या दशकात तसाच होता , तितका अगदी तसा नाही झाला पण एक स्पेस मिळाली हे नक्कीच. असो अश्या अनेक गोष्टींचा विचार करायला हवा. जसे गरजा, आहार, विहार, नाते, समाजजीवन असे अनेक.
वेगवेगळे प्रयोग करण्यापेक्षा आधीच जगलेल्या गोष्टी, ते वातावरण पुन्हा नव्याने आले तर असाच विचार मी करते . खरेतर ते जे अनुभव आहेत त्याचाच उपयोग करुन , जुन्यातील सोने वापरुन नव्याने हा जगण्याचा मार्ग आखावा असे वाटते. कारण शेवटी काय शांत अन समाधानी जगण म्हणजे जगण या निष्कर्षाप्रत मी आले हे नक्की. मला वाटते या इतक्या मोठया प्लॅटफॉर्मवर माझ्या सारखा किंवा त्या दिशेने विचार करणारे कोणीतरी असेलच. आपण हे असे आपले विचार शेअर करून खरच एक नवीन लाईफ स्टाईल सुरू करू शकतो. नाही का?

आयुष्य खूप साधे होते. एक रेडिओ आणि दुसरे वर्तमानपत्र. इतकाच काय तो घरात पोचलेला "मिडिया". बाकी एकमेकाशी संवाद साधायला पत्रासारखा एकमेव आणि सुंदर मार्गच होता. आजकाल पत्रे नामशेष झाली. "ती.स्व.... ना साष्टांग नमस्कार", "प्रिय... यास सप्रेम नमस्कार" ने सुरु होणारी पत्रे आजकाल फार कोणी लिहित असेल असे वाटत नाही. माझ्या ग्रामीण भागात तर टी.व्ही. सुद्धा पंच्याऐशी नंतर आला. गावात कुणा एका दुकानदाराने कलर टीव्ही नुकताच आणला होता. त्यावर भगभगीत रंगात चित्र दिसायचे. इंदिराजींची अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्कार बघायला दुकानाबाहेर ठेवलेल्या त्या टी.व्ही. समोर अख्खा गाव जमला होता ते अजून आठवते. रविवारी रामायण/महाभारत सुरु असायचे तेंव्हा अशीच गर्दी टीव्ही वाल्यांच्या घराघरांत दिसायची. सगळ्या गल्ल्या रस्ते ओस पडलेले असायचे.

>> बरोबरच मग रविवारी रेडिओवर लागणारी बालगीते ऐकणे

"आपली आवड" अत्यंत लोकप्रिय होती. लोक एखादे गाणे ऐकण्यासाठी पत्र पाठवत हि कल्पना आजच्या पिढीला कदाचित अविश्वसनीय आणि विनोदी वाटेल. पण हा कार्यक्रम त्या काळात श्रोत्यांचा जीव कि प्राण असायचा. महिन्यातल्या एका रविवारी (बहुतेक शेवटच्या) दुपारी साडेबारा वाजता "'बालगीतांची आपली आवड' हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर" व्हायचा. एखादा बाल कलाकार तो सादर करीत असे. दोन अडीचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या माझ्या गावात घरातल्या त्या छोट्याश्या फिलिप्सच्या ट्रांझीस्टरवर अत्यंत खरखराटात तो कार्यक्रम ऐकायला मिळायचा. तरीही कानात जीव आणून तो ऐकायचो. कारण बालगीते त्या व्यतिरिक्त अन्य कुठे ऐकायची सोय नव्हती. घरी टेपरेकॉर्डर कसेट असले काही नव्हते. ते सुद्धा नंतर आले.

शहरी भागात "ऐंशीच्या दशकात" म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर उभी राहतात त्या पडद्यासाठी पेलमेट लावलेल्या दारे खिडक्या, दिवाणखान्यात शोकेस मध्ये दिमाखात ठेवलेला मोठा रेडिओ, लाकडी केस मध्ये बसवलेला आणि सगळी बटणे स्क्रीनच्या एका बाजूला असलेला टीव्ही, त्याच्या खालचा व्हीसीआर, भरभक्कम लाकडाचे बसायला बनवलेले कोच इत्यादी. घरी टीव्ही फ्रीज व्हीसीआर असणे हे त्या काळात "स्टेटस" होते.

माणसं भावनाप्रधान होती. काळ खूप वेगळा होता. साधेपण जपणारा. तंत्रज्ञानाची आयुष्यात जास्त ढवळाढवळ न झालेला.

अतुल आणि स्मिता, काळ तर बदलणाराच असतो. तो बदलला म्हणून गम्य नाही पण खूपसे बदल हे घातक ठरत आहे. रोजचे दैनंदिन जीवनमान फार अवघड झाले आहे. जर ह्याच गतीने आपण जगत राहिलो तर जीवनातले विविधरंग कधी पहायला फार अवकाश मिळणार नाही. कित्येक गोष्टींचा आपण त्याग करत आहोत. जग जवळ आले आहे असे म्हणता म्हणता नेमके आपल्या बहिण भाऊ आईबाबा नातेवाईक गाव घर शहर ह्यापासून मैलो दुर निघालेले आहोत. आपले बरेसशे संबंध तांत्रिकरित्या जुळलेले आहेत. संवाद उरलेले नाहीत कारण एकमेकांपासून झालेला दुरावा.

खरच माणसे साधी होती अन त्यामुळे काळही साधासाच होता. मिडिया घराघरात पोहोचला नव्हता म्हणुन काही फारसा फरक ही पडला नव्हता. " रेडिओ" त्याच्या टायमिंग बरहुकुम चालणारे घरातले व्यवहार..त्याची सिग्नेचट्युन तर अजुनही मनात घोळते..कामगार सभा संपली की आजोबा जेवायला आत येणार हे आजी सोबत आम्हाला ही ठाऊक होतेच.

पडद्यासाठी पेलमेट लावलेल्या दारे खिडक्या, दिवाणखान्यात शोकेस मध्ये दिमाखात ठेवलेला मोठा रेडिओ, लाकडी केस मध्ये बसवलेला आणि सगळी बटणे स्क्रीनच्या एका बाजूला असलेला टीव्ही, त्याच्या खालचा व्हीसीआर, भरभक्कम लाकडाचे बसायला बनवलेले कोच>>>>>>>>> अतुल अगदी घरात नेऊन आणले तुम्ही Happy तो मोठा लाकडी रेडिओ म्हणजे घराची शान होता..त्या रात्री लागणार्‍या शृतीका..ओह...ती लहानपणी रात्री अंथरूनावर पडल्या पडल्या ती " अवंतिका " की अशीच तत्सम शृतिका लागायची..घाबरुन ऐकायचे पण ऐकायचेच..

अन पत्रांचा मखमलीपट तर काय विचारता..वडिलांकडे सगळी पत्रे एकत्र लावून असे गठ्ठे केलेले होते...कधी काही लागले तर असावे किंवा जपून ठेवलेले..ते नुसते कधी बसुन उघडले तरी तो काळ ती वेळ यायचीच डोळ्यापुढे...त्या ओळीवर हात फिरवला तर लिहिणार्‍या हाताच्या स्पर्शाचा भास व्हायचा. प्रत्यक्ष भेटीची अनुभूती मिळायची..जी आज मोबाईल वर तास तास बोलू नही मिळत नाही...तो ओलावा गेलाय हरवून

पन अजूनही मन कूठेतरी म्हणतय It will back

बी, खरंय तुझ.>>>>>>काळ तर बदलणारा असतो. तो बदलला म्हणून गम्य नाही पण खूपसे बदल हे घातक ठरत आहे. रोजचे दैनंदिन जीवनमान फार अवघड झाले आहे. जर ह्याच गतीने आपण जगत राहिलो तर जीवनातले विविधरंग कधी पहायला फार अवकाश मिळणार नाही.>>>>अगदी !!काळ बदलला म्हणुन कालौघात ते लुप्त झाले असे नको व्हायला..सुंदर ते जपलेच पाहिजे ...निदान अनुभवले ते पुढे द्यायला हवे असे मात्र मला मुळापासुन वाटते..बदल कायम प्रवाहा बरोबरच केले पाहिजे असे नाही ना... मागे राहिलेल्या एखद्या वाटेवरुन करायला हवा जाणीवपूर्वक!
आताच बघा गरजाचा विचार केला तर जाणवते खरच इतकी गरज आहे का मला. सगळ्याच गोष्टी कपडे, चपला, पर्स, फोन, यात अनेक गोष्टी तर निव्वळ एक एकेदाही वापरलेल्या नसतात.
हे झाले आपले वैयक्तिक. आता घरात ही पहा न लहान मुलांपासून सुरु करु. किती ते कपडे अन किती ती खेळणी...किती सुविधा..पण खरच आपण जगलो त्या निखळ आनंदाच बालपण आहे त्यांच?

क्राउनचा टीव्ही , व्होल्टास चे फ्रीज, एम ८०, अ‍ॅटलास सायकल, ठराविक ऑप्श्नस असायची, कोलगेट्ची पावडर, आणि नंतर केलेली पिगी बँक, लेमन गोळ्या, मागे दार असली एसटी इ इ
काय सुंदर काळ होता तो...

तुम्हाला नाही आवडणार , पण ७० -८० वा ले असच ५०-६० बद्दल म्हणत असतील. प्रत्येक काळ काही अधिक काही उणे सोडून पुढे सरकत असतो आणि एवढे " गतकालविव्हल-नॉस्टॅल्जिक" न होता , तो ही सुंदर होता, आजही त्याहून सुंदर आहे आणि पुढे ही कदाचित सुंदर असणार अशी भूमिका मी घेतो. मी तसा ६०-७०-८० काळातील पण मी " नो रिग्रेट्स" अशी भूमिका घेतो... एस्केपिस्ट म्हणून नव्हे बरं!
जीवनातील बहुतेक बदल तंत्रज्ञानामुळे होत आहेत आणि त्यांचा वेग वाढत आहे हे खरे पण त्या बरोबर मिळणार्‍या सुविधांशी जाणीवपूर्वक सांगड घातली , त्यांच्या आहारी न जाता त्यांचा समर्पक उपयोग करून घेण्याने हा विरोधाभास जाणवत नाही, मी रेडियो तेवढ्याच तन्मयतेने ऐकतो पण पेन ड्राईव्हवर सोय शोधतो. मध्यम वर्गाल सुबत्ता याच ९० ते २०१० च्या दशकांत आली हे सुध्दा तेवढेच खरे नाही का?
माझ्या दोम्ही मुली परदेशात आहेत. आधीच्या शतकात त्यांच्याशी संवाद साधणे खूप्प कठी ण होते पण स्काईप सारख्या गोष्टींउळे जिव्हाळा वाढला अन दुरावा जाणवत नाही.
इथे कुणाच्याही भावनांचा अनादर करत नाहीये व त्यातील कळकळ खोटी आहे असे म्हणण्याचा माझा मुळीच हेतु नाही.

मला आताचा काळ आवडतो.मोबाईल, इमेल्स्,टेक्नॉलॉजी ने माझं आयुष्य सोपं केलंय ते मला खूप आवडतं.
आम्ही लहान असताना 'इन्फेक्शन होईल्/काहीतरी चावेल/लागेल' याची पर्वा न करता छोटी फुलं असलेल्या झाडाची फळं खाणे, फुलपाखरं पकडणे(नंतर सोडून द्यायचो),वाळूच्या/दगडाच्या ढिगार्‍यावर घसरणे, मोठ्या ट्रिप ला गेल्यावर हॉटेल नसलेल्या जागी निवांत एखाद्या एकाकी देवळाच्या ओवरीत झोपणे वगैरे वेडे प्रकार करायचो ते थोडे मिस होतात पण आता ते प्रकार(विशेष म्हणजे देवळाच्या ओवरीत झोपणे) करण्याची हिंमत झालीच नसती.
टेक्नॉलॉजी जितकी चांगली होतेय तितकं माझं आयुष्य जास्त सुधारतंय. (उदा: ओला रिक्षा आणि मेकमाय्ट्रिप)

खरं तर मला आता 'आमच्या वेळी' असं म्हणून उसासे सोडायचा कंटाळा आलाय.
एक गोष्ट आता पूर्वीसारखी अजिबात करावी लागत नाही : वाट पाहणे. माझ्या लहानपणी मोबाईलच काय, घरोघर फोन नव्हते. त्यामुळे बाबा कधी ऑफिसातून उशिरापर्यंत आले नाहीत की खिडकीत त्यांची वाट बघत बसणं अनेकदा व्हायचं. मग आमच्या भूमिका बदलल्या. मी नोकरी करू लागलो आणि पहिल्यांदा मला ऑफिसात उशिरापर्यंत थांबावं वं लागलेलं तेव्हा तर बाबा माझी वाट बघत बसस्टॉपवर उभे होते. तेव्हा खरं तर मला राग आला होता. "उगाच काय एवढी काळजी? मी काय आता लहान आहे का? बसस्टॉपवरून घरी येणार नाही का?"
मग परिस्थिती अशी झाली की "आज मी लवकर घरी येणार आहे" हे फोन करून सांगायची वेळ आली. हे नव्वदीतलं.

रेव्यु, प्रतिसाद आवडला. 'गतकालविव्हल' शब्द अतिशय आवडला.
mi_anu आणि भरत मयेकर, दोघांचेही प्रतिसाद आवडले.

अनेक जुन्या गोष्टी आठवतात, आवडायच्या आणि आता नाहीत म्हणून क्वचित त्यांची कमतरता भासते तसेच अनेक नव्या गोष्टी महत्वाच्या वाटतात.
गतकालविव्हल (मस्त शब्द!) होण्यात फार काही मजा नाही वाटत. कधीमधी जुने मित्रमैत्रिणी भेटल्यावर जुन्या स्मृतींना उजाळा इतपत ठिके. पण त्यापलिकडे 'गेले ते दिन गेले!' करत उसासे सोडणे हे कंटाळवाणेच होते. खरंतर एका ठराविक कालखंडाबद्दल.. तो काळ कसला भारी होता आणि आता काय राह्यलं नाही म्हणत त्याच काळात अडकलेले लोकही बोर होतात. व्हॉटसॅपवर वगैरे असल्या प्रकारचे फॉरवर्डस येतात तेही तसेच कंटाळवाणे.

आता साधारण १४ वर्ष मास्टर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने विशीतल्या तरूणांच्या मानसिकतेतले स्थित्यंतर अनुभवले आहे. आणि मी विशीबाविशीत होते तेव्हापेक्षा काही भिंती आता तुटून गेल्यात हे जाणवते हे फार छान आहे.

सगळ्यात प्रथम आभार..रेव्यु, भरत मयेकर, हीरा, मी_अनु, चिखलु, मन्दार..:)

आता प्रथम हे स्पष्ट करावेसे वाटते की येस तुम्ही म्हणता ते मला पटते. इथे माझा विचार जुने ते सगले चान्गले आनि नवीन सगळे वाईट असा नाहीये. पण आजच्या काळात मी ही जगते..मी सगळ्या गोष्टीवापरते...पण आता राहुन राहुन वाटते की खरच या गोष्टी अतिरेकाने वापरणे गरजेचे आहे? नो डाउट..खुप महत्वाच्या आहेत त्या, पण त्याचा जो अतिरेकी वापर होतोय तो असावा का तितका?. का नाही आपण नव्या जुन्या दोहोचा समन्वय साधत. आमच्या वेळी असे होते असा उसासा सोडणे मलाही नाही आवडत पण जे खरच होते चांगले ते का नाही घ्यायचे?

आता पहा ..वर चर्चेत ते मुद्दे आले की आज खुप धावपळ वाढली आयुष्यात, शांतपणा हरवलोय, मुळात घडी म्हणतो ती राहिली नाही. कधी उठा कधी झोपा कधीही काहीही करा. त्यामुळे शारिरीक हानी होतेच आहे, सोबत मानसिक हानी. पर्यायाने कितीतरी व्याधी मागे लागल्या कुठेतरी या गोष्टींचा साकल्याने विचार व्हायला हवा. सगळे पळतात म्हणुन आपण पळतो असे नको ना. का पळतो? गरजेचे आहे का? या मर्यादा रेषा आपण ठरवायला हव्या ना. हरवत चाललोय आपण मनस्वास्थ्य अन पर्यायाने शरीर स्वास्थ्य ही! खुप कंगोरे येतील या विचारांना. एकान्गी होऊन कुठेच चालणार नाही असे माझे मत.

'गतकालविव्हल' शब्द अतिशय आवडला.
जुन्या काही गोष्टी छान होत्या. पण त्या आत्ताही तशाच हव्या अस काही वाटत नाही.
ते काही बेस्ट होते असे नाही .
आपण आपल्या आयुष्याच्या त्या त्या कालखंडासाठी तसे तसे जुळून गेले होतो म्हणून ती आत्मीयता असते.
माझ्या लहानपणची रावळगाव गोळ्या , dairy मिल्क तर आताच्या पिढीसाठी स्विस चोकलेट असतील.
८०-९० च्या दशकातील प्रेमगीत , फिल्मी गाणी मनाला भावतात कारण माझे वय तसे होते म्हणून तीच गाणी सुंदर अस तर नाही ना

निवांतपणा मात्र हरवला हे मात्र खरे .
त्यामुळे असे वाटत कि किती वेळ मी त्या काळात वाया घालवलाय . किती काय काय करू शकले असते जर का मला हि गोष्ट मला तेंव्हा जाणवली असती.

गतकालविव्हल >>> अगग. एकदम दु:खी फील आला. Happy
'आमच्या वेळी' असं म्हणून उसासे सोडायचा कंटाळा आलाय.>>>>+१

मी तर आजच्याच वेळेची आहे असं मला वाटतं. Wink Happy

बालपण नेहमीच रम्य वाटते आपल्याला. त्यामुळे माणूस त्या कालाबद्दल हळवाच असतॉ. आयुष्यातला सर्वात उत्तम काळ वाटतो तो. पण बदल हा अपरिहार्य असतो. थोडा वेळ त्या आठवणीत रमायला आवडते. पण म्हणून आता तसं नाही राहिलं म्हणून दु:ख करायला नाही आवडत.

खरतर मला हे जाणवले ते सभोताल पाहूनच.स्वानुभव पण आहेतच. मानसिकदृष्ट्या खूप अस्थिर होत चाललोय आपण असे सतत वाटते. एक इक्विलिब्रियम ढळलाय आपला..सगळ्याच बाबतीतला...त्यात सदानंद नाडकर्णी यांचे समतोल आर्थिक विकासाच्या संदर्भातून पुस्तक वाचनात आले...ते वाचून वाटते येस, खरेच २० टक्के मानव, २०%पाळिव मनुष्यप्राणी आणि ६० टक्के अडगळ. आजच्या समाजाचे हे चित्र खरे वाटले. केवळ आर्थिक समतोलाच्या बाबतीत नाही तर मी सामाजिक, भावनिक, मानसिक इक्विलिब्रियमचा विचार केल्यावरही हे जाणवले. अरे खरेतर केवळ शांतपणे जगणे अन आवड आहे ते काम करायला मिळणे हा खरतर समाधानाचा सर्वोच्च भाग. पण आपण किती हा विचार सजगपणे करतो? शेळ्या मेन्ढ्याप्रमाणे सगळा लोंढा जिकडे तिकडे आपसूक आपण वहायला लागतो त्यात ही मग त्या दिशेने पुढे जाण्याची धडपड..खरच आपल्याला हेच हवे आहे याचा एक क्षणभर थांबून कणभर तरी विचार मनात येतो का?...या विचारातून मग सुरु केला शोध...किती तरी अध्यात्मिक, योगिक, पौराणिक गोष्टी वाचायला सुरूवात केली...कित्येकदा खूप काही खजिना गवसला असे वाटते अन मग आपण ते खूप मागे सोडून आलो अशी खन्तही वाटायला लागली...मग लहानपणचा विचार करताना काही गोष्टी मनाच्या प्रतलावर लख्ख उमटलेल्या आठवल्या. कदाचित तो माझ्या मनाचा भाग असेल असे वाटले. मी अनुभवले म्हणून मला ते छान वाटते असे ही वाटले. काही तथ्यान्शाने ते खरे ही आहे. पण मग म्हणून मग मी इथे तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला. यात हे चांगलेच अन ते वाईटच हा भाग खरेच नाही. निसटलेल्या क्षणासाठी दु:ख करणे वैगरे टिपीकल गोष्टी नाही यात. आपल्याला वेचायचय ते चांगले कण अन त्याचा आजच्या जगण्यात गोफ गुफंता येईल का हे पहाणे. मनाच्या तळातुन आज आधुनिक काळात जगतानाही काही संदर्भ खूप अभ्यासाने मांडलेले होते हे लक्षात येते.

>> पण ७० -८० वा ले असच ५०-६० बद्दल म्हणत असतील. प्रत्येक काळ काही अधिक काही उणे सोडून पुढे सरकत असतो आणि एवढे " गतकालविव्हल-नॉस्टॅल्जिक" न होता...

हो हे तर आहेच. ८० मध्ये ५०-६० चा काळ चांगला होता म्हंटले जात होते. त्याला कारणेही आहेत. पण तो विषय वेगळा आहे. माझ्या पोष्ट मध्ये मलाही यावर लिहायचा तीव्र मोह झाला पण धाग्याचा विषय "सत्तर व ऐंशीच्या दशकातील जीवनशैली" आहे हे ध्यानात आल्याने ते मी टाळले.

प्रत्येक काळात चांगल्या वाईट गोष्टी/वृत्ती असतात. मुळात काळ बदलतो म्हणजे फक्त उपकरणे आणि सुवीधा बदलत नाहीत. माणसांची वृत्तीची बदलते. ८० ह्या दशकात लोकांच्या वृत्तीबाबत मला स्वत:ला जाणवलेली साधेपणा हि जशी सकारात्मक गोष्ट तशी नकारात्मक गोष्ट म्हणजे लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप गंभीर असत. भावनावश होत. म्हणजे प्रमाण जास्त होते. आजच्या इतकी "इझी गोइंग" वृत्ती नव्हती. आयुष्याच्या ठराविक चाकोरीच्या कल्पना होत्या. अमुक चांगले. तमुक वाईट. इत्यादी. नवीन गोष्टी सहज स्वीकारल्या जात नसत. नवनवीन मार्ग चोखाळणे इतके मंजूर नव्हते. त्याबाबत आजचा काळ जास्त सकारात्मक आहे असे वाटते. अर्थात हे माझे वैयक्तिक निरीक्षण व मत.

>>रेडिओ म्हणजे घराची शान होता..त्या रात्री लागणार्‍या शृतीका..

हो Happy श्रुतिका वर लिहायचे आहे. नंतर सवडीने लिहितो.

अतुल देअर यु आर, मला अपेक्षित फक्त भौतिक गोष्टी नव्हत्या तर मानसिकता ही होती. उलट मानसिकता ही मुख्य होती हेच खरे. हो माणसे भावनिक होती, गंभीर ही होती प्रत्येक गोष्टीबाबत पण त्याचा काही फायदाही होताच ना..हल्ली सारखे सगळेच खूप ईझी घेणेही खूपदा त्रासदायक वाटते नाही..

नीधप..धन्यवाद Happy
आता साधारण १४ वर्ष मास्टर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने विशीतल्या तरूणांच्या मानसिकतेतले स्थित्यंतर अनुभवले आहे. आणि मी विशीबाविशीत होते तेव्हापेक्षा काही भिंती आता तुटून गेल्यात हे जाणवते हे फार छान आहे.>>>> अगदी काही भिंती तुटून गेल्या हे स्वागतार्ह आहेच पण काही गिलावे हवे होते हे आजही जाणवते. हा केवळ विलाप किंवा विव्हळता किंवा हतबुध्दता नाही..पन एक धागा जाणवतो तो धागा आज असायला हवा होता , तो विरळ झालाय किंवा तुटलाय बहुदा. तो पुनश्च आज आणता येईल का हा एक विचार बाकी काय

प्रत्येक गोष्टीची जागा नवीन गोष्टीने घेतली जाते. कधी जुनी गोष्ट चांगली असते तर कधी नवी चांगली. त्यामुळे एकुणात चांगल्यावाईट गोष्टी एकाच प्रमाणात राहतात.
तसेच जुन्यातल्या अनेक चांगल्या गोष्टी आज इरिलेव्हंट झालेल्या असू शकतात.
काही गोष्टी रिव्हाइव्ह होत राहतातच.

आपल्याला जुन्या काळातल्या गोष्टी आता नसल्यामुळे स्वतःमधे खूप मोठी निराश पोकळी जाणवत असेल तर आपल्या सगळ्याच निर्णयांकडे तटस्थपणे बघता येणे आणि गरजेचे बदल करता येणे यासाठी हिंमत लागते. आणि बदलांची किंमतही मोजावी लागते. ते झाले की मग हवा तो निवांतपणा वगैरे मिळतोच.

बाकी मी सत्तरच्या दशकातच जन्मलेली असून आमचा काळ वगैरे म्हणण्याइतके मला म्हातारे झाल्यासारखे वाटत नाहीये. आयुष्याचे प्रत्येक दशक ही एक फेज होती आणि प्रत्येक फेज महत्वाची होती. आताची फेजही नवीन बदलांची आहे आणि तेवढीच एक्सायटिंग आहे.

बाकी मी सत्तरच्या दशकातच जन्मलेली असून आमचा काळ वगैरे म्हणण्याइतके मला म्हातारे झाल्यासारखे वाटत नाहीये. आयुष्याचे प्रत्येक दशक ही एक फेज होती आणि प्रत्येक फेज महत्वाची होती. आताची फेजही नवीन बदलांची आहे आणि तेवढीच एक्सायटिंग आहे.>>>>>>> Happy म्हातारे झाल्यासारखे अजुन वाटत नाही हे चांगलय ना...

हो नव्या गोष्टी स्विकारायाच्याच पण जुने धागेही जुनाट म्हणुन तोडुन न टाकता बळकट करता येईल का हा विचार करायला हवा ना.. कोणी करत नाही..मग आपण का करायचे असे नको ना..काहीतरी वेगळा विचार करायला काय हरकत आहे? ..माझा विचार दोन काळाचा तुलनात्मक विचार नाही तर दोहोतील अगदी चांगले अहे त्याचा मिलाफ करुन एक वेगळी वाट का नाही धरत आपण निदान तसा विचार का नाही करत हा आहे..
धन्यवाद सगळ्यांना...:)

दोहोतील अगदी चांगले अहे त्याचा मिलाफ करुन एक वेगळी वाट का नाही धरत>>> हेच तर करतोय ना आपण? मी ८०ज मधली आहे अजुन 'आमच्या वेळी' फेज नाही आलीये.

मी त्या काळातील अलीकडच्या सीमारेषेवर आहे. मला काळाबरोबर रहायला आवडते पण तरी शांतता कमी झाली आहे ह्याच्याशी मी सहमत आहे.
त्या काळात आपलं वय आणि आपल्या वर असलेल्या जबाबदार्‍या यावर पण खूप काही अवलंबून असते. त्या काळात नोकरी करणार्‍या स्त्रियांना आजचा काळ अधिक सुखकर वाटत असेल कदाचित.
आजच रेडिटवर एक shower thought वाचला: In 5 years, we will be closer to 2070 than we are to 1970. (अर्थात पुढे पुढे चालावे!)

Happy सस्मित छान..
आपण हेच करतोय नक्की? ...जरा शान्त पणे थांबून विचार करायला हवा या स्टेटमेंटपाशी

आमच्या वेळी ही फेज फक्त म्हातार्‍यांनी वापरायची हा विचार ही बदलता येऊ शकेल ना ?

जिज्ञासा... त्या काळात नोकरी करणार्‍या स्त्रियांना आजचा काळ अधिक सुखकर वाटत असेल कदाचित.>>>> असु शकेल ही. पण माझ्या आईला जी त्यावेळेस नोकरी करत होती ती माझी नोकरी बघून म्हणते..नोकर्‍या आम्हीही केली पण अशी ससेहोलपट नव्हती बाई ..खुप आरामशीर केली नोकरी आम्ही ..एक तर ऑफिसेस जवळ होते आजच्या तुलनेने..मुलांच्या शाळेची टेन्शन्स नसतील, कामाला माणसे मिळत होती अशी अनेक कारणे तिच्या म्हणण्यामागे असतील.
पण आपल्याला तुलना नाही करायची इथे.आता हेच बघ..हे बोलताना जाणवले आज अंतरे वाढली, मुलांचे प्रश्न निर्माण झाले? मग ते कमी करण्यासाठी त्या काळातील चांगली गोष्ट कोणती असेल तीचा विचार करता येईल?

Pages