शिर्षक अजून ठरले नाही.. (भाग २)

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 December, 2014 - 04:20

..

भाग पहिला खालील लिंकवर वाचू शकता!
http://www.maayboli.com/node/51814

..

ऊद्या !.. अंतिम सत्राच्या अंतिम परीक्षेचा शेवटचा पेपर होता.

एकीकडे गेली चार वर्षे केट्या झुलवत कशीबशी आम्ही आमची ईंजिनीअर पुर्ण करत होतो, तर दुसरीकडे आमचे आईबाप डिग्री हातात पडायच्या आधीच आमचा पोरगा ईंजिनीअर आहे म्हणून मिरवत होते. उद्यानंतर या खेळाचा अंत होत आम्ही विशाल जगात स्वत:ला आजमावायला फेकले जाणार होतो. पण मनातून मात्र कोणाचीही तशी इच्छा नव्हती. अजूनही खूप धमाल करणे बाकी होते. अजूनही कॉलेजलाईफ जगणे बाकी होते. पण या सर्वात आजचे शाश्वत सत्य हेच होते,.. की अजूनही उद्याच्या पेपरचा अभ्यास करणे बाकी होते!

आमच्या कॉलेजचे हॉस्टेल फार्र जबरदस्त नसल्याने, किंबहुना टिपिकल लाकडाच्या चाळी वाटाव्यात तशी दाटीवाटीची खोपटे असल्याने, कॉलेजची मुख्य इमारत वगळता ईतर ईमारती मुलांनी दिवसरात्र अभ्यास करावा म्हणून सताड उघड्याच असायच्या. मुले मात्र परीक्षेची आदली रात्र वगळता अभ्यास सोडून ईतर सारे धंदे करण्यातच कॉलेजजीवनाचे सार्थक मानायचे. परीणामी पत्ते कुटण्यापासून सिगारेटी फुकण्यापर्यंत, सुक्या भेळेपासून ओल्या पार्टीपर्यंत, पानसुपारी अन गुटख्याची पाकीटे, या सर्वे सर्वांच्या त्या कॉलेजच्या भिंती मुक्या साक्षीदार होत्या. हो मुक्या आणि सुक्या!.. कारण कधीही एखादी लालभडक पिचकारी त्या भिंतीवर पडणार नाही याची काळजी आम्ही सर्वांनीच नेहमीच घेतली होती. पण त्या रात्री मात्र त्या भिंती उभ्या आयुष्यात कधी नव्हे ते रंगणार होत्या!.. त्या देखील त्यांनी कल्पनाही केली नसेल अश्या प्रकारे रंगणार होत्या...

फुंर्रंऽऽरर फुंर्रंऽऽरर... ट्वॉंक ट्वॉंक ट्वॉंक !..
नाईट वॉचमनचा अखेरचा राऊंड मारून झाला. साधारण बारा-साडेबाराच्या सुमारास तो ठरलेलाच असायचा. त्यानंतर मात्र थेट तांबडं फुटल्यावरच. त्यामुळे एकदा का तो राऊंड आटपला, की आमच्यातले निशाचर वळवळू लागायचे. चादरी अंथरल्या जायच्या, न्यूजपेपर पसरले जायचे. जीन्स बाल्कनीला लटकवत शॉर्टस चढवल्या जायच्या. पण आज मात्र संमिश्र माहौल होता. अधिकृतरीत्या कॉलेजमधील आमची आजची शेवटची रात्र होती. कित्येक आठवणी दाटून आलेल्या, त्या रंगवायच्या होत्या, पण सोबतीला अभ्यासही करायचा होता. त्यातही काही दिडशहाण्यांनी आगावूपणा दाखवत उद्याच्या पेपरचा अभ्यास आधीच संपवला होता. आणि असाच एक दिडशहाणा रौशन सुद्धा होता!.

दूरवर कुठेतरी एकचा ठोका पडला! पेपर सुरु व्हायला आता फक्त ९ तास शिल्लक होते. किमान चार-पाच तासांचा अभ्यास अजून शिल्लक होता. तसे पाहता ईंजिनीअरींगचा सिलॅबस कधीच पुर्ण अभ्यासून होत नाही, पण पेपरला आत्मविश्वासाने सामोरे जायला किमान अभ्यास करावा लागतो तो अजूनपावेतो झालासा वाटत नव्हता. म्हणून मी आणि माझा जिगरी दोस्त ‘जितेंदर’ उर्फ ‘जित्या’, पहिल्या मजल्यावर ईतरांपासून दूर, एका कोपर्‍यात अभ्यास करत बसलो होतो. ईतक्यात तिथे रौशन आला. तो ही आमच्या मांडीला मांडी लाऊन अभ्यासाला बसला. पण फार काळ नाही. थोड्यावेळातच त्याला टिवल्याबावल्या सुचू लागल्या. स्वत:च्या हातातले पुस्तक बाजूला ठेवत, आमच्याही हातातले खेचून भिरकावले. पुढे तास-दिडतास पत्त्यांचा डाव रंगला. एक शेवटचा डाव!.. कोण जिंकतेय, कोण हरतेय याला महत्व नव्हते. डाव जेव्हा संपला तेव्हा रौशन झोपायच्या तयारीला लागला. फटक्यात दिवा मालवला आणि तिथेच न्यूजपेपरवर पसरला. आणि इथे जित्याचा दिवा पेटला!

"रुनम्या, या महानामाने आपला गेम केला रे.. स्वत:चा अभ्यास झालेला म्हणून पत्त्यांचा डाव मांडला. सोबत आपल्यालाही धंद्याला लावला. आता स्वत: देतोय मस्त ताणून. पण आपला अभ्यास बोंबलला की रे.."
श्रीलंकन क्रिकेट संघात रौशन महानामा नावाचा खेळाडू होता, त्यावरून आम्ही रौशनला अधूनमधून महानामा अशी हाक मारायचो, ते असो!, पण जित्याच्या बोलण्यात तथ्य मात्र होते.. तरी आता सांगतोय कोणाला, म्हणून आम्ही पुन्हा पुस्तक हातात घेऊन डोळ्यावरची झोप उडवत अभ्यासाला लागलो. पण इथे रौशनला मात्र झोप येत नव्हती. तिथेच पडल्यापडल्या तो आम्हाला पकवू लागला. खाली ईतरांबरोबर जाऊन झोपायला सांगितले तरी ऐकायला मागत नव्हता. सुझायनाचा विषय काढून उगाचच्या उगाच सेंटी चिपकवायला लागला. कदाचित अचानक त्याला जाणीव झाली असावी की उद्यानंतर ती त्याला पुन्हा दिसणार नाही, वगैरे वगैरे, पण आमच्या डोक्याला मात्र त्याच्या बडबडीचा त्रास होऊ लागला. याउपर अभ्यासाचे खोबरे होत होते ते वेगळेच. जित्याने शेवटी त्याला शिव्याच घातल्या, तसा तो पण अचानक चेकाळला. आपल्या प्रेमाची आपल्या मित्रांना काही पडली नाही वगैरे नाटकबाजी सुरू झाले. आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला, आमच्या अभ्यासात व्यत्यय आणू लागला. त्याच्याजागी दुसरा कोणी असता तर त्यादिवशीच त्याला धरून धोपटलाच असता, पण काहीही असले तरी आमची यारी होती.

अजून तासभर आम्हाला तरास देऊन अखेर त्याचा वळवळणारा आत्मा शांत झाला आणि तो झोपायला खाली गेला. पण आता आमचा अभ्यासाचा मूड खराब झाला होता, झाला तेवढा अभ्यास झाला म्हणत आम्हीही पसरलो. पण एव्हाना रौशनची देखील काहीतरी खोड काढायची कल्पना आमच्या डोक्यात भिरभिरू लागली होती. नेमका त्या दिवशी हा किडा कोणाच्या नापीक डोक्यातून बाहेर पडला आता काही आठवत नाही, पण आम्ही दोघांचीही त्याला संमती होती. बस्स ठरले तर ठरले!..

खडू मिळवणे कठीण नव्हते. कोर्‍या कागदासारख्या भिंती समोर पसरल्या होत्या. विषय काय मांडायचा आहे हे डोक्यात होते. मजकूर तेवढा काय कसा ठरवायचा होता. अर्थात हेतू एकच होता, ते म्हणजे सकाळी उठल्यावर त्या रंगलेल्या भिंती पाहून रौशनचा त्या साफसफाई करण्यात अर्धाएकतास फुकट जावा. जे त्याने आमच्या वेळेचे नुकसान केले होते, ते देखील परीक्षेच्या आदल्या रात्री, त्याचा बदला म्हणून त्याच पेपराच्या ऐन वेळी त्याचेही वेळेचे नुकसान करावे.

मन मात्र अजूनही थोडे कच खात होते. असे करणे योग्य आहे की नाही हा एक विचार होता, तर काही गडबड झाली तर काय परीणाम होतील हा दुसरा विचार होता. पण ‘जित्या’ची खोड, झोप आल्याशिवाय जायची नव्हती.. आणि तीच येत नव्हती. अखेरीस तो उठला.. बदल्याच्या भावनेने सदसदविवेकबुद्धीवर मात केली होती!..

एक मोठाली भिंत ठळक अक्षरात रंगली होती! फक्त तीन शब्दात!!

.........................
" रौशन "
- शुभविवाह -
" सुझायना "

.........................

..

..

" कुमार ऋन्मेष आणि कपूर जितेंदर .. हाजीर हो!.. "

परीक्षागृहात निम्मा पेपर झाला असताना अचानक एक शिपाई आला आणि आमच्या नावाचा असा पुकारा झाला!..

भाग ३ इथे वाचा -- http://www.maayboli.com/node/51919

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेऽऽष | 7 December, 2014 - 09:41
तुर्तास क्रमशा आहे.
शीर्षक सुचत नसल्याने ते देखील बाकी ठेवलेय.
पुढचा भाग पुर्णत्वास नेउन वेगळा धागा न काढता इथेच अपडेटेन.

---> तुमचेच वाक्य ... जुन्या धाग्यावरून ...