चारचाकी चालवणेः एक (भीषण) 'अनु'भव

Submitted by mi_anu on 23 September, 2014 - 13:56

वैधानिक इशारा : या अनुभवातील ठिकाणे, पात्रे, घटना व संवाद काल्पनीक नाहीत आणि या अनुभवाशी साधर्म्य दर्शवणारी एक चालक रस्त्यावर चारचाकी चालवताना दिसल्यास चालकाच्या मन:स्थितीनुसार चारचाकीचा ब्रेक/वायपर/इंडीकेटर/भोंगा कधीही चालू शकतो याची नोंद घ्यावी आणि त्याचा रस्त्यावरील स्थितीशी मेळ घालून मागील चालकाने स्वतःच्या जवाबदारीवर योग्य तोच निर्णय घ्यावा.

॥ वाहन प्रशिक्षक उवाच ॥
"काय म्याडम! अशा हळूहळू मागे बघत ष्टेरिंग फिरवत राहिल्या तर युटर्न घेईपरेंत पेट्रोल टँकी खाली होणार. आस्सा हात ष्टेरिंग वर अल्लाद, आस्सं ष्टेरिंग गच्च न पकडता नुस्ता वर हात वर सरळ ठेवून आस्सं गर्रा गर्रा फिराया पायजेल ष्टेरिंग !! घ्या परत अश्शी मागे आणि टाका परत युटर्न !मी एक सेकंद व्हॉटस्शॅप करून घेतो. "

(स्वगतः गर्रा गर्रा?? भिंगरी आहे का ती? का सुदर्शन चक्र? आणि स्टिरींग हाताने पकडायचं नाही? नुसता वर सपाट हात? अतीच करतो हा बारक्या ! घरी काय सपाट हात नुसता पोळीवर ठेवून पोळी तोडतो का? मी इथे हिंजेवाडी चौकात गाड्यांच्या अथांग महासागरात युटर्न घेणार आणि हा शहाणा व्हॉटसऍप बघणार म्हणे.)

॥ पती उवाच ||
"अरे जरा बघून सांग ना मी दुसरा टाकलाय का चौथा."
"तुला कळत नाही? प्रत्येक ठिकाणी मी असणार आहे का? "
"आता सांग, प्रत्येक ठिकाणचं नंतर बघू."
" केस विंचरताना स्वतःचा हात दुसऱ्याला शोधून द्यायला सांगशील का?"
" यु आर कंपेरिंग ऍप्प्ल्स टु ऑरेंजेस हां !! तुला महत्त्वाचं काय आहे? गाडी बंद न पडणं की बायको किती मूर्ख आहे हे सिद्ध करणं? "
"सिद्ध करायची गरज आहे का? "
"ठीक आहे. तू नवरा म्हणून मला गाडी चालवायला मानसिक आधार देत नाहीस. आता जे होईल त्याची जावाबदारी तुझी. "
"अगं ..., अगं, पुढे बघ.. वॉटर टँकर ला ठोकशील. बाजूला घे !!!!!! "
"मी का घेऊ? त्याला सांग रस्त्याच्या चुकीच्या बाजूने मध्ये नको घुसू म्हणून "
"ओ दादा, सकाळच्या ट्रॅफिकमध्ये गाडी राँग साईडने काय घालताय? नगरसेवकाचं ऑफिस आहे समोर. कंप्लेंटच करतो आता. घ्या ट्रक बाजूला. "
""हॅ हॅ हॅ.... कंप्लेट करता का साहेब..करून टाका.. नगरशेवक सरांच्याच कंपनीचा हा ट्यांकर . "

॥ सहप्रवासी उवाच ॥
"ओ मॅडम दिमाग खराब है क्या? ४० के स्पीड मे डायरेक्ट ब्रेक? मरवाओगे एक दिन. खाली रास्ते पे क्यों नही चलाते ? "
"जिंदगीभर खाली रास्ते पर चलाऊ ? कभी ना कभी तो ट्रॅफिक एक्स्पोजर लेना होगा ना? "
(आता यात नाक उडवून कपाळावर हात मारून जोरात पुढे निघून जाण्यासारखं काय बोलले?)

॥ नातेवाईक उवाच ॥
" सोपं असतं. पुढच्या आरशात मागची काच बघत रहायची, बाजूचे आरसे पुढच्या आरश्यात दिसतात, त्यासाठी वाकून बघायची गरज नसते. आणि हे सर्व जोडधंदा म्हणून. पुढे नेहमी बघत रहायचं. आणि कंट्रोल्स मध्येच बघायचे, पुण्यात गाडी चालवणार असाल तर राँग साइडने जाणारे दुचाकीवाले, हातगाडीवाले, कुत्रे आणि म्हशी यांच्या वर एक डोळा ठेवायचा. इतकं झालं म्हणजे जमलंच. "
( हा सहस्रनेत्र इंद्र आहे का? इतक्या ठिकाणी बघायचं ?? )
" पण इतक्या ठिकाणी एकावेळी लक्ष कसं देता येणार? "
" हे मी नेहमी गाडी चालवणाऱ्यांचं सांगितलं हो!! तुमच्यासारखे काय, महिन्यातून एकदा रिकाम्या रस्त्यावर दोन किलोमीटर गाडी चालवणार आणि बाकी वर्षभर 'हल्ली नाही आणत गाडी. कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात आपला वाटा नको का? ' वगैरे वल्गना करणार"
(कोण आहे रे तिकडे? या सत्याचे प्रयोग करणाऱ्याला लक्ष्मी रोडवर नवरात्राच्या आधीचा रविवार इनोव्हा चालवण्याची शिक्षा द्या रे ! )

॥ पती उवाच ॥
" लाव, आणि वाट लाव त्या गाडीची. दुसऱ्या गिअरवर मोकळ्या रस्त्यावर गाडी कोणी चालवली होती का? "
" आता दोन किलोमीटरवर वळण आहे तिथे परत पहिला करावा लागणार. मला सारखे सारखे गिअर बदलायला आवडत नाही. "
" ठिकाय. पहिल्यावरच चालव. रोज क्लचप्लेट बदल. मी काय बोलणार? माझी जागा फक्त ड्रायव्हर ची. "
" पाच हजार महिन्याला पगार देईन. माझ्याजवळ रोज गाडी चालवताना बसायचं आणि लग्ना आधी वागायचास तशा प्रेमाने चुका सुधारायच्या."
" दहा हजार देतो. स्वतः गाडी चालवायची, मी जवळ बसणार नाही, बसलो तर भरपूर शिव्या घालेन त्या ऐकायच्या, स्वतः पेट्रोल टाकायचं, स्वतः सर्व्हिसिंगला न्यायची. "
( ओक्के ऍलिगेटर ! युवर बॅक इज सॉफ्ट!! नाऊ शाल वी गो अहेड? हेल्पलेस हरी, होल्डिंग फीट ऑफ हॉर्स! (पतीव्रता हो मी! मनात तरी नवऱ्याला गाढव कसे म्हणेन? ))

॥ अनू उवाच ॥
" मी ना, अमेरिकेला जाणार आणि तिथे गाडी चालवणार. "
" बापरे, मी ओबामाला मेल लिहून ठेवू का? अमेरिकेला उलटं असतं सगळं. डाव्याबाजूला स्टिअरिंग असतं. नाहीतर घुसशील चुकीच्या बाजूला. "
" डॅम इट ! मी इंग्लंडला जाईन. तिथे गाडी चालवेन. बघच तू. येताना मुंबईहून स्वतः येईन बस चालवत. "

॥ सहकारी उवाच ॥
" अरे ते बजरंग मोटर कंपनीवाले शिकवतात गाडी चालवायला. त्यांच्याकडे सिम्युलेटर पण आहे. "
" झालं !! म्हणजे कॉंप्युटरवर बसून गाडी शिकणार? उद्या व्हिडिओ गेम खेळून विमान शिकशील. "
" अरे बाबा सगळा वेळ सिम्युलेटर वर नाही .. एक सिम्युलेटर, एक रस्ता, एक थिअरी असे.. आणि ऑटोमॅटिक गाडी घेणार. म्हणजे गिअर बदलायचा त्रासच नको."
" आम्ही नाही शिकलो हो सिम्युलेटर फिम्युलेटर वर !! सगळा पैसे कमावण्याचा वाह्यातपणा आहे.. तुझ्याकडे जास्त झालेत पैसे. "

॥ बाळ उवाच ॥
" आई आता आपल्याला घाई आहे ना? आता तू नको चालवू गाडी. आपण आपटलो तर? त्या चेन्नै एक्सप्रेस मध्ये कशा गाड्या उडाल्या होत्या? मग गाड्या उडतील, रक्त येईल, डॉक्टरकडे जायला लागेल."
(शुभ बोल गं नारी!! )
" नाही गं बाळा, आता तूच शिक छान गाडी पंधरा वर्षानी. तोपर्यंत रस्ते सुधारतील, माणसं सुधारतील, गाड्या सुधारतील, नवरे सुधारतील, तेव्हा तूच आईला फिरव गाडीतून. मी आपली आता रोज दोन किलोमीटर ऑफिसला जाईन तू शाळेत गेल्यावर. "

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीही देशपांडे काकांकडेच शिकले. पण गिअरवाली, क्लचवाली गाडी चालवणे मला कायम अवघड गेले <<
बस्के... नो ऑफेन्स पण आश्चर्य आहे.. Happy

>>> तसं नसतं, तर इतर बॅकग्राउंड कॉन्फ्लिक्ट्स आणि पूर्वग्रह हे सगळे मनात असतं ना दोन्ही बाजूंच्या !! त्यामुळे ड्रायव्हिंगमधली चूक ही साधी चूक वाटत नाही आणि चुकीबद्दल टीका ही पण तेवढ्यापुरती वाटत नाही दोघांना एकमेकाची वाक्यं काही भलत्याच सबटेक्स्टसकट ऐकू येतात <<< Proud
परफेक्ट...

आवडले !

हा हा हा... वाट लागली हसुन हसुन... Happy मस्तच लिहिलयस... मी ड्रायव्हींग क्लास लावणार होते.... पण असच काही ऐकाव लागेल, अस दिसतय...

>>दोघांना एकमेकाची वाक्यं काही भलत्याच सबटेक्स्टसकट ऐकू येतात <<
हो बरोबर; सुरुवातीच्या बाँडिंगच्या काळात जरा जास्तच. लोणचं मुरल्यावर मात्र - शब्दावाचुन कळले सारे... Happy

अगं ऑफेन्स वगैरे काय. मी गाडी चालवायचेच, अगदी व्यवस्थित घाटाबिटातून, मंडईच्या गर्दीतून इत्यादी. पण ऑटोमॅटीक चालवायला लागल्यावर कळतं आता की तेव्हापेक्षा आत्ताची गाडी चालवणे मला आवडते. तेव्हा ताण यायचा गिअर अन क्लचचा.
बर्‍याच जणांना ती स्टिक शिफ्ट गाडी म्हणजेच खरी गाडी असे वाटते. उदा माझा नवरा. पण मला नाही. Happy

लेख फर्मास आहेच पण प्रतिक्रियांची भट्टीपण चांगली जमलीय...असा निवांत शुकुरवार मिळावा आणि ही गप्पांची मैफिल तसं काही...

बस्के, बर्‍याच जणांना ती स्टिक शिफ्ट गाडी म्हणजेच खरी गाडी असे वाटते. याबद्दल आम्ही दोघंही नाय बा वर असलो तरी मायदेशात गेलो की "तीच खर्रीखुर्री" गाडी नं गं? मग जे अपंगत्व येतं त्यावर मात कशी करायची यावर मी प्रत्येक वेळी तिकिट काढलं की विचार करते आणि मग पोहोचलो की पुन्हा आपले त्या मेरूच्या माथी पैशे मारते...एकंदरीत जे इतरवेळी कॉस्ट ऑफ लिविंग नसतं ते निव्वळ स्टिक शिफ्ट येत नाही म्हणून होऊन जातं..

पण अजुनही मी बाइक चालवू शकते. फक्त मला कुणी देत नाहीत. आणि त्यांच्या गाड्या घेणं मला सोसणार नसतं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझा नवरा पण स्टिक शिफ्ट (पुन्हा) शिकायला मागत नाही. माझं देशातलं लायसन्स असून मी ही पांगळीच....(एकद्म कोतबो विषय)

उसगावात लायसन्स काढलं होतं तेव्हाच एकदा चालवली होती आटिकमाटिक. बाकी गियरवालीच चालवलीये.
गियरला जो कंट्रोल असतो तो आटिकमाटिक ला मिळत नाही असं वाटतं.
मी टू व्हिलर पण गियरची आणि गियरलेस चालवलीये. (कैक वर्ष हमारा बजाज.. म ८०). आता गियरच्या टू व्हिलर्स फक्त बाइक्सच असतात बाकी स्कूटर, मोपेडस नाहीत पण आजही स्कूटरमधे हॅण्डल क्लच, ३ / ४ गियरवाली स्कूटर(बजाजची स्ट्राइड होती काही काळ) काढली कुणी तर मी घेईन.

ऑटोमॅटीक ची सवय लागल्यावर गियर वाली चालवता येत नाही का??
( गियर वरून ऑटोमॅटीक घ्यावी का अशा विचारात आहे.?)

ऑटोमॅटीक ची सवय लागल्यावर गियर वाली चालवता येत नाही का??

>> नाही. ऑटोमॅटिक मधला सुटसुटीतपणा पाहुन पुन्हा गियरवाली चालवावीशी वाटत नाही. विशेषतः ज्यांना क्लच गियरचे तंत्र कटकटीचे वाटते त्यांना. पण शिकतांना मात्र गियरवालीच शिकावी हेमावैम.

-ऑटोमॅटिक गियरवाल्या रेवाच्या प्रेमात पडलेली पियू

गाडी आटो असो वा मॅन्युअल असो , भान ठेवुन चालवता आली पाहीजे . मागे एक बया, गाडीच्या फ्युएल टँकला अडकलेला गॅस नोझल पाईपसहित, फरफटत चालवताना पाहिलं .

माझं हॅन्ड आणि आय को-ऑर्डिनेशन चांगलं नाहीये आधीच सांगते. >>>>> Lol दाद.

मै .... सॉल्लिड!! Biggrin

नविन नविन गाडी चालवायला शिकले असताना माझ्या डोळ्यातून आत शिरलेला समोरच्या काँक्रिट्च्या खांबाचा सिग्नल डायरेक्ट डोळ्याकडून मेंदूकडे असा न जाता आख्ख्या शरीरभर भटकून, प्रत्येक अवयवाची विचारपूस करून मग मेंदूत शिरला होता. भक्त जसा पांडुरंगाकडे ओढीनं धाव घेतो त्याच इंटेन्सिटीनं मी त्या खांबाकडे धाव घेतली. ब्रेक! ब्रेक!! असे नवर्‍याचे शब्द मला का कोण जाणे पण अ‍ॅक्सलरेटर! अ‍ॅक्सलरेटर!! असे ऐकू आले आणि मी त्या हुकमाची त्वरीत अंमलबजावणी केली. नवर्‍याने हँडब्रेक जोरात ओढला आणि खांबाच्या भेटीचे माझे मनसुबे धुळीस मिळाले. त्यानंतर मी शांतच होते पण नवरा पाच मिनिटं घाम पुसत बसला होता.

प्रतीसादांबद्दल आणि सम भावना व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद मंडळी.
'एकमेकांची वाक्ये वेगळ्या सबटेक्स्ट सकट ऐकू येतात' याबद्दल दोनशे टक्के सहमत.

मस्त लिहिलय, आमचे असेच झालेले संवाद वाचून खूप हसू आलं. माझी धाकटी मुलगी माझ्याबरोबर गाडीत एकटी बसायला तयार नसायची , बाबा आले की बाहेर जाऊ..... असं मला इनडायरेक्ट्ली सांगायची ते आठवून मजा वाट्ली.

मला खूपच आवडलं हे.... नवर्याला पहिले वाचायला दिल.... निदान आता तरी त्याला माझ्या भावना पोहोचतील...

<< आस्सा हात ष्टेरिंग वर अल्लाद, आस्सं ष्टेरिंग गच्च न पकडता नुस्ता वर हात वर सरळ ठेवून आस्सं गर्रा गर्रा फिराया पायजेल ष्टेरिंग >>

अरे वा! तुम्ही पॉवर स्टीअरिंग वाले (स्वयंशक्ती वाले सुकाणू चक्र असलेलेले) वाहन चालविलेले दिसतेय. मी टेम्पो ट्रॅक्स टाऊन अ‍ॅण्ड कन्ट्री (१९९६ मॉडेल) आणि त्यानंतर ओम्नी (२०१० मॉडेल) चालवलंय (तशी इतरही वाहने चालवलीत, पण ही दोन जास्त प्रमाणात). या दोन्ही वाहनांची सुकाणू चक्र फिरवायला इतकी प्रचंड ताकद लागते की, तुम्ही अवजड वाहनच चालवताय असा भास व्हावा. विशेषतः तुमचा वेग ताशी २० किमी पेक्षा कमी असेल तेव्हा म्हणजे अर्थातच शहरातील जास्त गर्दीच्या वेळी आणि वाहनतळावर वाहन उभे करताना. सुरुवातीला तर हे सुकाणू इतकं घट्ट असतं की वाहन चालकाला रात्री दोन्ही खांद्यांना आयोडेक्स लावूनच झोपावं लागणार. पुढे वाहनाचा बर्‍यापैकी वापर झाला म्हणजे हे सुकाणू चक्र मोकळे होतात आणि तुलनेने कमी ताकद लावूनही फिरविता येतात.

या वाहनांच्या तुलनेत पॉवर स्टीअरिंग वाहने चालविणे हा बराच सुखद अनुभव आहे. पण गंमतीची गोष्ट म्हणजे तुम्ही महामार्गावर असताना जर तुमचा वेग ताशी ९० किमी अथवा अधिक असेल तर पॉवर स्टीअरिंग ची अनेकांना भीतीही वाटू शकते. कारण तुमच्या वाहन प्रशिक्षकाने सांगितल्याप्रमाणे सुकाणू चक्राला अगदी बोटांनी दिलेला हलकासा धक्का देखील वाहनाची दिशा एकदम बदलून टाकतो.

या समस्येवर उपाय म्हणून नवीन नॅनो ट्विस्ट मध्ये वाहनाचा वेग ताशी ४० किमी च्या पेक्षा जास्त झाल्यावर पॉवर स्टीअरिंग आपोआप निष्क्रीय (डिअ‍ॅक्टिव्हेट) होऊन मॅन्युअल स्टीअरिंग मध्ये रुपांतरित होते आणि संभाव्य धोका टळतो.

मस्त लिहीलय. मस्त आणि माहीतीपुर्ण धागा Happy .मलापण घरचे मागे लागलेत गाडी शिक म्हणुन ,लहाणपणी कशी वेगात सायकल चालवायचीस आता का घाबरतेयस?(घरचे इतर) ट्रक सुद्धा चालवशील (भावाचे असे प्रोत्साहन Angry .) आता काय सांगु (त्यांना) माझ्या जीवापेक्षा मी दुसर्याला उडवेन याचीच मला जास्त भीती .त्यातनं आयुश्यात खुप काही करायचय ?पण ते गळ्यात हात बांधुन नाही किंवा जेल मधे तर नाहीच नाही .त्यामुळे गाडीघोडं अडलय माझं.
पण इतर वाहनांची वाट पाह्ताना कधीतरी मनात येतेच की गाडी यायला पाहीजे .त्यात काय कठीण आहे ? गाडी चालवायला आली तर कुठेही बिनधास्त फिरता येईल .क्वीन पाहील्यापासुन तर जास्तच. आशा करा की कधीतरी तुमच्या गाडी शेजारी सिग्नल वर उभी असलेली गाडी माझी असेल आणि ती मीच चालवत असेन. Happy .

मला माझी साधं स्टीअरिंग वाली गाडी अगदी व्यवस्थित चालवता येते पण नवरा त्याच्या पॉवर स्टीअरिंग वाल्या गाडीमुळे फार शायनिंग मारतो.. आणि मला तितकी नाही आवडत पॉवर स्टीअरिंग वाली गाडी चालवायला......
त्यावरून टक्के-टोणपे, टोमणे, तु.क. इ. ची देवाण घेवाण चालू असते आमची..

<< मला माझी साधं स्टीअरिंग वाली गाडी अगदी व्यवस्थित चालवता येते >>

मारूती ८०० आहे का? या वाहनात रॅक अ‍ॅन्ड पिनिअन प्रकारातलं स्टीअरिंग आहे जे हाताळायला अतिशय सुलभ आहे.

मी उल्लेख केलेल्या मारुती ओम्नी आणि टेम्पो ट्रॅक्स टाऊन अ‍ॅन्ड कन्ट्री या वाहनांत स्टीअरिंग गीअर बॉक्स असतो ज्यामुळे कमी वेग असताना स्टीअरिंग हाताळणं बरंच अवघड होत जातं. अर्थात वाहन २५ ते ३० हजार किमी चालवून झालं की स्टीअरिंग गीअर बॉक्स फ्री होतो.

<< पण नवरा त्याच्या पॉवर स्टीअरिंग वाल्या गाडीमुळे फार शायनिंग मारतो.. आणि मला तितकी नाही आवडत पॉवर स्टीअरिंग वाली गाडी चालवायला >>

खरं तर पॉवर स्टीअरिंग हाताळणी सोपीच आहे ताशी ८० किमी वेगापर्यंत. त्यानंतर थोडीशी गडबड होऊ शकते. अर्थात तुम्ही मॅन्युअल स्टीअरिंग च्या सवयीप्रमाणे जास्त ताकद लावून हाताळायला जाल तर कमी वेग असताना देखील तुम्हाला गैरसोयीची वाटू लागेल.

पण याउलट जर तुम्ही एकदा का पॉवर स्टीअरिंगला सरावलात तर तुमचे नेहमीची मॅन्यूअल स्टीअरिंग वाहन चालविणे त्रासदायक असल्याचे जाणवेल. मी गेल्या महिन्यात जवळपास १५०० किमी इतके अंतर इंडिका विस्टा वाहन चालविले तर त्यानंतर मला अचानक माझे नेहमीचे मारूती ओम्नी वाहन जास्तच अवघड जाणवले.

तुम्हाला जे वाहन नेहमीकरिता वापरायचे आहे त्याचीच सवय असल्यास जास्त सोयीस्कर राहील.

Pages