ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एम्टीच्या रोमॅन्टिकपणाच्या पोस्टवरून आठवलं - गालावर टिचकी मारणं हा प्रकार मी मराठी कादंबर्‍यांतच वाचला आहे. मला प्रयत्न करकरूनही हा प्रकार कोणी रोमॅन्टिकपणे कसा करत असेल हे इम्याजिन करता येत नाही. >>> आणि ती टिचकी अंदाज चुकून साट्कन लागली तर टिचकी ऐवजी अख्खा तळहातच रिटर्न रोमान्स म्हणून मिळेल.

Lol मस्त लिहिलय.

हळव्या इत्यादी नायिकेची 'गुलझार' ऐकताना/वाचताना पावसाळी भरुन आलेल्या संध्याकाळी' 'कॉफी' वगैरे आवडणे वर्णने, तसेच तिचे 'पिसासारखे हलके मन',ही बॅन करावे Proud

ये आया मेरा फेवरेट टॉपिक!
मला अगदी बोअर बोअर होणारे प्रकारः
१. आठवणींनी फेर धरणे! ओह कमॉन, आठ्वणींना दुसरं काहीतरी द्या बा करायला...नेहमी नेहमी काय फेर धरायचा?
२. "वाफाळते" चहा/कॉफीचे "मग" घेऊन अतिशयच फालतु फोलॉसॉफी झाडणारी, मराठी कथांमधून दिसणारी पात्रं
३. कुठल्याही शब्दाआधी "मस्तपैकी" लावणे उदा. "मस्तपैकी कॉफी करते", "भाजी मस्तपैकी परतून घे", "ती मस्तपैकी तयार झाली" वगैरे.. अरे, दिसण्यापासून भाजी परतण्यापर्यंत कशालाही एकच विशेषण काय? अन तेही साहित्यात?
४. मराठी कथा नायिका नेहमी "हलकासा" मेकप का करतात? हलकासा म्हणजे काय आणि? वॉटर बेस्ड की काय? Proud
५. मराठी कथा कुठल्याही काळातली असली तरी त्यातल्या नायिका "रमाबाई", "सुमतीताई" टाइप जुनाट कॅरॅक्टर तरी असतात नायतर आजकालच्या मराठी कथा ट्रेंड प्रमाणे फेमिनिस्ट (म्हणजे "कचकवून" शिव्या देणार्‍या) तरी.. ह्या "कचकवून" शिव्या काय प्रकार आहे भौ? मला हा शब्दच इरिटेट होतो.
६. मराठीतल्या सध्याच्या ट्रेंडप्रमाणे येणार्या "फेमिनिस्ट" कथा म्हणजे लयच विनोदी बघा.. उग्गा कसलीही पारंबी "फेमिनिझ्म" ला चिकटवायची अन कुठल्यातरी भैताड वागण्याचं समर्थन द्यायचं.. असोच.

'त्याच्या' आवडत्या रंगाची शिफॉनची साडी, हलकी लिपस्टीक आणि मोत्यांचा "एकच" सर गळ्यात ही वेषभुषाही बॅन करावी Proud

Lol
मागे कुठल्याश्या कादंबरीत नायिका गोंधळली की 'ओठांचा चंबू करून' नायकाकडे पाहते असं वाचल्याचं स्मरतंय. हा पण असाच काही कॉमन प्रकार आहे का?

>> मराठी कथा नायिका नेहमी "हलकासा" मेकप का करतात?
>> 'त्याच्या' आवडत्या रंगाची शिफॉनची साडी, हलकी लिपस्टीक आणि मोत्यांचा "एकच" सर गळ्यात

Lol

नटुले, 'वाफाळता'बद्दल दे टाळी! Proud

मागे कुठल्याश्या कादंबरीत नायिका गोंधळली की 'ओठांचा चंबू करून' नायकाकडे पाहते असं वाचल्याचं स्मरतंय. >> ती गोंधळली की???? नायक गोंधळला की ती करत असेल. Lol

हाहाहाहाहा

आता "तिने "तिच्या" आवडत्या रंगाची शिफॉनची साडी" नेसली तर मराठी पब्लिशर घेतील का? नेसतिये अजून मराठी नायिका "त्याच्या"आवडत्या रंगाची तर नेसू दे की.

आणि मोत्यांचा "एकच" सर गळ्यात >> जरा ओकाबोका गळा असेल तर भरेल कि तो. १०० सर घातले तर हुंडा मागायचा.
सबब क्लिशे इज अ क्लिशे फोर अ रीझन! Wink Happy

>> मराठी कथा नायिका नेहमी "हलकासा" मेकप का करतात? >>> Lol हीच ती ममं मेन्टॅलिटी. भमे करायला घाबरते की काय मराठी नायिका.
बाहुपाश , चुंबन यादीत अजून पण नेहमी येणारे यक्क पण लेखकुंचे बरेच फेवरेट शब्द लिहिणार होते . पण आवरले. Happy

"अगं वेडाबाई..."?? Lol
खरंच.. असं कोण म्हणतं आजकाल? रोमँटिक मराठी नवरे म्हणत असतील असं वाटत नाही.. आधीच मराठी त्यात नवरा.. मग रोमँटिक असण्याची शक्यता अगदी शुन्याच्या आसपासच असणार Lol त्यातही म्हणायचं झालं तर "मूर्ख, यडपट, बावळट" वगैरे शब्द भाव प्रकट करायला समर्थ आहेत. गेलाबाजार इडियट, डफर तरी..

हलकासा मेकअपच मला काय विचारतेस. विको वाले लिपस्टिक बनवायला लागले तर मराठी नायिका उटन्यासारखी लिपस्टिक फासेल. बी मराठी बाय मराठी Wink

तरी बरं हल्ली नायिकेचं 'खट्याळ' किंवा 'खळखळून' हसणं बरेच दिवसांत ऐकलेलं नाही.

वाफाळते कप आवडत नाहीत आणि कान तुटलेले एका डिझाइनचे कप आले की त्यावर गदारोळ होतो. नायक अनेक विषयात प्रविण असलेला चालत नाही, पण इस्त्रीवाला असला की बोअर होतो Happy

आमची अजून एक अ‍ॅडिशन: प्रत्येक लेखात पुलंच्या व्यक्तिचित्रातील व्यक्तिंच्या तोंडची वचने देण्याला ठार बंदी असावी (म्हणजे दिले तर लेखकास ठार मारण्यात येईल) Proud

इस्त्रीवाला असला की बोअर होतो >>> हे कुठून आलं Proud

ते हे म्हणतील आधुनिक नायिकेने सिगरेट ओढलीच पाहीजे हे बॅन करायला हवं Wink Proud

टण्या Lol

>> पुलंच्या व्यक्तिचित्रातील व्यक्तिंच्या तोंडची वचने देण्याला
कोण रे म्हणजे? फारएन्ड का? Proud

बाकी "तिने निळे झिरझिरीत" खूप परवडत. कुठल्यातरी सिनेमात स्वप्नील जोशी मुक्ता बर्वेला बघतो आणि झिरझिरीत श्रीदेवी संचारल्यावर अष्टमीला शाहरुखला जस फेफर येईल तस झिरझिरीत shirt घालून acting करतो. सबब त्याने झिरझिरीत पेक्षा तिने झिरझिरीत ठीक असत. (तेव्हापासून गेल्या ३ वर्षात मी मराठी सिनेमा कमर्शियल पाहिला नाही.)

>> सबब त्याने झिरझिरीत पेक्षा तिने झिरझिरीत ठीक असत
Lol

यावरून बुवांचं तिचा लो कट व्हर्सेस रणजीत वगैरेंचे उघडे गळे यावरचं भाष्य आठवलं Lol

आधुनिक विचारांची नायिका म्हणजे शिव्यांसोबत दारू प्यायलाच हवी आणि सिगरेट पण फुंकायला हवी. तिला स्वयंपाकाची आवड नको (ती रोज स्वतःची हाडं खाते. दारू आणि सिगरेट प्यायल्याने हाडंच उरणार तसं पण). तर हे सगळं बाद.

'सिगरेट शिलगावली' पण बाद करा.

त्याने/तिने श्वास/वारा/केवड्याचा-चाफ्याचा-केसांचा सुवास खोलवर आत भरून घेतला हे पण नको.

कुणाच्याही मनाचा तळ ढवळला जाणे नको.

बाख ऐकणारी आणि शेक्सपियर वाचणारी नायिका नक्को.

कुणीच येणार नव्हतं तरी तिने/त्याने वाट बघितलेली नको. (त्यांना मायबोलीवर आयडी काढून द्या. कुणी येणारं असेल तरी विसर पडेल)

भेगा पडलेली जमीन नको.

Pages