स्विट्झर्लंडचे अनुभव.. ३

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

ही माहिती मी 'आपली दाद, आपला संवाद'मध्ये दिली होती. वाहून जाऊ नये म्हणुन इथे टाकते आहे....

Swiss Constitutionमधे एक तरतूद आहे ज्यामुळे युध्दामुळे वा अंतर्गत बंडळीमुळे त्रस्त झालेल्या देशांतील लोकांना इथे आश्रय (asylum) मागता येतो. त्यानुसार श्री लंकेतील लोक रेफ्युजी म्हणून मोठ्या संख्येने वास्तव्य करून आहेत. सरकारी आकडेवारीप्रमाणे श्री लंकन ३५,००० आहेत व भारतीय फक्त ६,००० आहेत. श्री लंकनांनी लगेच किराणा मालाची दुकाने उघडली तेवढी मागणी निर्माण झाली होती. त्यामुळे दक्षिण भारतीय जिन्^नस उपलब्ध झाले. कढीपत्ता, मोहरी - जिरं, तांदूळ आणि नारळ्सुध्दा आला. गेल्या ५ वर्षांत थाय दुकानं उघडली... कोथिंबीर, मिरच्या, आलं मिळू लागलं. आता नवीन येणार्‍यांना आमच्यासारखा प्रॉब्लेम येत नाही. फक्त भाषा शिकावी लागते, शाळेत जाणारी मुलं असतील तरच! जर तुम्ही मुलांना इंटरनॅशनल शाळेत पाठवलंत तर जर्मन शिकलंच पाहिजे असं नाही. (या शाळा बेफाट महाग आहेत) शिवाय globalizationचा जमाना आहे, स्वीस लोकांनी बर्‍यापैकी इंग्रजी आत्मसात केलं आहे. तरूण स्वीस इंग्रजी बोलतात. तेव्हा यायचंय् का कुणाला इकडे?

जेव्हां आपण मुलं परदेशांत वाढवतो तेव्हा त्या देशांतील भाषा मुलं शिकणारच असतात. स्थानिक मुलांशी संबंध आल्यावर, शाळेत गेल्यावर तिथली भाषा मुलं आत्मसात करतातच, पण मग आपली भाषा मुलांना कोण शिकवणार? आपणच ना? तेवढ्यासाठी मराठी घरांत बोललीच पाहिजे!

भारतांत बर्‍याच लोकांचा समज असतो की पाश्चिमात्य देशांत राहून आपण आपली भाषा, संस्कृती विसरून जातो. असं हो^ऊच कसं शकतं? माझी स्वतःची मातृभाषा कोकणी आहे, पण स्वीस्मधल्या घरी आम्ही फक्त मराठी बोलतो. महिने न् महिने मी कोकणी कधी ऐकत नाही की बोलतही नाही.... तरीही भारतांत गेल्यावर माझ्या सर्व नातेवाईकांशी मी सुध्द कोकणीत बोलते. कुणाला जाणवतच नाही की मी काही वेगळं बोलते आहे किंवा शब्द वेगळे उच्चारले जात आहेत.

स्वीसमधे पुरूषांना वयाच्या एकोणिसाव्या वषी मिलिटरींत भरती व्हावें लागतें. अर्थात् शारिरीक क्षमता (fitness) असावी लागते. कांही व्याधी असल्यास, डोळे कमकुवत असल्यास, पाठदुखी असल्यास मिलिटरीतुन सूट मिळते. पण तें सिध्द करून द्यावे लागते. सहसा अशी सूट अगदी वाईट परिस्थिती असेल तरच मिळते.... नाहीतर भरती व्हायला सांगतात व झेपेल अशा कामावर नेमणूक करतात.

रिक्रुटिंग कमीत कमी एकवीस आठवड्यांचं असतं. जर वरची रॅंक मिळाली तर जास्तीत जास्त तीस आठवड्यांचं रिक्रुटिंग असू शकतं. कॉलेजमधे असतांना मुलं रिक्रुटींगला जातात. कॉलेजला ह्या दिवसांत मुलांना सुटी द्यायचं बंधन असतं. पहिलं रिक्रुटिंग संपल्यावर जवळ जवळ पस्तिसाव्या वर्षापर्यंत दरवर्षी दोन ते चार आठवड्यांसाठी (रॅंकप्रमाणे) जावं लागतं. माझी दोन्ही मुलं त्याप्रमाणे मिलिटरीत जात आहेत.

मला स्वतःला विचाराल तर मी म्हणेन की ह्या मिलिटरी ट्रेनिंगने मुलं खूप चांगलं शिकतात. स्वाध्याय, शिस्त आनि मुख्य म्हणजे आजपर्यंत घरांत आईवडिल आपल्याला किती सुखं उपल्ब्ध करून देतात याची जाणीव! आवडीचं खाणं, परीटघडीचे कपडे, तयार स्वच्छ बिछाना ह्या सर्वांची किंमत कळू लागते. हे सर्व आपण घरातल्यांसाठी सहज करत असतो पण त्याचं महत्व मिलिटरीसारख्या कडक वातावरणांत जास्त कळतं. मुलं बदलून जातात. क्वचित काहीं जणांवर मिलिटरीचा विपरीत परिणाम होतो. त्यांना मिलिटरीतल्या रुक्ष वातावरणाचा धसका बसतो.... मग मानसिक कारणांसाठी डॉक्टरचं सर्टिफिकेट दाखवून मिलिटरी करावी लागत नाही.... पण हे अपवादानेच घडते. त्यामुळे प्रत्येक स्वीस पुरुष हा सैनिक असतो.

विषय: 
प्रकार: