इतनीसी बात - २

Submitted by vaiju.jd on 7 December, 2013 - 07:05

||श्री||

भाग - १ धागा --> http://www.maayboli.com/node/46236

जजासाहेब रिक्षानी कोर्टातून घरी आले . आज शोफरसह गाडी त्यांनी वसुंधरा बाईंसाठी ठेवली होती. आज ते फार खुश होते. कारण अतीशय अवघड अश्या केसचा निकाल आज वसुंधरा बाईंच्या अशिलाच्या बाजूने लागला होता. वसुंधराबाईनी खूप प्रयत्न करून त्या महिलेला न्याय मिळवून दिला होता. ज्यांच्यासमोर हा खटला चालला त्या जजसाहेबांच्या जजमित्राने फोन करून त्यांचेही खास अभिनंदन केले होते. उद्या पेपरमध्ये ह्या गाजलेल्या खटल्याचा वृतांत वसुंधरा बाईंच्या नावासाह येणार हे नक्कीच होतं. त्यांना आपल्या पत्नीचं विशेष अभिनंदन करायचं होत. त्यांना त्यांचा खूप अभिमान वाटत होता. त्यामुळे ते खुशीत कार त्यांच्यासाठी ठेवून आले होते.वसुंधरा बाईना सायंकाळी थोडं काम होत, यायला उशिर होईलसं वाटत होतं.
जजसाहेब बंगल्यात आले. पांडुरंगाने त्यांचे बूट उचलून ठेवले. खोलीकडे जाता जाता सूनबाईला आपण आल्याचे सांगावं म्हणून ते आलोकच्या खोलीत डोकावले, तर बाथरुमच्या दाराचा धाडकन आवाज आला. आणि आलोक रागारागाने कपाळावर हात मारत म्हणत होता," नुसतं एकदा म्हणायला सांगितलं मी आपल्या चरणांची दासी आहे पण एवढं सुद्धा होत नाही म्हणायला! इगो आडवा येतो ना!'
नको त्या वेळेला मुलाच्या खोलीत डोकावलो , ह्या विचाराने जजसाहेब जरा चुटपुटले. पण एका क्षणात चाणाक्ष जज साहेबांच्या लक्षात आलं, काय झालं असावं? त्यामुळे आवाज न करता हलकेच दरवाजा ओढून ते स्वत:च्या खोलीकडे आले.
जजसाहेबांच्या मनात विचार आला. अरेच्या म्हणजे आपल्या सगळ्यांशी लाघवीपणे वागणारी दीपा आलोकाशी अहंकाराने, मीपणाने वागते की काय? खरं म्हणजे ती अजिबात तशी वाटत नाही. किती चिडला होता आलोक? आज सर्जरीचा दिवस म्हणजे थकून आला असणार! काय म्हणत होता, ' मी आपल्या चरणांची दासी आहे' असं म्हण तर म्हणून टाकायचं ना! त्यात भांडण होण्याइतकं कशाला ताणायचं?
पण ह्या तरुण मुली, शिकलेल्या कमावत्या. ह्यांना पडतं घ्यायची सवय नसते, त्यामुळे संबंध ताणले जातात. छे!छे! याबद्दल वसूशी बोललंच पाहिजे!
वसुंधराबाई आल्या. हातातला कोट, बॅग सगळं सोफयात टाकत म्हणाल्या," दमले ग बाई! जरा राखमाला चहा सांगायला हवा!'
"सांगतो मी" असं म्हणत जजसाहेब चटकन उठले आणि हस्तांदोलन करत म्हणाले," अभिनंदन वसु! शेवटी तू त्या बाईंना न्याय मिळवून दिलास. मला तुझा अभिमान वाटतो. लॉची डिग्री घेतलीस त्याचे सार्थक झाले आज!"
"माझ्या यशात तुमचाही वाटा आहे. तुम्ही प्रोत्साहन दिलंत, मार्गदर्शन केलंत म्हणूनच हे झालं, तुमचंही अभिनंदन! बरं तुम्ही घेतलात का चहा? खायला काय केलयं आज ?"
"मी नाही घेतला अजून चहा!"
"कां? दीपा आली नाहीये का अजून?
" आली आहे, पण दीपा आणि आलोकच भांडण झालंय आज!"
"भांडण? तुम्हाला चहासुद्धा न देण्याइतकं? काहीतरीच. असं कधी झालंय का?"
" आज झालंय. अग दीपा लाघवी, मनमिळाऊ वाटते पण आलोकशी तशी वागत नसावी असं वाटतं. मी आल्यावर खोलीत डोकावलो चहासाठी तर आलोक अगदी चिडला होता."
"पण झालं काय?"
"काही नाही, आलोक दिपाला म्हणाला तू मला म्हण, मी आपल्या चरणांची दासी आहे. तर दीपा सरळ 'नाही' म्हणाली. असा भडकला होता आलोक!"
ऐकुन वसुंधरा बाई खो खो हसू लागल्या," काय, असं म्हणाला आलोक?"
"हसतेय काय? प्रकरण गंभीर आहे."
" हसू नको तर काय करू? हे काय लहान मुलासारखं? आपल्या बायकोला हे असलं काही तरी काय म्हणायला सांगायाच!कमालच आहे!"
"अगं कमाल तर दीपाची , तिने नकार दिला. जरा समजूतदारपणा दाखवून आलोकच्या मनासारखं म्हणाली असती तर काय होणार होतं ? पण ह्या तरुण मुलींना पोच कमीच! नाही तर तू! मी आता तुला म्हणालो की तू मला म्हण मी आपल्या चरणांची दासी आहे, तर तू लगेच म्हाणशील कारण तुझ्यात ती मॅच्युरिटी आहे."
" एक मिनिट, जजसाहेब समजूतदारपणा वेगळा आणि हे असलं काहीतरी म्हणणं वेगळं , मी नाही असं काही म्हणणार!"
"पण काय हरकत आहे? आपल्या पतीची इच्छा आहे तर? आणि म्हटल्यानं काय खरचं तसं होतं का?"
"नाही नां ? मग कशासाठी आग्रह करताय? मी म्हणणार नाही!"
" बरोबरच आहे, ज्या घरातली सासू आपल्या पतीच्या मनासारखी एखादी गोष्ट करत नाही. तिच्या सूनेपुढे काय आदर्श, ती अशीच वागणार!"
"जजसाहेब, सुनेपुढे आदर्श ठेवण्यासारख्या खूप गोष्टी करते मी. त्यासाठी हे असलं काही म्हणण्याची गरज वाटत नाही मला."
" म्हणजे एवढ कायद्याच्या डिग्रीचं शिक्षण पण ञान फक्त कोर्टातच!"
" काय बोलताय तुम्ही? मगाशी केस जिंकली म्हणून माझं अभिनंदन करणारे तुम्हीच होतात नां? माझ्या हुशारीचा अभिमान वाटतो म्हणलात नां? आणि आता हे काय, भलतंच! आणि काहीही असलं तरी मी हे असलं काहीही म्हणणार नाही. आणि मुलाची चूक समजून सांगायची तर त्याची बाजू कसली घेताय? मी दीपालाच पाठिंबा देईन.मी स्पष्ट सांगते!"
अस ठामपणे म्हणून वसुंधराबाई रागारागाने खोलीच्या बाहेर पडल्या. आणि टेरेसवर गेल्या. जाताना अत्यंत चिडून आणि वैतागून त्या स्वत:शी म्हणाल्या,
"काहीही बोलय चं! म्हणे मी चरणोकी दासी आहे म्हण! निदान आपल्या वयाचा तरी काही विचार!"

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

वैजू - बात बडी हैन, इतनीसी नही | ही कथा नवर्‍याला सांगून त्याची प्रतिक्रिया बघते आणि कथेतल्या सारखीच असली तर थोडं भांडण उकरून काढेन म्हणते. किम्वा मग त्याने तरी म्हणावे मै तुम्हारे चरणोंका दास हूं..|

कथा आवडली. सासू सूनेची बाजू घेते हे तर खासच..

@वल्लरीच, गोष्टीशी एकरूप होउन वाचल्यबद्दल धन्यवाद!
तूझ्या कथेच पुढे काय झालं ते सांग, आणि माझ्या कथेच्या पुढच्या भागांवर तुझ्या प्रतिक्रियेची वाट पाहते. Happy