मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्ज्युन्या इं...........द्र बोलतो किंवा एकंदरीतच जे बोलतो ती रागाने असो/प्रेमाने असो/धमकवायचे असो वा कसलेही असो फारच गुळमुळीत वाटते.

झक्की Lol

नविन महाभारतात हिरो बरेच दिसायला चांगले घेतलेत, अभिनयपण बऱ्याच जणांचा चांगला आहे पण हिरोईनमध्ये ती पल्लवी सुभाष चांगली आहे. सुभद्रा, द्रौपदी, वृषाली ह्या काही खास नाहीत एवढ्या, अभिनयपण खास नाहीये. कर्णाला ती वृषाली अजिबात शोभत नाही, कर्ण किती छान आहे.

आजचे (५ मार्च चे),महाभारत पाहिल्यावर मला सर्वात जास्त कर्णाची दया आली. वाईट, वाईट अवस्था आहे त्याची!! एका बाजूला दुर्योधनाला वचन देऊन बसला, नि दुसर्‍या बाजूला स्वतःच्या मनातून धर्म सुटत नाही!

त्याने थोडा विचार करावा. त्याचा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असेल तर त्याला दुर्योधनाचाच काय पांडवांचाही आधार नको.

दुर्योधनाची बाजू सोडली तर दुर्योधन कर्णाचे राज्य सहज बळकावून बसेल. पण पांडवांच्या बाजूला गेला तर तो सामर्थ्याच्या जोरावर बरोबरीचा मान मिळवू शकेल. ज्याचे मन शांत त्याला कुणि जिंकू शकत नाही.

(किती छान असते ना, जिथे आपल्याला काही देणे घेणे नाही. खुश्शाल लोकांना फुकटचा सल्ला देत सुटायचे! )

तोच काय, सगळेच जण कुठेतरी काहीतरी प्रतिज्ञा करून बसतात नि जन्मभर त्याची फळे भोगतात.

हे लोक राजकारणी नव्हेत. म्हणूनच शकुनी सारखे राजकारणी त्यांचे जिणे दु:सह करू शकतात!

उगाच प्रतिज्ञा वगैरे करू नये. मनातल्या मनात ठेवावी!

कर्णाला त्या अंगराज्याचा काही उपयोग देखील दिसत नाहि. सदानकदा मुक्काम पोस्ट हस्तिनापुर.

आरामात अंगराज्यात जाऊन हरी हरी करत बसायचे आणि सरळ युद्धाचे बोलावणे आल्यावर आपले सामर्थ्य दाखवायची खूम खूमी भागवायची. रोजच्या रोज धर्म संकटात आ बैल मुझे मार म्हणून कशाला पडायचे Happy

कर्णाला त्या अंगराज्याचा काही उपयोग देखील दिसत नाहि. सदानकदा मुक्काम पोस्ट हस्तिनापुर.
<<<<<<<
मला देखील हा प्रश्न कित्येकवेळा पडला कि हा अंगदेशाचा राजा आहे तर आपल्या राज्याचा राज्यकारभार बघायचे सोडुन सदानकदा हस्तिनापुरात काय करत असतो. आता पांडवांना खांडवप्रस्थ/ खांडववन मिळाल्यावर कसे ते हस्तिनापुर सोडुन स्वत:चे राज्य सांभाळायला गेले. तसेही कर्ण दुर्योधनाचा मित्र कमी व बॉडीगार्ड जास्त वाटतो. आयुष्यभर त्याला तेच काम करावे लागले. कालच्या एपिसोडमध्ये तर त्याची दया आली. बिचारा.. आईने टाकले नसते तर काय ऐट असली असती या माणसाची.... मग दुर्योधनाने राज्य देउ लागु नये म्हणुन लग्नाआधीचा मुलगा असे हिणवुन त्याची चेष्टा केली असती.

शकुनीमामा नाही का नावाचाच 'गांधारनरेश?' तसंच हा- अंगनरेश. नावाचाच.

आधीइतक्या इन्टरेस्टने ही सिरियल पाहत नाही आता. खूपच लिबर्टीज घेतात ज्याचा कंटाळा येतो.

रच्याकने, तक्षकाची रंगभूषा अव्वल झाली होती Happy

इइइइइइइइइ तो तक्षक.... कसा दिसतो तो... काय ती जीभ बाहेर काढतो आणि इंद्राला सरळ सरळ धमकीवजा ऑर्डर देतो. रंगभुषा खरोखर मस्त... अगदी खरा नागराज वाटतो.

मध्ये माझादेखील इंटरेस्ट कमी झाला होता. पण आता खरे महाभारत सुरु झाल्यासारखे वाटते. इतके दिवस कथेची सुरुवात त्या अनुषंगाने एक एक पात्र कथाभागात प्रवेश करत होते. आता बहुतेक सर्व मुख्य पात्रांचा कथाप्रवेश झाला आहे. पांडवदेखील वेगळे झाले. आता खरे महाभारत सुरु झाले. आता पुढील भागांची प्रतिक्षा आहे.

इंद्राला सरळ सरळ धमकीवजा ऑर्डर >>
इंद्राला मुळात (कधीतरी) लढताना बघुनच मला आनंद झाला. कायम स्त्रीलंपटपणा करणे वा पळुन जाणे एवढेच जमते असा माझा समज होता. Proud

बहुधा "इंद्र" ही एक पदवी आहे. मनुष्यात मुख्य तो राजा,सम्राट वगैरे तसेच देवांमध्ये मुख्य तो इंद्र... मग इंद्र सतत बदलत असतात. बहुतेक मनुष्यजन्मात ज्यांनी चांगले पुण्यप्राप्त केले ते इंद्रपदी पोचायचे. बहुतेक सर्व महत्वाकांक्षी राजेलोक इंद्रपद मिळण्यासाठी यज्ञ करायचे. मग सध्या पदावर असलेला इंद्र स्वतःचे स्थान अबाधित राहण्यासाठी यज्ञाचे पुण्य यज्ञकर्त्याला न मिळण्यासाठी नाना खटपटी करतो अश्याच कथा आहेत.

पाच पांडवांनी त्यांच्या आधीच्या काही जन्मांमध्ये इंद्रपद भोगलेले होते. अशी कथा वाचलेली आठवते.

बहुधा "इंद्र" ही एक पदवी आहे. मनुष्यात मुख्य तो राजा,सम्राट वगैरे तसेच देवांमध्ये मुख्य तो इंद्र... मग इंद्र सतत बदलत असतात. बहुतेक मनुष्यजन्मात ज्यांनी चांगले पुण्यप्राप्त केले ते इंद्रपदी पोचायचे. बहुतेक सर्व महत्वाकांक्षी राजेलोक इंद्रपद मिळण्यासाठी यज्ञ करायचे. मग सध्या पदावर असलेला इंद्र स्वतःचे स्थान अबाधित राहण्यासाठी यज्ञाचे पुण्य यज्ञकर्त्याला न मिळण्यासाठी नाना खटपटी करतो अश्याच कथा आहेत.
पाच पांडवांनी त्यांच्या आधीच्या काही जन्मांमध्ये इंद्रपद भोगलेले होते. अशी कथा वाचलेली आठवते.
- असे आहे होय. नवीनच कळले मला
मग
एकदाका इंद्र झालो की सर्व पुण्य बिण्य संपायचे का
कारण ----------
इंद्राला मुळात (कधीतरी) लढताना बघुनच मला आनंद झाला. कायम स्त्रीलंपटपणा करणे वा पळुन जाणे एवढेच जमते असा माझा समज होता -

एकदा इंद्रपदी पोचलात की पुण्यप्रभाव असेपर्यंत मजा करा तो पर्यंत इतर आहेतच रांगेत ते पद भोगण्यासाठी उत्सुक.... इति विविध पुराणकथा

हेच तत्व सध्याच्या राजकारणालादेखील बरोबर लागु आहे.

शकुनी हा महाभारताचा खरा नायक आहे.

भीष्माने आंधळ्या धृतराष्ट्राला मुलगी मिळत नसल्याने गांधारच्या राजाला धमकी दिली होती. तुमची मुलगी आमच्या आंधळ्याला द्या नाहीतर तुमचे राज्य नष्ट करु.

त्यामुळे गांधारीने आपल्या बापाचे राज्य वाचावे यासाठी ते लग्न केले.

शकुनी त्यामुळेच हस्तिनापुरात आला . भविष्यात कुणीही गांधारातील मुलींना वाक्ड्या नजरेने पाहू नये यासाठी हस्तिनापुरातील लोकांना धडा शिकवण्यासाठीच तो आला.

आणि त्यानंतर जे महाभारत युद्ध झाले त्यानंतर गांधाराकडे वाकड्या नजरेने कुणीही भारतीय पाहू शकला नाही. कुणी शिल्लक उरलाच नाही.

कुणी शिल्लक उरलाच नाही.
अच्छा. असा मार्ग काढला का विश्वशांतीसाठी?
करून बघायला पाहिजे असा प्रयोग आता.
असे वाचल्याचे आठवते की नोस्ट्रदामस ने लिहीले आहे की २०३० च्या आधी काही वर्षे जगात घनघोर युद्धे, प्रचंड मनुष्यहानि होईल पण नंतर काही शतके जगात शांतता राहील. याचा अर्थ काही लोकांनी केला की अणुयुद्ध होणार!

माझ्या ७ वर्षाच्या लेकाच्या आतापर्यंतच्या प्रतिक्रिया - त्याला महाभारताबद्दल आतापर्यंत काही माहित नव्हते आणि हिंदीचा गंधही नाही. शाळेत Religious Education मध्ये यावर्षी Hinduism आहे त्यामुळे ten headed monster 'रवाना' , butter eater krishna मध्ये याला फार इंटरेस्ट ! गेल्यावर्षी भारतात गेलो तेव्हा छोटा भीम बघितला --तेव्हापासून सगळे छोट्या भीमचे टी शर्ट आणि मग कॉमिकस एवढाच पूर्वाभ्यास - त्याला कथा आतापर्यंत कळते. काही गोष्टीत मार्मिक प्रतीक्रिया असतात. त्याला त्याच्या पद्धतीने समजून घेऊ देत म्हणून मीही आता भाष्य करायचे सोडले आहे पण तरीही --

उदा एकलव्याचा अंगठा घेतला तेच मी हळहळलेच -- so unfair! असे निघालेच तोंडातून. माऊची प्रतिक्रिया : it is fair mamma- Ekalvya did not ask Drona's permission to copy him. You cant just do such things! किती copyright बद्दल सजगता !

हिडींबा आली तेव्हा याला वाटले कदाचित हीच छुटकी -- अजून छोट्या भीमाचे साथीदार दिसत नाहीयेत ना ।

द्रौपदीचे पाच नवर्यात विभाजन यात एवढा वाद घालायचे काय हे त्याला पटतच नव्हते --but she has accepted it and all of them are happy ( pandav and droupadi) मग एव्हडा रडून ओरडून गोंधळ काय घालताय? that is their choice, what is so unrighteous about it ? सगळे सबटायटल्स-- अधर्मचा unrighteousness! माझ्यातल्या मम्मात्वाला आत्तापासूनच ललकार आहे --we are happy why interfere असा म्हणताना दिसतोच आहे हा !

पांडव हस्तिनापुर सोडून चालले आणि अर्जुन कुंतीच्या मांडीवर डोके ठेऊन रडू लागला --oh come on arjuna - you need to grow up, cant be with your mother all your life !

हस्तिनापुर आणि राज्यावरचा हक्क, कुंती सगळ्यांना सोडून जाताहेत म्हणून मी म्हणाले - बिचारे पांडव --why poor mamma they must seek new experience, it is good to learn new things

भिमासारखे पाय आपटणे-- नंतर दुखतात म्हणून गुपचूप शांत बसणे -- मान्य नाही करायचे. पाउस असला तरी छत्री बंद करून युधीष्टीरासारखा भाला बनवून फिरवणे आणि दुर्योधनाच्या हत्तीवर उडी मारून मालिकेत प्रवेश केला तेव्हापासून बिचाऱ्या घरच्या सोफ्याने हजार शाप नक्कीच दिले असतील दुर्योधनाला आणि त्या स्टंट डायरेक्टरला।

सकाळी शाळेला उशीर होत असताना toilet seat वर बसून जोरात अगदी गांडीवधारी अर्जुना आ}} आ}}} अशी तान हा जेव्हा छेडतो तेव्हा तू जे काय धरलयस ते सोड आणि तयार हो लवकर -- हे अर्थात माझ्या मनात!

आपल्या लेकरांना म्हराटी शिकवणे किती महत्वाचे ते अशा वेळेला कळतं -- शिकवायचंच अशी प्रतिज्ञा काही आपण करणार नाही -- महाभारतातल्या कोणाच्या प्रतिज्ञेमुळे काय काय घडलं याचा कार्यकारणभाव लावून आणि समजावून दमायला झाले आहे!

मी अलिकडेच बघायला सुरुवात केली आहे. कृष्ण इतका गर्ली का घेतलाय? ते खटकतं जरा.
बाकी मालिका अप्रतिम आहे. बघायला मजा येते आहे. भीष्म सुरुवातीच्या एपिसोड्समध्ये सही वाटतोय. तोच नायक आहे या महाभारताचा. असं निदान आत्तातरी वाटतंय. अंबेच्या भूमिकेत रतन राजपूतपण सही काम करुन गेली. भीष्म-परशुराम युध्दाच्या वेळी शंकराची एन्ट्री भारी घेतली होती.

व्यासपर्व वा युगांत कशात तरी वाचलं होतं की भीष्म एक शापित अष्टवसूंपैकी एक होता. हे अष्टवसू लोक म्हणजे आठ देव होते. त्यांना वसिष्ठांनी शाप दिला होता. तर भीष्माला शाप म्हणजे एक जन्म पृथ्वीवर काढण्याची शिक्षा केली होती. तो जन्म संपल्यावर तो परत अष्टवसूंपैकी एक बनणार होता. म्हणूनच त्याने लग्न न करण्याची व अपत्य न होऊ देण्याची शपथ घेतली. कारण पृथ्वीवर संसार, बायको, मुलंबाळं यात त्याला अडकायचं नव्हतं. "आपण इथले नाही' हे त्याच्या सतत डोक्यात होतं म्हणूनच तो अलिप्त राहू शकला.

कालचा एपिसोड छान वाटला.... शकुनीमामा भलताच हुशार दिसतो. भाच्यांना बरे सल्ले देत असतो. अर्जुनाने दोन दोन लग्न केली तरी द्रोपदीला अजुन काही कळले नाही वाटते. आता अजुन एका लग्नाची तयारी सुरु झाली.

हो ना द्रौपदीला पत्ताच नाही अर्जुनाच्या लग्नांचा आणि संन्यासी म्हणून बाहेर पडला होताना अर्जुन, तपस्या करायला, दोन विवाह करून आला तपस्या करायला सोमनाथ मंदिरात.

सुभद्रा दाखवलीय तिला बघितल्यावर तिचे अर्जुनाऐवजी दुर्योधानाशीच लग्न झालेले बरे असे वाटते.

"कल देखिये" मध्ये द्रौपदी असे म्हणताना दाखवली होती की: "अंधे का पुत्र अंधा होता है क्या?"

पण एपिसोड मध्ये द्रौपदी च्या मागे उभी असलेली दासी वरचे वाक्य म्हणते, द्रौपदी नाही म्हणत!!
पाण्यात पडलेला दुर्योधन मागे मान वळवून पाहातो तेव्हा त्याला वाटते, द्रौपदीच असे म्हणाली !!
नेमके खरे काय आहे ?
द्रौपदी असे म्हणाली होती की नव्हती?

पण मला वाटते की द्रौपदी असे म्हणाली नसावीच.

खरं द्रौपदी म्हणते असंच आहे, यात त्यांनी सोयीप्रमाणे बदललं. जरी दासी बोलली असली तरी ती हसते, विरोध करत नाही, हेपण चुकीचंच आहेना. त्याकाळी दास-दासी असं दुसऱ्या राजाला इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतील असं वाटत नाही.

अच्छा...!!

आणि द्यूत खेळाला सुरूवात करेपर्यंत चा भाग अगदी भराभर आणि पटापट आटोपला असे वाटते आहे....

मी असे ऐकले होते की अर्जुनाने वनवासात लग्ने केली नाहीत. वनवासात तो कुणा कुणा कडून बरीच श्स्त्र, अस्त्र विद्या शिकला.
जसे उच्च शिक्षणाला लोक परगावी जातात तसे.
मग स्वतःचा एव्हढा मस्त महाल नि द्रौपदी सोडून इकडे तिकडे कशाला जा, म्हणून परत आला. मग जेंव्हा तो अश्वमेध का काय तो यज्ञ करायचा म्हणून इतर राजांना जिंकायला क्षत्रियाचे कर्तव्य म्हणून जातो तिथे क्षत्रीयाचे कर्तव्य म्हणून One night stand करून नागकन्या व इतर कुणाशी लग्न करतो. मग श्रीकृष्णाने जसे अधर्म होऊ नये म्हणून रुक्मिणीला पळवून आणले तसे परत सुभद्रेवर अन्याय असा आरडा ओरडा करून तिला पळवून नेले. ( पहा: सुभद्राहरण, अर्जूनहरण नाही!)
पुढे त्या नागकन्येचा मुलगा पोटगीचा दावा करायला अर्जुनाकडे येतो तेंव्हा नेमके धर्मयुद्ध चालू असते, तेंव्हा मोठ्या प्रेमाने तो त्याचा स्वीकार करतो व सांगतो की पोटगी पेक्षा लढणे हाच आपला धर्म आहे तर तू लढ! त्यावेळी काय पांडवांचा धर्म कौरवांचा धर्म असे वेगळे वेगळे धर्म होते. हिंदू धर्म तसाहि एक धर्म नव्हताच. खैबर खिंडीतून आलेल्या अन्य मूर्ख लोकांना भारताच्या विशालतेची, धार्मिक स्वातंत्र्याची विविधतेची ओळख नव्हती. म्हणून त्यांनी सर्वांना सरसकट हिंदू म्हणून टाकले !

नि आता मूर्ख लोक हिंदू धर्म असा आहे नि तसा आहे असे भांडत बसतात!
खरे तत्वज्ञान सांगते ते रोजच्या व्यवहारात आचरणात आणायला जी पद्धत स्वीकारायची असेल ती स्वीकारावी.
मग अंगी भरपूर सामर्थ्य आल्यावर कर्णाला मारणे, द्रोणाशी खोटे बोलणे, दुर्योधनाला मारणे हेहि त्यांच्या धर्मात चालते!!
Light 1 Light 1 Light 1
Happy

बाकी अर्जुनाऐवजी दुर्योधानाशीच लग्न झालेले बरे असे वाटते.
सहमत - मग द्रौपदी सुभद्रा - Catfight!! Happy
Light 1 Light 1 Light 1
Happy

थोडक्यात काय, पैसे मिळवायला जे महाभारत दाखवतात त्यावरून धर्म, अधर्म, बरोबर, चूक हे काही ठरवू नये.
स्वतः विचार करून ठरवावे आपण कसे वागावे. आजकाल कायदे केले आहेत ते पाळावे. नाहीतर राजकारण्यांप्रमाणे, बॉलीवूड च्या लोकांप्रमाणे सामर्थ्यवान बनावे,

खरं द्रौपदी म्हणते असंच आहे, यात त्यांनी सोयीप्रमाणे बदललं. >> पांडव कायमच बरोबर ना ? Happy
खरे तर द्रौपदी उगाचच भोळी वगैरे दाखविलये. मी जेवढ वाचलय त्यावरून तर तीही अतिशय गर्विष्ठ होती .
But then again her side WON Happy

कृष्णाने पण धर्म-अधर्म सोयीसाठीच वापरले. कर्णाला धर्माची बाजू समजावतो पण कर्णाला युद्ध जवळ आल्यावरच सांगतो की तू कुंती-पुत्र आहेस. तोपर्यंत कर्णाचा सुतपुत्र म्हणून अवमान होत असतो तेव्हा नाही सांगत की हा कुंती पुत्र आहे.

धर्म नि अधर्म यांचा अर्थच त्या काळी वेगळा होता. आजकालच्या जगात जसा कायदा तसा तेंव्हा धर्म. आजहि काही ठिकाणी, जिथे काही कट्टर पंथीय लोकांचे वर्चस्व आहे तेथे, बायकांना शिक्षण देऊ नये, एका पुरुषांनी चार बायकांशी विवाह केले तरी चालेल, मॉर्मन ख्रिश्चन धर्मातहि पुरुष एकाहून अधिक बायका करू शकतो. असे धर्मात (कायद्यात) आहे.

या लोकांचे मग इतरांशी पटत नाही. पण जसे अमेरिकेला भिऊन आज बरेचसे देश अमेरिकन कायदा मानतात तसे त्यावेळी भीष्म, कृष्ण वगैरे जास्त सामर्थ्यवान असल्याने ते म्हणतील ते खरे.

दुर्योधन शकुनि हे त्यांच्या कायद्याप्रमाणे (धर्माप्रमाणे) वागत होते, शेवटीसुद्धा त्यांच्या बाजूला पांडवांपेक्षा संख्येने जास्त सैन्य जमलेच. पण ते हरले म्हणून भीष्म कृष्ण यांचेच बरोबर.

Pages