घरचा आहेर

Submitted by डॉ अशोक on 6 August, 2013 - 06:23

घरचा आहेर

पैठणला असतांना तिथल्या खुल्या कारागृहाला आठवड्यातून एकदा भेट द्यावी लागे. भेटीदरम्यान आजारी कैद्यांना तपासून उपचार करणे, आधीच्या भेटीतल्या आजारी कैद्यांची विचारपूस करणे, तुरूंगाच्या किचनला भेट देवून पहाणी करणे, तिथल्या वैद्यकिय अधिका-याशी चर्चा असा सर्वसाधारण कार्यक्रम असे. आवश्यकता वाटल्यास कैदी आमच्या हेल्थ युनिट मधे तपासणीला पाठवले जायचे. तिथं त्यांची तपासणी करून उपचार केले जात. क्वचित प्रसंगी त्यांना दाखल करून उपचार केले जात. इतर कारागृहे आणि खुले कारागृह यात मोठा फरक हा की खुल्या कारागृहातले कैदी शेत काम करण्यासाठी कारागृहाच्या मालकीच्या शेतात जात. त्यामुळे खुल्या कारागृहाच्या कैद्यांना बराच मोकळेपणा अनुभवता येतो.

एकदा असेच काही कैदी आमच्या हेल्थ युनिट मधे तपासायला आणले. आमच्या कडे प्रशिक्षणासाठी असलेल्या इंटर्ननी त्यांना तपासलं आणि तो माझ्या कडे आला अणि म्हणाला: "सर, एक प्रॉब्लेम आहे या चार कैद्यांचा", आणि त्यानं त्याचा प्रॉब्लेम सांगितला. ऐकून मीही चकित झालो. चारही कैद्यांना गुप्तरोग झाला होता. लैंगिक संबंधातून होणारा सिफिलीस नावाचा गुप्तरोग झाल्याचा प्रथमदर्शनी निदान होतं. तसं कैद्यांमधे हा रोग होणं नवीन नव्हतं. पण चार कैद्यांना, एकाच वेळी अशी लागण होणं ही गंभीर बाब होती. जेलला साप्ताहिक व्हीजीटच्या वेळी तिथल्या वैद्यकिय अधिका-याशी यावर चर्चा करायची असं मी तेंव्हाच ठरवून टाकलं. मात्र काही करण्या अगोदर निदानाची खातरजमा काही तपासण्या करून करणं आवश्यक होतं. तेंव्हा ही तपासणी करण्यासाठी रक्ताचा नमुना औरंगाबादला पाठवावा लागे. त्याप्रमाणे रक्तनमुने पाठवले आणि त्या रोग्यांवर उपचार सुरू केले.

घरी आलो पण ही बाब मला स्वस्थ बसू देईना. मी संध्याकाळी खुल्या कारागृहात पोहोचलो. आधी निरोप दिलेला होता त्यामुळे वैद्यकिय अधिकारी आणि जेलचे अधिकारी होतेच. त्यांना मी भेटीचं कारण सांगितलं आणि त्या कैद्यांशी एकेकट्यांनं भेटून माहिती घ्यायची असं ठरवलं. आधी तर ते कैदी नीट बोलेनात. मग मी तुरुंगातल्या सर्वांना बाहेर जायला सांगितलं आणि त्या चौघांना एकत्र बोलावलं. त्यांना काय आजार झालाय, तो कसा होतो ते सांगितलं. यामुळे तुरूंग प्रशासन अडचणीत येऊ शकेल हेही त्यांना सांगितलं, इतकंच नव्हे तर त्यांना मिळालेली खुल्या कारागृहाची सवलत रद्द होवून परत मुळच्या तुरूंगात खडी फोडायला जावं लागेल हेही निदर्शनास आणून दिलं. त्या चौघांची मूळ तुरूंगातल्या चांगल्या वर्तनामुळे खुल्या कारागृहासाठी निवड झाली होती. सक्तमजूरीच्या तुरूंगाच्या तुलनेत खुलं कारागृह म्हणजे तर स्वर्गच होता आणि आता या स्वर्गातून परत त्या तुरूंगात जावून खडी फोडायची या कल्पनेनं त्या चौघांना घाम फुटला आणि त्यांना कंठही फुटला.

त्यांनी सांगितलेली हकिगत थोडक्यात अशी. खुल्या कारागृहात काही दिवस काढल्यानंतर कैद्यांना काही दिवस घरी जावून नातेवाईकांना भेटण्याची सवलत मिळते. त्यानुसार हे चौघेही नुकतेच या सवलतीचा लाभ घेवून कारागृहात परत आले होते. आता घरी जावून त्यांना "हा आजार" कसा काय झाला ते काही कळेना. तेंव्हा आणखी खोदून विचारलं तेंव्हा कळलं की तिघं आपापल्या घरी गेले होते पण तिथं त्यांचं "थंड" स्वागत झालं होतं. त्यामुळे यांची डोकी "गरम" झाली आणि मग "जीवाची मुंबई" करण्या साठी त्यांनी खरंच मुंबई गाठली होती आणि तिथून या गुप्तरोगाचा प्रसाद यांना मिळाला होता. तिघातल्या एकाला "याबाबतची मुंबई" माहिती होती आणि यामुळे त्यांनी एकत्रितच संगनमतानं मुंबई गाठली होती.

तिघांचं कारण कळलं. मुंबईतल्या रेड्लाईट एरियातून त्यांना ही लागण झाल्याचं निष्पन्न झालं, पण चौथ्याचं काय? तो या तिघांबरोबर नव्ह्ता हे त्या तिघांनी शपथेवर सांगितलं. त्याला खोदून खोदून विचारलं, पण त्याचं आपलं एकच पालूपद: "मी माझ्या घरी गेलो होतो. दुसरी कडे कुठेच नाही." आणि मग माझ्या मनात एक विचार आला, समजा हा खरं बोलत असेल तर? तर मग याला रोगाची लागण कुठून झाली हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट होतं. मी आणखी चौकशी केली तेंव्हा कळलं की तो मुदती आधीच घरून तुरूंगात परतला होता. त्या तिघांचं घरी "थंड" स्वागत झालं म्हणून त्यांनी बाजारात जावून तो आजार विकत घेतला होता आणि या चौथ्याला मात्र या आजाराच्या रूपात "घरचा आहेर" मिळाला होता !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गम्भन आणि पियु परी
आंतरजालावर अन्य दोन समूहात हा लेख प्रसिद्ध झालाय ! मायबोलीत मात्र पहिल्यांदाच !
*
चनस....
खिन्न नाही, अस्वस्थ म्हणा. कारण वाचकांना खिन्न करणं हा माझा हेतू कधीच नव्हता, नाही. पण आपण आपल्याच मर्यादित विश्वात रमरमाण असतो आणि असा एखादा अस्सल अनुभव अस्वस्थ करून जातो. तीस-एक वर्ष झालीत या घटनेला, पण अवचित एखादा सर्प समोर उभा रहावा तसा हा प्रसंग फणा काढून आठ्वणीतून वर येतो आणि मग अस्वस्थ व्हायला होतं

या प्रसंगात चूक कुणाची याचा मी मागील तीस वर्षा पासून विचार करतोय.

हर्पेन....
तुम्हाला हा लेख वाचून काही सूचत नाही. माझी काय अवस्था झाली असेल. सत्य कळल्यावर त्या कैद्याची काय अवस्था झाली असेल? त्यानं काही आत्म-परिक्षण केलं असेल कां?

काय आपली मनोवृत्ती असते पहा!
उरलेले तिघे 'मुंबईत' जाऊन तो रोग घेऊन आले याबद्दल आपल्याला काही वाटत नाही पण तो मात्रं घरी जाऊन हा रोग घेऊन आला तर आपल्या मनात ते रुतून राहतं.
असोच.

खरं तर अश्या प्रसंगात डॉक्टरने चूक कुणाची असा विचार करुच नये.
प्रत्येकाच्या नैतिकतेच्या आपापल्या कल्पना आणि प्रत्येकाचा आपापल्या शारीरिक गरजा.
स्वतःच्या चुकीने सक्तमजुरीची शिक्षा भोगायला गेलेल्या त्या कैद्याच्या बायकोच्या वागण्याला चूक म्हणता येईल का?

डॉक्टर, एक बाळबोध शंका..
स्त्रीच्या पाळीच्या दरम्यान नवरा-बायको एकत्र आल्यास असे काही होऊ शकेल का?

साती १०१ % अनुमोन !

हाच प्रकार जेव्हा उलटा घडतो तेव्हा त्याच्याकडे इतक्याच अचंबितपणे का पाहिले जात नाही ?

की जे सर्रास आढळून येते ते समाजमान्य होते ?

माझ्या नाशिकच्या घरी जी मदतनीस आहे तिच्या नणदेला याच कारणांनी अकाली वैधव्य आले शिवाय पदरात दोन लहान मुलं....गावाने चक्क वाळीत टाकलं तिघांना....शेवटी उपचारासाठी ही शहरात भावाकडे आली पण कोणी काम द्यायलाच तयार नाहीय तिला . म्हणजे भावावर भारच !

असे आहेर पचवून पिचलेल्यांच काय ?

कृ.गै.न.

-सुप्रिया.

साती आणि सुप्रिया...
मला अस्वस्थ व्हायला झालं ते त्याच्या पत्नीच्या असहाय्यतेनं देखिल. हा तुरुंगात. तिला अगतिकनेनं हा मार्ग पत्करावा लागला कां हा विचार ही मला अस्वस्थ करतो.

तिनं त्याचं "थंड" स्वागत केलं. घरी रहाण्याची मुदत संपण्याच्या आधी हा तुरुंगात परत आला हे मी लिहिलं आहेच, यावरून ही बिट्वीन द लाइन काही गोष्टी वाचता येतील
*
प्रमोद....
मासिक पाळीच्या वेळचा शारिरीक संबंध आणि गुप्तरोग याचा काही ही संबंध नाही .

डॉ अशोक,

>> या प्रसंगात चूक कुणाची याचा मी मागील तीस वर्षा पासून विचार करतोय.

माझं मत सांगतो. कदाचित पुराणमतवादी व/वा बाळबोध भासेल. समाजातले प्रतिष्ठित लोक जसे वागतात तसेच सामान्य लोक वागत जातात. आज म्हणा किंवा ३० वर्षांपूर्वी म्हणा, गुन्हेगार लोक सत्तास्थानी जाऊन बसलेत. स्वच्छ, नीतिवान आणि चारित्र्यवान माणसे सत्ताकेंद्री बसली तर आणि तरच अशा प्रकारांना आळा बसू शकतो.

यात चूक अशी म्हणायचीच झाली तर केवळ राज्यकर्त्यांची आहे.

आ.न.,
-गा.पै.

डॉ. अशोक - काय बोलावे, काय सांगावे. सगळेच अवघड. माझा एकेकाळचा वाड्यातील मित्रही गुप्तरोगाने गेलेला आहे. त्यावेळची परिस्थिती आठवते...

साती/सुप्रिया - यालाच भोग म्हणतात.

गामा_पैलवान - तर्क समजला पण तुमचे मत पटले नाही.

सुसुकु,

यथा राजा तथा प्रजा हा एक निसर्गनियम आहे. चूक शोधायचीच झाली तर राज्यकर्त्यांची आहे असं म्हणावं लागेल. दिसायला नागरिकांचं बेजाबदार वर्तन दिसतं. पण काही प्रमाणात राज्यकर्त्यांची जबाबदारीही असतेच.

परदु:खशीतल न्यायाने या घडीला एव्हढंच म्हणता येतं! Sad

आ.न.,
-गा.पै.

सुन्न ... पण ती बाईतरी दोषी म्हणावी का? याबाबतीत अज्ञान आणि अर्धज्ञान दोन्हीही धोक्याचच. Sad

त्या बाईचा नवरा तुरुंगात गेला होता लढाईला किन्वा कामासाठी दूर गेलेला नव्हता हे बघता रोग झाला ही बाब सोडता अस्वस्थ होण्यासारखे काही वाटले नाही याच्यात. त्या बाईचे दुसर्‍याशी संबंध येण्याची अगणित कारणे असू शकतात. स्वखुशीने तिला कोणी भेटला असेल, नवरा नसल्याने कोणी जबरदस्ती करत असेल, घर चालविण्यासाठी, पैशासाठी तिने कोणाचा आधार घेतला असेल काहीही असू शकते.

यावरून हेमामालिनीचा एक पिक्चर आठवला. त्यात तिचा नवरा शहरात असतो आणि गावचा एक गुंड टाईप माणुस तिच्या मागावर असतो. ती त्याला खूपदा टाळते पण शेवटी बळी पडतेच. आणि तिला दिवस जातात तेव्हाच नेमका नवरा घरी येतो.

गा पै , कै च्या कै प्रतिसाद आहे. वडाची साल वांग्याला का लावताय ?

डेलिया,

>> वडाची साल वांग्याला का लावताय ?

आजिबात नाही. तुम्हीच म्हणालात की :

>> त्या बाईचे दुसर्‍याशी संबंध येण्याची अगणित कारणे असू शकतात.

या कारणांना राज्यकर्त्यांच्या औदासिन्यामुळे उठाव मिळतो. प्रजेसंबंधी आपलं काही कर्तव्य आहे, ही जाणीव आज पार लुप्त झाली आहे.

इथे संभाव्य अगणित कारणांपैकी त्या बाईंना नक्की कोणतं कारण लागू पडतंय हे माहीत नाही. मात्र नीतिभ्रष्ट राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा हे कारण स्पष्टपणे लागू पडतंय.

हे झालं माझं मत. तुमची व/वा इतरांची मते वेगळी असू शकतात.

आ.न.,
-गा.पै.

साती+१

डेलिया,
वड्याचं तेल वांग्यावर काढणे अन वडाची साल पिंपळाला चिकटवणे या दोन वेगळ्या म्हणींची एक तिसरीच म्हण केलीस तू Wink

गापै Rofl
भारतातल्या कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक प्रॉब्लेमचा संबंध राज्यकर्त्यांशी लावणं भयंकर हास्यास्पद आहे. तेच लॉजिक लावायच्ण ठरवलं तर "मी आज बसस्टॉपवर चिखलात पाय घसरुन पडले" याचंही कारण "राज्यकर्त्यांची निष्क्रियता" हे येऊ शकतं..
उदा. बसस्टॉपवर चिखलात पाय घसरला कारण- तिथे चिखल होता कारण- रस्ता नीट पक्का बांधलेला नाही कारण- राज्यकर्त्यांची निष्क्रियता!!

पण "माझा पाय घसरला" हे सगळ्यात मह्त्वाचं कारण असतं ते सोडून कुणी सरकारला दोष देत नाही. पण तुमचं आपलं एकच तुणतुणं जिथेतिथे. म्हणून हसायला येतं. Rofl

गा पै, मार्मिक प्रतिसाद! Happy

नताशा, <<<बसस्टॉपवर चिखलात पाय घसरला कारण- तिथे चिखल होता कारण- रस्ता नीट पक्का बांधलेला नाही कारण- राज्यकर्त्यांची निष्क्रियता!!>>> नकळत इथे गा पैं चा मुद्दाच सिद्ध झाला, मात्र वेगळ्या डायमेन्शनने Lol

साती>> +१०००००० सगळ्या नैतिक वर्तणूकीची अपेक्षा स्त्रियांकडूनच असली मनोवृत्ती असल्यावर याहून वेगळी काय अपेक्षा करायची?

शिवाय, डॉ. अशोक, गुप्तरोग होण्याची अनेक कारणं असतात ना? रोगजंतूयुक्त स्वच्छतागृहाचा वापर हे ही अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण असू शकते त्या स्त्री च्या संसर्गाचे. हे त्या कैद्याला सांगायला हवे होते. आधीच गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आणि वरुन असल्या शंका म्हटल्यावर बायकोचे हाल झाले असतील ना!

बापरे ! मूळ विषयाला बरेच फाटे फुटलेले दिसतात. यातल्या विषयाशी संबंधित काही मुद्दे

१. गामा पैलवान
"स्वच्छ, नीतिवान आणि चारित्र्यवान माणसे सत्ताकेंद्री बसली तर आणि तरच अशा प्रकारांना आळा बसू शकतो"
गुप्त रोग हे मानवाला माहित असलेल्या रोगांपैकी जुने रोग. अगदी चरक-संहिता, सुश्रूत संहितेत पण याचे उल्लेख आहेत. त्यामुळे आज किंवा तीस वर्षांपूर्वी काही लोक सत्तेत जाऊन बसले त्याचा आणि या रोगाच्या प्रादुर्भावाचा काहीही संबंध नाही.
२. विजय देशमुख
"पण ती बाईतरी दोषी म्हणावी का?"
ती बाई दोषी आहे असं मी माझ्या लेखात अजिबात सूचित केलेलं नाही. मात्र त्या "चौथ्याला" तिच्या पासून (स्वत:च्या बायको पासून) हा संसर्ग झाला असं समोर आलेल्या पुराव्या वरून दिसतंय
३. डेलीया
"त्या बाईचा नवरा तुरुंगात गेला होता लढाईला किन्वा कामासाठी दूर गेलेला नव्हता हे बघता रोग झाला ही बाब सोडता अस्वस्थ होण्यासारखे काही वाटले नाही याच्यात"
त्या बाईच्या नव-याचा तुरुंगवास, त्या बाई वर कोसळलेला प्रसंग यामुळे तिला स्वत:ची इच्छा नसतांना हा रोग स्वत:वर ओढवून घ्यावा लागला ्हे अस्वस्थ होण्याचं कारण ! तिनं नव-याचं केलेलं थंड स्वागत आणि त्याचं मुदती आधी तुरुंगात परत येणं यावरून तिचा याबाबतीत नव-यावर असलेला राग दिसून येतो. मी वर एका प्रतिसादात बिट्वीन द लाईन्स म्हनालो ते हे !
४. गामा पैलवान
"त्या बाईचे दुसर्‍याशी संबंध येण्याची अगणित कारणे असू शकतात"
हो असू शकतात. पण धडधडीत दिसणारं कारण "नव-याचा तुरुंगवास आणि त्यामुळे आलेलं अर्थोक अरिष्ट" हे होय !
५ सानी
"शिवाय, डॉ. अशोक, गुप्तरोग होण्याची अनेक कारणं असतात ना? रोगजंतूयुक्त स्वच्छतागृहाचा वापर हे ही अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण असू शकते"
सानी, गुप्त-रोग बाय डेफिनीशन "लैंगिक संबंधातून जे आजार पसरतात असे आजार" होय. या प्रकरणात मी त्यांना "सिफिलीस" नावाचा गुप्तरोग झाल्याचं लिहिलंय. हा रोग "रोगजंतूयुक्त स्वच्छतागृहाचा वापर " यामुळे होत नाही !

नताशा,

>> भारतातल्या कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक प्रॉब्लेमचा संबंध राज्यकर्त्यांशी लावणं भयंकर हास्यास्पद आहे.

या वैयक्तिक अडचणी ज्यामुळे फोफावतात त्यात राज्यकर्त्यांची निष्क्रियता हे प्रमुख कारण आहे. तसंही पाहता राज्यकर्ते भ्रष्ट असले की प्रजेला पापं भोगावी लागतात. हे उत्तराखंडातल्या महाप्रलायावरून दिसतंच ना! नाकर्त्या राजवटीचे काही परिणाम सार्वजनिक स्वरूपात दिसतील, तर काही परिणाम वैयक्तिक स्वरूपाचे असतील.

आ.न.,
-गा.पै.

डॉ अशोक,

>> त्यामुळे आज किंवा तीस वर्षांपूर्वी काही लोक सत्तेत जाऊन बसले त्याचा आणि या रोगाच्या प्रादुर्भावाचा
>> काहीही संबंध नाही.

थोडं वेगळ्या शब्दांत मांडतो. जर हे रोग रोखायचे असतील तर राजकीय इच्छाशक्ती हवी ना? ही शक्ती कशी कार्य करते ते तुमच्या पैठणचा ताजमहाल या लेखातून स्पष्टपणे दिसतं.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान.....
१. काही किरकोळ गोष्टी वगळता, गुप्तरोगाच्या प्रादुर्भावात आनादीकाला पासून ते आजतागायत फारसा लक्षणीय फरक पडलेला नाही. तुमचे म्हणणे ग्राह्य धरायचे तर अनादिकाला पासून आजतागायत याबाबत राजकिय इच्छा शक्ती दिसून आलेली नाही !!
२. गुप्तरोगांचा प्रादुर्भाव जगात सर्वत्र आहे. प्रमाण कमी-जास्त हा फरक आहे, पण सर्वत्र ही एक "आरोग्य समस्या" (पब्लीक हेल्थ प्रॉब्लेम) आहेच आहे. तुमचे म्हणणे ग्राह्य धरायचे तर या बाबतीत सर्वत्र राज्किय इच्छाशक्तीचा अभाव आहे !!

मला यात राजकीय हात, फक्त "आरोग्य शिक्षण" न देणे इतपतच वाटतो. सगळं काही सरकारच कसं करु शकेल ?

डॉ अशोक,

>> गुप्तरोगाच्या प्रादुर्भावात आनादीकाला पासून ते आजतागायत फारसा लक्षणीय फरक पडलेला नाही.

समाजातल्या किती टक्के लोकांना हा रोग झालाय याची आकडेवारी उपलब्ध आहे का? गुप्तरोग हा अपवादाऐवजी नियम तर बनला नाहीये ना? तसं असेल तर राजकीय इच्छाशक्तीकडे अंगुलीनिर्देश होतो आहे.

आ.न.,
-गा.पै.

विजय देशमुख,

>> मला यात राजकीय हात, फक्त "आरोग्य शिक्षण" न देणे इतपतच वाटतो.
>> सगळं काही सरकारच कसं करु शकेल ?

मलाही हेच म्हणायचं होतं. आरोग्यशिक्षणाची हेळसांड हा प्रमुख मुद्दा आहेच.

यापुढे जाऊन म्हणेन की वरील प्रकरणात नवरा तुरुंगात गेला म्हणून बायको उघड्यावर पडली. अशा बायकांना काही आधार पुरवायला हवा ना? तो कोणत्या प्रकारचा असावा? तर, १. उपजीविका. २. नैतिक (इंद्रियांवर संयम). अशा स्वरूपाचा असावा. याकरिता राजकीय इच्छाशक्ती हवी. सरकारने सगळं करायची गरज नाही. सेवाभावी संस्था आहेत समाजात. त्यांच्या मागे उभं राहिलं तरी चालेल.

पैसेवाल्यांना गुप्तरोग झाला तरी फारसं बिघडत नाही. ते वेळेवर औषधोपचार घेऊ शकतात.(पैसेवाल्यांचं वाईट होवो, असं मी सुचवीत नाहीये.) पण जर समाजातील वंचित घटकांना झाला तर तो इलाजाअभावी पसरण्याची शक्यता अधिक असते. वंचित घटक महाजनांच्या मार्गानेच जातात. महाजन (प्रतिष्ठित लोक वा सत्ताधारी वर्ग) जर नैतिकदृष्ट्या घसरले तर वंचितांचे काय होईल ते उघड आहे. प्रतिष्ठितांच्या यादीत राजकीय व्यक्तिमत्वे वरच्या क्रमांकावर असतात हेही सांगणे नलगे.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान
गुप्तरोग तेंव्हाही (आणि केंव्हाही) अपवाद नव्हता. तसंच तेंव्हाही (आणि केंव्हाही) नियम नव्हता. या बाबतीत विश्वासार्ह आकडेवारी अशक्य आहे, कारण उघड आहे, संबंधित रोग "गुप्तरोग" आहे. तरीही वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या गटात आणि वेगवेगळ्या रुग्णालयात या व्याधींचे रुग्ण येतात त्याची जी काही आकडेवारी आहे त्यावरून गुप्तरोग अपवाद नाही, नव्हता; तो नियम नाही, नव्हता असे नक्कीच म्हणता येईल

Pages