कोल्हापुरी अख्खा मसूर : नादखुळा

Submitted by अमेय२८०८०७ on 30 April, 2013 - 09:36

कोल्हापूर हे तसं लाटांचं शहर आहे. म्हणजे ते समुद्राकाठी नाही तर लाटांचं शहर अशासाठी की या करवीर नगरीत प्रत्यही कुठल्या ना कुठल्या गोष्टीची टूम येत असते. कधी काय तर म्हणे नादखुळा. मग प्रत्येक गोष्टीला नादखुळाच. सचिन कसा खेळला ..नादखुळा ! पाऊस कसा पडला ..नादखुळा! रस्सा कसा झालाय ..नादखुळा! मध्ये 'तुमच्यासाठी कायपण' चालू होतं. जी गत शब्दांची तीच इतर गोष्टींची. 'संग्राम स्टाईल' कुडते (म्हणजे रंगारी लोकं उघड्या गळ्याच्या नी कोपरापर्यंत हात असलेल्या बंड्या घालतात त्या), बेकहम सारखी 'मोहिकन' हेअर स्टाईल, अशा काही ना काही साथी इथे सदैव चालू असतात. त्यात खाणं म्हणजे जीव की प्राण. एक मटण म्हटलं तरी ते 'निलेश'चं, 'महादेव'चं, 'परख'चं असे पाठभेद असतात. दोने़कशे खानावळींपैकी कुणाला तरी अचानक मटका लागतो की आयला नादखुळा म्हणत सगळे तिकडे धावायला मो़कळे. दोन तीन महिन्यात पुन्हा कोणीतरी नवा शोधून काढतात.
'अख्खा मसूर' हा पदार्थदेखील कोल्हापुरी खाद्यक्षितिजावर असाच उगवला. हा मूळचा कोल्हापूरचा वाटत नाही. कोल्हापूरला 'रस्सा'पान करायला आवडते. मिसळीबरोबर कट (पातळ भाजी) आणि जेवणाबरोबर तांबडा-पांढरा रस्सा 'वढ की वढ' म्हणून ओरपल्याखेरीज आमचे पैसे वसूल होत नाहीत. त्यामुळे हा टोटली कोरडा पदार्थ कोल्हापूरच्या गृहिणीने निश्चितच शोधलेला नाही. पण दहा बारा वर्षांपासून हा एकदम 'ग्लॅमराईझ' झालाय. मुख्य म्हणजे नवलाईचा आवेग कमी झालाय पण प्रेम मात्र टिकून असल्याने कथा रोमिओ-रोझलीनची न होता रोमिओ-ज्युलिएटची झालीय, तीही सुखांतिका.
वेगवेगळ्या छोट्या हॉटेलांतून याची रेसिपी मिळवायचा मी बराच प्रयत्न केला. खूप करमणूक झाली (आत्ता लिहीत नाही, काळजी नसावी!). शेवटी बरीच सर-मिसळ हाती लागली. मायकेलँजेलोच्या चिवटपणाने जरा एडिटिंग केल्यावर ही खालची रेसिपी तयार झालीय. यात काय आहे नी काय हवे आहे यावर मौलिक चर्चा होईलच पण कोल्हापुरात मिळणार्‍या अख्खा मसूरची ही बर्‍यापैकी ऑथेंटिक रेसिपी आहे असे मानायला हरकत नसावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
"अख्खा मसूर"

साहित्य

भिजवून फुललेले मसूर दीड वाटी (साधारण अर्धी-पाऊण वाटी कोरडे भिजवावे लागतील, ७-८ तासांसाठी)
एक मोठा कांदा - बारीक चिरून
एक मध्यम टोमॅटो - बा.चि.
टोमॅटो प्युरे - दोन मोठे चमचे
कांदा-लसूण मसाला - तिखटाच्या आवडीनुसार
हिंग, हळद, मोहरी - फोडणीसाठी
तेल, मीठ

कृती

मसूर कुकरमधे वाफवा. दाणे अखंड आणि वेगळे राहिले पाहिजेत. (म्हणूनच अख्खा मसूर नाव?)

तेल तापवून फोडणी करा. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटोही परता. टोमॅटो प्युरे घालून २-३ मिनिटे शिजवा.

कांदा-लसूण मसाला व मसूर घालून आणखी २ मिनिटे शिजवा, जास्त कोरडे वाटत असेल तर थोडे कोमट पाणी घाला व नंतर झाकण लावून एक वाफ येउद्या. वाफ आल्यावर मीठ घालून मसूर मोडू न देता हलक्या हाताने ढवळून घ्या. अख्खा मसूर इज रेडी.

am1.JPGam2.JPG

ता.क. यात लसूण, कढीलिंब, हिरवी मिरची काही नसल्यानं आधी मीही थोडा साशंक होतो. अर्थात त्यांच्यासकटही चांगलंच , सॉरी, नादखुळाच लागेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आख्खा मसूर मि इस्लामपुर ला खाल्लाय अप्रतिम चव बर्याच दिवसन्पासुन क्रुति शोधत होति thanks for रेसीपी

आमच्याकडे सर्रास असतो हा पदार्थ, मझ्या खुप आवडीचा

कृती सेम पण आम्हि भिजवत नाहि अगोदर सरळ कुकर मध्य वाफवुन घेतो लवकर शिजतात.

श्रावणात तर मटणाच्या रस्स्याला पर्यायी आहे.

Pages