मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हटं तटं ही खास वसईची भाषा.>> हिच भाषा तुम्हाला वसईपासून पार डहाणूपर्यंत ऐकायला मिळेल. थोडा लहेजा बदलतो एव्हढेच पण नीत ऐकलत तर जाणवते कि बेस एकच आहे.

माटूंगा western and central ह्यांना जोडणार्‍या z-bridge बद्दल कोणीच लिहिले नाहि चक्क.

>> डबल डेकर तुर"ळक ठिकाणि चालू आहेत बिकेसी. फोर्ट इ
ओह ओके. Happy

बॅलार्ड पिअर वगैरे एरिआजमधे वीकेन्डला कसला शुकशुकाट असायचा! तिथल्या जुन्या बिल्डिंग्जमधल्या त्या अजस्त्र लिफ्ट्स हे अजब प्रकरण होतं. फार पूर्वी त्या हाताने ओढायचे असं कोणीतरी सांगितल्यावर मला प्रचंड धक्का बसला होता. Happy

मामी त्या फुलबाजारात कागडा जास्त असातो. तिथे जरा न शोभेलसे, चिनी मातीच्या भांड्याचे दुकान आहे.
तिथे छान कपबश्या मिळायच्या.
तिथून कबूतरखान्याकडे जाणारा रस्ता पण खासच. खाकरा भाजायचे साधन, कोयता, धुपदाणी, लाटणे अशी ऑड साधने हमखास मिळतात तिथे. तिथले वडके ब्रदर्स हे दुकान आमच्या शेजार्‍यांचे. ते दुकान त्या भागाची जणू ओळखच आहे. परिंदामधे जो त्या भागाचा सेट आहे त्यातही ते दुकान होते. त्याच्या समोरच्या बाजूला खास गुलाबजामचा मावा मिळायचे ठिकाण आहे. आणि गोल देवळाच्या समोर पानपट्टीसाठी लागणारे सामान घाऊक रित्या विकणारे दुकान आहे. ठंडक वगैरे हमखास मिळते तिथे.

असाम्या, तो लॉन्गेस्ट रेल्वे ब्रिज असेल का? >> म्हणायला हरकत नाही कारण त्यावरून जाताना railway pass/ticket लागते असा प्रवाद रुढ होता. तसेच तो ज्या प्रकारे बनवला आहे - थोडासा enclosed skywalk type त्यामूळे अतिशय unsafe, isolated वाटतो.

फार पूर्वी त्या हाताने ओढायचे असं कोणीतरी सांगितल्यावर मला प्रचंड धक्का बसला होता. >>> बापरे! हातानं????? Uhoh

फोर्ट, हॉर्निमन सर्कल मधल्या जुन्या बिल्डिंगमधला वीजपुरवठा आणि त्याकरता निर्माण झालेलं वायरींचं कडबोळं हा ही एक संशोधनाचा विषय ठरावा. जिन्यातून जातानाच भिंती पार काळ्या वायरींनी भरून गेलेल्या दिसतात. वायरींचा एक भुलभुलैय्या तयार झालेला दिसतो. कोणती वायर नक्की कोणत्या ऑफिसमधल्या कोणत्या उपकरणापर्यंत जाते हे केवळ त्या जगन्नियंत्याला कळेल अशी परिस्थिती असते. खरंतर हे खूपच धोकादायक आहे. पण अजूनही आपल्याकडे बिल्डिंगींचं आगीचं ऑडिट केलं पाहिजे याबाबत सतर्कता दाखवली जात नाही. यातूनच तर मंत्रालयाला आग लागण्यासारखी प्रकरणं घडतात.

मुंबईत वीज जात नाही आणि व्हॉल्टेजही स्थिर असतं म्हणून निभतंय.

>> फोर्ट, हॉर्निमन सर्कल मधल्या जुन्या बिल्डिंगमधला वीजपुरवठा आणि त्याकरता निर्माण झालेलं वायरींचं कडबोळं हा ही एक संशोधनाचा विषय ठरावा.
अगदी!

तिथे जरा न शोभेलसे, चिनी मातीच्या भांड्याचे दुकान आहे.
तिथे छान कपबश्या मिळायच्या.
>>> दिनेशदा, ते सरदारजीचं ना? माझ्या आईचं ते आवडतं ठिकाण. त्या दुकानातून खरेदी केलेली एक अप्रतिम हॅडपेंटेंड ओवल आकाराची प्लेट आहे माझ्याकडे.

आता बहुधा ते दुकान बंद झालंय. त्याचंच दुसरं दुकान सेनाभवनासमोरही आहे. मस्त क्रोकरी मिळते तिथं.

<< हीरा, तुमच्याकडून भाऊचा धक्का या जागेविषयी अधिक माहिती मिळेल का?>>> हो हो मला सुद्धा खूप कुतूहल आहे , लहानपणी पार्ल्याहून आजोबांकडे जाताना आम्ही लोअर परळ स्टेशन बाहेर ५० नं ची बस पकडायचो तिचा लास्ट स्टॉप हा भाऊचा धक्का असायचा , आणि मला लहानपणी ह्या नावाबद्दल भयंकर कुतुहूल वाटायचं ( अजुनही आहे) भाऊचा धक्का का?दादाचा धक्का अस नाव का नाही …. जरा मोठ झाल्यावर मनाची समजूत करून घेतली , की भायखळा = भाई कोळ्याच खळ असाच काहीतरी प्रकार असावा . हिरा , किंवा इतरही कोणाला भाऊच्या धक्क्याबद्दल माहिती असेल तर जरूर सांगा

<<मला तसंच दादरच्या फूल मंडईचं आहे. >> अगदी सेम Happy तिथे सुद्धा नुसत भटकायला प्रचंड आवडत Happy

मशीद बंदरच्या मसालेवाल्यांबद्दल नाही का लिहिलं कोणी?
व्हीटीला जाणार्‍या फास्ट गाड्याही तिथे हमखास सिग्नलला थांबतात आणि तो कोरडा दरवळ नाकात भिनतो.

व्हीटी स्टेशन हे एक स्वतंत्र 'कॅरेक्टर' आहे. किती हिंदी सिनेमांची टायटल्स त्याच्या बॅकग्राउंडवर सुरू होतात हा एक अभ्यासाचा विषय ठरावा. Happy
मला ते सगळं बांधकाम भयंकर आवडतं. दगडी आणि उंचच्या उंच छतांचं!

दादरसारखा किरकोळीचा इतका मोठा फूलबाजार महाराष्ट्रातल्या दुसर्‍या कोणत्याही शहरात नाही. इथे काय मिळत नाही? जर्बेरा, कार्नेशन्स, ऑर्किड्स्,ट्यूलिप्स,जिरॅनिअम् अशा परदेशी फुलांपासून विविध कमळे, पिवळे-पांढरे कवठी चाफे, सोनचाफा( हा शेकड्यावरसुद्धा विकला जातो आणि बराच स्वस्त पडतो.), झेंडू (गोंडा), बिजली,चांदणी, शेवंती, मोगरा, सोनटक्का,जाई, जुई, नेवाळी, मोतिया,मल्लिगे,मदनबाण (कस्तुरी मोगरा) ,गुलछडी (निशिगंध),तगर, सुरंगी, बकुळ, पाचू, सब्जा,मरवा,तुळस,कातरी,झिपरी,बेल,दूर्वा,हंगामात(शिवरात्र, सोमवार) धोत्र्याची फळे, बेलफळे, केळीचे खुंट,पाने, विड्याची पाने, सुपारी-फुले,जास्वंदी,कण्हेर, काय नसते इथे! या शिवाय कंठ्या, वाडीचे सामान (मुगुट, पट्ट्या वगैरे) तर्‍हेतर्‍हेचे हार, माडाच्या पातीचे एकावर एक दुमडून केलेले हार, एका दोर्‍यावरच्या (इंग्रजी आठ आकड्यासारखा पीळ असणार्‍या) वेण्या,सुईवरचे गजरे, फिरवून केलेले गजरे, कदंबे.. आणि यासाठी लागणार्‍या सामानाचा बाजारही इथेच. नाना आकारातल्या सुया, तीन पदरी, चार/सहा पदरी सुताचे गुंडे, सुतळीची बंडले किंवा सुटे धागे, कलाबुतीची रिळे किंवा तुकड्यांची खोकी, हारात घालायचे निळे-गुलाबी चमचमते गोळे, रंगीत लोकर किंवा लोकरीचे तुकडे सर्व सर्व इथे मिळते. शिवाय बूके,परड्या, गुच्छ आहेतच. इथले फूलवाले सजावटीच्या ऑर्डर्स घेतात. त्यांच्याकडे हारांच्या डिझाइन्सची पुस्तके (पॅटर्न बुक) असतात. त्यावरून आपण हार कसा पाहिजे ते निवडून मागणी नोंदवू शकतो. हा बाजार म्हणजे एक भूलभुलैया आहे. एकदा आत शिरलो की पाय निघता निघत नाही..

असंच एक फुलांचं देखणं स्थान म्हणजे माटुंगा पश्चिम. तिथे फुलं फारशी नसतात विकायला. पण हारांचे इतके विविध नमुने असतात ना! आणि किती मोठे मोठे, खास दाक्षिणात्य दिसणारे हार. आता त्या बाजूला गेले की या हारांचे फोटो काढून इथे टाकेन. मज्जा येते ते हार पाहताना. >>>> ते माटुंगा पुर्व गं. म्हणजे किंग्ज सर्कलला जाणारा रस्ता. तिथे फुलवाल्यांचा गणपती बसतो गणेशोत्सवात. त्याला रोज भरगच्च फुलांची वाडी आणि फुलांचंच डेकोरेशन असतं.

स्वाती, मशिद बंदरचं मार्केट आणि गोल देवळाजवळचा भाग. काय काय वाट्टेल ते मिळतं तिथे Happy वड्या थापायचे ट्रे, सुका मेवा. जाम आठवणी येतायत हा बाफ वाचून.

<< .....भाऊचा धक्का या जागेविषयी अधिक माहिती मिळेल का?>>> पूर्वी कोकणात जाणार्‍या बोटी फक्त ह्याच धक्क्यावरून सुटत. त्यामुळें गिरगांव, परळ भागात 'भाऊचा धक्क्या'बद्दल प्रचंड जिव्हाळा असायचा. मला स्वतःलाही होता व आहे. [ फार पूर्वी म.टा.च्या 'अर्थव्यवहार'संबधीच्या पानावर माझीं व्यं.चि. कांहीशा नियमितपणे कांही काळ येत. मीं निवडलेलं शीर्षक होतं ' भाऊचा धक्का' !]
बोटीमधे केबिन, अप्पर डेक व लोअर डेक असे तीन वर्ग असत. केबिन वगळतां इतर वर्गाना रिझर्व्हेशन हा प्रकार नसे. बोट सुटण्यापूर्वीं साधारण एक तास धक्क्यावरून बोटीत चढण्यासाठी मोठ्या शिड्या लावल्या जात. मग जवान 'झिलगे' हातात चटया, चादरी घेवून पहिली चढाई करत व आपापल्या कुटुंबियांसाठी डेकवर जागा अडवत. मग ओळखीच्या गांववाल्यांसाठी, ज्यांच्या बरोबर जागा अडवणारे तरूण नाहीत त्याना अडवलेली जादा जागा आपुलकीने दिली जायची. असो, कोकणची बोट सर्व्हीस हा एक वेगळाच 'नॉस्टेल्जिया' आहे !
[ गिरगांवात पोर्तुगीज चर्चसमोर 'किरणकला फोटो स्टुडिओ' होता, अजूनही असावा. कित्येक वर्षं त्याच्या दर्शनी भागात रस्त्यावरून कोट टोपी घालून चाललेल्या तरुणाकडे बाजूनेच चाललेली एक तरूणी मागे वळून संतापून बघतेय, असा मोठा फोटो लावलेला असे. खालीं 'कॅप्शन' होतं, ' हा भाऊचा धक्का नव्हे बरं का !' ]

भाऊच्या धक्क्यावरुन मी ( अर्थातच लहानपणी ) चौगुलेंच्या बोटिने प्रवास केला आहे.
तो धक्का अजूनही आहे. मोरा बंदरसाठी लाँचेस सुटतात तिथून.

दादरला रानडे रोडवर किंवा प्लाझा समोरच्या रस्त्यावर काही फोटो स्टुडिओ होते. पद्मा चव्हाण, आशा काळे व नंतर रिमा यांचे खास फोटो लावले होते तिथे. त्या स्टुडिओ समोरच मी रिमाला जाताना बघितले होते. आमची नजरानजर पण झाली होती. त्यावेळी तिच्या डोळ्यांची भितीच वाटली होती.

माटुंगा पोस्ट ऑफिस जवळचा फुलबाजारही खास आहे. तिथे खास दाक्षिणात्य पद्धतीचे हार मिळतात. समोरच एक तामिळ धार्मिक ( ?!) वस्तू विकणारे दुकान आहे. रुद्राक्ष, कापूर, चिकनी सुपारी, चंदन, लुंग्या असले काय्काय मिळते त्यांच्याकडे.

तिथेच आजूबाजूला, मद्रासी पद्धतीचे खाद्यपदार्थ , कारल्याच्या चकत्या, भेंड्याच्या चकत्या, त्यांचे सांडगे,
मुरुक्कू, कापूर घातलेले बुंदीचे लाडू असे काय्काय मिळते. मग जरा कोपर्‍यावर नल्लीज आहे तिथे जवळच शंकराचे देऊळ आहे. श्रवणात तिथे लोण्याचे शिवलिंग करतात.

आणि सध्या तर तिथे सकाळी राजेळी केळ्याच्या गाड्या लागलेल्या असतात आणि चिप्स पण बनवणे चालू असते. रामा नायक मधे अजून सात्विक जेवण मिळते.

आमची नजरानजर पण झाली होती. त्यावेळी तिच्या डोळ्यांची भितीच वाटली होती. >> जरा जास्तच रोखून बघीतलं असणार तुम्ही इतकी भिती वाटली म्हणजे Proud

कित्येक वर्षं त्याच्या दर्शनी भागात रस्त्यावरून कोट टोपी घालून चाललेल्या तरुणाकडे बाजूनेच चाललेली एक तरूणी मागे वळून संतापून बघतेय, असा मोठा फोटो लावलेला असे. खालीं 'कॅप्शन' होतं, ' हा भाऊचा धक्का नव्हे बरं का !>>> हे सही आहे Proud

भाऊच्या धक्क्यावर गूगल केले तर बरीच माहिती मिळते. पूर्वी म्हणजे १९८० सालापर्यंत मूळ धक्क्यावरून कोंकण लाईन च्या बोटी सुटत. ह्या बोटप्रवासाचे सुंदर विनोदी वर्णन गंगाधर गाडगिळांनी केले आहे. त्यानंतर मूळ धक्क्यावरून फक्त रेवस, उरण इथल्या प्रवासी बोटी सुटू लागल्या. सध्या त्याचा विस्तारित भाग एक मोठे मासळी बंदर आहे.
http://www.slideshare.net/HemantBhagat/bhau-chadhakka
पाठारेप्रभू ज्ञातीतले एक हरहुन्नरी सद्गृहस्थ लक्ष्मणभाऊ हरिश्चंद्रजी अजिंक्य यांनी हा धक्का(जेटी) बांधला. त्या काळात माझगाव बेट भरणी घालून परळला जोडले जात होते आणि पूर्व किनार्‍यावर गोदी बांधण्याची पूर्वतयारी सुरू होती हे लक्ष्मणभाऊ जरी गन कॅरेज फॅक्टरी मध्ये क्लेर्क म्हणून काम करीत होते, तरी मेहनत आणि धडपडीच्या जोरावर त्यांनी या कामातली छोटीछोटी कंत्राटे घ्यायला सुरुवात केली आणि हळू हळू ते एक बडे ठेकेदार बनले. कोंकणातून मुंबईस येणार्‍यांचा लोंढा वाढू लागला तेव्हा खास या गलबतांसाठी धक्क्याची आवश्यकता भासू लागली. भाऊंनी कनवाळूपणा आणि धंद्याची दृष्टी या दोन्हीमुळे हा धक्का बांधण्याचे कंत्राट घेऊन ते यशस्वीपणे पूर्ण केले म्हणून हा भाऊचा धक्का ऊर्फ फेरी व्हार्फ.
अवांतर : माझगावची व्युत्पत्ती विकीवर मत्स्यग्राम अशी दिलेली आहे, ती चुकीची वाटते. आज जरी भाऊचा धक्का हे मासळीबंदर असले तरी अठराव्या शतकापर्यंत ते तसे नव्हते, शेतीवाडी असलेले एक सुंदर कोंकणी गाव होते ते. (बहुधा न.र. फाटकांनी दिलेली) एक व्युत्पत्ती माझगाव म्हणजे मधला गाव--आपले माझघर असते तसा, ही जास्त बरोबर वाटते. मुंबई आणि इतर बेटांचा भरणी होण्यापूर्वीचा नकाशा पाहिला तर माझगाव हे बेट परळ आणि मुंबई ह्या दोन बेटांच्या बरोबर मध्ये येत असे. बहुधा जुन्या मराठी शब्दांची माहिती आधुनिक (इंग्लिश मधून शिकलेल्या) इतिहासकारांना नसावी म्हणून असे होत असावे.

बहुतेक त्या पुर्वी तिची दूरदर्शनवर अंधारवाडा हि रत्नाकर मतकरी लिखित एकांकिका बघितली होती !

पण त्या काळातच नव्हे अजूनही मराठी नाट्यकलाकार दादरला सहज दिसतात आणि तेदेखील कुठलाही आव न आणता, सहज वावरतात. सध्याच्या मालिकास्टार्स बद्दल मात्र माहित नाही.

हीरा, तुम्ही चांगली माहिती दिली आहे. माझ्या भावाने लोकसत्ता मध्ये लक्ष्मण अजिंक्य यांच्यावर लेख लिहिला होता, त्याची लिन्क :http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id... यात भाऊच्या धक्क्याबद्दल माहिती आहे.

ते माटुंगा पुर्व गं. म्हणजे किंग्ज सर्कलला जाणारा रस्ता. >> अय्यय्योच की!!! धन्स अश्वे. मी विचार करून छानपैकी चुकीचं लिहिलं. Lol

खूप खूप वर्षांपूर्वी खास मुंबईच्या ट्रीपकरता आईबाबांबरोबर आलो होतो. सोबत आणखी एक फॅमिली होती. त्यावेळी दूरदर्शन आणि वरळी डेअरी, वरळी सी फेस असं बघितल्याचं अंधूक आठवतंय. मात्र आठवणीत ठळकपणे लक्षात राहिल्या त्या दोन गोष्टी - उंचच उंच टिव्ही टॉवर (याच्या सगळ्यात वरच्या टोकाला काही रिपेरिंग निघालं तर माणसाला चढायला किती वेळ लागेल यावर आम्हा लहान मुलांचं बरंच डिस्कशन झालं होतं.) आणि वरळी डेअरीतलं रंगित फ्लेवर्ड दूध (मला दूध आवडत नसतानाही मी ते चाखून पाहिलं होतं.). तेव्हाच माझ्या बालपणीचा ओळखीचा एक पत्ता मी तिथं पाहिला. 'किशोर' मासिकाचं ऑफिस असलेली 'नीलम' बिल्डिंग. Happy किती हरखून गेले होते.

<< मशिद बंदरचं मार्केट आणि गोल देवळाजवळचा भाग. काय काय वाट्टेल ते मिळतं तिथे >> यू सेड इट ! लहानपणीं आमचं सात-आठ जणांचं टोळकं दिवाळीला चाळीतल्या शेजार्‍यांसाठी ३०-४० आकाशकंदील करायचं. अर्थात,' नो लॉस, नो प्रॉफिट' तत्वावर. त्यासाठीं लागणारं बांबू, कागद व इतर साहित्य आणायचं ठीकाण -गोल देऊळ परिसर ! तिथें समोरच असलेला 'चोरबाजार' मग खूप वर्षं कुतूहलाचा विषय होता. शेवटीं तिथं नियमितपणे जाणार्‍या एका इलेक्ट्रीशियन बरोबर धीर करून गेलों. << काय काय वाट्टेल ते मिळतं तिथे >> याचा ज्वलंत प्रत्यय आला. आम्ही आंत शिरलों तिथलं पहिलंच दुकान होतं सांखळ्यांचं; सुबक डिझाईनच्या नाजूक सांखळ्यांपासून महाकाय बोटींच्या नांगरांसाठी लागणार्‍या अजस्त्र पोलादी सांखळ्यांपर्यंत सगळंच मांडून ठेवलेलं; मग आंतल्या गल्ली बोळांतून फिरताना भूतकाळ पांघरलेलं एक वेगळं विश्वच उलगडत गेलं. पहिल्याच भेटीत त्या सार्‍याचा आंवाकाही लक्षात येणं अशक्यच. बरोबरच्या एलेक्ट्रीशियनला हवं होतं तेव्हढं घेईपर्यंत मी फक्त त्या जगाची तोंडओळख करून घेतली व परतलों.
नंतर कुणाला तरी एका मूर्तिवर ठेवायला कांचेची सुबक हंडी हवी होती म्हणून त्याच्याबरोबर जाणं झालं. विविध आकाराच्या, डिझाईन्सच्या कांचेच्या हंड्या, झुंबरं याचा तिथला संग्रह पाहून वेडंच व्हायला होतं. जुन्या संगीताच्या 'रेकॉर्डस' जमवण्याचा छंद असलेला माझा एक मित्र तिथं नियमितपणे जात असे. तो म्हणतो अशा रेकॉर्डस ठेवणारे तिथले लोक नुसते माहितगार नाहीत तर संगीतातले दर्दी पण असतात ! मग इलेक्ट्रॉनिकची गल्ली, कटलरी सामानाची गल्ली अशाही भागात कांहीं वेळां गेलों पण 'चोर बाजारा'चा थांग लागण्यापासून कित्येक कोस दूर असल्याचंच जाणवतं.
हल्लीं बरीच वर्षं तिथं जाणं झालं नाही पण मला नाही वाटत त्यात कांही बदल झाला असेल. 'चोर बाजार' कालातित आहे हें तिथं गेलेल्याला सांगावंच नाही लागत !!!

समोरच एक तामिळ धार्मिक ( ?!) वस्तू विकणारे दुकान आहे. रुद्राक्ष, कापूर, चिकनी सुपारी, चंदन, लुंग्या असले काय्काय मिळते त्यांच्याकडे.>>>> "गिरी"

भाऊ Happy एकदा वाट चुकून चोरबाजारात शिरले होते. सगळीकडे कधी न पाहिलेली हत्यारं विकायला ठेवलेली पाहून आल्या वाटेने कडंकडंनं Proud माघारी फिरले. भुलेश्वरची चाहूल लागली तेव्हा बरं वाटलं.

Pages