मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> पूर्वी बेस्टच्या डबल डेकर बसेस शिवाय ट्रेलर बसेस पण असायच्या, त्यात ड्रायव्हर केबिन वेगळी असायची.
हो, या मला आठवतात पाहिलेल्या.

वरळीच्या पोदार आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या मागच्या गल्लीला 'अभ्यासगल्ली' म्हणतात. दिवसा तिथे खरंच अनेक मुलं अभ्यास करत असतात. तिथे झाडांची छान सावलीही असते आणि बर्‍यापैकी शांतताही असते. कदाचित रात्रीही विद्यार्थी अभ्यास करत बसत असतील.

>>>> इथं काय कुणी लिहून ठेवलेलं थोडंच लिहीतंय ! आठवतं तें लिहायचं; लिहायला लागलं कीं तसं आठवतही जातंच ना ! <<<
सोळा आणे सच भाऊ.
नन्दे, तू फक्त लिहायला सुरवात कर, त्यावेळचे देखिल आठवायला लागेल.

<< बहुतेक हस्नाबाद, म्हातारपखाडी हे स्गळे या वॉक मधे कव्हर होईल. >> माझगांव परिसरातील हस्नाबाद दर्ग्याशी माझ्या कांही जुन्या आठवणी निगडीत आहेत. आगाखान पंथाचा हा दर्गा व आगाखान कुटूंबाच्या खास आवडीचा. दर्ग्यासमोर मोठ्ठं मैदान व मागच्या बाजूस एक विहीर व २०-२५ फूट उंचीच्या भिंतीने वेढलेला विस्तीर्ण भाजीचा मळा [मुंबईच्या भरवस्तीत असलेल्या या विहीरीवर पूर्वी बैलानी चालवलेली मोट मीं पाहिली आहे !!!]. अत्यंत भव्य,सुबक, स्वच्छ व हवेशीर अशा ह्या दर्ग्यावरचा लांबूनही नजर खेंचून घेणारा सोनेरी कळस ही माझगांवची शानच.
दर्ग्याच्या सभोंवारच्या इमारतींत फक्त आगाखान पंथीयांचीच वस्ती. पण दर्ग्याच्या मागें मात्र भाजी मळ्याची व्यवस्था पहाणार्‍या मराठी कुटूंबाचं छोटसं घर. पिढ्यान पिढ्या तिथं असलेल्या या कुटूंबावर आगाखान कुटूंबाची मर्जी व रहिवाश्यांना आत्मीयता. दर्ग्यापुढच्या मैदानात क्रिकेट. एकेकाळीं हस्नाबादचा संघ हा मुंबईच्या 'टेनीस' क्रिकेटमधला गाजलेला अग्रगण्य संघ. त्यांतही त्या मराठी कुटूंबातील खेळाडूंचा अर्थातच समावेश असायचाच. मुंबईचा रणजी खेळाडू इस्माईल व त्याचा मुलगा, हल्लीचा लॉन टेनीसपटू इस्माईल, हे हस्नाबादचेच रहिवासी होते.

[माझ्या तिथल्या एका मित्राबरोबर मीं क्रिकेट खेळायला [मुंबईतली सर्वच मुलं/तरूण खेळतात तसंच] पूर्वीं तिथं जायचो म्हणून ही माहिती. खूपच वर्षं झाली त्याला. आतां काय बदल झालाय , कल्पना नाही ].

कदाचित रात्रीही विद्यार्थी अभ्यास करत बसत असतील. >>> माझ्या भावाने त्याचा C.A. चा अख्खा अभ्यास स.का. पाटिल उद्यान (जपानी बाग), गिरगाव, ठाकूरद्वार येथे बसून केला. चाळीतील दोन खोल्यांमध्ये न मिळणारा निवांतपणा तिकडे मिळत असे. संध्याकाळी ७ वाजता जेवून पुस्तकं घेऊन तो बागेत जाऊन बसत असे. असे अनेक विद्यार्थी तिथे आपापला अभ्यास करत बसत. अजूनही कदाचित ही प्रथा चालू असेल त्या बागेत Happy

त्या बागेतली हत्तीच्या आकाराची घसरगुंडी हा माझा आवडता खेळ आणि उसाची गंडेरी व उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा खाणे हा बागेतला आवडता उद्योग.

<< चाळीतील दोन खोल्यांमध्ये न मिळणारा निवांतपणा तिकडे मिळत असे. >> अगदीं खरंय. गिरगांवातील चाळीतली बरीचशीं मुलं 'चर्नी रोड गार्डन'मधेही [ स्टेशनलगतचं] अभ्यासाला बसत. परिक्षा जवळ आल्या कीं तिथली अशी गर्दी खूपच वाढायची.
रच्याकने, स.का. पाटील उद्यान हें कबरस्तानावर वसलेलं आहे, हेंही बर्‍याच जणाना ठाऊक नसावं. पूर्वी इथं खूप जुनं, वापरात नसलेलं कबरस्तान होतं. स.का. पाटीलानी तिथल्या ट्रस्टीना बागेची कल्पना पटवून देवून अंमलात आणल्याचं निश्चितपणे आठवतं. आजही या बागेच्या लगतच्या जागेत कबरस्तानच आहे.

पाटील उद्यान हें कबरस्तानावर वसलेलं आहे, >>> असेल. पण आमच्यासारखी भुतं तिथेच खेळून मोठी झाली Wink ती बाग मुलांनी, फुलांनी बहरलेली असायची. त्या बागेच्या फेन्सिंगमध्ये असलेल्या लोखंडाच्या विविध कार्टुनी आकारांवर चढ उतर करणे हाही एक आवडता उद्योग. एकदा सी-सॉ वरुन सराइतपणे उतरता न आल्यामुळे ती फळी पोटाला लागून रक्तबंबाळ झाले होते ते ही आठवतंय. दात ओठ दाबून त्याही वयात रडू आवरलं होतं कारण मग परत बाबा बागेत नेणार नाहीत पडापडी, रडारडी केल्यामुळे.

चर्निरोड ब्रिजला लागून अजून एक कब्रस्तान आहे साहित्य संघाच्या समोर.

परेश, तू पण जायचास का जपानी बागेत? की तू बालभवन मध्ये जायचास? गोरेगावकर लेन ला बालभवन जवळ होतं.

स.का. पाटील उद्यानाच्या जागेवर पूर्वी एक वापरात नसलेली सीरियन्/आर्मेनिअन्/जॉर्जिअन अशा कुठल्यातरी लोकांसाठी राखून ठेवलेली दफन भूमी होती. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात काही सैनिकांचे/लोकांचे दफन इथे झाले होते म्हणतात. या लोकांचे मुंबईत अस्तित्व न उरल्यामुळे या दफनभूमीचा उपयोग उरला नाही. स.का. पाटील यांच्या हयातीतच आणि त्यांच्याच पुढाकाराने येथे बाग बनवण्यात आली .निधनानंतर त्यांचा पुतळा वगैरे न उभारता काही समाजोपयोगी स्मारक निर्माण व्हावे अशी कल्पना निघाली. ती गिरगावकरांनी उचलून धरली कारण पाटिलांची मूळ कर्मभूमी गिरगावपरिसर होती. स.का.पाटिलांच्या नावाने नामकरण पाटिलांच्या हयातीतच झाले किंवा कसे ते आठवत नाही. पण तेव्हाही मुंबईत, त्यातूनही गिरगावसारख्या मोक्याच्या ठिकाणी मोकळी जागा मिळणे अवघड होते. शेवटी ही विनावापर पडून असलेली जागा पालिकेकडून मिळवण्यात आली. त्यातही बर्‍याच कायदेशीर किंवा वहिवाटीच्या अडचणी आल्या. काही संस्थांनी त्यावर हक्कही सांगितला. पण अखेरीस हे उद्यान तयार झालेच. दफनभूमीची पार्श्वभूमी असल्याने सुरुवातीला या उद्यानात लोकांचा फारसा वावर नसे. कालांतराने दफनभूमीचा शिक्का पुसला गेला आणि आज ते गिरगावकरांची लाडके उद्यान होऊन बसले आहे. अगदी अलीकडची गेल्या दोनचार वर्षातली परिस्थिती मात्र माहीत नाही.

मला पण बालभवन बोअर व्हायचं Proud कुणी खेळायचंच नाही. अभ्यासच करत सगळे. जपानी बागेत कट्ट्यां/बाकांभोवती पकडापकडी खेळणे, हत्तीची घसरगुंडी, झोपाळे वगैरे मजा यायची. गिरगाव सोडलं तेव्हा मुद्दाम आई आणि मी तिथे जाऊन अर्धातास बसून आलो. सगळं बालपण त्रयस्थपणे डोळेभरुन पाहिलं. तीच शेवटची भेट (अजूनतरी) जपानी बागेची Sad

नतद्रष्टा, तू परत गिरगावात रहायला गेलास की मला १ दिवस माहेरपणाला बोलाव Proud (माझं माहेरचं आणि नत्याचं आडनाव सेम आहे). मी तेव्हा आयतं जेवेन आणि नंतर काळाराम गोराराम, जपानी बाग करुन माझ्या घरी परत येईन.

<< परेश, तू पण जायचास का जपानी बागेत? >> अहो, जुना असलों म्हणून काय झालं; मला पण विचाराना हा प्रश्न. मींही गिरगांवच्या चाळीतलाच होतों व 'अभ्यासातला' अजिबातच नव्हतो असंही नाही !! Wink
<< भाउ, पाठकांचं किरणकला इतिहासजमा झालं.>> पण त्यांचा तो 'भाऊचा धक्का' रस्तोरस्तीं बहुधा अजूनही चालूच असावा !! Wink

बरं. तुम्ही पण जायचात का? खेळायचात की अभ्यास करायचात? Proud मी नेहमीच आयत्यावेळी पुस्तक उघडणारी असल्यामुळे मी फक्त खेळायचे.

फेरीवाल्याकडुन/दुकानदारांकडुन घेतल्या जाणार्‍या हप्त्यासाठी 'बापट' शब्द प्रचलित होता. > दादर भागातील विक्रेते 'बापट भाव' म्हणून उल्लेख करत... म्हणेज १० रु.च्या मालाची किम्मत २० रु. सांगणे असे त्याचे स्वरुप होते.

तसाच चर्नीरोडचा तो पायपूल मला अजूनही आवडतो चालायला - > गिरगाव चौपाटीच्या escalator बद्दल म्हणताय का? ८० च्या दशकातला मुंबईतला तो पहिला escalator असावा... त्या वेळी काय कौतुक वाटायच त्या escalatorच. नंतर गर्दीच्या कारणास्तव बंद करण्यात आला असे ऐकिवात आहे.

मध्यरेल्वेवर दादर-माटुंगा ही स्टेशन्स सगळ्यात जवळ आहेत > +१

या दिवसात लालबागच्या फ्लायओव्हर ब्रीजवरुन भायखळ्याला जाणे हा एक आनंददायी प्रवास असतो. > विक्रोळी ते घाटकोपर प्रवासात गोद्रेजच्या डाव्या बाजुला पितमोहर आणि बहावाचे असेच सुंदर प्रदर्शन भरलेले दिसते या दिवसांत.

माझा गिरगावाशी फार संबंध नाही, मात्र चर्नी रोड स्टेशन समोर जी तळवलकर जीम (तळवलकरांनी चालु केलेली पहिली जीम )आहे तीथे मी काही वर्ष व्यायामाला जायचो. तीथे गिरगावातले काहि मेंबर्स होते. त्यामुळे गिरगाव काय प्रकरण आहे त्याचा अंदाज आहे Happy

पुर्वीच्या आठवणींनी व्याकूळ वगैरे होऊन इकडे निळे चेहरे टाकू नका कृपया. Wink

पुर्वीची मुंबई छान होतीच, आताची छानच आहे आणि भविष्यातलीही छानच असणार आहे.

बदलाशिवाय प्रगती नाही. Happy

@ नी, परागसिंचनाचे प्रयोग बघायला.

@ धनुक्श. सरकता जिना नव्हे. तो आयडीअल कॅफे ( 'अंगार' सिनेमा आठवा. जॅकी डिंपल नानाचा ) च्या बाहेर होता. हा pedestrian bridge स्टेशनला अगदी लागुन समांतर आहे. दोन दिशांना आणि मधे केळेवाडीत म्हणजे संघाच्या गल्लीत उतरतो खाली.

अग्गं, जपानी बाग बदलली किंवा तिचं अजून काही झालं म्हणून नैय्ये तो निळा चेहरा. ती छानच होती, आताही असेल आणि नंतरही असेलच Wink पण मला त्यानंतर जपानी बाग दिसली नाही म्हणून तो निळा चेहरा आहे.

Pages