भोपळा सूप विथ संत्रा ट्विस्ट

Submitted by अमेय२८०८०७ on 24 March, 2013 - 04:51

भोपळा ही तशी प्रथमदर्शनी प्रेम जडावं अशी भाजी नाही. चल रे भोपळ्या ... किंवा बीरबलाच्या गोष्टीतून लहानपणी भेटलेला हा भाजीविशेष पानात आला की मात्र अजिबात आवडायचा नाही. गोष्टीतला गोजिरवाणा भोपळा गोष्टीतच रहावा असे आवर्जून वाटण्यासारखी चव लागायची. त्यातून पुढे परीक्षेतील अकलेच्या तार्‍यांवर शिक्षकांनी आपुलकीने आणि वारंवार दिलेले 'तांबडे' भोपळे वगैरे पाहून तर या फळभाजीबद्दल शुद्ध अढीच निर्माण झाली. घरातील इतर माणसे भरीत, घार्‍या इ.चा यथेच्छ समाचार घेताना पाहूनही भोपळेरावांबद्दल फारशी माया दाट झाली नाही. मला भोपळा खाऊ घालण्याचे आईचे सर्व प्रयत्न मी फोल ठरवले. प्रसंगी मार खाल्ला पण भोपळा तोंडात जाऊ दिला नाही. माझा हा विजय महत्त्वाचा होता कारण घरात खाण्या पिण्याचे फाजील लाड चालत नसत. शेपू पासून सगळे एकदा तरी पानात घेतलेच पाहिजे असे आईचे कडक तत्त्व होते. एरवी (बाबांच्या मते) सॉलीड व्यक्तिमत्वाच्या आईला या एका बाबतीत मी पुरून उरल्याचे पाहून बाबांच्या डोळ्यातही 'बापसे बेटा सवाई' निघाल्याचे समाधान (आई जवळ नसताना) उमटल्याचे मी पाहिले आहे.
पण रूडयार्ड किपलिंग उघडपणे आणि बाकी सर्व विद्वान मनातल्या मनात 'द फीमेल ऑफ द स्पीसीज इज मोअर डेडली दॅन द मेल' उगाच म्हणत नाहीत. ज्याला मी आईचा पूर्ण पराभव समजत होतो ती मोठ्या विजयासाठी केलेली एक छोटी तुच्छ तडजोड होती हे कळेपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. केवळ स्त्रीसुलभ अशा मुत्सद्दीपणाने आईने मला भोपळा खायला घालण्याची 'सुपारी' पत्नीला दिली. लग्नानंतरच्या 'त्या' नवलाईच्या दिवसांचा फायदा घेऊन बायकोने एकदा भोपळ्याचे सूप बनवले. आपण आजन्म भोपळा खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे हे लक्षात येईपर्यंत माझा बाऊल अर्धा रिकामा झाला होता. विश्वामित्राबद्दल त्या दिवशी पहिल्यांदा सहानुभूती वाटली.
पुढच्या सुटीत घरी गेल्यावर आईने सुनेला कडेवर घेऊन नाचायचेच बाकी होते. पहिल्याच दिवशी जेवायला भोपळ्याची भाजी होती. 'सूप से गई वो भाजी को ना बोलनेसे क्या आयेगी?' अशी मनाला समजूत पटवून मी कष्टी मनाने भोपळ्याचा घास तोंडात घातला. बाबांच्या डोळ्यांतले 'शेवटचा मालुसरा पडला' टाईपचे विषण्ण भाव अजून लक्षात आहेत. आज मला भोपळा आवडतो आणि त्याचे सर्व पदार्थ मी निमूटपणाने खातो हे कबूल करताना अतिशय दु:ख होत आहे. दु:ख वाटल्याने हलके होते या भावनेने त्या आयुष्यास कलाटणी देणार्‍या क्रांतिकारी सूपची रेसिपी खाली देत आहे.

साहित्य :

तांबडा भोपळा (अरेरे) - अर्धा किलो.
गाजरे - दोन मोठी
कांदा - एक मोठा
हिरवी मिर्ची - एक मध्यम तिखट बिया काढून
जिरेपूड - दोन टी.स्पून
मीठ - चवीनुसार

क्रीम - तीन-चार टे.स्पून
ऑरेंज ज्यूस - २०० मि.ली.

सजावटीसाठी कोथिंबीर

कृती :

भोपळा, गाजर, कांदा यांचे चौकोनी तुकडे करुन घ्या. मिरचीबरोबर कुकरमधून अगदी अंगाबरोबर पाणी घालून शिजवून घ्या. भा़ज्या शिजल्यावर पाणी व भाज्या वेगळे करा. शिजलेल्या भाज्या मिक्सरमधून बारीक करा. बारीक केलेल्या भाज्या पुन्हा पाण्यात मिसळून सूप उकळायला ठेवा. जिरेपूड, मीठ व ऑरेंज ज्यूस घाला. एक उकळी आली की आंच धीमी करून क्रीम घाला. व्यवस्थित ढवळून गॅसवरून उतरवा. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

मिरची जास्त तिखट नको, चव बिघडते. मिरची अजिबात वर्ज्य असल्यास चवीनुसार मिरपूड घालावी. जिरेपूड ताजी केल्यास चांगला स्वाद येतो.

1_0.jpg2_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रेसिपी Happy

मी भोपळा आधी रोस्ट करुन घेते. त्याचे सूप ही मस्त लागते.

पम्पकिन सूप, त्यावर सावर क्रिम आणि सोबत टोस्टेड बगेट / सूप रोल हे अतिशय आवडते कंफर्ट फूड आहे Happy

पुढच्या वेळेस या सूप मधे थोडे मार्जोरम किंवा थाईम घालुन बघा Happy जरा वेगळा स्वाद. किंवा ड्राईड मिंट वरतुन चुरून घातलेले पण छान लागते.

मी थोड्याफार प्रमाणात असंच भोपळ्याचं सूप करते. फक्त ऑरेंज ज्युस आणि मिरची मात्र घालत नाही. गाजर असलं तरच घातलं जातं. नेक्स्ट टाईम वरील रेसिपीने करून बघेन. Happy

छानच हो........................................!

छान वाटतेय रेसिपी.आंबट-गोड चव मस्त लागेल. करुन बघेन नक्की Happy

आत्तापर्यंत मितानच्या पद्धतीने भोपळ्याचे सनराईज सूप करत होते.

भोपळ्याची भाजी चमचमीत करुन खायची असेल तर मृण्मयीने दिलेली बाकर भाजी मस्त आहे.

रेसिपी (नेहेमीप्राणेच) मस्त .. Happy

वरच्या फोटोत क्रीमचं प्रम्म्ण अगदी बेताचंच असावं असं वाटत आहे .. इकडे अमेरिकेत भोपळ्याच्या पदार्थांत सहसा थोडं जायफळ घालतात .. पण मिरची बर्‍यापैकी तिखट असेल तर जायफळाची चव कितपत कळेल कल्पना नाही ..

ओजे घालून करुन पाहिलेलं नाही. बाकी आणखी दोनचार भाज्या लोटून केलेलं आहे. तेव्हा पुढच्या वेळी ह्याप्रमाणे करुन बघेन.

मलाही हे सूप आवडतं..त्यात लाजो ने सांगितल्याप्रमाणे त्यात थाईम्,पेप्पर आवडतं.. संत्र्याचा जूस .. मला आवडेल कि नै ..डाऊटफुल!!!
पडलेल्या मालुसर्‍या.. प्रस्तावना पण आवडलीच.. Lol

भोपळ्याचे घार्‍यांव्यतिरिक्त खाण्यासारखे फार चांगले पर्याय नसतात हा माझा आतापर्यंतचा अनुभव पण भोपळ्याला जेवणात स्थान द्यायला हवे असा ठराव इतक्यातच पास झालाय.. रेसिपी शोध सुरु आहे. त्यामुळे ही पाकॄ अगदी योग्य वेळेला मिळाली!

मस्त रेसिपी... आणि प्रस्तावना पण भारीच!!

मी पण हे सुप बर्‍यापैकी असचं करते.. पण ऑरेंज ज्युस नाही घातला कधी..
आता ह्या पद्दतीने करून बघेन.

आज ह्या रेसिपीने करून बघणार. घरात क्रीम नाही म्हणून लाजोजी म्हणतात तसं सावर क्रीम घालून ट्राय करणार.
प्रस्तावना लाजवाब!