अंड्यातला 'अ' जरी काढला तरी हाहाकार उडेल, मेरूमंडळ ढळेल आणि एकंदरीत मायन लोक जिची आतुरतेने वाट पहायचे ती जगबुडी साक्षात येईल असे घरचे पारंपारिक वातावरण होते. 'अ' 'आ' मध्येच इतका प्रॉब्लेम असल्याने 'च' चिकनचा, 'म' मटणातला वगैरे तर फारच दूरचे दिवे. बाबा - काका यांची पिढी बाहेर 'चोरून' खायला शिकली होती पण आजीच्या धाकामुळे वर तोंड करून कबूल करायची प्राज्ञा नव्हती. लग्नानंतर आपले दिवस पालटतील आणि सासूबाईंना 'नॉन वेज शिवाय कसं जेवणच जात नाही' असं सांगणार्या मॉडर्न मत्स्यगंधा छाप सुना येऊन घरात चिकन, मासे यांच्या सुगंधाचे 'खारे' वारे वाहायला लागेल असा त्या दोघांचा कोंडीफोडू आशावादही फोल ठरला. माझी आई आणि काकू यांचे इतर अनेक बाबतीत सासूशी 'बौद्धिक मतभेद' (उदाहरणार्थ भांडण) झाले पण शाकाहाराच्या बाबतीत मात्र तिघाही बायकांचे भयंकर एकमत होते. त्यामुळे पुनश्च बिचारे बाबा व काका हॉटेलांच्या वाटेला लागले. पण आम्हा पोरांना लहानपणापासूनच 'खायला' शिकवून दोघांनी माफक वचपा काढला. पुढे 'दिलवाले दुल्हनिया...' मधील फरिदा जलालचे 'मेरी बेटी मेरे जैसे समझौते नही करेगी' वगैरे डाय्लॉग ऐकले तेव्हा बाबांच्या खाद्यसंस्कारांची आठवण येऊन डोळ्यांना नसले तरी तोंडाला पाणी सुटल्याची हृद्य आठवण आहे. याच विदग्ध संस्कारांमुळे लग्नानंतर पत्नी शुद्ध शाकाहारी असूनही (खानदानी प्रॉब्लेम!) 'घरात नॉन वेज करून खाणे हा माझा हक्क आहे आणि मी तो मिळवणारच' असे मी बाणेदारपणे स्पष्ट करू शकलो (तरीही पत्नीसुद्धा घराण्यातील बाकी स्त्रियांप्रमाणेच 'तेजोमय' असल्याने 'नॉन-वेज' खाण्यासाठी मला आधीचे तीन-चार दिवस चांगले वागणे, वेळेवर घरी येणे वगैरे गुंतवणुकी कराव्या लागतातच, निदान खायला तरी मिळते. पिढीनुसार प्रगती होते ती अशी!)'
पण घरची मुर्गी शाकाहारी असली तरी अगदीच 'दाल' बराबर नव्हती काही! काकू आणि आई उत्तम सुगरणी होत्या. आईच्या काहीकाही पदार्थांसाठी तर ज्यांच्या घरात 'तांबड्या-पांढर्या'च्या नद्या वाहतात असे माझे मित्रही घरी आसुसून यायचे. असाच एक 'हिट' मेनू म्हणजे भाकरी, वांग्याची भाजी आणि खरडा. आता या आद्य महाराष्ट्रीयन पदार्थांना बनवणे हे रॉकेट सायन्स नसो बापडे. वर्ल्ड गूरमे क्युझीनमध्येही हे येत नसतील, काही हरकत नाही पण या पदार्थांच्या कम्फर्ट व्हॅल्युला तोड नाही. या पदार्थांचा मूळ बाज एकच असला तरी व्यक्तिनुसार, घरानुसार यात बारीकसारीक बदल होत असतात. यांची अमुक एकच 'आय एस आय' मार्क वाली रेसिपी नाही याची जाणीव असल्याने खाली दिलेली रेसिपी म्हणजे या विषयावरचे ब्रह्मवाक्य असा माझा मुळीच दावा नाही. पण माझ्यासाठी हे पदार्थ म्हणजे घरापासून दूर असताना ज्यांची आठवण येऊन 'गमते उदास' होते, रसनेची देवी जागृत होऊन चंडीप्रमाणे प्रसादासाठी थयथयाट करू लागते अशा प्रतवारीचे आहेत त्यामुळे आज भरल्या पोटाने याची पा.कृ. लिहिताना आनंदाचे भरते येत आहे.
साहित्यः-
१. वांग्याची रसभाजी
प्रमुख भूमिका:-
७-८ छोटी वांगी (कृष्णा, थेम्स, मिसिसीपी अशा सोयीच्या नदीच्या काठची)
ताजे मटार अर्धी वाटी
एक मोठा बटाटा मध्यम आकाराच्या फोडी करून
एक मोठा कांदा, बारीक चिरून
दोन मध्यम टोमॅटो, बारीक चिरून
७-८ लसूण पाकळ्या बारीक चिरून
कांदा-लसूण तिखट ३ टी.स्पून
ताजे दाण्याचे कूट - ३-४ टी.स्पून
तेल
बाकी हळद, कोथिंबीर, मीठ, पाव चमचा तिखट वगैरे सहाय्यक अभिनेते आवडीनुसार प्रमाणाने
पटकथा
वांगी, मटार, बटाटा सोडून बाकी सर्व मसाला एका बाऊल मध्ये एकजीव करून थोडासा कुस्करून घ्यावा. वांग्यांना उभे क्रॉस काप देऊन त्यांत मसाला भरून ठेवावा. काही मसाला उरेल तो बाजूला ठेवावा.
कढईत थोडे तेल गरम करून त्यात भरली वांगी टाकून एक वाफ द्यावी. नंतर उरलेला मसाला, बटाटा आणि मटार घालून तेल सुटेपर्यंत पुन्हा वाफवून घावे. वाफ आल्यावर पाहिजे तेवढ्या ग्रेव्हीच्या अन्दाजाने गरम पाणी घालून सर्व भाज्या बोटचेप्या होईपर्यन्त शिजवावे. शेवटी कोथिंबीर घालावी.
२. खरडा
लसूण - मिरची (८-१० मोठ्या मिरच्या + एक पूर्ण गड्डा लसूण) अशा प्रमाणात
तेल. मीठ
मिरच्या अर्ध्या चिरून लसणाबरोबर तव्यात टाकाव्या. पाण्याचा हलका हबका मारून अर्धवट शिजेपर्यन्त झाकून वाफ द्यावी.
अर्ध्या शिजल्यावर बत्त्याने किंवा पसरट वाटीने तव्यातच बारीक करून घ्याव्यात. दोन छोटे चमचे तेल टाकावे. मीठ घालून मंद आचेवर २-३ मिनिटे परतून घ्यावे.
भाजी, भाकरी, खरड्याचे ताट (सोलकढी सहित .. मिरची-मसाल्याला थोडा उतारा म्हणून!)
प्रचंडच तोंपासू. लिहीण्याची
प्रचंडच तोंपासू. लिहीण्याची स्टाईलही मस्तच मेनूप्रमाणे.
वांग्याच्या भाजीत मटार पहिल्यांदाच ऐकले.
>>प्रचंडच तोंपासू. >>++१
>>प्रचंडच तोंपासू. >>++१
लिहिण्याची स्टाईल छान
लिहिण्याची स्टाईल छान आहे.
आत्ताच तुम्ही लिहिलेल्या पद्धतीने रसम केलं.
आता हे एकदा करून बघणार.
मीही भरल्या वांग्याच्या भाजीत
मीही भरल्या वांग्याच्या भाजीत मटार पहिल्यांदाच ऐकले. मस्त रेसिपी आणि फोटो.
सकाळी सकाळी असं काही वाचणं म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे.
छान लिहिलंय मस्तपैकी धिरडी
छान लिहिलंय
मस्तपैकी धिरडी खात खात रेसिपी वाचल्याने तितकेसे क्लेश झाले नाहीत. छोटी वांगी सध्या बाजारात दिसली नाहीयेत. आली की लग्गेच करून बघण्यात येईल. भाकरी मात्र नाचणीची
खरडा - स्लर्र्रर्रप
लिहिण्याची स्टाईल व रेसिपीचे
लिहिण्याची स्टाईल व रेसिपीचे फोटो खूप छान.
मीही भरल्या वांग्यात मटार पहिल्यांदाच ऐकले.
आता अशीही करून बघेन.
सही पाकृ आणि अगदी तोडफोड
सही पाकृ आणि अगदी तोडफोड फोटो! छाळ आहे!
पण घरत हिरवी बारकी इकोनोलोकाचीनदीकाढची वांगी पण आहेत. आजच भाजी, खरडा आणि 'दीप'ब्रँडाच्या कृपेची भाकरी खाण्यात येईल.
धन्यवाद!
मस्त. फोटोही एकदम
मस्त. फोटोही एकदम तोंपासू.
भरल्या वांग्यात मटार / ओले हरभरे सोलून / कोवळे वालाचे दाणे / सुकी मच्छी (त्यातही सोडे उत्तम) घालतात.
छान!
छान!
मामी, आठवलं. सिंडीची ओले
मामी, आठवलं. सिंडीची ओले हरभरे की सोलाणे घालून वांग्याच्या भाजीची रेसिपी आहे.
मस्तच !!!
मस्तच !!!
मस्त लिहिता! ब्लॉग काढा...
मस्त लिहिता! ब्लॉग काढा... प्रतिसाद मिळेल. (ए. फु. प. चा. स.)
रेसीपी काय घराघराची कशी रांगोळी सुंदर तशीच आहे.(आमच्या घराची पण छान आहे)
छान आहे रेसिपी. आम्ही ह्या
छान आहे रेसिपी. आम्ही ह्या सर्व अभिनेत्यांच्या जोडीला शेवग्याच्या शेंगा पण घालतो ह्या भाजीत. अप्रतीम मेन्यू.
सकाळी ही रेसिपी पाहिल्यावरच
सकाळी ही रेसिपी पाहिल्यावरच दुपारी जेवणाकरता भाकरीचा बेत पक्का झाला. जोडीला शोभेशी भाजी नसल्याने ओल्या वालाची उसळ केली. तुमच्या रेसिपीप्रमाणे खर्डा केला. मस्त ओरपली.
मस्त! एकदम फर्मास बेत ओले
मस्त! एकदम फर्मास बेत
ओले हरभरे किंवा वाल घातलेली वांग्याची भाजी खल्लि आहे. मटार घालुन करुन बघेन.
तुमच्या रेसिप्यांना तुम्ही ज्या प्रस्तावना लिहिता त्या एकदम भारी असतात
मस्तच ! लिहिण्याची श्टाईल तर
मस्तच !
लिहिण्याची श्टाईल तर खूपच भारी.
अहाहाहा- वर्ल्ड गुरमे कुझीन
अहाहाहा- वर्ल्ड गुरमे कुझीन गेले तेल लावत.
माझी पण सेमपिंच पाकृ आहे वांग्याच्या भाजीची. द फिलिंग ऑफ ओरपिंग दॅट रस्सा. अहाहाहा
आमच्या मातोश्रींना सैपाकात शून्य विंट्रेस्ट, पण ही भाजी काय अफलातून करते. नॉट धिस पुणेरी गूळ अँड ऑल इन एव्हरीथिंग.
विदर्भाचे का हो तुम्ही?
जीव घेतलास!!
जीव घेतलास!!
छान बेत. आणि लेखनही !
छान बेत. आणि लेखनही !
एक नंबर
एक नंबर
लेखनशैली अस्ली जबरी आहे की
लेखनशैली अस्ली जबरी आहे की अगदी "वरण-भात" असं जरी लिहिलंत तरी ते वाचताना अग्दी खमंग -कुरकुरीत-मसालेदार आणि स्वादयुक्त असणार .....
सर्व प्रतिसादकांना खूप
सर्व प्रतिसादकांना खूप धन्यवाद
मस्तच रेसिपी अन
मस्तच रेसिपी अन प्रचि..मामींची सूचना ऐकल्यास शाकाहारी /मत्स्याहारी तोडगा निघेल. पण घर परिमळलेले चालेलसे दिसत नाही प्रस्तावनेवरून
वासाचे जास्त वावडे नाही पण
वासाचे जास्त वावडे नाही पण खाल्ले जाणार नाही मिक्स असेल तर
रेसिप्या लिहिता बाकी मस्त.
रेसिप्या लिहिता बाकी मस्त.
)
(कोल्हापूरचे का? 'कांदा-लसूण तिखट' लिहिलंत आणि कृष्णाकाठची आठवण काढलीत त्यावरून.
होय, कोल्हापूरचा आहे.
होय, कोल्हापूरचा आहे.
मेनू टिपिकल हिट असूनंही
मेनू टिपिकल हिट असूनंही ,वेगळेपणा अवडला...!!!
अमेय२८०८०७, सुरेख सादरीकरण
अमेय२८०८०७,
सुरेख सादरीकरण आहे. पदार्थाचं आणि लेखाचं दोघांचंही!
रच्याकने : अठ्ठावीस ऑगस्ट सात ही खास तारीख आहे का? आपल्या सदस्यनामात दिसते म्हणून कुतूहल चाळवलं गेलं.
आ.न.,
-गा.पै.
.
काल इथे प्रतिसाद लिहिल्यावर
काल इथे प्रतिसाद लिहिल्यावर आठवण झाली. मी तूरीचे दाणे घालून भरली वांगी करते.
मागे इथे http://www.maayboli.com/node/22549 रेसिपी टाकली होती. पण धागा सार्वजनीक नसल्याने सापडत नव्ह्ती.
काय भाजी होते! आईला आणि
काय भाजी होते! आईला आणि तुम्ही इथे ही रेसिपी टाकलीत म्हणून तुम्हाला खूप धन्यवाद! ही आमची नटवी...
(खरड्याचं गंडलं बघा. लोकांनी मला तव्यावरल्या मिर्च्या-लसूण पाकळ्ञा वाट्यांनी चेचायला सांगितल्या.:P एरवीच्या आयुष्यातल्या चेचण्याच्या प्रॅक्टीसचा इथे काडीचाही उपयोग नाही याचा अनुभव आला. त्यामुळे त्या विचित्र लगद्याची, मिक्सरमधून खडबडीत वाटून यथासांग चटणी झालीय. ती पण अफाट लागतेय.)
Pages