पुरणपोळी पण तेलावरची.

Submitted by दिपु. on 23 January, 2013 - 02:00

दोनेक महिन्यापुर्वी ईथे विचारले होते तेलपोळी विषयी.. त्या बीबी वर मी पा.कृ देते असा रि. दिला आणी विसरुन गेले. ह्या वेळी संक्रांतीला काही कारणाने करता नाही आली पुपो. मग ४-५ दिवसांनी खावीशी वाटु लागली.
पुपो ती पण तेलावरची करताना खुप काळजी घ्यावी लागते. एकतर ती भरपुर तेल (पचपच असा आवाज येईपर्यंत तेल) यावर पुपो न पलटता पोळपाट फिरवुन लाटावी लागते हलक्या हाताने. आज्जी दरवेळी मी पुपो लाटताना म्हणायची "पोरगी पहावी व्हटात, आणी पोळी पाहावी काठात".. तर अशी ही पुपो नाजुक, हलक्या हाताने, एकाच दिशेत लाटणं फिरवुन लाटावी लागते.
मग सकाळी डाळ + गुळ शिजत घातले.
क्रमवार कृती खालीलप्रमाणे.

पुरणः
साहित्यः- २ वाटी हरभरयाची डाळ, पावकिलो ला जरा कमी असा गुळ (ढेकळे फोडुन) ( चवीनुसार गोड कमी-जास्त करु शकता) , वेलची पावडर (ऑप्शनल), चिमुट भर मीठ.
कृती:-
एका जाड बुडाच्या भांड्यात डाळ शिजु शकेल ईतके म्हणजे डाळीच्या लेवलच्या ४ बोटं वर असे पाणी गरम करत ठेवल. पाण्याला उकळी आली की डाळ पाण्यात टाकली. मीठ टाका. परत एकदा सरसरुन उकळी आणुन गॅस बारीक करुन ठेवला. भांड्यावर तिरके झाकण टाकुन ठेवले. १०-१५ मि, नंतर पळीने डाळ चाचपुन बघितली. हातात फुटली की समजावे की डाळ शिजली आहे.

Photo0907.jpg

मग गॅस बंद करावा. ताट भांड्यावर झाकुन (वेळुन) पाणी एका भांड्यात काढुन ठेवा हे पाणी कटाच्या आमटीला लागते.

Photo0908.jpg

पाणी पूर्ण काढुन घ्यावे नाहीतर पुरण पातळ होते. आता डाळीच भांडं परत गॅसवर ठेवुन गुळ अ‍ॅड करा. गुळाचे पाणी सुटेल त्यात डाळ पूर्णपणे शिजुन जाईल. जरा मिश्रण हाटलुन घ्या. गॅस मोठा करुन गुळाचा रस आटु द्या..

Photo0909.jpg

तेलाच्या पोळीला जेवढे स्मुथ पुरण तेवढी पोळी सुकुमार होते. आईकडे पुरण दगडी पाट्यावर होते अजुनही. ईथेही पाटा आहे पण बाकी कामं असल्याने मी मिक्सरचा आधार घेतला( आणी ईथेच चुकलो.. मिक्सरवर काल माझे पुरण पाट्यायेवढे फाईन झालेले नाहीये त्यामुळे जरा मुड गेला माझा पुपोचा.. Sad )
तर मुद्दा काय की जेवढे फाईन पुरण तेवढे पुपो फाईन..

आता पुपोची कणीकः-
साहित्यः-
१ १/२ वा टी गव्हाचे पीठ, पाऊण वाटी मैदा, मीठ, पाणी.
कृती:-
मैदा, गव्हाचे पीठ चाळुन घेऊन मीठ टाका. थोडे थोडे पाणी टाकत कणीक मळुन घ्या. पण ही कणीक रेगुलर चपातीच्या कणीकीपेक्षा मऊ पाहिजे. गरज पडली तर तेलाचा हात घेऊन कणीक चरचरुन मळुन घ्या. नंतर पाणतुटी करुन घ्या. तयार कणीकेला तेलाचा १ चमचा घेऊन तेल मुरेपर्यंत मळा.

Photo0910.jpg

आता पुपोची तयारी.
१. पोळपाट -लाटणे कोरडे करुन तेल लावुन घ्या. पुर्ण पोळपाटाला तेल लावायचे आहे. आणी लाटण्याला सुद्दा..
२. तवा मागच्या साईडनी ठेवायचा आहे त्याला पण उपड्या बाजुन तेल लावुन घ्या.
तेलावर हात जरा जास्तच असावा.. Happy

पुरणपोळी कृती:-
१. हाताला तेल लावुन छोटासा कणीकेचा गोळा करुन घ्या. तो हातावरच पसरत पसरत म्हणजे कडेने पुरी येवढ्या आकारत करुन घ्या.
Photo0911.jpg

२. आता पुरणाचा छोटासा गोळा करुन लांबट आकाराचा , तो हळु हळु कणीकीच्या गोळ्यात भरायचा. हात फिरवत फिरवत मोदकासारखे साईडची कणीक वरतुन आणुन गोळा बंद कराय्चा.
Photo0912.jpgPhoto0913.jpg

३. आता दोन्ही हाताने हलकेसे दाबत गोळा चपटा करुन तेल लावलेल्या पोळपाटावर मध्यभागी तेलाची धार सोडुन गोळा हाताने थपथपा . ह्यामुळे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरते. तोंड बंद केलेली गोळ्याची बाजु खाली गेली पाहिजे.
Photo0914.jpg

४. तेल लावलेले लाटणे एका दिशेने फिरवत पोळी लाटा. पोळी लाटताना पोळपाट फिरवा. आणी काठात लाटा.
Photo0915.jpg

५. गोलाकार पोळी झाल्यावर लाटणे पोळीच्या समोरील कडेवर ठेवा. काटाने अलगद उचलुन पोळी लाटण्यावर रोल करा. हे लाटणे हळुवार फिरवत आतल्या साईडने पुर्ण पोळी लाटण्यावर घ्या. दुसरा काठ अधांतरीच ठेवा नाही तर पोळी तव्यावर सुटी करताना चिकटेल.
Photo0916.jpg

६. तवा चांगला तापला आहे याची खात्री करा पोळी असलेले लाटणं अलगद तव्यावर पोळी सोडली जाईल ह्या बेताने बाहेरच्या बाजुला फिरवत आणा.
Photo0917.jpg

७. पुपो टम टमीत पुरी सारखी फुगली की साईडला होल करुन हवा जाऊ द्यावी नाहीतर वाफ हातावर येते. पुपो भाजली की तव्यावरुन घसरायला लागते कधीकधी तेव्हा ही सुध्दा काळजी घ्या.
८. एक साईड भाजली की पोळी परतुन टाका. तेलाचा हलका-सा हात लावा. परत परता आणी चांगली भाजुन घ्या दोन्ही साईडनी.
९. आई खाली सुती कापड अंथरुन त्या वर पोळ्या निम्या एकावर एक रहतील अश्या टाकते. म्हणजे गरम पण राहतात पण चिकटत नाहीत.
हो परतायला मी स्टील्चे ऊलथंणे वापरलेय पण आई-आज्जी हातानेच उलथवतात. पुपो च्या कणीकेत बिब्बा टाकुन ठेवते आई-आज्जी. का माहित नाही.

पुरणपोळी बरोबर कटाची आमटी मस्ट.
Photo0918.jpg

गरम गरम पुपो, कटाची कट असलेली तिखट तिखट आमटी, बटाट्याची भाजी, कुरडई,, ,..... बस्स अजुन काय
पाहिजे. पप्पा पोळी गरम दुधाबरोबर खातात तसेही चांगले लागते. पण पुपो आमटीत बुड वुन खाली पुरण जाऊन बसते ती आम टी अहाहा.. Happy

तर मग या जेवायला.. Happy
Photo0919.jpgPhoto0920.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप कौशल्याचे काम आहे हे, पण तेवढीच चवदार लागते हि. मुंबईत एक गोल कापलेला पत्रा मिळतो, या पोळ्या लाटायला.

छान!

मी पहिलेली/खलेल्ली (लहानपणी हो..)तेलपोळी एकदम कुरकुरीत होती.

इतका तेलाचा मारा करून बनवायची पाहून .. गेले ते दिवस गेले म्हणायची वेळ आलीय.
लहान असताना तीन तीन खायची एकाच बैठकीत( विकतचीच आणायचो आम्ही).

मस्त मस्त मस्त मस्त मस्त. Happy
एक नंबरी काम केलसं.
कोल्हापुरात अशीच करतात म्हणजे कशी हे सांगायला तुझा धागा दाखवावा.

भारी.. खुप खुप धन्यवाद Happy

एकदा प्रयत्न केला होता पण लाटताना उलटायची नसते, अन लाटण्यावर घेउन उलट्या तव्यावर टाकायची असते हे माहित नसल्याने, नेहमीसारखीच लाटत होते.. चवीला बरी झालती, पण अर्धीच पोळी तव्यावर जाउ शकलेली Wink

ही पुपो लाटणं आणि उलट तव्यावर न करपता भाजणं दोन्ही कौशल्यच आहे..भिजवलेल्या कणकेला तेल्-पाण्याचा हात लावुन मळत गेले कि गोळ्याला लोच/खेच निर्माण होतो अन लाटताना पोळी पसरते.मऊसुत,तोंडात विरघळणारी पोळी बनवणे हे कौशल्याचे काम आहे.

मस्त! आमच्याकडेही अशीच तेलपोळी फक्त कणीक भिजवल्यावर तो गोळा पातेल्यात तेल घेउन त्यात बुडवून ठेवला जातो.त्यामुळे बटरपेपरवर किंवा दिनेशदांनी लिहिल्याप्रमाणे पत्र्यावर साबा लाटतात.

दिपु मीच विचारले होते Happy खुपच कौशल्याने बनवली आहे पु.पो.

पण मी विचारलेली पोळि खुपच खुसखुशित आणि कडक पापडासारखि आहे ती पाककृती कोणाला माहित असल्यास सांगावी. Happy

मस्त दिसताहेत. प्रचि छानच आहेत. Happy

फक्त आमच्याकडे मैद्याच्या पुपो व्हायच्या. मैदा भिजवल्यावरही तो तेलात ठेवायचा. मात्र आता कणकेच्याच करणे तब्येतीला योग्य असं वाटतं.

मुंबईत एक गोल कापलेला पत्रा मिळतो, या पोळ्या लाटायला. >>> येस्स. आमच्याकडे आईनं तो पातळ पत्रा आणला होता. पुपोकरता एक वेगळं अगदी बारकुडं पण लांब असं लाटणंही होतं आणि एक पुपो स्पेशल मोठ्ठा सपाट तवा होता. आई एकावेळी दीड्-दोन किलोच्या पुपो सपासपा करायची. एकदम पातळ पुपो. त्या ठेवायला एक चपटा, मोठा, गोल स्पेशल डबाही आणला होता. अत्यंत कुशलतेने तेलपोळ्या कराव्या लागतात. पण तोंडात टाकल्या की अक्षरशः विरघळतात. या नारळाच्या दुधाबरोबर खायच्या.

दादरला रानडे रोडच्या तोंडाशी असलेल्या छोट्या स्वामी समर्थमधल्या तेलपोळ्या अतिशय छान असतात.

पुरण करण्याकरता डाळ भिजत घालून सरळ कुकरातून छानशी शिजवून घ्यायची. मग गुळ वगैरे घालून पुढील सोपस्कार करायचे.

जबहराट!!! एकदा या प्रकारची पुपो खायची आहे!

मामी, दादरला रानडे रोडच्या तोंडाशी असलेल्या छोट्या स्वामी समर्थमधल्या तेलपोळ्या अतिशय छान असतात.>>>>> नोंद घेतली आहे! धन्यवाद!

या प्रकारची पुरणपोळी कधी बघितली वा खाल्ली नाहीये. पुढच्या देशवारीत मामीने सुचवलेल्या दादरच्या स्वामी समर्थांकडे चक्कर मारण्यात येईल.

ओये होये दिपु, कसल्या भारी पुरणपोळ्या आहेत तेलावरच्या. आमच्याकडे तेलावरच्या नाही करत.

ग्रेट दिपे काय डिटेलिंग आहे. मी उशीरा बघितली ही रेसिपी. तुला ___/\___.

मस्तच आहे रेसिपी.
ताट, वाटी, पाट आणि आमटी पोळी भात. भारीये.
वाढताना भोजनभाऊंच्या बाजूला समया लावण्याची पद्धत आहे का ?

करणार आहे. पाटा वरवंटा आणि पुरणयंत्र दोन्ही नाहीए. प्रितीचा मिक्सर आहे आणि न्युट्रीबुलेट आहे. त्यात वाटेन म्हणते. तेलपोळी आवडते प्रचंड म्हणुन घाट घालायचा विचार आहे.