चाळीशीतली वाटचाल - सार्वजनिक धागा

Submitted by मामी on 6 December, 2012 - 22:14

'संयुक्ता'ने माहिती संकलन, विचारमंथन आणि समाजसेवा हे तीन उद्देश समोर ठेवून आजवर धागे प्रकाशित केले आहेत. 'संयुक्ता'मध्ये चर्चेस घेतले जाणारे विषय सर्वंकश असावेत हे पथ्य संयुक्ता व्यवस्थापन तसेच संयुक्ता सदस्य कटाक्षाने पाळत आल्या आहेत. ह्यातले अनेक विषय केवळ स्त्रियांपुरते मर्यादित नसतात किंवा 'संयुक्ता'पुरते ठेवल्याने केवळ एकच बाजू समोर येते असे लक्षात आल्याने काही धागे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता उदा: प्रोफेशनल नेटवर्किंग. 'चाळिशीतली वाटचाल' हा असाच एक विषय जो स्त्री-पुरुष दोघांनाही समसमान महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा. ह्याच कारणासाठी हा धागा सार्वजनिक आहे. धागा 'संयुक्ता'तर्फे काढण्यात आला म्हणून 'संयुक्ता' ग्रूपमध्ये आहे.

***************************************************

आपली मायबोली ऐन षोडशा असली तरी बहुसंख्य मायबोलीकर आता चाळीशीत पदार्पण करते झालेले आहेत. विशीतली धडपड आणि तिशीतली गडबड मागे पडून चाळीशीचा प्रवास सुरू झाला आहे. आताच्या जमान्यात चाळीशी म्हणजे काही 'वय' झालं नाही हे नक्कीच. करियरमध्ये, धंद्यामध्ये, जीवनात अजूनही कितीतरी मोठ्या भरार्‍या घेण्याची हिंमत आहेच. पण तरीही कुठेतरी काहीतरी बदलतंय हे जाणवतंय. होय ना?

वयाच्या या टप्प्यात अनेकानेक बदल होत असतात. शारीरिक, मानसिक, परिस्थितीजन्य...

स्त्रीच्या शरीरात होणारे बदल अगदी ठळक असतात. रजोनिवृत्ती, त्यामुळे होणारे हार्मोनल चेंजेस आणि निसर्गानं बहाल केलेलं हे कवचकुंडल गळून गेल्यानं काही रोगांना शरीरात मिळणारा सहज प्रवेश. तर पुरुषांचे इतके ठळक नाही पण तरीही जाणवण्याइतपत होणारे शारीरिक बदल. यांचा स्त्रीपुरुषांच्या सहजीवनावर होणारा परिणामही महत्त्वाचा ठरतो.

सर्वसाधारणपणे या वयात स्त्रीपुरुष आपापल्या नोकरी-धंदा-संसारात स्थिर झालेले असतात. भौतिक सुखाची समीकरणं, आपापल्या चौकटीत का होईना, जुळवली गेलेली असतात.

पण तरीही समीकरणातले इतर घटक बदलू लागलेले असतात. मुलांची वयं वाढून त्यांची उच्च शिक्षणं सुरू होतात. त्याकरता पैश्यांची तजवीज करावी लागते. मुलं परदेशात रहायला जातात, बाहेरगावी नोकरीनिमित्त जाऊन राहतात. घर मोकळं होतं. 'एम्टी नेस्ट सिंड्रोम'च्या अनुभवाची ओळख होते.

आईवडिल एव्हाना वयस्क झालेले असतात. त्यांच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांचे फोन नंबर्स मोबाईलमध्ये जमायला लागतात. अनायसे आपल्याकरताही हा डेटाबेस तयार होत आहे याची कुठेतरी नोंद घेतली जाते आणि मग नियमित आरोग्य तपासणी करण्याकडे कटाक्ष ठेवला जातो.

आईवडील वेगळे राहत असतील तरीही आता त्यांच्या ढासळत्या तब्येतीमुळे, आजारपणामुळे आलेल्या परावलंबित्वामुळे किंवा एक जोडीदार गेल्याने मागे उरलेल्या पालकांना आधार देण्याकरता अनेकदा त्यांना आपल्या घरी आणले जाते. या वाढीव जबाबदारीकरता घरातल्या व्यवस्थेची नव्याने बांधणी करावी लागते.

मानसिक दृष्ट्याही हा काळ तसा नाजूकच. स्त्रीची रजोनिवृत्ती जवळ आलेली असते आणि त्या बदलाचे पडसाद मनाच्या माध्यमातून वागण्यात उमटतात. घरातून निघून गेलेल्या मुलांच्या अवास्तव काळज्या करणं, कारण नसताना हळवं होणं, आपल्या ओसरत चाललेल्या सौंदर्यखुणांची खंत करणं, जोडीदाराला आपल्यात इंटरेस्ट राहिला नाहीये का अशा शंका मनात डोकावणं, निसटून चाललेलं तारुण्य पकडून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणं असं काहीबाही घडत राहतं. हे चुकीचं वागणं आहे हे कळूनही वळत नाही. 'लाथ मारेन तिथं पाणी काढेन' ही वृत्तीही हळूहळू बदलायला लागलेली असते.

दुसर्‍या दृष्टीने विचार केला तर मुलांच्या जबाबदार्‍या कमी झाल्याने जोडीदारांना एकमेकांकरता पुन्हा वेळ मिळतो, एकत्र काही छंद जोपासणे, प्रवास करणे, गाण्याच्या मैफिली मनमुराद ऐकणे, काही सामाजिक उपक्रम हाती घेणे, नवनविन समवयस्क आणि समविचारी मित्रमैत्रिणी जमवून धमाल करणे या करता पैसा आणि वेळ गाठीशी असतो. त्यामुळे जीवन समृध्द करण्याच्या अनेक संधी असतात.

हल्ली चाळीशीचा फारसा बागुलबुवा केला जात नाही. जे बदल अपरिहार्य आहेत ते सहजपणे स्वीकारून जीवनाचा आनंद घेण्याची ही संधी आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन वावरणारे आपल्या मायबोलीकरांमध्ये पण अनेक असतील. तर हा धागा आहे आपले अनुभव शेअर करण्याकरता, काही प्रश्न असतील, शंका असतील त्या मांडण्याकरता.

****************************************************
तळटीप : या लेखात व प्रतिसादात दिलेल्या माहितीची अधिकृत शहानिशा करून मगच त्यानुसार कार्यवाही करावी. या लेखाचा उद्देश केवळ अनुभव व माहितीची देवाण-घेवाण एवढाच असून काही वैद्यकीय उपचार असतील तर ते आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करावेत.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा ........

<<<<<<< जग काय म्हणेल ( लोक काय म्हणतील ) याची पर्वा वाटेनाशी झालीय. >>>

१००००% अनुमोदन !!

उत्तम धागा, मामी.

शरीरस्वास्थ्य, मनोस्वास्थ्य आणि स्वतःसाठी वेळ देणे या महत्त्वाच्या गोष्टी वर नमूद झाल्या आहेतच! या शिवाय आपण आपले सोशल सर्कल वाढविणे, छोट्या-मोठ्या समाज-कार्यात जसे जमेल तसे योगदान देणे, वेगवेगळे छंद जोपासणे (ज्यांसाठी अगोदर वेळ मिळत नव्हता!), नवीन काही शिकणे, जुन्या मित्रमंडळींशी पुन्हा संपर्क वाढविणे - जोपासणे असे अनेक मार्ग आहेत, ज्यांतून शरीराला व मनाला उभारी येण्यास मदत होते.

ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर राहात असाल/ नसाल तरी त्यांची सर्व कागदपत्रे, विमे, व्यवहार अद्ययावत आहेत ना, त्यांचे शरीरस्वास्थ्य-मनोस्वास्थ्य ठीक आहे ना, तपासण्या-उपचार-व्यायाम-पथ्य-आहार सुरळीत चालू आहेत ना, त्यांची शरीरक्षमता कमी झाल्याचे गृहित धरून त्यानुसार उपाययोजना हेही सर्व या वयात बघावे लागते. आणि त्यांची काळजी घेताना व करताना स्वतःकडे दुर्लक्ष करूनही उपयोग नाही हे पुन्हापुन्हा लक्षात ठेवून त्यानुसार वागावे लागते. Happy

मामी छान धागा

इब्लिस, साती, दिनेशदा चांगालं लिहिलयत.

प्रचण्ड भिती वाटत असते. कशाची भिती वाटते तेही समजत नसते. >>>मलावाटत शारिरीक क्षमता कमी होत असताना डेटुडे कटकटी इतक्या इतक्या वाढत असतात की त्यात नवी भर नको म्हणून कुठली नवी अ‍ॅक्टिव्हीटी करायची भिती वाटत असावी.

काहीच नवे करण्यासारखे शिल्लक नाही असे वाटू लागते. >>> हे कशाने होत असावे?

धागा संयुक्तामधे आहे याकडे अत्ता लक्ष गेले, मग उमजलं की वर "हा धागा सार्वजनिक" अशी टॉप-टीप का दिली आहे ते. पण संयुक्तामधे धागा का निघाला ते समजले नाही.

>>म्हणजेच ती मानवाच्या अस्तित्वापासून समोर असलेली मृत्यूची भिती ?<<
दिनेशदा,
तीही भिती कित्येकांना वाटते. रात्र रात्र जागे रहातात लोक त्या भितीपोटी.

>>पण दूकानदार आंटी म्हणत्तात हा अनुभव <<
आपनही त्यांना अंकल म्हणून टाकावे Wink

****
मिडलाईफ क्रायसिस बद्दल अधिक नंतर.. सध्या इतकेच, की हे लिंगनिरपेक्ष आहे, व पुरुषांमध्ये जास्त प्रखरतेने जाणवते. स्त्रीयांतला याचा बराचसा भाग मेनोपॉजल सिंड्रोमच्या नावाखाली दडपला जातो.

सुधीर, यात पण व्यक्तीगणीक दृष्टीकोन असावा. काहीजणांना रुटीनमधेच रहायला आवडतं. रोज तेच करतोय याचे काही वाटत नाही. उलट शरीराला आणि मनालाही त्याची सवय होऊन जाते. पण ज्यांना रुटीनचा कंटाळा येतो, त्यांना मात्र ते अवघड जाते. बदल तर हवा आहे, पण तो कसला ते कळत नाही. कळला तर वेगळी वाट शोधायची तयारी नसते ( यालाच भिती म्हणायचे का ? )

आपल्या आधीचा पिढीत ३०/४० वर्षे एकाच कंपनीत, एकाच जागी काम केलेली माणसे दिसतात. हे असेच चालायचे. हे त्यांचे ब्रीद होते. अर्थात त्यात वाईट असे काही नाही. पण मन जर बंड करत असेल, तर मात्र मनाला
साथ द्यावीच. आपण यशस्वी होऊ शकतो का ? याचा ताण (भिती) घेण्यापेक्षा. मला हे करायचे होते, म्हणून करतोय / करतेय असा दृष्टीकोन ठेवला तर सोपे जाते.

मला तर हे करुन बघितले नाही, याचा जास्त ताण येईल.

हो ना इब्लिस. सगळे धर्म हि भिती घालवायचा प्रयत्न करतात. कुणी म्हणतं जीर्ण वस्त्र फेकायचं तर कुणी म्हणतं अंतिम न्यायनिवाडा होणार आहे. पण भिती जात नाही हेच खरं !

ज्ञानेश्वर माऊली / स्वा. सावरकर / सानेगुरुजी अशी काही मोजकीच नावे आठवताहेत. ज्यांना हि भिती वाटली नाही. आत्महत्येला मात्र मी यात धरणार नाही.

मानवाच्या अस्तित्वापासून समोर असलेली मृत्यूची भिती>>>>>>>>>मृत्यू म्हणजे फक्त आयुष्याचा शेवट नाही, कुठल्याही गोष्टीच्या संपण्याला, शेवटाला आपण मृत्यू म्हणू शकतो. आणि त्याबद्दलची अनिश्चितताच चिंतेचे, भयाचे कारण असू शकते. हे भय कुठल्याही वयात असतेच, चाळीशीच असे नाही, फक्त त्याबद्दल विचार करण्यासाठीचा वेळ आणि मन:स्थिती चाळीशीत जास्त मिळत असावी.

पण ज्यांना रुटीनचा कंटाळा येतो, त्यांना मात्र ते अवघड जाते. बदल तर हवा आहे, पण तो कसला ते कळत नाही. कळला तर वेगळी वाट शोधायची तयारी नसते ( यालाच भिती म्हणायचे का ? )>>> असेच होत असेल दिनेशदा.

बरोबर मंजिरी.. मला संख्याशास्त्रातला घंटेच्या आकारातला (बेल शेप्ड ) नॉर्मल कर्व्ह आठवला. एकदा उच्च स्थानी आल्यावर पुढे तीव्र उतारच असल्याची भावना. तोपर्यंत एक ध्येय समोर असते. तिथे पोहोचले कि पुढे काय ? हा विचार येत असेल का ?
त्यापेक्षा ध्येय आणखी वर नेऊन ठेवायचे Happy

आभार नंदिनी.

बबौ, तेच स्वीकारणं कठीण जातं ना ? पहिला चष्मा, पहिला पांढरा केस, पहिला रक्तदाब तपास, पहिली साखर तपासणी, पहिला ई. सी. जी. कुठेतरी हुरहुर लावतंच ना ?

अर्थात या काही शक्यता. आपण भिती का आणि कसली वाटत असावी त्याचा विचार करतोय.

नोप, काही कठीण जात नाही. कठीण जात असेल तर स्वतःत बदल घडवण्याची नितांत गरज आहे. चाळिशी गाठायच्या आत वरचं सगळं करुन झालय.

भीती बहुदा प्रचंड वेगाने बदलत चालेल्या आजूबाजूच्या परिस्थितीची आणि मुख्य म्हणजे ह्या बदलत किंवा प्रवाहात आपण कुठे उभे आहोत आणि आपल्याला हा बदल पचवता येणार का ह्याची असावी. सर्वसाधारणपणे एकतर आई वडील म्हातारे झालेले असतात त्यांची जबाबदारी आणि मुले मोठी होत असतात त्यांची वेगळीच जबाबदारी. शिवाय ऑफिस मधील कटकटी त्या वेगळ्याच.

चैतन्य, हे माझ्या बाबतीत खरे आहे. तांत्रिक बदल खुपच वेगात होताहेत, याचा ताण काही काळ मी अनुभवला.
पण संवाद साधणे मह्त्वाचे कि लेटेस्ट सेल फोन हाताळता येणे, असा विचार केल्यावर, मन ताळ्यावर आले.

माझ्याबाबतीत तांत्रिक बदलाने नव्हे पण आर्थिक प्रश्नांनी आणि मुख्य म्हणजे ढासळलेली नैसर्गिक परिस्थिती. हल्ली पुण्यात गेलो की नको नको होते. १० वर्षांपूर्वी पुणे सोडले तेंव्हा फार विचित्र मनस्थिती होती. हैदराबादला उत्तम कंपनी मिळाली पण पुणे सोडायला जीवावर आले होते. हैद्राबाद आवडले. शांत वाटले पुण्यासाराखेच एक उकाडा सोडला तर बाकी उत्तम मानवले. आता २-३ वर्षांनी पुण्यात गेल्यावर इतका फरक वाटला की विश्वासच बसेना हेच का ते पुणे. इतकी गर्दी की काय सांगावे. शिवाय जुन्या खुणा पण पुसत चालल्या आहेत. त्याचा जास्त ताण येतो. परवाच महाराष्ट्र मंडळाचे रमेश दामले गेल्याची बातमी वाचली आणि २-३ दिवस फारच दुखत गेले. सगळ १५ वर्षे मंडळात न चुकता गेलो आता चर्चा अशी आहे की कदाचित ते मैदानच बिल्डरच्या घशात जाईल सगळे नाहीतरी मागची बाजू नक्कीच जाईल. काही वर्षांपूर्वी तिथली जिम बंद पडली. दरवर्षी दसऱ्याला तिकडे १००० जोर मारायचा विडा असायचा. मंडळाची तालीम आणि जिम ह्यांची जाम जुगलबंदी चालायची. माझ्या मित्राचा काका वयाच्या ६५व्या वर्षी न चुकता सकाळी ५ला जात असे. त्याचा एक १०-१५ लोकांचा कंपू होता. सगळे म्हातारे अगदी तरुणाला लाजवतील अश्या जोमाने १००-२०० जोर हाणायचे. मुख्य म्हणजे हा जो वारसा आहे ना तो लुप्त होतो आहे ह्याची मला जास्त भीती म्हणा किंवा वाईट वाटते म्हना ह्यामुळे प्रचंड अस्वस्थता येते. खूप सध्या सध्या गोष्टी मुकतो आहोत. म्हणजे टिळक रोडला सहज चालणे पण अवघड झाले आहे. माझे सख्खे काका आता ८९ वर्षांचे आहेत. गेले १५ वर्ष ते कुरकुरत असता की आता चालणे एकदम कठीण झाले आहे. असो. हे बदल होताच राहणार पण मन ह्या बदलांना सारवण्यासाठी काही वेळेला तयारच होत नाही.

सुन्दर आणि अत्यंत समर्पक धागा.....४० आले हे कळे पर्यन्त ४४ झाले.....पण मन अजुन बर्याच बाबतीत teen ager सारखे वागते...विचार करते.....चांगलं का वाईट ते नाही माहित्....पण अजुन 'तो' feel नाही आला......

छान धागा मामी.

विशीतून तिशीत आल्यावर जेवढे वाईट वाटले तेवढे वाईट तिशीतून चाळीशीत येताना नाही वाटले मात्र. मला पुन्हा तरुण व्हायला आवडेल का? तर अजिबात नाही. ...केवढ्या त्या जबाबदार्‍या होत्या त्या तेव्हा...कश्या पार पाडल्या आपण ह्याचेही आता कौतुकच वाटते. आता नाही बाई जमणार एवढे सगळे करायला असेच वाटते...लहान मुलांना वाढवताना त्यांची ने-आण करणे, शाळा, अभ्यास, व्यायाम, आरोग्य् ह्या सगळ्याचा ताण फार जास्त असतो पालकांवर. मुले मुली तरुण होतात तेव्हा ते स्वावलंबी होतात आणी आपली कामे/जबाबदार्‍याही पहिल्यापेक्षा कमी होतात ..त्यांच्याबरोबरच्या सहजीवनात आपणही मनाने तरुण होतो.... त्यामुळे मला तिशीपेक्षा चाळीशी आवडते आहे :)...एक नोकरीखेरीज, (तीही माझ्या आनंदाची आहे) बांधलेली बाकी कामे आता नाहीत ह्याचा मला तर दररोज आनंद होतो...

अनिल अवचटांची एक मस्त मस्त उतार अशी कविता छान आहे ह्या विषयावर.

>>>>>> मला वाटतं आपण भिती नेमकी कशाची वाटतेय, त्याचा शोध घेतला तर !
मुलांच्या ( बाहेरील जगातील) सुरक्षिततेबाबत काळजी वाटतेय का ? किंवा एवढी आकर्षणे असताना, ते काहितरी वेडा निर्णय घेतील. याची भिती वाटते का ? (मला लेकीबद्दल तसे वाटते.)
का स्वतःच्याच तब्येतीबाबत वाटतय ? खुप काही करायचे होते आणि करायचे राहून गेले, वेळ थोडा आहे. याची खंत ? <<<<<
"आमच्यात" एकच सनातन भिती वास करुन अस्ते, ती म्हणजे म्हातारपणी यदाकदाचित आर्थिकदृष्ट्या परावलम्बी झालो तर पोरे/सुना विचारणार तर नाहीतच, उलट उचलुन वृद्धाश्रमात नेऊन टाकतील वा खायचेप्यायचेल्यायचे हाल हाल करतील. अगदी आमचा "नटसम्राट बेलवलकर" करतील. डॉ.लागून्नी त्यांच्या डुगडुगत्या मानेच्या अभिनयाच्या जोरावर ही भिती अधीकच पक्की करून ठेवली आहे. Proud सबब मी सध्या एकाच भितीमधे आहे, ते म्हणजे आता निदान म्हातारपणाकरतातरी पैशाची बेगमी व्हावी. पैसा नसला तरी किमान डोक्यावर छ्प्पर हवे. बाकी आमचे आम्ही बघुन घेऊ.

>>>>> म्हणजेच ती मानवाच्या अस्तित्वापासून समोर असलेली मृत्यूची भिती ?<<<<<
मृत्युची भिती बाळगण्यात अर्थ नसतो हे केव्हाच कळलय, कित्येक अकाली/अपघाती तर कित्येक पिकलेले मृत्यु बघितल्यावर मृत्यु केव्हाही कसाही न सान्गता येऊ शकतो याची खात्री आहे, अन भिती म्हणण्यापेक्षा काळजी असलीच, तर अकाली मृत्युमुळे उर्वरितांवर "आर्थिकदृष्ट्या" काही संकट येऊ नये, अन अशावेळी काय करायचे याचे ज्ञान/समययोचितता त्यांचेकडे असावे.
तरीही, मृत्यु शांतपणे अन्थरुणावर झोपेत यावा असे कितीही वाटत असले तरी अन्थरुणाला महिनोन्महिने खिळून रहायची वेळ न येवो, तसेच चूकूनही हॉस्पिटल वगैरे मधे दाखल व्हायला लागू नये इतकीच अपेक्षा.
करण्यासारखे इतके काही शिल्लक आहे, वा आत्ता आत्ताच समजु लागलय की हे हे करण्यासारखे होते/आहे, ते इतके आहे की अजुन चारपाच सलग जन्म पुरणार नाहित. सबब, मी तो विचार करणे सोडून वर्तमानात जगू पहातोय.
मृत्युची भिती दोन प्रकारात असते, एक म्हणजे मृत्यू कशा प्रकारे येतो याची भिती, दुसरे म्हणजे तो केव्हा येणारे अन आल्यावर माझ्यावर अवलम्बुन असलेल्या बाकीच्यान्चे काय होणारे. दोन्ही बाबी पराधीन असल्याने त्यावर जास्त विचार न करता, मृत्यू गृहितच समजुन बाकीच्यान्च्याकरताच्या उपाययोजना करणे इतकेच हाती आहे.
अर्थात, मी काय अगदीच मृत्युपश्चात समाधीवगैरे करता कोणता "ताजमहाल" रजपुत राजाकडुन हिसकावुन घेणार नाही Proud वा कोणी माझी समाधी /चिरा/पणती वगैरे करणार नाही, तेवढी शामत नाही माझी. Wink तर या क्षणी माझ्या मृत्युबाबत "जे न देखले रवि" ते "कविमनाने" बघत बसण्याचा अव्यापारेषू उपद्व्याप सान्गितलाय कोणी?
(त्यापेक्षा आता क्यान्टिनला जाऊन भरपेट गिळावे हे उत्तम.)

आपण आता चाळीशीत पाय ठेवतोय याची जाणिव पहिल्यांदा जेव्हा झाली तेव्हा मी खुप अस्वस्थ झाले होते. काहीतरी हातातून निसटुन चाललेय असे वाटायला लागले होते.....

पण आता सवय झालीय.. Happy वर केदारने लिहिल्याप्रमाणे चाळीशीत एम्टी नेस्ट वगैरे आता होत नाही. माझी मुलगी आता १२वीत आहे, ती घरटे सोडून जाईतो मी पन्नाशीही पार केली असेन.

तिशीत असताना रिटायर झाल्यावर रोजीरोटीचे पुढे काय याची धास्ती वाटायची. आता हळूहळू 'आज दिवस तुमचा समजा' वर विश्वास वाढायला लागला... Happy नंतर काय हा प्रश्न आहेच पण उगीच त्या भानगडीत आजचा दिवस वाया घालवायला जीवावर येतेय आता. वेळ अतिशय वेगाने पुढे चाललाय आणि एकेक मिनीटही वाया घालवणे म्हणजे आयुष्यातले एकेक मिनिट संपवणे होय असे आता वाटायला लागलेय.

याबरोबरच माझा व्यायाम आणि संतुलीत आहारावरचा विश्वास वाढायला लागलाय. आज जर हे संभाळले तर उद्या पन्नाशी-साठीही आरामात जाईल याची खात्री वाटतेय, किंबहुना ती तशी आरामात इतर कोणाला त्रास न देता जावी याचसाठी आज कष्ट घ्यायला सुरवात केलीय. आणि ही काळजी जर घेतली तर मग ढलत्या तारुण्याची जास्त फिकर करायला नको... वय वाढेल पण ते शरीरावर आणि चेह-यावर दिसणार नाही Happy

मला मृत्युची भिती मला वाटत नाही असे मी आरामात म्हणेन पण जोपर्यंत तो समोर ठाकत नाही तोवरच.
जबाबदा-या संपेपर्यंत तरी तो नको असे आज वाटतेय. अर्थात माझ्या जबाबदा-या काय आहेत हेही मी नीट आखुन घेतलेय. नाहीतर मग त्या कधीच संपणार नाहीत.

वाचतोय.
कोणीतरी नमस्कार करण्यासाठी माझ्यापुढे वाकल्यावर बसलेला धक्का अजून लक्षात आहे . Happy

@ इब्लिस,
धागा संयुक्तामधे आहे याकडे अत्ता लक्ष गेले, मग उमजलं की वर "हा धागा सार्वजनिक" अशी टॉप-टीप का दिली आहे ते. पण संयुक्तामधे धागा का निघाला ते समजले नाही.

>>>>>>>>>>
'संयुक्ता'ने माहिती संकलन, विचारमंथन आणि समाजसेवा हे तीन उद्देश समोर ठेवून आजवर धागे प्रकाशित केले आहेत. 'संयुक्ता'मध्ये चर्चेस घेतले जाणारे विषय सर्वंकश असावेत हे पथ्य संयुक्ता व्यवस्थापन तसेच संयुक्ता सदस्य कटाक्षाने पाळत आल्या आहेत. ह्यातले अनेक विषय केवळ स्त्रियांपुरते मर्यादित नसतात किंवा 'संयुक्ता'पुरते ठेवल्याने केवळ एकच बाजू समोर येते असे लक्षात आल्याने काही धागे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता उदा: प्रोफेशनल नेटवर्किंग. 'चाळिशीतली वाटचाल' हा असाच एक विषय जो स्त्री-पुरुष दोघांनाही समसमान महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा. ह्याच कारणासाठी हा धागा सार्वजनिक आहे. धागा 'संयुक्ता'तर्फे काढण्यात आला म्हणून 'संयुक्ता' ग्रूपमध्ये आहे.

त्यामुळे धागा माझ्या आयडीने काढला असला तरी तो संयुक्तातर्फे काढण्यात आला आहे.

छान चर्चा वाचते आहे. साती,इब्लिस,दिनेशदाशी सहमत! माझा अनुभव - मला वाटणारी भिती मृत्युची नाही पण म्हातारपणाची नक्कीच वाटते, आपलं कुणाला काहीही करावं लागू नये ह्यासाठी तब्येतीची काळजी घेणे हे वरच्या क्रमांकावर आपोआप आलं कारण इतर जबाबदार्‍या कमी झाल्या. हे करत होते. तुम्हारे एज का तो पताही नही चलता.. वैगेरे कॉमेंट्स मिळतं त्यामुळे जरा कॉलर ताठ व छाती गर्वाने फुलायची पण..... अचानक मानेचा स्पॉडिलायटीस झाला. धक्का पचवणं/स्वीकरणं जड गेलं. तसा काही भयंकर आजार नाही पण 'मला' हे झालंच कसं? आलेली बंधनं पचवणं जडच गेलं. परत ती उभारी आली पण यायला वेळ लागला.
आता ३५-४० तल्या मुली/बायकांची नोकरी-घरातली कामं- मुलांना शाळा,क्लासला घेऊन जाण्याची धावपळ बघितली की वाटतं कश्या काय करतात बॉ हे सगळं, एकेकाळी आपणही केलंय ह्याचं आश्चर्य वाटतं.
एक महत्वाचा मुद्दा बहुतेक चर्चिला जात नाही बर्‍याचजणींच्या बाबतीत घडत असेल मेनॉपॉजचा काळ अन सुनं घरात येणं ह्या गोष्टी एकाच वेळेस घडणं. आपला मुलगा आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना? अनेक असुरक्षितेच्या भितींबरोबर ही एक मोठी भिती असते. आज दैनंदिन जीवनात अनेक बदलांना सामोरं जावं लागतं त्या स्वीकारणं एक मोठं संकट वाटतं त्यातल्या काही टाळता येण्यासारख्या त्या टाळण्याकडे कल असतो त्यात घरात येणार्‍या नविन सुनेमुळे होणारे बदल स्वीकारण्याची भीती/दडपण वाटणं. हे दडपण बहुतेक दोघींनाही हे येत असावं. आणि हाच तो काळ असतो दोघींचे एकमेकींशी नाते संबंध जुळण्याचा.
प्रत्येकजण पुढच्या आयुष्यासाठी आर्थिक नियोजन करतच असतो त्यामुळे ती भीती कमी करता येते पण त्याचबरोबर आपल्या वेळेच्या नियोजनाचाही विचार नक्कीच करुन ठेवला पाहिजे.
अजून बरंच लिहायच आहे सावकाश लिहिन.

मामी, खुलाशाबद्दल धन्यवाद.

चाळीशी पार करताना, केल्यानंतर कायकाय होते, काय भावना मनात येतात, आयुष्यात वेगळे काय घडते याचे अधिक-उणे अनुभव येऊ द्यात की लोकहो. ते आले की मग प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची चर्चा सुरू करु.

अन प्रतिसाद लिहिताना आपण ४०+ की - ते पण उल्लेख केलात तर बरे..

मी चाळीशीत नाही. जर चाळिशी म्हणजे ४० +_५ म्हटलं तर. Happy
पण माझे ७०% पेशंट चाळिशीचे असतात. त्यांच्या फिजीकल आणि मेंटल वेलबिईंगसाठी निर्माण होणारे प्रश्न हाताळायची यामुळे चांगलीच 'प्रॅक्टिस' आहे.

वर कुठेतरी अनिल अवचटांच्या कवितेचा उल्लेख वाचला. ती माझीही आवडती कविता आहे. त्यामुळे माझ्याकडून या धाग्यावर एवढेच काँण्ट्री, चालवून घ्या Happy

उतार

आता उतार सुरू
कित्ती छान!
चढणं ही भानगड नाही
कुठलंच शिखर जिंकायचं नाही
आता नुसता उतार
समोर झाडीने गच्च भरलेलं दृश्य
दरीतून अंगावर येणारा आल्हाददायक वारा
कधी धुकं तर कधी ढगही!
टेकावं वाटलं तर टेकावं,
एखाद्या दगडावर बसलेल्या छोट्याशा पक्ष्याशी
त्याच्या सुरार्त सूर मिसळून गप्पा माराव्यात
अरे, हे सगळं इथेच होतं?
मग चढताना का नाही दिसलं?
पण असू दे
आता तर दिसतंय ना?
मजेत बघत उतरू हळूहळू
हा मस्त मस्त उतार

- अनिल अवचट

Pages