स्वाभिमानाचे नव-किरण

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 26 January, 2012 - 02:11

स्थळ : पुण्यातील सुप्रसिद्ध बी. एम. सी. सी. कॉलेजचे टाटा सभागृह. सकाळची वेळ. खच्चून भरलेल्या सभागृहातील तरुण विद्यार्थिनींमध्ये उत्सुकता, कुतूहल व कार्यक्रम सुरू होण्याअगोदरची अस्वस्थ चुळबूळ. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होते. पांढरे टी-शर्ट व निळ्या जीन्स या वेशातील तरतरीत कॉलेज कन्या मायक्रोफोनचा व मंचाचा ताबा घेतात. समोरील श्वेतपटावर सरकणार्‍या अतिशय नाजूक व संवेदनशील विषयावर आधारित चित्रांसोबत दिल्या जाणार्‍या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच सभागृहातील अस्वस्थ चुळबूळ थांबते व सार्‍या श्रोत्या तरुणी - स्त्रिया बघता बघता कार्यक्रमाच्या विषयात समरस होऊन जातात...

प्रोजेक्ट स्वाभिमान.... कोवळ्या वयाच्या मुली-स्त्रियांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराबद्दल उघडलेली एक सार्थ मोहीम! घराबाहेर सदोदित असुरक्षिततेच्या छायेत वावरणार्‍या स्त्रियांना सतर्क व समर्थ करण्याच्या हेतूने उचललेले एक सशक्त पाऊल!

गर्दीतील जाणून-बुजून केलेली धक्काबुक्की, किळसवाणे स्पर्श, नको असताना केलेली लगट, रस्त्यातील छेडछाड, ताकदीचा वापर करून केलेली बळजबरी.... भारतातील लाखो स्त्रिया अशा प्रकारच्या गैरवर्तणुकीला सहन करत असतात. रोजच्या आयुष्यातील संघर्षाखेरीज हा अतिरिक्त संघर्ष, त्यातून येणारी अस्वस्थता, असुरक्षितता, भीती, घालमेल या सार्‍या प्रकारांतून जात असतात. घराबाहेर ठेवलेले पाऊल त्यांना समाजात दबून राहण्यात, संकोच-लाज-भीती यांच्या अवगुंठनाखाली जगण्यास भाग तर पाडत नाही ना, अशी स्थिती अनेकदा निर्माण होते. लैंगिक शोषण व अत्याचार ही फक्त स्त्रीच्या आयुष्यालाच नव्हे तर पूर्ण समाजाला लागलेली कीड आहे आणि तिचा नि:पात हा व्हायलाच हवा!

शाळा - कॉलेजांतील, खास करून १३ ते २५ वयोगटांतील मुलींना लैंगिक अत्याचार व शोषणाबद्दल जागरूक करणे, त्यांच्यात या विषयाबद्दल जागृती घडवून आणणे, त्यांना बोलते करणे व कोणत्याही लैंगिक स्वरूपाच्या अत्याचाराला बळी न पडण्याविषयी स्त्रियांना मार्गदर्शन या हेतूने 'सनशाईन - ए रे ऑफ होप' (SSROH) या एनजीओ ने महाराष्ट्रात १२ जून २०११ रोजी प्रोजेक्ट 'स्वाभिमान'चा शुभारंभ केला. या प्रकल्पांतर्गत बायका-मुलींना अशा व इतर प्रकारच्या गुन्ह्यांचा विरोध करून समाजात सन्मानाने, मोकळेपणाने व वैभवसंपन्न व्यक्तिमत्वाने जगण्यास उद्युक्त करणे या हेतूनेच प्रोजेक्ट स्वाभिमानची मुहूर्तमेढ रोवली गेली.

शाळा-महाविद्यालयांखेरीज ऑफिसेस-कचेर्‍या व घराच्या चार भिंतींच्या आड मुली-स्त्रियांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराला अटकाव करण्यासाठी संस्थेने उघडलेली ही एक सामूहिक चळवळच म्हणता येईल. या चळवळीअंतर्गत समाजात स्त्री-पुरुषांच्या लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याबरोबरच स्त्रियांचे सबलीकरण व सक्षमीकरण करण्याचा ह्या संस्थेचा मानस आहे. समाज-विकासात स्त्रीला वैश्विक पातळीवर सहभागी करून घेण्याचा हेतूही त्याद्वारे साकार करण्याचे हे स्वप्न आहे.

अगदी काही वर्षांपूवीपर्यंत भारतातील आधुनिक समाजातही अशा 'धाडसी' किंवा 'निषिद्ध' (taboo) समजल्या जाणार्‍या विषयांवरील सेमिनार्स शाळा-कॉलेजांतून उघडपणे घेणे, त्यात कॉलेज-कन्यांना स्वयंसेविका म्हणून सामील करून घेणे अशा तर्‍हेचे कार्य क्वचितच कोणी करत असेल. परंतु दिवसेंदिवस समाजात बोकाळत चाललेल्या गुन्हेगारीच्या व स्त्रियांसंदर्भातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर प्रोजेक्ट 'स्वाभिमान' सारख्या कार्यशाळा या काळाची गरज व समस्यांवर उचित उपाय शोधण्याच्या वाटेकडे जाणारे एक ठोस पाऊल ठरल्या आहेत.

१३ ते २५ वयोगट का?

मुख्यतः १३ ते २५ वयोगटातील मुली-स्त्रिया या लैंगिक शोषण व विनयभंगासारख्या गुन्ह्यांचे सर्वाधिक लक्ष्य ठरतात असे निदर्शनास आले आहे. त्याचे एक कारण म्हणजे या वयात घडून येणारे शरीर-आकारांतील नैसर्गिक बदल. आणि दुसरे कारण म्हणजे अपराध्यांनी आपल्या लैंगिक भावनांच्या शमनार्थ केलेले स्पर्श - जवळीक हे नकोसे वाटले तरी या वयातील अनेक मुलींना त्यांबद्दल नीट न समजणे, त्यासंदर्भातील मानसिक तयारी नसणे हे आहे. या तरुण मुलींशी बोलायला, त्यांच्याशी या विषयावर संवाद साधायला अनेकदा भारतीय समाजात पालकांना व शिक्षकांना संकोच वाटतो किंवा मर्यादा जाणवतात. मर्यादांची ही बंधनकारक चौकट मोडून कोवळ्या वयातील मुलांशी मोकळा संवाद साधणे तर दूरच राहते व मुलेमुली अपुर्‍या माहितीवर किंवा गैरसमजांवर विसंबून राहतात. प्रोजेक्ट स्वाभिमान अंतर्गत शाळा, कॉलेजेसमध्ये या विषयावर जागृती करण्याचे व लैंगिक शोषणाला अटकाव घालण्यासाठी स्त्रिया-मुलींना समर्थ करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

कसा असतो हा सेमिनार?

दीड ते दोन तास चालणारा स्वाभिमानचा सेमिनार हा बराचसा पॉवर पॉईन्ट प्रेझेंटेशन, त्यासोबत समालोचन, प्रश्नोत्तरे, अनुभव-कथन, लैंगिक शोषणाविषयीचे निनावी सर्वेक्षण या स्वरूपाचा असून कोणतीही संस्था आपल्या विद्यार्थिनी किंवा महिला कर्मचारी वर्गासाठी हा सेमिनार आयोजित करू शकते.

''आमचे सेमिनार्स सध्या तरी मुली व स्त्रियांसाठीच आहेत. अतिशय नाजूक व गंभीर विषयांना, गुन्ह्यांना या सेमिनार्समध्ये चर्चिले जाते. त्यामुळे आमच्या स्वयंसेविका म्हणूनही आम्ही मुलीच निवडल्या आहेत. सेमिनार मध्ये माहिती, प्रेझेंटेशन इत्यादी झाल्यावर प्रश्नोत्तरांच्या वेळी शिक्षिका, प्राध्यापिकाही अनेकदा आपले मनोगत व्यक्त करतात. या गुन्ह्यांना सामोरे गेलेल्या मुली, स्त्रिया आपले अनुभव कथन करतात. कित्येकदा तर मी तिथे उपस्थित शिक्षिकांनाही थोडा वेळ बाहेर जायला सांगते, जेणेकरून मुली जास्त मोकळेपणाने सहभागी होऊ शकतात, बोलू शकतात, आपले अनुभव मांडू शकतात किंवा प्रश्न विचारू शकतात.'' श्रीमती नेहा सिंग, SSROH च्या अध्यक्षा सांगतात.

पंजाब येथील औद्योगिक क्षेत्रातील प्रशासनाचा व भारतातील अनेक शहरांमधील शिक्षण क्षेत्राचा, आर्मी स्कूल्सचा उत्तम अनुभव असलेल्या श्रीमती नेहाजी आपल्या आर्मी ऑफिसर असलेल्या पतींमुळे आर्मी वाईव्ह्ज वेलफेयर असोसिएशनशीही प्रदीर्घ काळ संलग्न आहेत. लडाख, कन्याकुमारी, जैसलमेरपासून ते पार नागलॅन्ड पर्यंत भारताच्या कानाकोपर्‍यांत त्यांनी भ्रमंती केली आहे. 'प्रोजेक्ट स्वाभिमान'च्या आरंभाची बीजे भारताच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयाने इ.स. २००७ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात असल्याचे त्या सांगतात.

महिला व बाल कल्याण मंत्रालयाने इ.स. २००७ प्रसिद्ध केलेला अहवाल

ह्या अहवालानुसार भारतातील जवळपास ५३% मुलंमुली कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या लैंगिक शोषणाला सामोरे जातात. त्यांतील २२% मुलंमुली तीव्र स्वरूपाच्या लैंगिक शोषणाचा बळी ठरतात तर ६ % मुलामुलींना विनयभंग सहन करावे लागतात. ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुले सर्वात जास्त प्रमाणात लैंगिक शोषणाला बळी पडतात. अर्थात त्याबद्दल बहुतेक केसेसमध्ये तक्रारी दाखलच केल्या जात नाहीत! अशा शोषित मुलामुलींपैकी ७३% मुलंमुली हे ११ ते १८ वयोगटातील होते. आणि ७१% शोषणकर्ते हे या मुलांच्या माहितीचे व विश्वासातील व्यक्ती होते!

सेमिनारमधील अनुभव

आजही आपल्या समाजात मुली -स्त्रिया या विषयावर घरी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत, व त्या बोलल्या तरी त्यांचे पालक किंवा घरची मंडळी त्यांना समजून घेतील अशी परिस्थिती नाही. अशा वेळी SSROH ने उपलब्ध करून दिलेला हा व्यक्त होण्याचा मंच अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. मुलींना योग्य माहिती मिळते, गैरसमज दूर होण्यास मदत होते व त्याचबरोबर आपण अशा गुन्ह्यांना सामोर्‍या जाणार्‍या एकट्याच नाही, हीदेखील जाणीव होते. एका संघटित शक्तीची साथ मिळाली की समोरच्या प्रश्नाला सामोरे जाण्याचे बळ येते, मनोभूमिका समर्थ होण्यास मदत मिळते.

वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये 'स्वाभिमान'चा सेमिनार : उपस्थित विद्यार्थिनी, व्यवस्थापन व अध्यापक

एका सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या एका मुलीने नंतर सांगितले, ''आमच्या शेजारी राहणारा एक वयाने मोठा मुलगा, ज्याला मी 'भैय्या' म्हणते, घरी कोणी नसताना मला वरच्या मजल्यावर घेऊन जायचा व मला आडवे करून स्वतः माझ्या अंगावर झोपायचा. मला ते खूप विचित्र वाटायचे, चुकीचे वाटायचे. पण मी घरी त्याबद्दल कोणाला कधी सांगू शकले नाही. रात्री ते सगळे आठवायचे आणि अस्वस्थपणाने झोप यायची नाही. रडू यायचे. पण कोणाला काही सांगता आले नाही. आज तुमच्या या सेमिनारमध्ये ते सारे आठवले आणि मला खूप रडू आले.'' बरीच वर्षे त्या मुलीच्या मनात साचलेला ताण अश्रूंवाटे बाहेर पडला.

कधी कोणी मुलगी बसस्टॉपवर तिला सातत्याने छेडणार्‍या, त्रास देणार्‍या मुलाला आपण आपल्या चार मैत्रिणींना सोबत नेऊन सामूहिक रित्या कसे बडवले याचे उत्स्फूर्त अनुभव-कथन करते, तर कोणी रोजच्या आयुष्यात ज्या प्रकारे नकोश्या स्पर्शांचा त्रास सहन करावा लागतो याचे वर्णन करते.

SSROH च्या प्रोजेक्ट स्वाभिमान अंतर्गत घेतल्या जाणार्‍या सेमिनारच्या माध्यमातून अशा तर्‍हेच्या गैरवर्तनाला बळी पडू नका हा संदेश मुलींपर्यंत यथायोग्य प्रकारे पोहोचतो. त्यासाठी निवडलेल्या तरुण स्वयंसेविका या धीट, धाडसी व मोठ्या प्रमाणावर प्रवासाचा अनुभव गाठीशी असलेल्या कॉलेज-कन्यका आहेत. त्यामुळे श्रोत्या मुली त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधण्यास प्रवृत्त होतात, त्यांच्याशी सहज जोडल्या जातात.

प्रोजेक्ट 'स्वाभिमान'ची वाटचाल

आजपर्यंत पुण्यातील बी एम सी सी कॉलेज, वाघिरे महाविद्यालय - सासवड, साधना कॉलेज - हडपसर, रेणुका स्वरूप हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, मुलींचे नूमवि हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, ए एफ एम सी चे नर्सिंग कॉलेज आणि एन. सी. सी. च्या कन्या छात्रांसाठी SSROH च्या प्रोजेक्ट स्वाभिमान अंतर्गत निरनिराळे कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.

या प्रकल्पात संस्था व्यवस्थापन व प्रत्येक विभागासाठी कार्यशाळा, मुलींच्या लैंगिक शोषणाचा शोध घेण्यासाठी सामाजिक सर्वेक्षण, मुलींना लैंगिक शोषण वा विनयभंगापासून वाचविण्यासाठी त्याबद्दल त्यांना सतर्क व संवेदनक्षम करणार्‍या कार्यशाळा, शोषित मुली-स्त्रियांना आपले अनुभव इतर मुलींसमोर मांडून त्या मुलींना सतर्क करण्यासाठी व लैंगिक शोषणाला बळी पडण्यापासून वाचविण्यासाठी एक समर्थ मंच उपलब्ध करून देणे, शोषित मुली-स्त्रियांना समुपदेशन करणे व संस्थांना लैंगिक शोषणाविरुद्ध व विनयभंगाविरुद्ध धोरण बनविण्यास मदत करणे यासारख्या उद्दिष्टांचा व कार्याचा समावेश आहे.

सेमिनारचा लाभ

जून २०११ ते जानेवारी २०१२ दरम्यान SSROH ने प्रोजेक्ट स्वाभिमान अंतर्गत असे १० कार्यक्रम केले असून त्यांतून ३१६३ मुली-स्त्रियांना थेट लाभ व अप्रत्यक्षपणे साधारण ३२,७१० व्यक्तींना कार्यक्रमाचा लाभ मिळाला आहे. ज्या मुलींना सेमिनारमध्ये इतरांसमोर आपली समस्या सांगायला संकोच वाटतो त्या मुली नंतर फोनवरून संपर्क साधूनही आपला प्रश्न सांगू शकतात. समस्याग्रस्त मुली -स्त्रियांना SSROH तर्फे समुपदेशन केले जाते. त्यांचा प्रश्न सोडविण्यास मदत केली जाते. गरज पडल्यास पालकांशी संपर्क व संवाद साधून त्यांची मदत घेतली जाते. भविष्यात समुपदेशनाच्या जोडीला केसनुसार गरज वाटल्यास पोलिसांची व कायद्याची मदत घेण्याचाही संस्थेचा इरादा आहे.

संस्थाध्यक्षा श्रीमती नेहा सिंग सांगतात, ''आतापर्यंत आम्हाला प्रोजेक्ट स्वाभिमानच्या प्रत्येक सेमिनारसरशी श्रोतेमंडळींकडून दणदणीत प्रतिसाद मिळाला आहे. मग त्या श्रोत्या तरुण मुली - महिला असोत, शिक्षक - प्राध्यापक असोत की व्यवस्थापनाचे सदस्य असोत! कारण अशा प्रकारच्या व अशा विषयावरील कार्यक्रमात त्यांनी बहुतेक वेळा पहिल्यांदाच सहभाग घेतलेला असतो. शिवाय हा विषयच असा आहे की सेमिनारला उपस्थित प्रत्येक स्त्रीला तो 'आपला' वाटतो. सेमिनार व कार्यशाळेपूर्वी त्यांचा असा समज असतो की 'फक्त मलाच हा त्रास होतो!' पण कार्यक्रमानंतर त्यांची खात्री पटते की ही समस्या आपल्याबरोबरच प्रत्येक मुलीला भेडसावते, तिच्या आयुष्यावर परिणाम करते!''

त्या पुढे सांगतात, ''आम्ही या सेमिनार अंतर्गत मुलींना त्यांच्यावर अशी परिस्थिती ओढवली तर ती कशा प्रकारे हाताळावी, काय पावले उचलावीत याबद्दल तर सांगतोच, शिवाय अनुभव-कथनातूनही मुलींना या प्रकारच्या परिस्थितीचा सामना कसा करावा हे समजते, धीर येतो. त्यांची हिंमत वाढते. या सर्व सत्रात आम्ही या गुन्ह्यांचा प्रतिबंध कसा होईल, ही परिस्थिती टाळता कशी येईल यावर भर देतो. आणि जर शोषण किंवा विनयभंगाचा त्रास होत असेल तर त्याबद्दल बोलण्यास, व्यक्त होण्यास सांगतो. लैंगिक शोषण व अत्याचार थांबविण्यासाठी त्याबद्दल बोलले जाणे आत्यंतिक जरूरी आहे.''

ह्या कार्यक्रमानंतर मुली समाजात धीटपणे, समर्थपणे वावरू तर शकतातच, शिवाय लैंगिक शोषण व विनयभंगाचे गुन्हे करणार्‍या लोकांचा सामना करण्याचे मनोबळही त्यांना मिळते. ज्या मुली आपली समस्या मांडतात, व्यक्त करतात त्यांना ती समस्या कशा प्रकारे सोडविता येईल याचे पर्याय सुचविले जातात. त्यातून इतर मुलींनाही त्या पर्यायांची माहिती मिळते. कोणाला जर खाजगीत काही सांगायचे असेल तर त्या मुली इमेल किंवा फोनच्या माध्यमातून संस्थेशी संपर्क साधतात. संस्थाप्रतिनिधी त्यांच्याशी संलग्न असलेल्या मानसोपचारतज्ञांशी त्या समस्येबाबत चर्चा करतात व त्यानुसार समुपदेशन करतात. तशी गरज वाटल्यास त्या मुलीच्या पालकांना किंवा शाळा / कॉलेजच्या विभागप्रमुखांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येते.

शिक्षक, प्राध्यापक, विभाग प्रमुख व व्यवस्थापनातील सदस्यांना अशा सेमिनार्समुळे ह्या विषयाला किती गंभीरपणे, परिपक्व दृष्टीने व संवेदनशीलतेने हाताळणे जरूरी आहे हे समजण्यास मदत झाली आहे. कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्या व या मुली आपल्याबरोबरच्या किमान २० मुलींना या विषयाबद्दल जागरूक करतील आणि संभाव्य शोषणापासून वा विनयभंगापासून वाचवतील याबद्दल ते खात्री व्यक्त करतात. या कार्यक्रमाचा लाभ घेतलेल्या संस्थांनी औपचारिक आभारपत्रांद्वारे SSROH कडे आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.

स्वयंसेविकांचा अनुभव

संस्थेसाठी स्वयंसेविका म्हणून काम करणार्‍या कॉलेज कन्यकेतील एक जण आपला अनुभव कथन करते, ''मी सुरुवातीला सेमिनारमध्ये इतक्या नाजूक विषयावर बोलायच्या वेळी थोडी संकोचले, थोडी बिचकले. आपल्याकडे अशा विषयावर घरातच काय, पण बाहेरही कोठेच मोकळेपणाने बोलले जात नाही! परंतु हळूहळू प्रत्येक सेमिनार सरशी माझ्यातही बदल होत गेला. मीही मोकळेपणाने माझे अनुभव इतर मुलींबरोबर शेअर करू लागले. त्याचा आम्हाला व उपस्थित मुलींना फायदाच झाला.''

आपण एका चांगल्या कार्याशी जोडल्या गेल्या आहोत व समाजासाठी काही सकारात्मक काम करण्याची संधी आपल्याला मिळते आहे या गोष्टीची या सर्व तरुण स्वयंसेविकांना योग्य जाणीव आहे. समाधान तर आहेच!
याखेरीज या मुलींना स्वतःतील गुणांचा व कौशल्यांचा उपयोग करता येतो. नवी कौशल्ये शिकायला मिळतात. श्रोत्यांपर्यंत आपला संदेश प्रभावीपणे कसा पोचविता येईल याचेही अप्रत्यक्ष प्रशिक्षण मिळते.

जगाच्या पाठीवर कोठेही जा, समाजात स्त्रियांचे लैंगिक शोषण वेगवेगळ्या प्रकारे व प्रमाणात आढळून येते. परंतु त्यांवर निव्वळ हळहळ व्यक्त करण्याव्यतिरिक्त काही निश्चित ध्येय ठरवून उपाय करणार्‍या व्यक्ती व संस्था तुलनेने कमीच आढळतात. त्यातून तरुण वर्गापर्यंत मोठ्या प्रमाणात पोचून त्यांना आपल्या मोहिमेचा भाग बनविणार्‍या संस्थाही तशा विरळच! या पार्श्वभूमीवर SSROH सारख्या संस्थांचे काम नक्कीच उल्लेखनीय ठरते व खर्‍या अर्थाने आशेचा एक किरण दाखविते.

(क्लॉकवाईज) संस्थाध्यक्षा श्रीमती नेहा सिंग सेमिनारमध्ये बोलताना, कॉलेज विद्यार्थिनी असलेल्या स्वयंसेविका, नूमविचे प्रा. शहापुरे अशा प्रकारच्या सेमिनार्सची गरज असण्याबद्दल सांगताना, बी.एम.सी.सी.च्या विद्यार्थिनी सर्वेक्षणाचे वेळी, प्रा. लीला माळी (बी एम सी सी च्या उपप्राचार्या) सेमिनारमध्ये बोलताना, स्वाभिमानच्या कार्यकर्त्या स्त्रियांशी संवाद साधताना, सेमिनारमध्ये प्रेझेंटेशन देणार्‍या स्वयंसेविका.

सेमिनार नंतरच्या काही प्रतिक्रिया

''या सेमिनारमुळे आजूबाजूच्या स्त्रियांच्या बाबतीत काय घडते / घडू शकते याची जाण आली. काय खबरदारी घ्यावी, अशा परिस्थितीत सापडलेल्या स्त्रीची मदत कशा प्रकारे करावी हेही उत्तम प्रकारे कळाले.''

****

''तुमचा सेमिनार मला खूपच आवडला. मुख्य म्हणजे तुम्ही विनयभंग म्हणजे नक्की काय, हे फार चांगल्या व सोप्या भाषेत समजावून दिलेत. आज ह्या सेमिनारला खेड्यांतून आलेल्या अनेक मुली हजर होत्या. त्या या विषयाबद्दल इतर कोठेच बोलू शकत नाहीत. तुम्ही त्यांना नवी आशा दिलीत.''

****

''या सेमिनारमुळे मला वाटतं की मुली आता आपल्या घरी आपल्या आईवडिलांशी ह्या विषयावर मोकळेपणाने बोलू शकतील व अधिक सक्षम बनू शकतील.''

****

''तुमच्या सेमिनारमुळे आम्हाला अशी परिस्थिती कशी हाताळायची, काय करायचे - काय नाही करायचे याची खूप माहिती मिळाली. तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला प्रत्येक विषय सोपा करून समजावून सांगितलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!''

****

एका मुलीच्या आईची प्रतिक्रिया

''तुमचा हा सेमिनार तुम्ही ज्या प्रकारे घेता, मुली ज्याप्रमाणे उत्स्फूर्तपणे आपले अनुभव सांगतात, एकमेकींना धीर देतात, चियर-अप करतात ते खूपच चांगले आहे. तुम्ही आम्हां पालकांसाठीही या विषयावर प्लीज सेमिनार घ्या. आम्ही आमच्या मुलांशी या विषयावर कसे बोलावे, त्यांच्याशी मोकळा संवाद कसा साधावा हे जरूर सांगा. टीनएजर्स नी त्यांच्या आईवडिलांशी या विषयावर बोललेच पाहिजे, कारण अनेकदा आई-वडीलच अशा तर्‍हेची परिस्थिती व समस्या हाताळण्यास त्यांना मदत करू शकतात.''

भविष्यातील योजना

ज्या प्रमाणे सध्या संस्थेतर्फे मुलींसाठी स्वाभिमान प्रकल्पांतर्गत सेमिनार्स घेतले जात आहेत त्याच प्रकारे भविष्यात मुलांसाठीही असे सेमिनार्स घेण्याचा संस्थेचा मानस आहे.

SSROH संस्थेचे अन्य प्रकल्प

संस्थेतर्फे या प्रकल्पाखेरीज महिला सबलीकरणासाठी 'गुणी बहू' प्रकल्प (महिलांसाठी शिवणकाम, स्वमदत गट निर्माण, बॅग्ज बनविणे, ब्यूटिशियन इ. साठी वर्कशॉप्स), आरोग्याच्या दृष्टीने 'जागृती' प्रकल्प (एड्स, एच आय व्ही संदर्भात जागृती, सेमिनार्स, पथनाट्ये, डॉक्टरांची भाषणे, वेगवेगळ्या स्पर्धा), दहशतवादाचा सामना करणारा 'बुलंद भारत' प्रकल्प (तरुणांसाठी दहशतवादाशी लढा देण्याबद्दल प्रकल्प), गरीब तरुणांना रोजगार मिळवण्यास साहाय्य करणारा 'समृद्धी' प्रकल्प (दारिद्र्यरेषेखालील व खेड्यांतील तरुणांना रोजगाराच्या संधी) अशा विविध योजना कार्यान्वित आहेत.

जागृती प्रकल्पातून पुरुषांमध्ये व तरुणांमध्ये स्त्रियांविरुद्ध हिंसाचाराच्या प्रवृत्तीला अटकाव करण्याची मोहीमही संस्थेद्वारा राबविली जात आहे.

तुम्हाला अशा प्रकारचा सेमिनार आपल्या संस्थेत आयोजित करायचा असेल, या कामात तुम्ही सामील होऊ इच्छित असाल किंवा आपले योगदान देऊ इच्छित असाल तर अधिक माहितीसाठी संस्थेचे संकेतस्थळ : www.ssroh.org

संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय :

A-26/A Pandav Nagar
Delhi-110092.
Phone: +91-9910713114, +91-9405538861, +91-9405538862
E-mail: ssroh.india@yahoo.com
Website : www.ssroh.org
फेसबुक लिंक : https://www.facebook.com/ssroh

महाराष्ट्रासाठी संपर्क पत्ता :

PO Box No 75
GPO
Pune – 411001.

-------------------------------------------------------------------------------------------

* संस्थाध्यक्षा श्रीमती नेहा सिंग यांचे माहिती व छायाचित्रांसाठी खास आभार. मला आपल्या सेमिनारसाठी आवर्जून निमंत्रण दिलेत त्याबद्दलही अनेक धन्यवाद! तसेच माझी छोटी मैत्रीण व एन सी सी छात्रा कल्याणी हिचेही आभार. तिच्या फेसबुक अपडेटमुळेच मला या संस्थेच्या कार्याविषयी समजले.

** संयुक्ताच्या माध्यमातून स्त्रियांसाठी व्यक्त होण्याचे एक वेगळे व्यासपीठ मायबोलीने उपलब्ध करून दिले आहे. व्यवसाय, करियर, आरोग्य, सल्ला-मार्गदर्शन, आधार, मदत, माहिती, संवादाच्या माध्यमातून स्त्रियांना व्यक्त होण्याचे, जाणिवा प्रगल्भ करण्याचे प्रयत्न संयुक्ताच्या माध्यमातून सातत्याने चालू असतात. आज अडीचशेहून अधिक स्त्रिया संयुक्ताच्या सदस्या आहेत व या व्यासपीठाचा लाभ घेत आहेत. नव्या मैत्रिणी मिळवत आहेत. मायबोलीवरील कोणीही स्त्री सदस्या संयुक्ताचे सभासदत्व घेऊ शकते.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अरुंधती. माहितीपूर्ण.
हल्ली कॉलेजांमध्ये असे सेशन होतात हे आशादायी आहे.

तरुण मुलामुलींच्या पालकांनो वाचताय ना?

खूप माहितीपूर्ण लेख. माझ्या फेसबूकवर शेअर केला आहे.
अकु, नेहेमीप्रमाणे याहीवेळी अतिशय वेगळ्या विषयावर उद्बोधन केलेस. त्याबद्दल धन्यवाद बोलणं सोडूनच द्यावं म्हणतेय. Happy

रच्याकने, रैनाला का धन्यवाद तेही सांग (असंच कुतूहल वाटलं म्हणून).

माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद अरुंधती! असे परिसंवाद झालेच पाहिजेत. आमच्या माताभगिनी सक्षम झालेल्या आम्हाला बघायला आवडतील.

मला आठवतंय त्याप्रमाणे मी शाळेत असतांना आमचे एक वर्गशिक्षक मुलींचे शोषण करीत असंत. त्यांना तोंडी परीक्षेच्या नावाखाली एकांतात बोलवून सूचक हालचाली, स्पर्श, इत्यादि करीत. ज्या मुली त्यांना विरोध करीत त्यांच्यावर खुन्नस काढून कमी गुण देत. असं ऐकण्यात आलं होतं की त्यांनी सहलीत कोण्या मुलीशी अतिप्रसंगही केला होता. असले प्रकार आम्हा पोरांना कळले असते तर त्यांची यथेच्छ धुलाई केली असती. मात्र ते त्यांची कुकृत्ये लपविण्यात यशस्वी झाले. ते परलोकवासी झाल्यावर त्यांच्या आठवणी निघाल्या तेव्हा हे कळलं. जर तेव्हाच वर्गातल्या मुलींनी तोंड उघडलं असतं तर...!

म्हणून असे परिसंवाद झालेच पाहिजेत. मायबोलीकर स्वयंसेवक/स्वयंसेविकांचे अभिनंदन आणि आभार!

आ.न.,
-गा.पै.

माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद!

ज्या प्रमाणे सध्या संस्थेतर्फे मुलींसाठी स्वाभिमान प्रकल्पांतर्गत सेमिनार्स घेतले जात आहेत त्याच प्रकारे भविष्यात मुलांसाठीही असे सेमिनार्स घेण्याचा संस्थेचा मानस आहे.
हे खूप आवडले. वयात येणार्‍या मुलांना स्त्रीत्वाचा आदर करायला शिकवणे खूप महत्वाचे आहे.

अकु, फार उपयोगी माहिती. असे सेमिनार होणे हे अत्यंत गरजेचे आहेच आहे. धन्यवाद अकु.
स्वाती२, लहानपणापासुनच मुलांना स्त्रीत्वाचा आदर करायला शिकवणे हे १०० टक्के मान्य.

उपयुक्त माहिती.
लेखन आवडले.
हा विषय मुलींच्याच पालकांना चिंतेत टाकणारा राहिला नाहिये (तसा तो कधीच नव्हता खरंतर).
अनेक मुलगेही अश्या विकृतींचे बळी ठरलेत. माझ्या मुलाशी या विषयावर कसे बोलावे हा प्रश्न होताच. सुदैवाने दोनेक ठिकाणाहून चित्रफित आणि पुस्तकाबद्दल माहिती समजली. मग काम सोपे झाले.

Please accept our sincere gratitude for taking our cause to masses, helping us eliminate the sexual abuse and assault on girls from this beautiful nation, India. We assure you that such support from media both print and electronic, will help us reach more and more people. SSROH (Sun Shine - A Ray of Hope), a national level NGO feels committed to the society who gives us so much of love, affection and respect wherever we have been across the country, with the rest of the country waiting for us to reach. We shall try and reach all Indians through one or the other form of media.

We shall feel very satisfied if more people could join us in the way it suits them. You may mail us at ssroh.india@yahoo.com. Please visit our website www.ssroh.org to know what we are doing for the society.

Thank you Ms Arundhati Kulkarni and Maayboli for advocating our cause and making it possible to be read by millions of reader of Maayboli. The sun shall shine and give a ray of hope to all.

अरुंधती, इतक्या महत्त्वाच्या विषयावर अतिशय उपयोगी कार्य करणार्‍या संस्थेची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद. फारच छान लेख.

हा धागा सार्वजनिक आहे?

सुदैवाने दोनेक ठिकाणाहून चित्रफित आणि पुस्तकाबद्दल माहिती समजली. मग काम सोपे झाले. >>> मैना, ती पुस्तके/चित्रफीती सगळ्यांसाठी इथे शेअर करता येतील का?

एका महत्वाच्या विषयाबाबत समाजाला जाग्रुत करणार्‍या संस्थेला खरोखरच धन्यवाद द्यायला पाहिजेत्.आणी आम्हाला ही माहिती देण्यासाठी अरुंधतीलाही.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद! Happy

गा. पै. शोषणाबद्दल जोवर आवाज उठवत नाही, बोलत नाही तोवर शोषणकर्त्यांचे फावते. मनातील संकोच, भीती, लाज हेही त्यांच्यासाठी शस्त्रच. त्यातूनच बाहेर पडायचे आहे.

मामी, होय, धागा सार्वजनिक आहे.

अरे वा! नेहाजींनी मायबोलीचे सभासदत्व घेतलेसुद्धा! छान. आशा आहे की मायबोलीच्या माध्यमातून तुमच्या कार्याचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल व तुमच्या कार्याला आणखी बळ येईल.

अतिशय उपयुक्त लेख आहे. धन्यवाद अरुंधती. मी सुद्धा माझ्या फेसबुकवर शेअर करेन.