मनमोहन सिंग यांनी पाश्चात्य राष्ट्रांवर, त्यातूनही अमेरिकेवर, केलेली टीका आपल्या राष्ट्रीय हितांना पोषक आहे का?

Submitted by sudhirkale42 on 28 September, 2011 - 06:02

कित्येक ठिकाणी एकाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याने तोंड उघडण्यापेक्षा ते बंद ठेवणेच त्या देशाच्या दीर्घकालीन हिताचे असते. काल संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना आपले पंतप्रधान आपले तोंड बंद ठेवण्याबद्दलचे "पथ्थ्य" पूर्णपणे विसरले असेच मला वाटले.

बांगलादेशबरोबरच्या संबंधांतील सुधारणा, भारताचे वाढते सामर्थ्य, या वाढत्या सामर्थ्याला शोभेशी जबाबदारी उचलण्याची भारताची तयारी, संयुक्त राष्ट्रांच्या घटनेमध्ये जरूर असलेल्या रचनात्मक बदलांची निकड वगैरे योग्य मुद्दे त्यांनी उपास्थित केले पण त्यांनी एकूण उपस्थित केलेल्या मुद्द्यांची गोळाबेरीज भारताच्या हितास पोषक होती असे निदान मला तरी वाटत नाहीं.

उदाहरणार्थ, लिबियाशी आपल्याला काय देणे-घेणे आहे? खरे तर तो देश आतापर्यंत पाकिस्तानच्याच जास्त जवळ होता. पाकिस्तानच्या अणूबाँब बनविण्याच्या प्रकल्पात लिबियाने पाकिस्तानला थोरल्या भुत्तोंच्या वेळेपासून भरघोस आर्थिक मदत केली होती व म्हणूनच कीं काय नंतर पाकिस्तानने त्यांना अणूबाँब बनविण्याचे तंत्रज्ञानच नव्हे तर सारी यंत्रसामुग्रीही विकली होती! पाकिस्तानने (कीं डॉ. अब्दुल कादीर खान यांनी) लिबियाला कालबाह्य (obsolete) यंत्रसामुग्री विकली याबाबत "न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकात उल्लेख आहेत, पण ती लिबियन लोकांना चालविता आली नाहीं ही शक्यतासुद्धा नाकारता येणार नाहीं.

कित्येक वर्षांपासून पाश्चात्य राष्ट्रांविरुद्ध-विशेषकरून अमेरिकेविरुद्ध-मध्यपूर्वेतील राष्ट्रांकडून सातत्याने वापरण्यात येत असलेले दहशतवादाचे तंत्र लिबिया पहिल्यापासून वापरत आलेला आहे. "पॅन-अ‍ॅम-१०३" हे विमान लिबियानेच बाँबस्फोट करून स्कॉटलंडवर पाडले होते[*१]! अशा "सद्दाम हुसेन"च्या पठडीतल्या एका जुलमी हुकुमशहाची सद्दी संपविली म्हणून पाश्चात्य राष्ट्रांचे आभार मानायचे कीं त्यांच्यावर टीका करायची?

ट्युनीशिया, इजिप्त या राष्ट्रांच्या पाठोपाठ येमेन, लिबिया, सीरिया, बहरीन अशा अनेक अरबी राष्ट्रांमध्ये प्रजा बंड करून उठत आहे. लिबियात "नाटो" राष्ट्रांनी भाग घेतला नसता तर गद्दाफींनी प्रजेचे बंड ठेचून काढले असते. अनेक दहशतवादाच्या कारवाया केल्याबद्दल पाश्चात्य राष्ट्रांचा गद्दाफींवर राग होताच. कदाचित् म्हणूनच संधी मिळताच "नाटो" राष्ट्रें गद्दाफींच्याविरुद्ध बंडखोरांच्या बाजूने उभी राहिली आणि त्यांनी गद्दाफीचे हवाई दल जमीनीवरच निकामी करून टाकले यात नवल ते कांहींच नव्हते.

पण त्याबद्दल भारताला कुठल्याही बाजूने बोलायचे कांहींच कारण नव्हते. गद्दाफी हे कांहीं प्रजेने निवडून दिलेले लोकप्रिय अध्यक्ष नव्हते तर पूर्वी एकेकाळी सैन्यात कर्नलच्या हुद्द्यावर असलेले लष्करी अधिकारी होते, कुदेताच्यामार्गे[*२] त्यांनी सत्ता बळकाविली होती आणि प्रजेवर अन्याय-जुलूम-जबरदस्ती करून ती सांभाळली होती. त्यांचा भारताला पुळका येण्याचे कांहींच कारण नव्हते आणि नाहीं. राजकारणापायी भारताला कुठल्या तरी एका बाजूला समर्थन द्यायची गरज निर्माण झाली असती तर भारताने बंडखोरांच्या बाजूने उभे रहाणे जास्त सयुक्तिक झाले असते, गद्दाफींची नव्हे.

मग उगीचच "नको तिथं श्यानपना" करून शत्रू कशाला निर्माण करायचे? केवळ आपण त्यांच्या बाजूचे आहोत असे मध्यपूर्वेतील राष्ट्रांना दाखविण्याखेरीज आपल्याला त्यात काय मिळाले? आणि आपण कुणाच्या बाजूने उभे आहोत याची या सर्व मध्यपूर्वेतील राष्ट्रांना कांहींतरी पर्वा आहे का? सौदी अरेबिया, संयुक्त अमिराती (अलीकडेपर्यंत दाऊदला आश्रय देणारे यजमानराष्ट्र), इराण[*२], इराक, सीरिया, अशी बहुतेक सर्व मध्यपूर्वेतील राष्ट्रें आपल्यापेक्षा पाकिस्तानलाच जास्त जवळचा मानत होती. मग आपल्याला या राष्ट्रांबद्दल सहानुभूतीपूर्वक धोरण ठेवायची काय गरज आहे?

People in all countries have the right to choose their own destiny and decide their own future असे या आमसभेत जगापुढे मांडणार्या सिंग यांना या लिबिया-सीरिया वगैरेसारख्या देशांतील जनतेने आजपर्यंत आपले भवितव्य कधीच ठरविले नव्हते याची तरी जाणीव होती ना? त्यांच्यावर तर हुकुमशाहीच लादली गेली होती (आणि आहे)! मग अशा तर्हेने आपल्याच देशातील जनतेविरुद्ध असलेल्या (आणि भारताशी फारशी जवळीक कधीच न ठेवलेल्या) या राष्ट्रांकडून आपल्याला काय देणं-घेणं आहे? अशा देशांच्या बाबतीत आपले तोंड बंद ठेवणे हाच मार्ग जास्त सयुक्तिक नाहीं कां?

सीरियाचीही तीच कथा. सध्याचे हुकुमशहा बशार अल-अस्सद (आणि त्या आधीचे हुकुमशहा बशार यांचे वडील हाफेज अल-अस्सद) हे आपल्या प्रजेवर जुलूम करणारे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या अन्यायाविरुद्ध जनता जर उठाव करून त्यांची हकालपट्टी करीत असेल तर आपण जनतेच्या बाजूला उभे रहायचे कीं अन्यायी हुकुमशहाच्या? ट्युनीशिया मध्ये सुरू झालेला "अरबी वसंतऋतू" सगळीकडे फैलावतो आहे त्याचा भारताला फायदा असेल तर अशा वसंतऋतूचे भारताने स्वागत केले पाहिजे पण असा वसंतऋतू आपल्या हिताचा नसेल तर त्या विषयावर गप्प तरी राहिले पाहिजे. मग आपल्या पंतप्रधानांनी विनाकारण तोंड कां उघडले?

शेवटी आपण इस्रायल आणि पॅलेस्टाईन या विषयांवर येऊ या. इथे पॅलेस्टाईनला समर्थन देण्यापर्यंत टाकलेली पावले ठीकच वाटतात. पण आपले पंतप्रधान जेवढे ठामपणे याबद्दल बोलले त्याची गरज नव्हती. अमेरिकेने पॅलेस्टाईनला सध्या तरी एका स्वतंत्र राष्ट्राचे स्थान देण्यास मान्यता दिली नसताना आपण असे ठामपणे काय म्हणून बोलायचे? अशा परिस्थितीत "इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांनी परस्परसंमत असा ठराव करून हा प्रश्न सोडवावा" असे गुळमुळीत निवेदन करणे भारताच्या जास्त हिताचे नव्हते कां? आज ना उद्या चीनबरोबर आपला संघर्ष अटळ आहे. आपल्यात युद्ध जुंपणारच आहे. त्यावेळी आपल्या बाजूने कोण उभे राहील? सौदी अरेबिया? मध्य-पूर्वेतील इतर तेलोत्पादक राष्ट्रे? मुळीच नाहीं. कुणी उभे राहिलेच तर ते राष्ट्र असेल फक्त अमेरिका. युरोपमधील राष्ट्रें त्यांच्या स्वत:च्या दिवाळखोरीमुळे चीनला मस्का लावायच्या तयारीत आहेत. इटलीने आपले ट्रेझरी बॉन्ड चीनला विकायची तयारी दर्शविली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या विरुद्ध मत व्यक्त करूनच सिंग थांबले नाहींत तर "पॅलेस्टाईनची राजधानी जेरुसलेम असावी" इथपर्यंत बोलून इस्रायलला (आणि अमेरिकेला) दुखवायची काय गरज होती?

इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत पाकिस्तानचा अण्वस्त्र बनविणाचा कहूता प्रकल्प बाँबहल्ला करून उडविण्याच्या प्रत्यक्ष भाग घेऊन आपल्याला मदत करण्याची तयारी इस्रायलनेच दर्शविली होते हे आपण कसे विसरू शकतो?

अलीकडे तर चीनची "नियत" जास्त-जास्तच उघड होऊ लागली आहे. चीनने अरुणाचलप्रदेश या आपल्या एका राज्यावरच्या त्याच्या हक्काचा हेका अद्याप सोडलेला नाहीं. चीनने आपल्या दोन देशातील सरहद्दीवर चीनच्या बाजूने हमरस्ते बांधलेले आहेत पण आपण बांधायला गेलो तर आपल्याच हद्दीत येऊन आपल्याला तसे करण्याला त्यांचे सैन्य मनाई करते (आणि आपण माघारही घेतो). आपल्या उत्तरेकडील सीमेवर आपल्या जवानांना दमदाटी चालूच असते[*३]. अशा परिस्थितीत उद्या जेंव्हां आपले आणि चीनचे युद्ध पेटले (ते पेटणारच आहे!) तर आपल्या मदतीला कोण येईल? पाकिस्तान? तो तर वहात्या गंगेत हात धुवून घ्यायला चीनच्या बाजूने आपल्याविरुद्ध युद्धात उतरेल. मध्य-पूर्वेतलाही कोणीही आपली विचारपूस करायलासुद्धा येणार नाहीं. मग त्यांची भलावण करून आणि ते करताना अमेरिकेला आणि इस्रायलला दुखवून आपण काय मिळविले? आपल्या हातात अशाने धुपाटण्याशिवाय कांहींही उरणार नाही!

म्हणूनच मनात आले कीं उद्या सुपरपॉवर बनण्याचे सामर्थ्य असलेल्या देशाच्या नेत्याला आपले तोंड कधी उघडायचे व कधी बंद ठेवायचे याचे भान असले पाहिजे. आणि चुकून नको तिथे तोंड उघडले तर कमीत कमी आपल्या पायाचा अंगठा तरी त्या उघड्य़ा तोंडात घालायचे त्याने टाळावे!
------------------------------------------------------------------
[*१] या कटाच्या सूत्रधारास जन्मठेपेची शिक्षाही झाली होती पण अलीकडेच त्याला "त्याचा मृत्यूकाल जवळ आलेला आहे" या सबबीखाली ब्रिटिश (कीं स्कॉटिश?) सरकारने अत्यंत संशयास्पद परिस्थितीत दया म्हणून वेळेआधीच मुक्त केले. (पण तो पठ्ठ्या अद्याप जिवंत आहे!)
[*२] अलीकडे पाकिस्तानातील शियांच्या कत्तलीमुळे इराणमधील परिस्थिती जराशी बदलत आहे असे वाटते. तसेच सद्दामनंतरचा सध्यातरी स्वत:च्याच जखमा चाटत आहे.
[*३] या घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे भूतपूर्व मुख्यमंत्री आणि आजचे एक केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला (Lion of Kashmir शेख अब्दुलांचे सुपुत्र)यांनी "हिवाळा संपून उन्हाळा येऊ दे मग मी जाऊन चिन्याना असा सज्जड दम मारेन कीं....." अशी "उत्तर" छापातली सिंहगर्जनासुद्धा केली होती. (उन्हाळा आता संपलाच आहे आणि मी बापडा अजून या चिन्यांच्या हृदयात धडकी भरविणार्या आणि त्यांच्या "धोतरांची पीतांबरे" करू पहाणार्या "अललडुर्र" गर्जनेची वाट पहात आहे!) या घटनेचा मला वैयक्तिक पातळीवर एक फायदा झाला कारण मला शाळेत शिकतांना माहीत झालेली पण दरम्यानच्या काळात विसरलेली मोरोपंतांची खालील आर्या आठवली.
कुरुकटकासि पहाता तो उत्तर बाळ फार गडबडला
स्वपरबलाबल नेणुनी बालिश बहु बायकात बडबडला!
------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

तुमचे उरलेले बहुसंख्य मुद्दे इतके निरर्थक आणि निराधार आहेत>>>>>>>>>>.. तुमच्या कडे वाजपेयी चे प्रेम दिसुन येत आहे....मुद्दे फार आहेत दिलेले.....तुमच्या कडेच उत्तर नाही आहे...कारगिल ची लढाइ फिक्स होती हे मी का म्हणालो ते सुध्दा लिहिले आहे..त्यावर काही उत्तर आहे का तुमच्या कडे..?
अणुस्फोट का केला यावर काही उत्तर आहे का..?
वाजपेयींच्या कवितांच्या अल्बम मधे काम करणार्याना लायकी नसताना पद्म पारितोषिके कसे मिळतात..? तुम्हाला तर या साध्या प्रश्नाचे सुध्दा उत्तर देता नाही आले...... हे सगळे मुद्देच आहेत तुमच्या साठी नाहीत कारण भाजप प्रेमाने तुम्ही आंधळे झाला आहात.......जिथे चुक आहे तिथे चुक म्हणण्यासाठी मोठे मन असावे लागते...थोडाफार विचार असावा लागतो..तो तुमच्यात नाही दिसला..
भाजपा बरोबर आम्ही कॉग्रेस ला सुध्दा चुकिचेच बोलतोय...तुमच्या सारखे नाही... की आमचा तो बाळ्या तुमचा तो काळ्या.... असे आम्ही नाही करत.. Happy
पुढच्या वेळेला तरी किमान चुक कबुल करा...........कमीपणा येत नाही त्याच्याने

>>> मुद्दे फार आहेत दिलेले.....तुमच्या कडेच उत्तर नाही आहे...

अहो, किती वेळा सांगायचं! निरर्थक, तर्कहीन, हास्यास्पद आणि तथ्यहीन मुद्द्यांना कोणाकडेच उत्तर नसते. ९/११ नंतर नोएम चोएस्की अमेरिकेत असे सांगत फिरत होता की ह्या हल्ल्याचे कारस्थान बुश (धाकटी पाती) व इस्राईल यांनी मिळून केलेले आहे. त्याला कोणीही शहाणा माणूस उत्तर देण्याच्या किंवा प्रतिवाद करण्याच्या फंदात पडला नाही , कारण हा आरोप पूर्णपणे तर्कहीन, हास्यास्पद व तथ्यहीन होता. तुमचे बहुसंख्य आरोप अगदी असेच आहेत. त्याला माझ्याकडेच काय, कोणाकडेच उत्तर नाहिय्ये.

अहो, किती वेळा सांगायचं! निरर्थक, तर्कहीन, हास्यास्पद आणि तथ्यहीन मुद्द्यांना कोणाकडेच उत्तर नसते. ९/११ नंतर नोएम चोएस्की अमेरिकेत असे सांगत फिरत होता की ह्या हल्ल्याचे कारस्थान बुश (धाकटी पाती) व इस्राईल यांनी मिळून केलेले आहे. त्याला कोणीही शहाणा माणूस उत्तर देण्याच्या किंवा प्रतिवाद करण्याच्या फंदात पडला नाही , कारण हा आरोप पूर्णपणे तर्कहीन, हास्यास्पद व तथ्यहीन होता. तुमचे बहुसंख्य आरोप अगदी असेच आहेत. त्याला माझ्याकडेच काय, कोणाकडेच उत्तर नाहिय्ये.>>>>>>>>>>>....

भारताच्या मुद्द्यात तुम्ही अमेरिकेला का आणतात..? अमेरिकेने जे केले ते भाजपाने केले का..? आनि त्याची लायकी पण नाही आहे.. Happy उत्तरे देता आली नाही ना की असे पळवाट काढली जाते....... मी समजु शकतो आपली भाजपा प्रती मनस्थिती...... Happy
रथ यात्रेला जात आहे ना......... अडवाणींना सांगा जास्त दगदग करु नका.. एसी रथ मधुन बाहेर पडु नका.. उगाच आजारी पडाल आणि चुकुन ऐन वेळेला पंतप्रधान रेस मधुन बाहेर पडाल.. असे झाले तर त्यांचा आत्मा संसद मधे फिरत राहील " मला पंतप्रधान करा" म्हणत........ Happy

udayone तुम्हाला आणि जागोमोहम्मदप्यारेना सध्या एका चांगल्या cycatrist ची गरज आहे.

वज्र३०० | 4 October, 2011 - 02:37 नवीन > पत्रकाराने किंवा लेखकाने प्रतिकुल असे लिहूच नाही अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्यासारखे आहे (वृत्तपत्रांची मुस्कटदाबी यातुनच जन्माला येते). --श्री. काळे यांनी मांडलेले विचार चुकीचे कसे आहेत किंवा तुम्हाला ते विचार का मान्य नाहीत या बद्दल लिहा. तुम्ही पंतप्रधान बोलले ते कसे बरोबर आहे, दुरगामी विचार डोळ्यासमोर ठेवुनच ते तसे म्हणाले या बद्दल थोडा प्रकाश टाका.
***
महोदय,
हाच लेख इतरही संस्थळांवर प्रसिद्ध केलेला आहे, अन तेथे विचार कसे चुकले याचे विवरण, त्या विचारांचे खंडन आहे. ते मजपेक्षा जास्त अभ्यासूंनी केलेले आहे. पुनरावृत्ती नको असे मला वाटते.

मुळात काहीही अभ्यास, ग्राऊंडवर्क न करता असल्या व्यासपीठावर बालिशपणे बडबड करेल असा पंतप्रधान या देशात आहे असे वाटते का आपल्याला? की केवळ तो काँग्रेसचा आहे म्हणून त्याने तोंड बंद ठेवले असते तर जास्त भले झाले असते असे तुम्हाला वाटू लागले?

ज्या भाषेत त्याने तोंड बंद ठेवावे असे लिहिले गेले, त्याच प्रमाणे मी म्हटले, की सगळी बुद्धीमत्ता अन विचारशक्ती ज्याला सामान्य माणूस अक्कल म्हणतो, ती तुमच्याच वाट्यास आली आहे काय? हे विचारले तर ती गळचेपी होते काय? ज्या नियमा प्रमाणे लेखकांना असे बोलण्याचा अधिकार आहे, त्याच नियमाने तो मलाही लेखकांबद्दल बोलण्याचा आहे.

लिबिया, तेल, भारतीय बाजारपेठ, अमेरिका, हे सगळे विषय इतरत्र चघळले गेले आहेत, इच्छा असेल तर शोधून बघा.

जॉनी | 5 October, 2011 - 14:13

udayone तुम्हाला आणि जागोमोहम्मदप्यारेना सध्या एका चांगल्या cycatrist ची गरज आहे.

<< तुम्हाला एकतर इंग्रजी शिकवणीची किंवा इंग्रजीला मराठी प्रतिशब्दांची ओळख करून घेण्याची नितांत गरज आहे. असो. हळू हळू शिकाल.

जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात !

ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भुमंडळी, भेटतू भुता !

>>> रथ यात्रेला जात आहे ना......... अडवाणींना सांगा जास्त दगदग करु नका.. एसी रथ मधुन बाहेर पडु नका.. उगाच आजारी पडाल आणि चुकुन ऐन वेळेला पंतप्रधान रेस मधुन बाहेर पडाल.. असे झाले तर त्यांचा आत्मा संसद मधे फिरत राहील " मला पंतप्रधान करा" म्हणत........

पुन्हा एकदा तर्कहीन आणि भरकटलेले लिखाण! Light 1

पुन्हा एकदा तर्कहीन आणि भरकटलेले लिखाण>>>>>>>>>>>>>>. हो आम्ही भरकटलेलेच.......अडवाणींसारखे नाही फुकट देशभर भरकटणारे...........! Happy

जॉनी | 5 October, 2011 - 14:13

udayone तुम्हाला आणि जागोमोहम्मदप्यारेना सध्या एका चांगल्या cycatrist ची गरज आहे.>>>>>>>>

तुमची अक्कल दिसुन येत आहे तुमच्या पोस्टींवरुन..!! तुम्हाला कशाची गरज आहे हे जगासमोर सांगायला लावु नका...!! उगाच अपमान होइल तुमचा..!!! जो सध्या तरी मला करायची इच्छा नाही आहे.....!!!!
तुमचा आग्रहच असेल करुन घ्यायचा तर सांगा... आम्ही चांगलाच करु...!!!!

cycatrist .. Happy

cycatrist ..

अहो आजकालच्या सुधारलेल्या मराठीत 'मानसशास्त्रज्ञ' असे कसे लिहीणार? कोकाडे यांच्याकडून दोन तासात फाड फाड इंग्रजी शिकून मग लिहायचे, ते असेच लिहीणार.

तुम्ही समजून घ्या की त्यांना Psychiatrist म्हणायचे असावे. असे आपले त्यांचे मत!! जसे तुमचे मत तसे त्यांचे मत!! मायबोलीवर लिहायला मत असावे लागते, अक्कल नाही!! तेंव्हा अक्कल नाही हे सांगायची काय गरज? मत तर आहे ना!! शिवाय इंग्रजीतून लिहीले, जरा रिस्पेक्ट द्या!!

धन्य धन्य ती 'चर्चा!!' Proud Proud Proud

सुधीर काळेजी,

नेहेमी प्रमाणे चांगला लेख. shining india व मेरा भारत महान !! ह्या घोषणा ही फक्त भारतीयांची
दिशा भुल करण्यासाठी.

ह्यापुर्वी ईंदरकुमार गुजराल नामक पंतप्रधानानी काय पराक्रम केले आहेत ह्याची लोकांनां जाणीव नाही.

पंजाबी असलेल्या ह्या भारताच्या पंतप्रधानानी पाकीस्तानच्या तत्कालीन पंजाबी पंतप्रधान नवाझ शरीफ ह्याच्यां शी दिलजमाई व्हावी ह्यासाठी पाकीस्तानात कार्यरत असलेल्या अतीशय कर्तबगार गप्तहेरराबाबत व त्यांच्या पाकीस्तानातील Support system बाबत सारी माहीती उघड केली होती. परीणाम असा झाला की ते सारे आपले कर्तबगार गप्तहेर मारले गेले. ही सारी यंत्रणा व कित्येक वर्षांची मेहेनत वाया गेली. त्यावर दोन देशातील संबंध काही सुधारले नाहीतच.

कारगील युद्धात् मारल्या गेलेल्या सैनकांना पाकीस्तानने आपले म्हणायला नकार दिला होता हे सरश्रु त आहेच. पण ह्या प्रकारात भारत ही काही कमी नाही.

१९७१ च्या भारत पाक युद्धात पाकीस्तानचे पकडलेले सर्व युद्ध कैदी परत करणारा भारत स्वःताचे पाकीस्तानने पकडलेले युद्धकैदी परत मागायला विसरला. किंवा पाकीस्तानने देत नाही जा म्हंट्ल्यावर गप्प बसला.

मरू देत सैनीक, मरू देत गप्तहेर आपल्या बापाच काय जातय? नाही तरी भारतात देशावर जान कु र्बान करण्यार्या मूर्खांची संख्या काही कमी नाही.

मी असे ऐकले की पं नेहेरूंपासून भारताला (म्हणजे भारतातल्या राजकारण्यांना) आपण जगात न्यूट्रल राष्ट्रांचे, थर्ड वर्ल्ड देशांचे नेते असावे (किंवा आहोतच) असे वाटत आले आहे! म्हणूनच जगात काहीहि करण्याची ताकद नसली, यांच्या बोलण्याकडे कुणि लक्ष देत नसले, तरी बोलण्याची हौस फिटत नाही. खरे आहे. पण आम्ही इकडे वीज, पाणी रस्ते या प्रश्नांनी गांजलोय. त्यातुन आमची पात्रता पुलं नी लिहल्या प्रमाणे महानगरपालिकेत उंदिर मारायच्या विभागात नसली तरी आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर भाष्य राहु द्या पण प्रतिक्रिया सुध्दा देण्यास नाही सबब लेखनसीमा.

या लेखावरून पंतप्रधानांचे भाषण म्हणजे मूर्खपणा असल्याचं सूचित होतंय..
माझा काही अभ्यास नाही या विषयाचा.

आपले लेख मी नियमित वाचत आलो आहे. काही विषयांचे ज्ञान नसल्याने प्रतिसाद दिलेले नाहीत.

आपल्या लेखांचा अभ्यास केल्यावर जाणवते कि आपला अमेरिकेवर विश्वास आहे. पण इतिहास पाहीला तर अमेरिकेवर विश्वास ठेवणं हे योग्य आहे का ही शंका उभी राहते. अमेरिकेने कायमच पाकला मदत केलेली आहे आणि करत राहणार आहे. भारताने अमेरिकेचे लांगुलचालन केले तरीही त्यात फरक पडणार नाहि कारण पाकिस्तानचे भौगोलिक महत्व.

दुसरं कारण म्हणजे अमेरिकेच्या अनेक कृष्णकारस्थानात पाक महत्वाचा साथीदार आहे. लादेनला मदत करण्यात जितका पाकचा हात होता त्याहून कितीतरी जास्त सहभाग अमेरिकेचा होता. काश्मीरमधील दहशतवादाबाबत अमेरिकेला आजवर वेळोवेळी अनेकदा पुरावे देऊनही अमेरिके कडून केवळ उक्तीच ऐकायला मिळाल्या, कृती दिसलीच नाही. भारताला तत्रज्ञान देतानाही अमेरिकेने हात आखडता घेतल्याचं दिसून येतं. पाकला एफ १६ विमानं दिल्यानेच भारताला रशियाची सुखोई विमानं घ्यावी लागली. हा निर्णय सूज्ञ ठरला. अमेरिकेचं तंत्रज्ञान हा प्रचाराचा भाग आहे. पेट्रीयट प्रणाली इराकच्या आखातात फेल झाल्याचं आपण पाहीलं.

याउलट चिनी तंत्रज्ञान हे गुप्त आहे आणि अमेरिकेपेक्षा प्रभावी असल्याचं बोललं जातंय. चिन्यांची लष्करी आणि आर्थिक ताकद वाढत चालली आहे. अमेरिकेने चीनपुढे लोटांगण घातलेलं आहे.

आता परिस्थिती नेमकी उलट होत चालली आहे. ग्रीस पाठोपाठ अमेरिका दिवाळखोरीत निघालेलीच आहे. फक्त त्यावर शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. चीनचा अमेरिकेला उपयोग होणार नाही. सध्या भारताला अमेरिकेची नाही तर अमेरिकेला भारताची गरज आहे. भारतीय उद्योगपतींना अमेरिकेत गुंतवणूक करण्याची होत असलेली आवाहने बरंच काही सांगून जातात. जैतापूर सारखे नाकरलेले प्रकल्प भारताच्या गळ्यात मारण्यामागे अणूभट्टीशी संबंधित कंपन्यांना कामे मिळवून देणं, त्यायोगे पैसे कमवणे हेच आहे.

अशावेळी अमेरिका भारताकडे मदतीसाठी हात पसरणार यात नवल नाही तेव्हा निगोसिएशन साठी उपयोगी पडतील अशा मुद्द्यांना आताच हवे देणं हे मुत्सद्दीपणाचं लक्षण वाटतंय. इराणची पाईलपलाईन भारताला फायदेशीर असूनही अमेरिकेच्या दबावाने आपल्याला ती रद्द करावी लागली होती हे ध्यानात ठेवावं लागेल. आता मात्र काही दिवसातच आंतरराष्ट्रीय राजकारणातील अमेरिकेची पत ढासळेल असं दिसतय. सोव्हिएत रशिया अस्।करी महासत्ता असूनही आर्थिक दिवाळखोरीने त्यांचंही हेच झालं होतं..

अशा वेळी चीन आणि भारत या दोन महाबाजारपेठा जगात निर्णायक भूमिका बजावतील. अमेरिकेच्या पतनावर मध्यपूर्वेतल्या तेलावर चीन आपल्या मुत्सद्दीपणाच्या जोरावर अधिपत्य गाजवण्याआधीच तेलौत्पादक राष्ट्रांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न हे बुडत्याचा पाय खोलात असणा-या अमेरिकेला गोंह्जारण्यापेक्षा महत्वाचे ठरतील. तसंही अमेरिकेने आपल्या तोंडाला पाने पुसण्याखेरीज मागे काहीही केलेलं नाही त्यामुळं वाइट वाटण्याचं कारण नाही.

राहता राहीला मुद्दा इस्त्राइलचा तर ते अमेरिका निर्मित राष्टं आहे. ज्यूंना स्वतःचा प्रदेश नसल्याने अमेरिकेने काही भूभाग बळकावून तिथं इस्त्रायलची निर्मिती केली आहे. ही काही मेहरबानी नसून अमेरिकेच्या आर्थिक नाड्या ज्यूंच्या हातात असल्यानं त्यांना ते करावं लागलं. अमेरिकेतला ८५% पैसा ज्यूंकडून येतो. वित्तपुरवठा, फंडस, बँकिंग हे सगळं त्यांच्या हातात आहे. एकूण जागतिक अर्थकारणातही ज्यू प्रभावीच आहेत. अमेरिका ही महासत्ता असल्यानं त्यांनी तिचा आपल्या मर्जीप्रमाणे वापर केला. उद्या अमेरिका ढासळली तर ते भारतात लक्ष घालायला कमी करणार नाहीत. ते पक्के व्यापारी आणि धूर्त आहेत. अशा वेळी त्यांच्या विरोधातली वक्तव्ये ही वाटाघाटींसाठी पथ्यावरच पडणार आहेत....

चुकभूल देणे घेणे

>>> काश्मीरमधील दहशतवादाबाबत अमेरिकेला आजवर वेळोवेळी अनेकदा पुरावे देऊनही अमेरिके कडून केवळ उक्तीच ऐकायला मिळाल्या, कृती दिसलीच नाही.

काश्मिर हा भारताचा प्रश्न आहे, अमेरिकेचा नाही. तिथला दहशतवाद हा भारताच्या नाकर्तेपणामुळे आहे. अमेरिका तिथे काय कृती करणार आणि का करावी?

मास्तुरे .. समजलं नाही. इराक, अफगाणिस्तानात आणि पाकिस्तानात कुणी कारवाई केली ?
आणि विषय तो नाहीच. पुरावे देऊनही अमेरिका पाकला मदत करत आलेली आहे आणि त्यांनी सबुरीचा सल्ला (दम) दिल्यानेच भारताला पाकव्याप्त काश्मीरमधे घुसून तिथले अड्डे उद्ध्वस्त करता आलेले नाहीत.

कृपया विशिष्ट चस्म्यातून पाहू नये कारण हे वाजपेयींच्या कारकिर्दीत देखील सिद्ध झालेलं आहे. भाजपाला तीनदा सत्ता मिळाल्याने काही कटू गोष्टी स्विकारायला हरकत नसावी.

किरण खुप छान परिक्षण केले आहे... अमेरिकेला भारताच्या मैत्रीची जास्त अवशक्ता आहे हे मला पटते, वादच नाही.

इराणची पाईलपलाईन भारताला फायदेशीर असूनही अमेरिकेच्या दबावाने आपल्याला ती रद्द करावी लागली होती हे ध्यानात ठेवावं लागेल.
----- अमेरिका त्यांच्या स्वार्था साठी दबाव आणणारच.... पण भारताने का म्हणुन दबाव मान्य करावा ? येथे भारत अमेरिकेला दबाव टाकयला परवानगी देतो आहे. " इराण आणि अमेरिका हे दोन्ही आमचे मित्र राष्ट्र आहेत. इराणशी होणार्‍या व्यावहाराची अमेरिकेने चिंता करायचे कारण नाही, भारताला त्याचे हित महत्वाचे आहे" असे का नाही आपण सांगू शकत. हा व्यावहार वाटतो तेव्हढा पारदर्षक नाही आहे. पाईपलाईन पाक मधुन येणार आहे, कितीही आश्वासने मिळाली तरी तेलाची तोटी कधिही बंद करता येते... सदा सर्व काळ ते तो मान्य करतिलच याची काहीच ग्वाही नाही. तेलाचे मिटर इराण मधे असावे का भारतात प्रवेश केल्यावर असावे यावएरही वाद आहे... पाक ला त्याच्या जागेचे भाडे जरुर मिळेल... पण अतिरेक्यांचा भरवसा काय? तरिही अमेरिकेला आपण जरुरी पेक्षा जास्त लुडबुड करायला परवानगी दिलेली आहे असे वाटते.

भारताचे संरक्षण मंत्री वा राजदुताला अमेरिकेत विमानतळावर अपमानास्पद रितीने सामोरे जावे लागले होते... आपण आदळ आपट केली... पण उपयोग काय ? तुम्ही कंडोलिझा राईस (किंवा अजुन कुणी) ला तशीच ट्रिट्मेंट दिल्ली मधे का नाही दिली? नंतर जरुर दिलगिरी व्यक्त करायची.

९-११ नंतर अमेरिकेने विमानतळांवर प्रवाशांच्या हाताच्या बोटांचे ठसे घेणे सुरु केले होते. त्याला उत्तर म्हणुन एका देशाने केवळ ``अमेरिकन नागरिकांसाठी`` बोटाचे ठसे घेणे अनिवार्य केले.

हे सर्व मुद्दे मान्य केले तरिही गड्डाफी क्रुर सत्ताधिशासाठी भारताच्या पंतप्रधानांनी युनो मधे गळा काढायची अवशक्ता नाही आहे.

काश्मीरमधील दहशतवादाबाबत अमेरिकेला आजवर वेळोवेळी अनेकदा पुरावे देऊनही अमेरिके कडून केवळ उक्तीच ऐकायला मिळाल्या, कृती दिसलीच नाही.
----- हा भारताचा लढा आहे आणि तो भारतानेच लढायचा आहे हे यातुन स्पष्ट होत नाही का? माझा रोष अमेरिकेच्या दुटप्पी पणा बद्दल नाही पण भारताच्या नाकर्ते पणा बद्दल आहे... कुठे तरी आपण परवानगी देतो असे वाटते.

१९९३ च्या मुंबई स्फोटामधे अत्यंत महत्वाचा दुर्मिळ असा सबळ पुरावा भारताने अमेरिकेला दिला होता. काही महिन्यांनंतर अमेरिकेने तो पुरावा तपासण्यांदरम्यान अनवधानाने नाहिसा झाला असे कळवले. श्री. बी. रामन (रॉ मधे काम केलेले) ह्यांचा ह्या विषयावर रेडिफवर लेख आहे.

----- हा भारताचा लढा आहे आणि तो भारतानेच लढायचा आहे हे यातुन स्पष्ट होत नाही का? माझा रोष अमेरिकेच्या दुटप्पी पणा बद्दल नाही पण भारताच्या नाकर्ते पणा बद्दल आहे... कुठे तरी आपण परवानगी देतो असे वाटते.

वज्र, मास्तुरे

मुद्दा समजावून घेता नाच भारताची आणि अमेरिकेची त्यावेळची पोझिशन हे ही लक्षात ठेवण गरजेचं आहे. रशिया सारखी महासत्ता आर्थिक घरसणीनंतर अमेरिकेव अवलंबून राहू लागली. इराकमधे कारवाई करताना अमेरिकेला युनोची परमिशन ध्याविशीही वाटली नाही. युनोचं स्थान काय आहे हे त्यातून स्पष्ट होतं. अमेरिका हा एकमेव सुपर पॉवर असताना भारताने अमेरिकेच्या लाडक्या राष्ट्राशी युद्ध कसं पुकाराव ?

तुम्ही भारतावर नाकर्तेपणाचा आरोप करता आहात तो चुकीचा आहे. बांग्लादेश युद्धात आपण क्षमता सिद्ध केली आहे. पण त्यावेळी अमेरिकेला हा भारत पाक अंतर्गत प्रश्न आहे असं वाटलं नाही आणि तिने सातवं आरमार भारताविरूद्ध लढण्यासाठी पाठवलं होतं.

त्या वेळी रशियाने घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळेच बाका प्रसंग टळला हे विसरून कसं चालेल ? अमेरिका आजही सुपरपॉवर आहे. फरक इतकाच कि रशियाच्या जागी आता चीन आला आहे आणि भारताच्या शब्दाला आज वजन आहे. हे लक्षात घ्यायला पाहीजे.

युनो अस्तित्वहीन झाल्याने आणि अमेरिकेने दहशतवाद विरोधी भूमिका उघडपणे घेतल्याने भारताने पाकविरूद्धचे पुरावे अमेरिकेला दिले होते त्यात पाकला मदत करू नका असं सुचवण्याचाच भाग जास्त होता.. आपल्ण परवानगी देण्याचा नाहीच. याउलट भारताने पाकव्याप्त काश्मीरमधे कारवाई करू नये असं स्पष्टपणे अमेरिकेने सुचवलं होतं. याचा अर्थच असा कि असं काही आपण केलं असतं तर युनोमधे अमेरिका साळसूदपणे भारताला दोष देऊ शकत होती....

आज भारताची पोझिशन नक्किच अमेरिकेशी वाटाघाटी करण्याची आहे तेव्हा जुने हिशेब चुकते करण्यापेक्षा मुत्सद्दीपणे पावलं टाकलेली चांगलीच. म्हणून गद्दाफींची बाजू घेतल्याने अमेरिका भारताचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार निश्चित. एका मोठ्या बाजारपेठेला दुखावून अमेरिकेला चालणार नाही... अमेरिका दुखावण्याचा प्रश्नच येत नाही !

सुधीरजी चांगलं लिहिलतं.
मनमोहन शिंग बोलले कारण ..............अमेरिकेचे कोणीही सोनियांना भेटायला दवाखान्यात गेले नाही . म्हणुन बाईंना राग आला व त्यांनी शिंगांना सांगितलं " पुत्तर मेरे इस अपमान का बदला जरुर लेना." Proud

पैसा नेहेमीच पांढरा असेल असे नाही. हॅलिबर्टन किंवा हम्वी बनवणारी कंपनी ज्यांनी इराक विषयी महत्वाची भुमिका वढवली... त्यांचा पैसा पांढरा म्हणाल?

जोपर्यंत कोर्टात खटला भरून तो पैसा काळा होता हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो पांढराच असतो. कुणाला वाटले तर ते कस्सून चौकशी करून सज्जड पुरावा मिळवतात, कोर्टात खटला करतात नि मग काय ते ठरते (म्हणजे न्याय, सत्य याच्याशी काही संबंध नाही, फक्त कोर्टात 'ठरवायचे'. )
शिवाय एकदा पैसा मिळाला की तो काळा असला तरी तो पांढराच होता असा कायदा पण करता येतो. जसे एका टेक्सासच्या काँग्रेसमनने गैर मार्गाने पैसे उभे केले म्हणून त्याच्यावर खटला भरला, पण कायद्याने ते 'बेकायदा' असे सिद्ध झाले नाही, तो सुटला. फक्त इथे फरक इतकाच, की तो बाबा आता पुनः कधीहि निवडून येणार नाही. ही शिक्षा त्याला आपोआप झाली. उपोषण नाही, राडा नाही.

खरे तर भारतातहि अशीच पद्धत आहे. लोक उगाच ओरडतात. त्या पेक्षा मुकाट्याने पुरावा गोळा करावा. तिथे शहाणपणा, शौर्य, धीटपणा, प्रामाणिकपणा दाखवावा, नि चोराला शिक्षा घडवावी, कायद्याप्रमाणे! नि नाही झाली शिक्षा तरी तुम्हाला वाटत असेल तर त्याला मत देऊ नका!! त्याला वाळीत टाका.

पण भारतीय हुष्षार! असे कायद्याप्रमाणे वागण्यात कसला शहाणपणा? फुक्कटची बोंबाबोंब करावी, एखाद्याला उपोषणाला बसवावे, 'राडा' करून स्वतःचे घर भरावे, नि मायबोलीवर येऊन लिहायचे भारतच फक्त किती वाईट. जणू इतर लोक भ्रष्टाचार करतच नाहीत!

जणू भारतात चांगले काही होतच नाही!! त्याबद्दल का लिहीत नाही कुणि? अरे हो, विसरलोच. दुसर्‍या 'भारतीयाला' ला चांगले कसे म्हणायचे?

(मी भारत, भारतीय, असे लिहीले आहे, पण मराठीत आजकाल त्या ऐवजी 'इंड्या', 'इंड्यन' म्हणतात. असे गेल्या तीन चार दिवसात भारतातून आलेल्या अनेक लोकांशी बोललो, तेंव्हा कळले. अमेरिकत फार वर्षे राहिलो की नवीन मराठी पटकन सुचत नाही.)

गा पै - होय हाच तो लेख आहे.... धन्यवाद येथे लिंक दिल्याबद्दल. हे रॉ मधे काम केलेल्या उच्च पदस्थाचे विचार आहेत. हे माझे/ तुमच्या सारख्या सामान्यांचे विचार नाही आहे. शेवटी त्यांना कोणताच महत्वाचा पुरावा आपल्या कडे ठेवायचा नव्हता.

आज भारताची पोझिशन नक्किच अमेरिकेशी वाटाघाटी करण्याची आहे तेव्हा जुने हिशेब चुकते करण्यापेक्षा मुत्सद्दीपणे पावलं टाकलेली चांगलीच.
---- जुने हिशोब चुकते करण्याचा प्रश्नच नाही. पण त्यांतुन काही शिकायला हवे, काही बोध घ्यायला हवा...
अमेरिकेला कात्रित पकडण्यासाठी, आंतरराष्ट्रिय व्यासपिठावर भारत गड्डाफीची पाठराखण करतो आहे हे चित्र समजणे मला अवघड आहे. फार मोठा मुत्सद्दी पणा असेल पण माझ्या कल्पनाशक्तीच्या आवाक्याबाहेर आहे. तुम्ही (विरोधी) पावित्रा जरुर घ्या पण त्यातुन तुम्हाला स्वत:ला तुम्ही उंच कसे आहात हे पण दाखवता येते.

पाकशी युद्ध हा उपाय आहे हे दुरान्वयेही मला सुचवायचे नाही आहे...

खी:
कुणी तिसर्‍याने येऊन अभ्यासपूर्ण प्रतिसाद दिला तरी नंतर रिक्षा फिरवून तो इथे दाबून टाकण्यात येतो. Kirnayake, सांभाळा!

मला किरन्यके यांचे बरेच मुद्दे पटले.
अमेरिकेला भारताकडून काय नि किती मिळते म्हणून त्यांनी अमेरिकेविरुद्ध बोलू नये?

उलट इतर स्वतंत्र देशावर हल्ले करण्याबद्दल अमेरिकेचा निषेधच केला पाहिजे. कारण अमेरिका नि पाकीस्तानचे संबंध बिघडत चालले आहेत. अमेरिका केंव्हाहि पाकीस्तानात घुसू शकेल नि मग अत्यंत घाणेरडे, मूर्ख, निरुपयोगी, भारताचा द्वेष करणारे कोट्यवधी पाकीस्तानी निर्वासित म्हणून भारतात घुसतील! म्हणजे दिग्विजयसिंग नि काँग्रेसचे ठीक आहे पण मला नाही वाटत बाकीचे लोक मुकाट्याने ऐकून घेतील, नि प्रचंड मोठ्या दंगली तर नक्कीच होतील!

म्हणून अमेरिकेने तसे करू नये, याबद्दल भारताला जमेल ते केले पाहिजे. सध्या तरी नुसता शाब्दिक निषेध ठीक आहे.
सध्या अमेरिकेतसुद्धा भारतासारखीच परिस्थिती आहे - काही थोडे लोक अतिश्रीमंत पण सरकार दळिद्री. आत्ताहि म्हणतात की लोकांजवळ, बँकांजवळ प्रचंड प्रमाणात रोख रक्कम आहे, पण गुंतवायची कुठे व कशी?
सोलर एनर्जी कं ला ५०० मिलियन डॉ. दिले ते बँकरप्ट!
तर असल्या कामांसाठी परकीयांचा पैसा बरा!!
भारतातल्या लोकांकडे बक्कळ पैसा आहे. सरकारकडे नसावा. सरकारला मागितले पैसे तर मिळणार नाहीत, पण भारतीय लोकांना अमेरिकेत गुंतवायला सांगितले तर ते गुंतवतील. मग एन्रॉन किंवा दोन तीन वर्षांपूर्वी केली तशी स्कँडल्स करून गोल्डमन सॅक्स,ए आय जी इ. कंपन्यांच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना प्रचंड प्रमाणावर पैसे मिळतील. भारतीयांना इतके पैसे गुंतवावे लागतील की त्यांना वरील कंपन्यांमधे वरीष्ठ अधिकारी होता येईल, तरच फायदा. ते कठीणच. भारतातले लोक हुषार, ते स्विस बँकेत ठेवतात. सोने घेतात. तसेच करावे.

वज्र
गद्दाफींची बाजू घेण्यामागे मुत्सद्दीपना आहे. इथं आपल्या गांधीगिरीच्या कन्स्पेट्स विसरून विचार करण्याची गरज आहे. मुत्सद्दीपणा म्हणजे कमीत कमी गमावून जास्तीत जास्त कमवण्याच्या वाटाघाटी. यासाठी पत हा महत्वाचा घटक असतो. ज्यावेळी ही पत भारताकडे नव्हती तेव्हा जमिनीवरची युद्धं जिंकूनही आपण मुत्सद्देगिरीत हारलो होतो.

पाक हे बदनाम राष्ट्र असतानाही सातत्याने अमेरिका पाकची पाठराखण करीत आली आहे याचा अर्थ तुम्ही काय काढाल ? पाकची बाजू घेतल्याने भारताने अमेरिकेशी वाटाघाटी कराव्यात ही त्या देशाची अपेक्षा होती. मग पाकला आम्ही पाठिंबा देणार नाही पण त्या बदल्यात आमच्या अमूक अमूक अटी मान्य करा ही त्या देशाची नीती होती.

इंदिरा गांधींनी त्या अटींना भीक न घालता दुस-या महासत्तेला जवळ करून बाजी आपल्या हातात ठेवली. अमेरिकेच्या गोटात त्या वेळी आपण गेलो असतो तर हाती काहीच पडलं नसतं. रशियाकडून आपल्याला तंत्रज्ञान मिळालं. आज त्या जोरावर आपण बरीच प्रगती केली आहे. अमेरिकेचं धोरण मात्र आम्ही तुम्हाला तंत्रज्ञान देणार नाही आणि इतरांकडून मिळूही देणार नाही असं राहीलेलं आहे. पण रशिया कर्जबाजारी झाल्यानंतर मात्र भारताने ते विकत घेतलं तर कमीतकमी भारत त्याचा गैरवापर करणार नाही हे आपण त्या देशाला पटवून दिलं. नाहीतर पैशासाठी रशिया आणि सोव्हिएत युनियन मधील इतर देशांनी ते दहशतवादी गट आणि देश यांना ते विकलं असतं इतकी त्यांची हलाखीची परिस्थिती होती.

लष्करी महासत्तेचा डोलारा सांभाळताना पैशाच पाठबळ लागतं. आज या पैशासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे. तिची ही गरज ओळखून आपल्याला आता निर्लज्जपणे ब्लॅकमेलिंग करणे गरजेचं आहे. अमेरिकेने हेच केलेलं आहे. तिथं प्रतिमा सांभाळण्याला काहीही अर्थ नाही. देशाला काय मिळेल हे पहायचं. तेव्हा आम्ही गद्दाफींची बाजू घ्यायला नको असं तुम्हाला वाटत असेल तर... आमच्या या अटी मान्य करा तरच तुमच्या देशात किती गुंतवणूक करायची कि नाही याचा विचार करता येईल हे त्या देशाला आज आपण ठणाकावून सांगू शकतो.

अमेरिकेची आजची परिस्थिती आणि सुपरपॉवर असताना त्यांनी कुठलाही विधीनिषेध न बाळगता केलेल्या कारवाया यांची माहीती असेल तर तुम्हाला हे पटेल.. आग्रह नाही. धन्यवाद.

झक्कीकाका धन्यवाद..

नुकतंच अमेरिकेतल्या कॉरपोरेट क्षेत्रातल्या प्रचंड भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या अमेरिकन नागरिकांनी वॉल स्ट्रील वर केलेल्या आंदोलनाची बातमी वाचनात आली.. कठीण आहे.

Pages