मनमोहन सिंग यांनी पाश्चात्य राष्ट्रांवर, त्यातूनही अमेरिकेवर, केलेली टीका आपल्या राष्ट्रीय हितांना पोषक आहे का?

Submitted by sudhirkale42 on 28 September, 2011 - 06:02

कित्येक ठिकाणी एकाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याने तोंड उघडण्यापेक्षा ते बंद ठेवणेच त्या देशाच्या दीर्घकालीन हिताचे असते. काल संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना आपले पंतप्रधान आपले तोंड बंद ठेवण्याबद्दलचे "पथ्थ्य" पूर्णपणे विसरले असेच मला वाटले.

बांगलादेशबरोबरच्या संबंधांतील सुधारणा, भारताचे वाढते सामर्थ्य, या वाढत्या सामर्थ्याला शोभेशी जबाबदारी उचलण्याची भारताची तयारी, संयुक्त राष्ट्रांच्या घटनेमध्ये जरूर असलेल्या रचनात्मक बदलांची निकड वगैरे योग्य मुद्दे त्यांनी उपास्थित केले पण त्यांनी एकूण उपस्थित केलेल्या मुद्द्यांची गोळाबेरीज भारताच्या हितास पोषक होती असे निदान मला तरी वाटत नाहीं.

उदाहरणार्थ, लिबियाशी आपल्याला काय देणे-घेणे आहे? खरे तर तो देश आतापर्यंत पाकिस्तानच्याच जास्त जवळ होता. पाकिस्तानच्या अणूबाँब बनविण्याच्या प्रकल्पात लिबियाने पाकिस्तानला थोरल्या भुत्तोंच्या वेळेपासून भरघोस आर्थिक मदत केली होती व म्हणूनच कीं काय नंतर पाकिस्तानने त्यांना अणूबाँब बनविण्याचे तंत्रज्ञानच नव्हे तर सारी यंत्रसामुग्रीही विकली होती! पाकिस्तानने (कीं डॉ. अब्दुल कादीर खान यांनी) लिबियाला कालबाह्य (obsolete) यंत्रसामुग्री विकली याबाबत "न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकात उल्लेख आहेत, पण ती लिबियन लोकांना चालविता आली नाहीं ही शक्यतासुद्धा नाकारता येणार नाहीं.

कित्येक वर्षांपासून पाश्चात्य राष्ट्रांविरुद्ध-विशेषकरून अमेरिकेविरुद्ध-मध्यपूर्वेतील राष्ट्रांकडून सातत्याने वापरण्यात येत असलेले दहशतवादाचे तंत्र लिबिया पहिल्यापासून वापरत आलेला आहे. "पॅन-अ‍ॅम-१०३" हे विमान लिबियानेच बाँबस्फोट करून स्कॉटलंडवर पाडले होते[*१]! अशा "सद्दाम हुसेन"च्या पठडीतल्या एका जुलमी हुकुमशहाची सद्दी संपविली म्हणून पाश्चात्य राष्ट्रांचे आभार मानायचे कीं त्यांच्यावर टीका करायची?

ट्युनीशिया, इजिप्त या राष्ट्रांच्या पाठोपाठ येमेन, लिबिया, सीरिया, बहरीन अशा अनेक अरबी राष्ट्रांमध्ये प्रजा बंड करून उठत आहे. लिबियात "नाटो" राष्ट्रांनी भाग घेतला नसता तर गद्दाफींनी प्रजेचे बंड ठेचून काढले असते. अनेक दहशतवादाच्या कारवाया केल्याबद्दल पाश्चात्य राष्ट्रांचा गद्दाफींवर राग होताच. कदाचित् म्हणूनच संधी मिळताच "नाटो" राष्ट्रें गद्दाफींच्याविरुद्ध बंडखोरांच्या बाजूने उभी राहिली आणि त्यांनी गद्दाफीचे हवाई दल जमीनीवरच निकामी करून टाकले यात नवल ते कांहींच नव्हते.

पण त्याबद्दल भारताला कुठल्याही बाजूने बोलायचे कांहींच कारण नव्हते. गद्दाफी हे कांहीं प्रजेने निवडून दिलेले लोकप्रिय अध्यक्ष नव्हते तर पूर्वी एकेकाळी सैन्यात कर्नलच्या हुद्द्यावर असलेले लष्करी अधिकारी होते, कुदेताच्यामार्गे[*२] त्यांनी सत्ता बळकाविली होती आणि प्रजेवर अन्याय-जुलूम-जबरदस्ती करून ती सांभाळली होती. त्यांचा भारताला पुळका येण्याचे कांहींच कारण नव्हते आणि नाहीं. राजकारणापायी भारताला कुठल्या तरी एका बाजूला समर्थन द्यायची गरज निर्माण झाली असती तर भारताने बंडखोरांच्या बाजूने उभे रहाणे जास्त सयुक्तिक झाले असते, गद्दाफींची नव्हे.

मग उगीचच "नको तिथं श्यानपना" करून शत्रू कशाला निर्माण करायचे? केवळ आपण त्यांच्या बाजूचे आहोत असे मध्यपूर्वेतील राष्ट्रांना दाखविण्याखेरीज आपल्याला त्यात काय मिळाले? आणि आपण कुणाच्या बाजूने उभे आहोत याची या सर्व मध्यपूर्वेतील राष्ट्रांना कांहींतरी पर्वा आहे का? सौदी अरेबिया, संयुक्त अमिराती (अलीकडेपर्यंत दाऊदला आश्रय देणारे यजमानराष्ट्र), इराण[*२], इराक, सीरिया, अशी बहुतेक सर्व मध्यपूर्वेतील राष्ट्रें आपल्यापेक्षा पाकिस्तानलाच जास्त जवळचा मानत होती. मग आपल्याला या राष्ट्रांबद्दल सहानुभूतीपूर्वक धोरण ठेवायची काय गरज आहे?

People in all countries have the right to choose their own destiny and decide their own future असे या आमसभेत जगापुढे मांडणार्या सिंग यांना या लिबिया-सीरिया वगैरेसारख्या देशांतील जनतेने आजपर्यंत आपले भवितव्य कधीच ठरविले नव्हते याची तरी जाणीव होती ना? त्यांच्यावर तर हुकुमशाहीच लादली गेली होती (आणि आहे)! मग अशा तर्हेने आपल्याच देशातील जनतेविरुद्ध असलेल्या (आणि भारताशी फारशी जवळीक कधीच न ठेवलेल्या) या राष्ट्रांकडून आपल्याला काय देणं-घेणं आहे? अशा देशांच्या बाबतीत आपले तोंड बंद ठेवणे हाच मार्ग जास्त सयुक्तिक नाहीं कां?

सीरियाचीही तीच कथा. सध्याचे हुकुमशहा बशार अल-अस्सद (आणि त्या आधीचे हुकुमशहा बशार यांचे वडील हाफेज अल-अस्सद) हे आपल्या प्रजेवर जुलूम करणारे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या अन्यायाविरुद्ध जनता जर उठाव करून त्यांची हकालपट्टी करीत असेल तर आपण जनतेच्या बाजूला उभे रहायचे कीं अन्यायी हुकुमशहाच्या? ट्युनीशिया मध्ये सुरू झालेला "अरबी वसंतऋतू" सगळीकडे फैलावतो आहे त्याचा भारताला फायदा असेल तर अशा वसंतऋतूचे भारताने स्वागत केले पाहिजे पण असा वसंतऋतू आपल्या हिताचा नसेल तर त्या विषयावर गप्प तरी राहिले पाहिजे. मग आपल्या पंतप्रधानांनी विनाकारण तोंड कां उघडले?

शेवटी आपण इस्रायल आणि पॅलेस्टाईन या विषयांवर येऊ या. इथे पॅलेस्टाईनला समर्थन देण्यापर्यंत टाकलेली पावले ठीकच वाटतात. पण आपले पंतप्रधान जेवढे ठामपणे याबद्दल बोलले त्याची गरज नव्हती. अमेरिकेने पॅलेस्टाईनला सध्या तरी एका स्वतंत्र राष्ट्राचे स्थान देण्यास मान्यता दिली नसताना आपण असे ठामपणे काय म्हणून बोलायचे? अशा परिस्थितीत "इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांनी परस्परसंमत असा ठराव करून हा प्रश्न सोडवावा" असे गुळमुळीत निवेदन करणे भारताच्या जास्त हिताचे नव्हते कां? आज ना उद्या चीनबरोबर आपला संघर्ष अटळ आहे. आपल्यात युद्ध जुंपणारच आहे. त्यावेळी आपल्या बाजूने कोण उभे राहील? सौदी अरेबिया? मध्य-पूर्वेतील इतर तेलोत्पादक राष्ट्रे? मुळीच नाहीं. कुणी उभे राहिलेच तर ते राष्ट्र असेल फक्त अमेरिका. युरोपमधील राष्ट्रें त्यांच्या स्वत:च्या दिवाळखोरीमुळे चीनला मस्का लावायच्या तयारीत आहेत. इटलीने आपले ट्रेझरी बॉन्ड चीनला विकायची तयारी दर्शविली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या विरुद्ध मत व्यक्त करूनच सिंग थांबले नाहींत तर "पॅलेस्टाईनची राजधानी जेरुसलेम असावी" इथपर्यंत बोलून इस्रायलला (आणि अमेरिकेला) दुखवायची काय गरज होती?

इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत पाकिस्तानचा अण्वस्त्र बनविणाचा कहूता प्रकल्प बाँबहल्ला करून उडविण्याच्या प्रत्यक्ष भाग घेऊन आपल्याला मदत करण्याची तयारी इस्रायलनेच दर्शविली होते हे आपण कसे विसरू शकतो?

अलीकडे तर चीनची "नियत" जास्त-जास्तच उघड होऊ लागली आहे. चीनने अरुणाचलप्रदेश या आपल्या एका राज्यावरच्या त्याच्या हक्काचा हेका अद्याप सोडलेला नाहीं. चीनने आपल्या दोन देशातील सरहद्दीवर चीनच्या बाजूने हमरस्ते बांधलेले आहेत पण आपण बांधायला गेलो तर आपल्याच हद्दीत येऊन आपल्याला तसे करण्याला त्यांचे सैन्य मनाई करते (आणि आपण माघारही घेतो). आपल्या उत्तरेकडील सीमेवर आपल्या जवानांना दमदाटी चालूच असते[*३]. अशा परिस्थितीत उद्या जेंव्हां आपले आणि चीनचे युद्ध पेटले (ते पेटणारच आहे!) तर आपल्या मदतीला कोण येईल? पाकिस्तान? तो तर वहात्या गंगेत हात धुवून घ्यायला चीनच्या बाजूने आपल्याविरुद्ध युद्धात उतरेल. मध्य-पूर्वेतलाही कोणीही आपली विचारपूस करायलासुद्धा येणार नाहीं. मग त्यांची भलावण करून आणि ते करताना अमेरिकेला आणि इस्रायलला दुखवून आपण काय मिळविले? आपल्या हातात अशाने धुपाटण्याशिवाय कांहींही उरणार नाही!

म्हणूनच मनात आले कीं उद्या सुपरपॉवर बनण्याचे सामर्थ्य असलेल्या देशाच्या नेत्याला आपले तोंड कधी उघडायचे व कधी बंद ठेवायचे याचे भान असले पाहिजे. आणि चुकून नको तिथे तोंड उघडले तर कमीत कमी आपल्या पायाचा अंगठा तरी त्या उघड्य़ा तोंडात घालायचे त्याने टाळावे!
------------------------------------------------------------------
[*१] या कटाच्या सूत्रधारास जन्मठेपेची शिक्षाही झाली होती पण अलीकडेच त्याला "त्याचा मृत्यूकाल जवळ आलेला आहे" या सबबीखाली ब्रिटिश (कीं स्कॉटिश?) सरकारने अत्यंत संशयास्पद परिस्थितीत दया म्हणून वेळेआधीच मुक्त केले. (पण तो पठ्ठ्या अद्याप जिवंत आहे!)
[*२] अलीकडे पाकिस्तानातील शियांच्या कत्तलीमुळे इराणमधील परिस्थिती जराशी बदलत आहे असे वाटते. तसेच सद्दामनंतरचा सध्यातरी स्वत:च्याच जखमा चाटत आहे.
[*३] या घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे भूतपूर्व मुख्यमंत्री आणि आजचे एक केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला (Lion of Kashmir शेख अब्दुलांचे सुपुत्र)यांनी "हिवाळा संपून उन्हाळा येऊ दे मग मी जाऊन चिन्याना असा सज्जड दम मारेन कीं....." अशी "उत्तर" छापातली सिंहगर्जनासुद्धा केली होती. (उन्हाळा आता संपलाच आहे आणि मी बापडा अजून या चिन्यांच्या हृदयात धडकी भरविणार्या आणि त्यांच्या "धोतरांची पीतांबरे" करू पहाणार्या "अललडुर्र" गर्जनेची वाट पहात आहे!) या घटनेचा मला वैयक्तिक पातळीवर एक फायदा झाला कारण मला शाळेत शिकतांना माहीत झालेली पण दरम्यानच्या काळात विसरलेली मोरोपंतांची खालील आर्या आठवली.
कुरुकटकासि पहाता तो उत्तर बाळ फार गडबडला
स्वपरबलाबल नेणुनी बालिश बहु बायकात बडबडला!
------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

चान्गला लेख, आमच्या नेत्यान्चे असले अवसानघातकी वक्तृत्व ही काही आजची रड नाहीये

In politics, there are no permanent enemies or friends. Our interests are eternal and perpetual, and those interests it is our duty to follow. इति Lord Palmerston (Henry John Temple)

मी असे ऐकले की पं नेहेरूंपासून भारताला (म्हणजे भारतातल्या राजकारण्यांना) आपण जगात न्यूट्रल राष्ट्रांचे, थर्ड वर्ल्ड देशांचे नेते असावे (किंवा आहोतच) असे वाटत आले आहे! म्हणूनच जगात काहीहि करण्याची ताकद नसली, यांच्या बोलण्याकडे कुणि लक्ष देत नसले, तरी बोलण्याची हौस फिटत नाही.

आता मध्यपूर्वेतील 'वसंत ऋतु' चा भारताला फायदा होण्याची संधि आहे, कारण तिथे देश उभारणीसाठी भारताच्या अनेक कंपन्यांना, माल पुरवणे, कंस्ट्रक्शन इ. गोष्टींसाठी व्यापारी संधि आहे. त्यासाठी इस्राएल, अमेरिकेला नावे ठेवण्यात फायदा आहे. एकंदरीतच केवळ बोलणे, लिहीणे या पलीकडे काही 'करणे' भारतीयांना येतच नाही. त्यामुळे इस्राइल, अमेरिका भारताच्या बोलण्याकडे काडीचेहि लक्ष देत नाहीत!

अमेरिकेला भारतातला फक्त पैसा पाहिजे आहे. तेव्हढ्यासाठी ते वरकरणी भारताची स्तुति करतात, विक्रेते जसे संभाव्य ग्राहकाची करतात तसे. आता भारतातले लोक अमेरिकेला मदत करतात आय टी मधे वगैरे, पण ते काही इथल्या लोकांना येत नाही म्हणून नाही. नाहीतरी सगळे इथूनच सुरु झाले. स्वस्तात मस्त मिळत असेल तर का सोडा म्हणून भारतीय. भारतातल्यांनी नाही म्हंटले तर चिनी आहेत, युरोपियन आहेत. गेला बाजार, मेक्सिकनांना पण शिकवता येईल!!

भारतातल्यांना अमेरिकन व्हिसा मिळायला त्रास, मेक्सिकन बेकायदेशीरपणे घुसले तरी त्यांना नागरिकत्व! कारण भारतातले लोक हुषार, ते काही बुश, पेलिन किंवा इतर राजकारण्यांना केवळ रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट म्हणून मते देणार नाहीत!!
तेंव्हा एखादा लहान प्राणी जसा हत्तीवर ओरडला तरी हत्ती लक्ष देत नाही, तसे भारताने खुषाल अमेरिकेविरुद्ध बोलून घ्यावे, जगात त्याचा इतरत्र फायदा होत असेल तर का सोडा!

सुधीरजी, चांगले विश्लेषण आहे. तुमचे लेख नेहमी वाचनीय असतात.

त्यामुळे इस्राइल, अमेरिका भारताच्या बोलण्याकडे काडीचेहि लक्ष देत नाहीत!
>>
अहो झक्की, अमेरिका वगैरे तर फारच लांबची गोष्ट. आपल्या शेजारचे पाकिस्तानसुद्धा आपल्याला भीक घालत नाही. आपल्या राजकारण्यांपेक्षा पाकिस्तानचेच राजकारणी जास्त चर्चेत असतात नेहमी. ती अलीकडेच परराष्ट्रमंत्री झालेली हीना रब्बानी खार, इकडे तिकडे जाऊन भेटीपण देऊन आली. आता जगातल्या ५०% लोकांना तरी ती बातम्यांमधून कळली असेल. पण आपले वयोवृद्ध परराष्ट्रमंत्री कृष्णा हे भारतातल्या ५०% लोकांनासुद्धा माहीत नसतील. जर कधी त्यांची बातमी आलीच तर ती 'चुकीचे भाषण वाचले' असली येते.

ती हीना रब्बानी एकतर आहे तरूण, त्यात दिसायला सुंदर. तिला नुसते पाहूनच आपल्या श्रीकृष्णांचे अवसान गळेल, तिथे मुत्सद्दीपणा, वाटाघाटी वगैरे तर सोडूनच द्या. Proud

<<
या घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे भूतपूर्व मुख्यमंत्री आणि आजचे एक केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला (Lion of Kashmir शेख अब्दुलांचे सुपुत्र)यांनी "हिवाळा संपून उन्हाळा येऊ दे मग मी जाऊन चिन्याना असा सज्जड दम मारेन कीं....." अशी "उत्तर" छापातली सिंहगर्जनासुद्धा केली होती. (उन्हाळा आता संपलाच आहे आणि मी बापडा अजून या चिन्यांच्या हृदयात धडकी भरविणार्या आणि त्यांच्या "धोतरांची पीतांबरे" करू पहाणार्या "अललडुर्र" गर्जनेची वाट पहात आहे!)
>>
Lol फार हसलो. अहो पण हे काही नवीन नाही. पार गांधींजींपासून भारतीय राजकारणी हेच करत आलेत.

>>> उदाहरणार्थ, लिबियाशी आपल्याला काय देणे-घेणे आहे?

वा! असं कसं. लिबियाशी पंगा घेतला तर भारतातले त्यांचे भाईबंद रागावून मते द्यायचे नाहीत.

>>> केवळ आपण त्यांच्या बाजूचे आहोत असे मध्यपूर्वेतील राष्ट्रांना दाखविण्याखेरीज आपल्याला त्यात काय मिळाले? आणि आपण कुणाच्या बाजूने उभे आहोत याची या सर्व मध्यपूर्वेतील राष्ट्रांना कांहींतरी पर्वा आहे का? सौदी अरेबिया, संयुक्त अमिराती (अलीकडेपर्यंत दाऊदला आश्रय देणारे यजमानराष्ट्र), इराण[*२], इराक, सीरिया, अशी बहुतेक सर्व मध्यपूर्वेतील राष्ट्रें आपल्यापेक्षा पाकिस्तानलाच जास्त जवळचा मानत होती. मग आपल्याला या राष्ट्रांबद्दल सहानुभूतीपूर्वक धोरण ठेवायची काय गरज आहे?

ही अक्कल भारतीय सत्ताधार्‍यांना कधीच आली नाही. दरवर्षी इस्लामिक परिषदेत "काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे" असा ठराव मांडून तो मंजूर करण्यामध्ये सौदी अरेबिया आघाडीवर असतो. पण आपण कायम त्यांचीच चाटत राहतो.

>>> इथे पॅलेस्टाईनला समर्थन देण्यापर्यंत टाकलेली पावले ठीकच वाटतात. पण आपले पंतप्रधान जेवढे ठामपणे याबद्दल बोलले त्याची गरज नव्हती.

आपल्या पंतप्रधानांना भारतात ठामपणे बोलायची परवानगी नाही. म्हणून ठामपणे बोलण्याची परदेशात संधी घेतली असणार.

>>> अशा परिस्थितीत अमेरिकेच्या विरुद्ध मत व्यक्त करूनच सिंग थांबले नाहींत तर "पॅलेस्टाईनची राजधानी जेरुसलेम असावी" इथपर्यंत बोलून इस्रायलला (आणि अमेरिकेला) दुखवायची काय गरज होती?

भारतात इस्राईलचे भाईबंद किती आणि पॅलेस्टाईनचे किती हा विचार करा ना. कुठली मतपेढी मोठी आहे.

>>> मध्य-पूर्वेतलाही कोणीही आपली विचारपूस करायलासुद्धा येणार नाहीं. मग त्यांची भलावण करून आणि ते करताना अमेरिकेला आणि इस्रायलला दुखवून आपण काय मिळविले? आपल्या हातात अशाने धुपाटण्याशिवाय कांहींही उरणार नाही!

अनुमोदन!

>>> म्हणूनच मनात आले कीं उद्या सुपरपॉवर बनण्याचे सामर्थ्य असलेल्या देशाच्या नेत्याला

Rofl भारताला आंतरराष्ट्रीय जगतात कोणताही देश फारशी किंमत देत नाही. असा देश कसा सुपरपॉवर बनेल?

एकंदरीत नेहमीप्रमाणे चांगला लेख! भारतीय राज्यकर्त्यांचा मूर्खपणा दिसण्याची ही काही पहिली वेळ नाही आणि शेवटची पण नसेल.

सौदी अरेबिया आघाडीवर असतो. पण आपण कायम त्यांचीच चाटत राहतो.

त्याशिवाय तेल कोण देणार? इस्राएल देणार आहे का तेल?
भारत गेली ६४ वर्षे 'प्रगतीके पथपर' आहे, अमेरिकेची कॉल सेंटर्स, प्रोग्रॅमिंग भारतात होते, त्यासाठी लागणारी उर्जा भारतात असणे आवश्यक आहे. ती तेलातून मिळते. सौर उर्जा वगैरे मधील संशोधन करायचे तर अमेरिका किंवा युरोपियन कंपन्याच करणार, म्हणजे भारतीय शास्त्रज्ञ भारतात ठेवून, स्वस्त नि मस्त पडते म्हणून. भारतीय शास्त्रज्ञांना सुद्धा परकीय देशांसाठी संशोधन करण्यात जास्त पैसे मिळतात. त्यातून तयार झालेल तंत्रज्ञान मग अमेरिका युरोपच्या मालकीचे होते, ते चोरून आणता आले नाही तर विकत घ्यावे लागते, त्याला परकिय चलन पाहिजेच. त्या प्रकल्पातून भारताला भरपूर परकीय चलन मिळते, त्याचा उपयोग नक्कीच भारताला होतो.
तेल नाही मिळाले तर हे होणार कसे?
अमेरिकेला आणि इस्रायलला दुखवून आपण काय मिळविले?
त्याची अज्जिबात काळजी नको, मनावर घेत नाहीत ते. त्यांना भारतीय राजकारण सरकार यांच्या पाठिंब्याची अजिबात आवश्यकता नाही, काही उपयोग नाही.
त्यांना फक्त हुषार भारतीय नि त्यांनी मिळवलेले पैसे हवे आहेत. त्यासाठी त्यांना माहित आहे, योग्य व्यक्तींना पैसे दिले की झाले, मग भारत असो की इतर कुठला देश. राजकीय मत काही का असेना!

लेखातील विचारांशी १०० % सहमत.

वैचारिक दिवाळखोरी दिसण्याची हि पहिली वा शेवटची घटना नसणार आहे. सुरक्षा समिती सारख्या अत्यंत महत्वाच्या बैठकीत आपले वयोवृद्ध परराष्ट्र मंत्री दुसर्‍याच राष्ट्राच्या मंत्र्याचे भाषण वाचत होते, काही वेळानंतर त्यांना त्यांची चुक भारतीय अधिकार्‍यांनी नजरेस आणली.... या मंत्र्याला कसली चुक केल्याची भावना नाही वा त्याबाबत लाज नाही (चुक केलीच नाही असे वाटत असेल तर लज्जा वा क्षमा कसली मागायची).

वज्र३००साहेब, अगदी याच 'थाटात' कुठला कागद पुढे ठेवलाय हे न पहाता आपल्या या वयोवृद्ध (आणि ज्ञानवृद्ध?) परराष्ट्रमंत्र्यांनी अशीच त्यांच्या कार्यवाहाने कांहीं दुसर्‍याच कामासाठी समोर ठेवल्यावर ठेवलेल्या 'त्या' कागदावर (तो न वाचता) सही ठोकून तो कागद पंतप्रधानांच्य कार्यालयात पाठविल्याने चिदंबरमसाहेबांची पोल खोलली गेली असावी! कधी-कधी वाईटातून चांगले निघते ते असे!!
जय हिंद!

फचिनसाहेब, आपण नेहमीच माझ्या लेखनाचे कौतुक करता. त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. अशा प्रोत्साहनामुळे लिहिल्याचे सार्थक होत आहे हे सुद्धा मला जाणवते.
पुनश्च धन्यवाद.

झक्कीसाहेब, आपल्या पहिल्या प्रतिसादावरचे माझे भाष्य!
तुम्ही लिहिले आहे कीं "आता मध्यपूर्वेतील 'वसंत ऋतु' चा भारताला फायदा होण्याची संधि आहे", मग आपले पंतप्रधान गद्दाफींच्या बाजूने कां बोलले? जर नाटो राष्ट्रे मधे न पडती तर या बंडखोरांचे बंड गद्दाफींनी चिरडून टाकले असते. पण सिंगसाहेबांना नाटो राष्ट्रांचा हस्तक्षेप आवडला नाहीं. म्हणून तर त्यांचे भाषण आपल्या दीर्घकालीन हिताचे नाहीं असे मी लिहिले आहे!

फचिन-जी,
आपले ती हीना रब्बानी एकतर आहे तरूण, त्यात दिसायला सुंदर. तिला नुसते पाहूनच आपल्या श्रीकृष्णांचे अवसान गळेल, तिथे मुत्सद्दीपणा, वाटाघाटी वगैरे तर सोडूनच द्या. हे वाक्य वाचून मला हीनाच्या भेटीच्या वेळचा एक व्हीडियो आठवला. कृष्णासाहेबांनी हस्तांदोलन करण्यासाठी तिचा हात जो पकडला तो सोडायलाच ते तयारच नव्हते. मला तर गाईडमधल्या "ओ मेरे हमराही, मेरी बाह थामे चलना" या गाण्याची आठवण झाली!

काळे साहेब. तुम्ही आता मनमोहनसिंग ना "बाप्पाक, तिडा बोले लाह" म्हणून एक चपात चपात सूरत पाठवा. :):)

पण राजकारणात खायचे आणि दाखवायचे दात निराळे असतात. त्यामुळे आतून अमेरिकेला तुमच चालू दे असही सांगायला ते विसरले नसतील.

दुसरा मुद्दा अमेरिकेच्या अरेरावी चा. सद्दाम काय किंवा गडाफी काय. दोघेही क्रूरकर्मा हुकुमशहा असले तरी त्यांना हटवायच्या नावाखाली लादलेली युद्धे (आणि त्यात मेलेले हजारो निरपराध नागरीक) कसे काय सनर्थनीय ठरतात.
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो.

गड्डाफीने त्याच्या लोकांवर केलेले अन्वनीत अत्याचार दिसणार नाहीत, त्याने केलेले अत्याचार निमुटपणे लिबीयन्सनी ३५ वर्षे झेललेत ना...

व्यवहार आणि देशाचे हित कशात आहे ? आज- ना उद्या गड्डाफी हे बुडणारे जहाज आहे... प्रश्न आहे किती तास? मग लाखो निरपराधी लिबीयन्सवर अन्याय करुन, हमखास बुडणार्‍याचा हात का धरावा? काय शहाणपणाचा विचार किंवा देशाचे हित साधले जाते आहे?

गड्डाफीचे बिलीयन $$ वेगवेगळ्या बँकात आहेत... त्यात कुणाचे (किंवा पक्षाचे) आर्थिक हित दडलेले आहे का? कॅनडाने, अमेरिकेने त्याचे आर्थिक खाती गोठवली आहेत.

दोघेही क्रूरकर्मा हुकुमशहा असले तरी त्यांना हटवायच्या नावाखाली लादलेली युद्धे (आणि त्यात मेलेले हजारो निरपराध नागरीक) कसे काय सनर्थनीय ठरतात.
----- सद्दाम थोडा वेगळा विषय आहे, तेथे निव्वळ अमेरिका हित किंवा स्वार्थ हाच विचार होत. पण मुबारक किंवा गड्डाफी हे जा म्हटल्याने जाणार नाही आहे... ते गेल्याने दु:ख व्यक्त करण्यासारखा मुर्खपणा दुसरा नसणार आहे. त्यांनी अन्वनीत अत्याचार केलेले आहेत. ३०-४० वर्षे जनतेला काही पर्यायच नाही.... आता ते नैसर्गिक रितीने गचकतील अशा एकमेव आशेवर जनता जगत होती... पण पुढे त्याचा मुलगा सत्ता सुत्रे हाती घेत होता... म्हणजे अजुन पुढची ४० वर्षे एकछत्री अंमल...

मला शहाणपणापेक्षा (कुणाचे तरी?) $$ हित दिसते आहे. Sad

मास्तुरेसाहेब,
भारतीय लोकांची कल्पकता आणि निर्मितीक्षमता इतकी उदंड आहे कीं कुणाचेही सरकार सत्तेवर असो भारत महासत्ता नक्कीच बनणार. Not because of the government we have, but in spite of it!

विक्रम-जी, "बापा, जांगान बिचारा लाSSSS" असे पत्र मी केंव्हाच पाठविले. आपण नेहमीच चपत-चपत असतो! हाहाहा!
खरे तर माझ्या या लेखाची आंग्ल आवृत्ती पणजीहून प्रसिद्ध होणार्‍या "नवहिंद टाइम्स"मध्यें आज प्रसिद्ध झाली त्याचा पूर्ण तर्जुमाच पाठविला बिचार्‍याना! वाचा म्हणावे!!

झक्कीसाहेब,
त्याशिवाय तेल कोण देणार?
"तू नहीं और सही, और नहीं और सही" या न्यायाने सौदी नाहीं तर आणखी कुणी तरी तेल देईलच आपल्याला. आणि सौदी अरेबियासुद्धा तेल देताना आपल्याला कांहीं डिस्काउंट नाहीं देत. अगदी ठणठण मोजून घेतो आणि मगच तेल देतो. तेंव्हा तेलासाठी कुणाला 'तेल लावायची' गरज नाही!

"भारतीय लोकांची कल्पकता आणि निर्मितीक्षमता इतकी उदंड आहे कीं "
ते काय विचारता? गेल्या पन्नास वर्षात जगातले सगळे शोध भारतीयांनी भारतात राहून लावले. संगणक, इलेक्ट्रॉनिक्स, निरनिराळ्या रोगांवरील औषधे इ. इ.
अनेक जागतिक प्रकल्प त्यांनीच सुरु केले, जसे फेसबूक, ट्विटर, गूगल. उत्पादन क्षमता तर विचारूच नका. अमेरिकेने धंदा दिला तर चीनला मागे टाकतील. पण काय करणार, अमेरिका देतच नाही!!
पण 'भारत महासत्ता नक्कीच बनणार', कधी ते माहित नाही!! पण आत्तापासून ओरडा आरडा करायला हरकत नाही. नाहीतरी कुणि लक्ष देतच नाहीत!!
या न्यायाने सौदी नाहीं तर आणखी कुणी तरी तेल देईलच आपल्याला
ते देतील तेंव्हा आपण त्यांचे पाय चाटू, तोपर्यंत तर सौदीच आहेत ना!

काळे, तूमची कळकळ आणि पुढचा विचार करायची वृत्ती मला फार आवडते.
पंतप्रधानांचे भाषण व त्याचा मसुदा यावर आधी चर्चा झाली नसेल का ? कुणालाही हे मुद्दे सूचले नाहीत का ? का ते उस्फुर्त बोलले ? (शक्यता कमीच आहे.)

(१) दिनेश-दा आणि इतर प्रोत्साहकांना मनापासून धन्यवाद.
आज माझा हा लेख ई-सकाळवर प्रकाशित झाला आहे. लिंक आहे:
http://72.78.249.107/esakal/20110929/5185345686201852398.htm
वाचकांचे प्रतिसादही वाचण्यासारखे आहेत.
(२) झक्कीसाहेबः अर्ध्याच भरलेल्या प्याल्याला 'अर्धा भरलेला' म्हणायचे कीं 'अर्धा रिकामा' म्हणायचे? आपले प्रतिसाद बर्‍याचदा असे वाटतात. जकार्ताचीच गोष्ट सांगतो. इथल्या पोलाद कारखान्यांच्या मालकांनी (जे मुख्यतः चिनी वंशाचे इंडोनेशियन नागरिक आहेत) जर्मन, जपानी, कोरियन, तैवानी अशा वेगवेगळ्या देशांतील विशेषज्ञांची पारख करून शेवटी आज जवळ-जवळ सगळे पोलाद कारखाने भारतीय Metallurgists अतीशय उत्तम रीतीने चालवत आहेत याचा मला अभिमान वाटतो. आपण असे स्वतःला कमी लेखू नये असे वाटते. भारतीय लोक खरेच कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीतून गडबडून न जाता लढाऊपणाने मार्ग काढतात व विजयी होतात हे अभिमानास्पद आहे. (कृपया रागवू नये)
धन्यवाद.

सुधीर आपले हार्दिक अभिनंदन, सकाळने आपला लेख प्रसिद्ध केला हे विशेष आहे, कारण आपण जाणताच की काही माध्यमे फक्त ठराविक विचारांचे लेख व बातम्या देत असतात. पुढील लेखनासाठी शुभेच्छा !
(सकाळला पण धन्यवाद)

फारच छान लेख...
अभिनंदन काळेसाहेब...तुमच्या अभ्यासपूर्ण लेखातून अनेक गोष्टी माहीती झाल्या...
बाकी आपले पंतप्रधान फक्त गुळमुळीतच बोलू शकतात असे वाटत होते. त्यामुळे ते असे कुणाला (चुकीचे का असेना)ठकणावून बोलले हे पाहून आश्चर्य वाटले...
सदैव मान खाली घालून आणि कसलीही जबाबदारी न घेणाऱ्या एखाद्याने उगाचच रस्त्याने जाणार्या पैलवानाला
काय रे उगाच मस्ती करतोस का...देऊ का कानाखाली असे विचारावे तसला प्रकार म्हणायचा हा

>>> भारतीय लोकांची कल्पकता आणि निर्मितीक्षमता इतकी उदंड आहे कीं कुणाचेही सरकार सत्तेवर असो भारत महासत्ता नक्कीच बनणार. Not because of the government we have, but in spite of it!

काळेसाहेब,

भारत महासत्ता व्हावा हे सर्व भारतीयांचे (त्यात मी पण आहे) स्वप्न आहे. भारतीयांमध्ये महासत्ता बनण्याची नक्कीच क्षमता आहे. परंतु महासत्ता वगैरे फार लांबचे दिवास्वप्न वाटते.

ज्या देशाला स्वत:च्या नागरिकांचे रक्षण करता येत नाही, स्वत:च्या सीमांचे रक्षण करता येत नाही, मित्र-शत्रू ओळखता येत नाही, शत्रूच्या नजरेला नजर देता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या देशाजवळ स्वतःच्या व देशातील नागरिकांच्या हिताचे कोणतेही धोरण नाही, तो देश महासत्ता बनेल असे वाटत नाही.

हा कदाचित तुम्हाला निराशावाद वाटेल, पण पोकळ आशावाद ठेवून वस्तुस्थिती बदलत नाही.

ज्या देशाचे नागरिक भाजपला सत्ता देत नाहीत , जे राष्ट्र अयोध्येत राममन्दीर बांधू शकत नाही, तो देश महासत्ता कदापि बनणे शक्य नाही .... (हे वाक्य अ‍ॅड करायचे राहिले वाटते)

कित्येक ठिकाणी एकाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याने तोंड उघडण्यापेक्षा ते बंद ठेवणेच त्या देशाच्या दीर्घकालीन हिताचे असते. काल संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना आपले पंतप्रधान आपले तोंड बंद ठेवण्याबद्दलचे "पथ्थ्य" पूर्णपणे विसरले असेच मला वाटले.

वा!
काळे काकां ना आपण 'हिंदूस्थानचे' सर्वोच्च नेते डिक्लेअर करू यात का, मतदान करून? म्हणजे हे सर्वोच्च नेते होतील, मग तोंड बंद ठेवतील? डायरेक्ट पथ्थ्य अन दीर्घकालीन हित साध्य होईल?

बाकी चाळू द्या.
(चालू द्या नाही. चाळू द्या)

>> बाळू जोशी. | 29 September, 2011 - 22:46 नवीन

ज्या देशाचे नागरिक भाजपला सत्ता देत नाहीत , जे राष्ट्र अयोध्येत राममन्दीर बांधू शकत नाही, तो देश महासत्ता कदापि बनणे शक्य नाही .... (हे वाक्य अ‍ॅड करायचे राहिले वाटते)
<<
हो
बहुधा राहिलेच असावे. चीनमधे भाजप च्या नव्हे, त्या "शाखा" उघडल्यात म्हणे? नॉस्ट्रॅडॅमस ने सांगितलंय ना? पूर्वेकडील देश? महासत्ता? की काय ते?

त्या मनमोहन सिंगाला काय अक्कल हो? तो तर एक सोनिया भक्त? कुणी इतका मोठा केला? ती सोनिया.. खी:
असो..
त्या विधात्याने अक्कल वाटली तेंव्हा सगळे जकार्ता पोस्ट चे लेखक फक्त भांडी घेउन गेले. बाकी मूर्ख! चाळणी नेली?
(तो बरिक हुश्शार हो! त्याने लेखकांना liquid वाढले, अन अम्हा कमनशिब्यांस solid!)

आशुचँप | 29 September, 2011 - 21:59

फारच छान लेख...
अभिनंदन काळेसाहेब...तुमच्या अभ्यासपूर्ण लेखातून अनेक गोष्टी माहीती झाल्या...
बाकी आपले पंतप्रधान फक्त गुळमुळीतच बोलू शकतात असे वाटत होते. त्यामुळे ते असे कुणाला (चुकीचे का असेना)ठकणावून बोलले हे पाहून आश्चर्य वाटले...
सदैव मान खाली घालून आणि कसलीही जबाबदारी न घेणाऱ्या एखाद्याने उगाचच रस्त्याने जाणार्या पैलवानाला
काय रे उगाच मस्ती करतोस का...देऊ का कानाखाली असे विचारावे तसला प्रकार म्हणायचा हा

टाळ्या!

त्या विधात्याने अक्कल वाटली तेंव्हा सगळे जकार्ता पोस्ट चे लेखक फक्त भांडी घेउन गेले. बाकी मूर्ख! चाळणी नेली?
(तो बरिक हुश्शार हो! त्याने लेखकांना liquid वाढले, अन अम्हा कमनशिब्यांस solid!) >>>>

अनावश्यक काँमेंट. काहीच गरज नाही.

काळ्यांना काय वाटले ते त्यांनी मांडले. ते देखील ह्या देशाचे नागरीक आहेत व त्याचे म्हणने योग्य शब्दात मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. तुम्ही अक्क्ल व्यक्तीची (लेखकाची) काढत आहात. मनमोहन हे देशाचे पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्याबद्दल चांगले / वाईट बोलायचा अधिकार प्रत्येकाला आहे.

काळे काकां ना आपण 'हिंदूस्थानचे' सर्वोच्च नेते डिक्लेअर करू यात का, मतदान करून >>> तुमचे हिंदूस्थानाचे काय जे असेल ते इथे आणू नका, तसे अनेक बाफ आपण आणि जामोप्यारावांनी काढले आहेत, आम्हाला इथेही तेच वाचायचे नाही. त्या त्या बाफवर चालूदेत. एवढेच वाटले तर कृपया लेखावर मत द्या. मनमोहन का बरोबर आहेत असा युक्तीवाद करा. (म्हणजे निदान तुम्ही मुद्यांनिशी प्रतिवाद करता असे आम्हास कळेल)

ते बाकी बरोबर आहे हो केदार साहेब.
इथे फक्त येउन मी गरळ ओकले हो.. गरळ ओकणार्‍यांची लेव्हल कळावी म्हणून ते लिहिले.

पण ना,
या देशाचा पंतप्रधान बोलतो, तेंव्हा त्याच्या पाठीमागे 'आय.ए.एस.' 'आय एफ एस' वै अधिकार्‍यांची फौज उभी असते. ते जे आय ए एस असतं ना? ते जssssरा कठिण असतं पास व्हायला. ते 'सनदी अधिकारी' सांगतात त्या आधारावर 'हा' बोलतो. त्यात त्याचं स्वतःचं पण मत असतं. तो 'पंतप्रधान' आहे. कुणी ऐर्‍या गैर्या नत्थू खैर्‍या नाही, की कुणीही उठावे अन काय वाट्टेल ते बोलावे, हिम्मत कशी होते अशी प्रस्तावना करायची की याने तोंड बंद ठेवले तर देशाचे भले होईल? 'रॉ' चे प्रमुख या चर्चेच्या प्रस्तावनालेखकांस डायरेक्ट रिपोर्टिंग करतात, की सगळे सनदी अधिकारी? जकार्ता मधे बसून कुण्या वर्तमानपत्राने ४ लेख छापले की सुधींद्र कुळकर्णींसारखी विश्वासार्हता मिळाली काय तुम्हास? भलते अभ्यासू हे? बाकी काय मूर्ख आहेत काय? पंतप्रधानांचे भाषण लिहून देणारे?
म्हणून म्हटले,
आम्ही चाळणी नेली होती. त्याने 'वाटली' तेंव्हा.. यांनी काय नेले ठाउक नाही.

त्यांना वाट्ले, त्यांनी लिहिले. मला वाटले, मी लिहिले? हिशेब कसा झाला?

Pages