ओरिसा: दालमा

Submitted by सावली on 23 August, 2011 - 21:50

हि एक अक्षरशः नेहेमी केली जाणारी ओरिसा मधली पाककृती. मला तर वाटतं किमान दिवसाआड तरी करतच असावेत. त्या त्या मोसमात उपलब्ध असलेल्या भरपुर भाज्या आणि डाळ यांचा वापर असलेली हि पाककृती साध्या शब्दात सांगायची तर "भाज्या घातलेले वरण" अशीच आहे. पण तरिही तीला एक खास चव आहे.

लागणारा वेळ:
साधारण ३० मिनीटे ( भाज्या चिरण्याच्या वेगावर अवलंबुन आहे)

लागणारे जिन्नस:

लागणारे जिन्नस मोसमाप्रमाणे बदलता येतात साधारण पणे टोमॅटो सोडुन सगळ्याच फळभाज्या वापरता येतील. सगळ्या भाज्या अगदी मोठ्ठ्या मोठ्ठ्या फोडी करुन घ्याव्यात छोट्या फोडीचा लगदा होतो.

१. तुरीची डाळ एक वाटी
२. एक मोठा बटाटा
३. तीन मध्यम आकाराची वांगी ( हिरव्या काटेरी वांग्याची चव अप्रतिम येते)
५. एक गाजर ( आवडत असल्यास )
६. लाल भोपळा / दुधी भोपळा/ कोहळा / कच्ची पपयी साधारण आठ दहा मोठ्या फोडी (असल्यास )
७. अरबी दोन तीन ( आळुचे कंद, साली काढुन आणि एकाच्या चार फोडी करुन ) (असल्यास )
८. फरसबी थोडीशी मोठे तुकडे करुन (असल्यास )
९. शेवग्याच्या शेंगा तीन /चार मोठे तुकडे करुन, सालं काढुन (असल्यास )
१०. फोडणीला तेल , मोहोरी, कडिपत्ता
१२ जीरे चार टिस्पुन, लाल मिरच्या दोन ( जास्त तिखट हवे असलयास अधिक)
११. हळद, मीठ चवी पुरते

यातले ५ ते ९ मधल्या कुठल्याही एक/ दोन भाज्या एका वेळी घाला, जास्त अर्थातच चालतील. लाल भोपळ्याने गोडसर चव येते ती आवडत नसेल तर तो घालू नका.

क्रमवार पाककृती:

१. डाळ धुवून छोट्या कुकरमधे घ्या, त्यात नेहेमी प्रमाणे हळद टाका.
२. वरच्या भाज्या धुवून मोठे मोठे तुकडे करुन डाळीत घाला.
३. नेहेमी वरणाला घालतो त्या पेक्षा किंचीत जास्त पाणी घालुन डाळ कुकर मधुन शिजवुन घ्या. नेहेमीच्या वरणाला लागतो तेवढाच वेळ. फक्त अरबी असेल तर किंचीत जास्त वेळ शिजवा. खुप शिजवले तर भाज्यांचा लगदा होतो, तो करु नका. जास्त पाणि घालुन एकदम पातळ पण नको.

४. कुकर थंड होई पर्यंत जीरे आणि लाल मिरच्या वेगवेगळे भाजुन घ्या, छान दरवळ सुटला पाहिजे.
५. आता हे भाजलेले पोळपाट लाटणावर भरडुन / खलबत्त्यात किंवा मिक्सर मधे कोरडेच जाडसर वाटुन घ्या.
६. कुकर थंड झाला की मोहोरी, कडीपत्त्याची फोडणी करा. पंचफोडण, लसुण वापरायचे नाहीये.
७. दालमा उकळायला लागला की वाटलेले जीरे, लाल मिरची पावडर घालून ढवळा आणि एक उकळी आल्यावर बंद करा.
८. गरम गरम जीर्‍याचा दरवळ असणारा दालमा तयार आहे. गरम भाताबरोबर किंवा चपाती बरोबर खाता येईल.

वाढणी/प्रमाण:
तीन माणसांसाठी. ( आपण सहसा वरण फार खात नाही पण हे इथे भाजी प्रमाणे खायचे आहे.)

अधिक टिपा:
१. भाज्यांचे तुकडे लगद न करता शिजवण्यासाठी मोठेच असले पाहिजेत.
२. ओरिसा मध्ये जेवताना या दालमाबरोबर अजून किमान एक पाले भाजी किंवा एक परतलेली भाजी असतेच.
३. जीरा , मिरचीची पावडर आधीच करुन ठेवण्याचा शॉर्टकट वापरु नये कारण दालम्याची चव त्या वाटणामधेच आहे.
४. वांगं आणि बटाटा गरजेचा आहे त्या शिवाय कुठल्याही भाज्या घातलेल्या चालतील, पण नुसत्या वांग बटाट्याचा करु नका, फार चव येत नाही.

माहितीचा आणि शिकवणारा स्रोत:
नवरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है. Happy

एक शंका - दालमा उकळायला लागला की >>>>म्हणजे काय?

पंचफोडण म्हणजे काय ग नक्की? बर्‍याचदा ऐकलंय पण मला माहीत नाही.

वरण फोडणी घातल्यावर उकळतो ना ते, म्हणजे एक उकळी आणतो ना तेच.

पंच फोडण - मोहोरी, मेथी, कलौंजी (कांद्याच्या बिया) , बडिशेप, जीरे सगळे एकत्र केलेले. मात्र यात मोहोरीचे प्रमाण थोडे जास्त असले पाहिजे.

मस्तंच गं सावली..करून बघेन

आता घरात वांगी, बटाटे आणि फरसबी, अरवी, गाजर सगळेच आहे.
फोटो असता तर खरंच अंदाज आला असता.प्ण नक्की करून बघेन.

रैना म्हणते तसे उडिया पदार्थ अजिबात माहित नव्हते ते आता तुझ्या कडून कळतील.

वेगळी पाकृ. आपण वरण जास्त खात नाही, परंतु डॉक्टर्स रोज आवश्यक प्रमाणात डाळ पोटात जायला हवीच असे सांगतात. त्या दृष्टीने हा भाजी + डाळ असा पूरक आहार आहे.

वेगळी कृती. करुन खाणेत येइल Happy अ‍ॅडमिनना सांगून ओरिसा हा पर्याय उपलब्ध करुन घे प्रादेशिक मध्ये म्हणजे तुला रेसिपीच्या शिर्षकात ओरिसा लिहावे लागणार नाही. नाही म्हणजे तुला लिहायचे असेल तर लिही पण ओरिसा पर्याय असला की पाककृत्यांची वर्गवारी नीट होइल Happy

सावली, कालच केली मी हि दाल..बटाटा नव्हता घातला बाकी बर्याच भाज्या घालुन केले. वेगळी आणी छान चव आहे. ह्या पा क्रु बद्दल धन्यवाद!

धन्यवाद Happy
आडो एक्दम मस्त दिसतोय. असाच दिसायला हवा Happy
सिंडरेला ओके सांगते अ‍ॅडमिन ना.
दिनेशदा तिथल्या मिरच्या तिखट असतात का ते खरच माहित नाहि.
अकु हो हा नुसता खायला पण चांगला लागेल पण सुप इतका पातळ नको

सावली, परवा जपान बीबीवर सांगितल्यापासून दोन वेळा करुन झाला. एकदम सुटसुटीत आणि मस्त रेसिपी आहे. थॅन्क्यु.