अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमोल.. अरे मी तुझेपण त्या बीबीवरचे.. ते चित्रपट बघतानाचे ९ का १० नियम(व पोटनियम!).. लिहीले होतेस ते शोधत होतो इथे टाकायला... पण सापडलेच नाहीत.. कृपया तुच परत इथे टाकतोस का?:)

तो बीबी नंदिनीने सुरु करुन धमालच केली. पण श्रद्धा व तु.. तुम्ही दोघांनी मिळुन बर्‍याच (अचाट आणी अतर्क्य )चित्रपटांचे जे रसग्रहण केले होते जुन्या मायबोलिवर..ते पण इथे परत टाकता आले पाहीजेत..

तुर्तास्..परत एकदा श्रियुत उचापती यांच्या या ३ धमाल, अफलातुन पोस्टिंग्स! ज्यांनी वाचल्या नसतील त्यांच्यासाठी... Happy

य़ा बा.फ. वर आधीच्या एका पोष्टमध्य़े जुन्या “नागीन” सिनेमाचा उल्लेख आला आहे त्या विषयी थोडेसे. पण त्या आधी नम्र निवेदन. आठवण बरीच जुनी असल्याने तपशीलांमधे फरक असण्याचा संभव आहे, तेंव्हा CBDG. (फरक फारच असल्यास या “नवीन” कथासुत्रावर एक अजून नागपट काढता येइल. कथा हक्क सुरक्षित.हास्यमुद्रा ).
हा सिनेमा त्यामधील अविट गाण्यांसाठी खूप गाजला. य़ा सिनेमा मध्य़े प्रदीप कुमार व वैजयंतीमाला होते. यात वैजयंतीमाला खूपच गोड दिसली व नाचली ही मस्त! हा व नंतरचे “नागीन” यात नावा व्यतिरीक्त काही साम्य नव्हते. याची कथा सरळ साधी हाड्वैर्‍यां मधील प्रेम कहाणी होती.

प्रदीप कुमार हा एक सपेरा असतो व रोज रात्री जंगलात जाउन नाग पकडून आणत असतो. (आता हा रोज का जातो व पकडलेल्या इतक्या नागांचे काय करतो कोणास ठाउक! वास्तविक एका गारुड्याला 7-8 नाग पुरेसे आहेत. 15-20 म्हणजे डोक्यावरुन पाणी. तो बहुतेक सर्व कबील्याला” सप्लाय करत असावा) कोणताही/कितीही विषारी नाग याच्या पुंगीच्या आवाजाने भारला जाउन याच्या कडे ओढला जातो अशी याची ख्याती असते. वैजयंतीमाला ही नागलोकाची राजकुमारी असते व रात्री सख्यांबरोबर नाइट आउट साठी पृथ्वीवर येत असते. पृथ्वीवर ती व तिच्या सख्यांनां फक्त रात्रीच मानव रुपात वावरता येते. त्यामुळे त्यांनां दिवस उजाडायच्या आत नागलोकात परत जावे लागते. एका रात्री त्या अश्याच पृथ्वीवर येतात तेव्हा प्रदीप कुमार पण नाग पकडायला जंगलात आलेला असतो. त्याच्या पुंगीच्या आवाजाने वैजयंतीमाला भारली जाउन त्याच्या कडे ओढली जाते व त्याच्या समोर पुंगीच्या तालावर नाचते. (बाकीच्या नागकन्या बहीर्‍या असाव्यात कारण फक्त वैजयंतीमालाच भारली जाते). दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. मग काय? रोज दोघांच्या भेटी सुरू होतात. (अर्थातच रात्री). ती नागलोकातली आहे हे कळून देखील प्रदीप कुमारचे तिच्या वरील प्रेम आटत नाही. य़ा भानगडीमुळे तो नाग पकडणे बंद करतो. (सासुरवाडीच्या मंडळींना टोपलीत कसे ठेवायचे?). नागांचा सप्लाय बंद पडल्याने प्रदीप कुमारच्या कबिलेवाले त्याच्यावर भडकतात. ते त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात पण हा ऎकत नाही. ईकडे वैजयंतीमालाच्या सख्यांनां पण ही बाई/नागीण रात्रीची एकटीच गायब होते ते लक्षात येते व त्या पण तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. ती पण ऎकत नाही. मग सपेरे नागांवर व नाग सपेर्‍यावर हल्ले चढवतात. सपेरे वैजयंतीमालाला मारण्याचा प्रयत्न करतात तर नाग प्रदीप कुमारला. शेवटी नागराज (वैजयंतीमालाचा बाप) प्रदीप कुमारला चावतो आणी मारून टाकतो. (अगदी नॉन रीटर्नेबल – म्हणजे नाग परत येउन विष शोषुन जिवंत करतो वगैरे भानगडच नाही).

Uchapatee

Thursday, November 01, 2007 - 9:06 am:

आता वैजयंतीमालाच्या प्रेमाची परीक्षा सुरू होते. प्रदीप कुमारला जिवंत करण्याचा एकमेव उपाय म्हणजे स्वर्गातुन अमृत आणणे. ती स्वर्गात जायला निघते. मग वाटेत लाखो अडथळे. डोंगर-दर्‍या, घनदाट जंगल, इ.इ. शेवटी तिला आगीतुन जावे लागते. तिच्या या तपामुळे देवांची आसने डोलायला लागतात. (अक्षरशः देवांची आसने उल्ट्या पेंडुलमवर असल्यासारखी डोलतांना दाखवली आहेत.) देव मग मुकाट्याने अमृत देउन टाकतात व वर बोनस म्हणुन वैजयंतीमालाला पर्मनंट मानव करुन टाकतात. अशा रीतीने प्रेमाचा विजय होतो.
य़ा सिनेमात माझ्या आठवणीनुसार एकदाही नागाचे मानवात अथवा मानवाचे नागात रुपांतर दाखविले नाही. (बहुदा टेक्निकली शक्य झाले नसावे) वर लिहील्या प्रमाणे यातील गाणी - मन डोले मेरा तन डोले, जादूगर सैया छोडो मोरी बैया, मेरा दिल ये पुकारे आजा, मेरा बदली मे छुप गया चांदरे, उची उची दुनियाकी दिवारे सैया छोडके, ओ जिंदगीके देनेवाले, तेरे द्वार खडा एक जोगी, छोडदे पतंग मेरी छोड दे वगैरे खूपच् गाजली. पण मन डोले विषेशच. हे गाणे व त्यातिल संगीत हे सर्व गारुड्यांनी उचलले. आजही गारुडी म्हटले कि तो “मन डोले” च पुंगीवर वाजवतो. (हे गाणे येण्यापूर्वी ग़ारुडी कोणते गाणे/संगीत वाजवत असावेत? एक भा.प्र). या सिनेमाला संगीत हेमंतकुमार यांचे होते. पाश्वसंगीत कल्याणजींचे होते. (कल्याणजी-आनंदजी जोडी मधले – तेंव्हा ते हेमंतकुमारचे असिस्टंट होते). पाश्वसंगीतामध्ये पुंगीच्या आवाजाचा भरपुर वापर केला गेला पण गंमत म्हणजे खरोखरची पुंगी एकदाही वापरली नाही. क्ले व्हायोलीन नावाचे वाद्य पुंगीच्या आवाजासाठी वापरले होते. नाग़ पुंगीच्या आवाजाने भारला जाउन पुंगीच्या दिशेने खेचला जातो हा भ्रम या सिनेमामुळे बराच पक्का झाला. विषेशतः “मन डोले” ला “नागांना वश करणार्‍या हुकुमी मंत्राचा दर्जा मिळाला. शेतात ट्रांसिस्टर वर मन डोले लाग़ले होते तेंव्हा नाग बिळातून बाहेर ओढला गेल्याच्या आख्याइका पसरल्या होत्या.

नाग पुंगीच्या आवाजाने ओढला जातो या भ्रामक समजुती इतकाच “दुखावला गेलेला नाग/साप डुख धरतो व संधी सधून चावतो” हा समजही होता(आहे). क़ोणत्याही भ्रामक समजुतींवर मुलांचा फार पटकन व दृढ विश्वास बसतो. वरिल समजुतींमुळे आमच्या वाड्यात एक प्रसंग घडला त्याचा किस्सा.

Uchapatee

Thursday, November 01, 2007 - 9:10 am:

आमचा वाडा छोट्याश्या गावातला. वाडा कसला? एक मजली चाळच म्हणायला हवी. एका मागोमाग एक अश्या तिन खोल्याचे (पुढल्या दारात उभे रहील्यास मागल्या परसातिल दिसायचे) एक घर, अशी आठ बिर्‍हाडे एकमेकांना लागुन होती. पुढे सुमारे चार-पाच फूट रुंदीचा कॉमन व्हरांडा. व्हरांडा व घर जमिनीपासुन तिन एक फूट वर असल्याने दोन-तिन पायर्‍या चढुन जावे लागायचे. समोर सुमारे 12-15 फूटाचे अंग़ण तर मागे 15-20 फुटांचे परस होते. वाड्याला चारही बाजुने पाच फूट उंच भिंतीचे कंपाउंड होते. एका बाजुला घराची भिंत व कंपाउंडची भिंत एकाच रेषेत होते तर दुसर्‍या बाजुला पाच फूटाचा पॅसेज होता. तिकडुन अंगणातून सरळ परसात जाता यायचे (मोलकरणीं साठी). अंगणात भिंतीला लागुन चाफा, पारिजात यांची तिन-चार झाडे होती. वावर अंगणातुन असल्याने ते बरेच साफ होते (एक कोपरा अपवाद). आम्ही बच्चे कंपनी अंगणात क्रिकेट, लगोरी लंगडी, इ.इ. खेळ खेळायचो. परसात मोठी झाडे व फारसा वापर नसल्याने बरेच गवत उगवलेले होते.
वाड्यात आठ घरातिल मिळून वेगवेगळ्या वयाची 10-12 मुले असावीत. एक 11 वीत असलेला सतिश दादा नुकताच पेटी शिकत होता. त्याला “मन डोले” हे एकच गाणे पेटीवर वाजवता यायचे. क़ोणीतरी त्याला “तू हुबेहुब वाजवतोस” असे सांगीतल्या मुळे तो सारखे हेच गाणे वाजवुन वाड्यामधिल तायांवर (व असल्यास त्यांच्या मैत्रीणीवर) इंम्प्रेशन मारायचा प्रयत्न करयचा.

Uchapatee

Thursday, November 01, 2007 - 9:14 am:

उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारची वेळ. वडिल मंडळी ऑफिसला गेली होती. सर्व घरातील आया जवळच एका वाड्यात उन्हाळी कामात (पापड, लोणची इ) मदत करायला गेल्या होत्या. त्या मुळे घरात (वाड्यात) मुलांचेच राज्य होते. आम्ही लिंबुटिंबु अंगणात लगोरी खेळत होतो. खेळतांना जोरात फेकलेला चेंडू सरळ घरा समोरील भिंतीजवळ पडलेल्या वाळलेल्या पानांमधे शिरला आणी तिथे काही तरी खसफसले. चेंडू मागे धावणारा मुलगा थबकला व त्याने “ए, त्या पानां खाली बघ काहीतरी आहे” असे म्हणून इतरांना गोळा केले. काय आहे ते बघण्यासठी दोन तीन मुलांनी छोटे दगड उचलुन त्या पानांमधे फेकले. त्या बरोबर त्या पानांखालून सुमारे तीन फूट लांब साप बाहेर पडला. सर्व मुले किंचाळत व्हरांड्यावर चढली. सापही घाबरला असावा त्यामुळे तो वाट मिळेल तसा आणी नेमका चुकीच्या दिशेने म्हणजे पॅसेजच्या विरूध्द बाजुला - शेजारच्या भिंतीच्या दिशेने गेला. तिकडे त्याला लपायला काहीच आडोसा नव्हता. भिंतीला लागून आमचा स्टंम्पचा दगड होता त्या मागे तो लपला. (तो दगड व भिंत या मधिल खोबणीत माती भरून आम्ही काठ्यांचे स्टंम्प उभे करायचो). मुलांच्या ओरडण्यामुळे घरात असलेले दादा व ताई काय झाले ते पहायला बाहेर आली. तायांच्या एक दोन मैत्रीणी पण होत्या. मुलींवर इंम्प मारायची इतकी छान संधी दादा लोक सोडणार नव्ह्तेच. त्यांनी लागलीच घरातून धूणे वाळत घालायच्या काठ्या आणल्या आणी 5-6 दादा अंगणात उतरले. (केवळ अंगठ्या एवढ्या जाड काठ्य़ां नी साप कसा मारणार होते कोणास ठाउक). दगड फरसा मोठा नसल्याने सापाचा काही भाग दिसत होता. सर्व सापाभोवती अर्धगोल करुन (अर्थातच सुरक्षित अंतरावर म्हणजे 5-6 फुटावर) उभे राहीले. एकाने जरा बिचकतच काठीने दगडाला हलवले. इतक्या वेळात त्या सापाला पण आपण सुरक्षित नसल्याचा अंदाज आला असावा. आजुबाजुच्या गडबडीने आधिच अस्वस्थ असलेला साप दगड थोडासा हालल्यावर जिवावर उदार होउन बाहेर पडला आणी सरळ “दादां”च्या दिशेने आला. त्याला पळायला ती एकच बाजु होती. साप आपल्या अंगावर येतोय असे बघताच एकच गोंधळ उडाला. सगळ्यांनी लांब पळत पळत आपापल्या काठ्या आपटल्या. म्हणजे त्यांना सापाला मारायचे होते पण घाबरुन आधी लांब पळाल्यामुळे काठ्या सापापर्यंत पोचल्याच नाहीत. तरी पण प्रत्येकाला आपल्या काठीचा एकतरी फटका सापाला निसटता का होइना पण बसल्याचा साक्षात्कार झाला होता. साप वेढा तोडुन जो निघाला तो सरळ समोरच्या भिंतीला गेला व कडेकडेने कोपर्‍यात गेला. या वेळेला पण त्याने पुन्हा नेमकी चुकीची दिशा घेतली आणी
पॅसेज मधुन परसात जाण्याऐवजी विरुध्द दिशेला (पुन्हा अंगणातच) गेला. क़ोपर्‍यात जरासे भंगार व झाडाच्या तोडलेल्या फांद्याचा ढीग पडलेला होता, त्या मधे तो गडप झाला. आता त्याला लपायला चांगली जागा मिळाली होती. दादा मंडळींची मात्र पंचाइत झाली. त्याला बाहेर कसा कढायचा यावर खल सुरू झाला. भंगार हाताने हलवण्याची कोणाची हिंम्मत नव्ह्ती. एक दोन वेळा काठीने भंगार हलवण्याचा प्रय़त्न झाला, एक दोन दगड देखिल मारले गेले पण साप काही दिसेना. सर्पनिर्दालन मोहीम इथेच थांबविण्यात “मुलींवरील इंम्प” चा प्रश्न होताच, पण त्याही पेक्षा लाख मोलाचा सवाल “सापाने डुख धरला आणी नंतर सुड घ्यायला आला तर?” हा होता. कारण वर लिहील्याप्रमाणे प्रत्येकालाच आपल्या काठीचा फटका सापाला लाग़ल्याचे प्रामाणीकपणे वाटत होते.

Uchapatee

Thursday, November 01, 2007 - 9:17 am:

तशात एकाच्या डोक्यातुन सापाला “मन डोले” वाजवुन बाहेर काढण्याची सुपीक आयडिया आली. आता यात पुंगीची एक बारिकशी अडचण होती, पण पेटी वाजवून प्रयत्न करायला काय़ हरकत? अशा प्रसंगी पेटी वाजवणे सतिश दादाला फारसे मान्य नव्हते (मुलींसमोर हे कसे दिसेल्?) पण भविष्यकालीन संभाव्य सर्पदंशाच्या भितीने (आणी इतर दादांच्या जबरदस्तीने) तो व्हरांड्यात बसुन पेटी वाजवायला तयार झाला. साप लपलेला कोपरा व्हरांड्यापासून बराच लांब असल्याने व्हरांड्यात बसुन वाजवायची आयडिया बाद झाली. सर्वांनी त्याला कोपर्‍याच्या जास्तीत जास्त जवळ वाजवण्यासाठी तय़ार केले. दादा पेटी गळ्यात अडकवुन उभ्याने वाजवू शकत नव्हता (“जंजीर” स्टाइल) आणी जमीनीवर ठेउन बसुन वाजविण्याची छाती होत नव्हती. (साप एकदम अंगावर आला व चावला तर?). शेवटी त्या ढीगाजवळ पेटी एका स्टूलावर ठेउन तोडगा काढण्यात आला.आता दादा उभे राहुन पण वाजवायला तयार होइना. त्याचे म्हणणे मला पाय जमीनीवर नको. (पळायला वेळ मिळायच्या आत जर साप येउन पायाला चावला तर?”). मग एक लोखंडी बिन हाताची फोल्डिंगची खुर्ची त्या स्टूलासमोर मांडण्यात आली. त्यावर दादासाहेब पाय वर घेउन बसले. मांडी घालुन नव्हे तर उकीडवे. (अगदी “त्या” साठी बसतात तसेच. फरक इतकाच की शेजारी “ट्मरेलच्या” ऐवजी समोर पेटी) कारण पळायची वेळ आली तर सोपे. उरलेल्या दादांनी आपापल्या काठ्या परजल्या (बेसबॉल मधला बॅट्स मन डोळ्यासमोर आणा – त्या दांडूने बॉल मारणार्‍याला बॅट्समन च म्हणतात ना?) आणी पेटी वादनाला सुरूवात झाली. सगळे गाणे त्याच्या सर्व कडव्य़ां सकट वाजवून झाले पण परिणाम शून्य. इतरांनी धीर दिला. तू वाजवत रहा, थांबू नकोस. साप बाहेर पडेलच. पण काहीच झाल नाही. शेवटी “नुसते संगीत” नॉन स्टॉप वाजवण्याचा सल्ला दिला गेला तरीही साप बधला नाही. हा प्रकार सुमारे 10-15 मिनीटे चालला आणी सर्व कंटाळायला लाग़ले. शेवटी सापालाच दया आली (की पेटीवादन असह्य झाले?). त्याने अंदाज घेउन सर्व बेसावध असल्याची संधी साधली आणी तो विजेच्या वेगाने बाहेर पडून भिंतीच्या कडेने परसात निघून गेला. दादा मंडळींना कोणतीही हालचाल करायची संधी त्याने दिली नाही. त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला गेला पण तो गवतात कुठे नाहीसा झाला ते कुणालाच समजले नाही. संध्याकाळी वडिल मंडळींच्या कानावर सर्व हकीकत गेली व “तुम्हाला कोणी नस्ते उपद्व्य़ाप सांगीतले” म्हणून बोलणी बसली. मोठ्यांनी समजवून देखिल दादा लोकं 2-3 महिने “साप चावेल” या भितीखाली वावरत होते.
(समाप्त)

Lol
Rofl
पुन्हा वाचुन मजा आली.
काल 'चांदनी चौक टु चायना' अधुन मधुन बघितला.
(१) व्हिलन दिपीका पादुकोण (यापुढे दिपा लिहीन) अक्षयला मारण्यासाठी येते. तिच्याकडे एक डेंजर लिपस्टीक असते.(या दो वाक्यांतील संबंध सुज्ञ, तीक्ष्ण इ. वाचकांच्या लक्षात येईलच.) तीचे ते लिपस्टीकलेले (ल्यायलेले) ओठ चुकुन चादरीला लागतात तर चादर जळुन जाते. नंतर आरशाला लागतात आणि तो चक्काचुर होतो. आता येवढं हे जहाल लिपस्टीक दि पा नी स्वतःच्या ओठांना लावलं आणि तिला ढीम्म काही झालं नाही? असा भयानक बुध्दीमान लोकांना प्रश्न पडणारच! मग उत्तरादाखल दि पा एक प्लॅस्टीक सदृश पातळ आवरण ओठांवरून बाजुला करते. कळलं? म्हणजे कापड, काच यांना त्यांच्या मौतीनं मारणार्‍या या डेंजर पदार्थाचा प्लॅस्टीकवर काहीच्च परीणाम होत नाही.
(२) अक्षय कुमार ५०-६० गुंडांना मारत आहे. दोन जण दोन्ही हातांशी धरून तो स्वतःभोवती गरगर फिरायला सुरवात करतो. अहो आश्चर्य! वावटळीसारखी धुळ उडायला लागते. आजूबाजुचे इतर गुंड त्या झोतांमुळे उचलुन इतस्ततः फेकले, आपटले जातात. जवळपास झाडाचा मागमुसही नसतांना पानं उडु लागतात मात्र रस्त्याच्या कडेची घरं किंवा रस्त्यातल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आपापल्या जागा धरून राहतात. मी उठुन (उडुन नाही) दुसर्‍या खोलीत गेले.
(३) व्हीलनच्या हॅटीत बूमरँग(आयडी नव्हे शस्त्र! सुज्ञ वाचक इ.) सारखं काहीतरी शस्त्र फीट केलेलं असतं. आता ती बूमरँग सारखी फेकुन माणूस जखमी होणं/ मरणं आपण समजु शकतो पण अक्की ती हॅट फेकतो आणि ती जवळजवळ १५-२० इंच जाडीचा दगडी खांब (या खांबावर पुतळा आहे) पावाचा बन मधोमध आडवा चिरावा तसा चिरुन प र त ये ते! आणि मग जेहत्ते काळाचे ठाई भौतिकशात्राचे सगळे नियम धुडकावुन तो पुतळा बरोब्बर व्हिलनवर पडुन त्याचा खातमा करतो.
ज्या कुणी पैसे देवुन, थिएटरमधे जावुन हा सिनेमा पाहीला त्यांच्याबद्दल मला प्रचंड सहानुभुती वाटली.
एक प्रश्नः सिनेमा संपतांना व्हिलन ऐवजी/बरोबर हिरोचाही खातमा व्हावा असं प्रेक्षकाला वाटलं तर सिनेमा नक्की कसा होता?

Lol
आगाऊ, त्या हिफाजतचा शेवट काहिसा अंधुक आठवतोय.
शेवटच्या फाईट मधे अनिल कपुरचे हात रक्ताने माखतात आणि भिंतीवर कि चादरीवर उमटतात. मग लहान बाळाच्या ठश्यांशी जुळवुन त्यांना कळत कि हा घोडा आपलाच बिछडलेला मुलगा आहे. Proud
कणेकर म्हणालेत तसच.. सिनेमाच्या सुरवातीला जर भिंतीवर बंदुक आहे तर त्याचा उपयोग सिनेमाच्या शेवटी झालाच पाहिजे तसचं सिनेमाच्या सुरवातीला रक्ताचे ठसे आहेत तर त्यांचा उपयोग सिनेमाच्या शेवटी झालाच पाहिजे. Proud

ज्या कुणी पैसे देवुन, थिएटरमधे जावुन हा सिनेमा पाहीला त्यांच्याबद्दल मला प्रचंड सहानुभुती वाटली.
>>> सहानुभुतीबद्दल धन्यवाद.

(सासुरवाडीच्या मंडळींना टोपलीत कसे ठेवायचे?). >>>> हे वाचून जे काय हसले होते अशक्य!!

फारेंड आणि श्र, तुमच्या पोस्ट्स पण उचलून इकडे टाका जरा!! फारेंडाचे ते नियम भारी होते. श्रचा धूम२ चा रीव्ह्यु इकडे पेस्ट करायला पाह्यजे. Happy

श्रुती, हा लहान मुलांचा सिनेमा आहे का ? आजकाल ती सुद्धा स्मार्ट असतात. कुठे डोके गहाण ठेवतात, हे हिंदी सिनेमावाले ? मूळात असतेच का त्यांना ते ?

पियाबावरी अल्बममध्ये पायलिया झनकार या बंदिशीवर एक विडिओ अल्बम आहे.... समुद्राच्या काठावर एक तरुण झोपलेला असतो.... एक जलपरी त्याला हात लाऊन निघून जाते... पाण्यात जलपरी पोहत चाललेली आणि बॅकग्राउंडला गाणे.. पायलिया झनकारे मोरी..
हे बघून मला दोन प्रश्न पडले...
१. अर्धे अंग माशाचे असणारी बाई पायात पायलिया घालणार तरी कुठे? आणि कशी?
२. बेंबीखालचे अर्धे अंग माशाचे असणार्‍या बाईला घेऊन तो बाप्या तिला करणार तरी काय? Proud

Rofl

अरे तो अजुन एक अक्षय कुमार, करीना, सैफ, अनिल कपुर चा एक पिक्चर आहे ना .. नाव आठवत नाहिये .. त्यातली अनिल कपुर त्यांना पकडायला येतो ती फाइट .. अशक्य आहे .. सर्व कमांडोजना अक्षय कुमार बिना बंदुकीचं मारतो .. इथे तीथे उड्या मारत Lol

तेलुगु मध्ये तर असे बरेच सापडतात .. एका चिरंजीवीच्या पिक्चर मध्ये तो कंम्प्युटरवर विंडोज मिडीया प्लेयर सुरु करुन माहिती शोधतांना दाखवलाय Lol

असे बरेच आहे .. लिहितो आठवेल तसे ..

सिनेमा: अमानत. संजय दत्त, अक्षय कुमार, इत्यादी.

संजय दत्ताच्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. तो ही हृदयद्रावक कहाणी मुकेश खन्ना या सहृदय माणसाला सांगतो.
एके दिवशी गावात एक कार आणि नि पाठोपाठ दोन ट्रक येऊन थांबतात. कारीतून मुकेश खन्ना उतरतो आणि संजय दत्ताला सांगतो की पाण्याच्या दुर्भिक्ष्याच्या कहाणीने द्रवून जाऊन त्याने त्याच्या गावासाठी दोन ट्रक भरून ट्यूबवेल आणल्या आहेत. Uhoh

आत्ता 'रहना है तेरे दिल मे' चालू आहे.

माधव शास्त्री हा एनआयआयटी वा तत्सम इन्सिट्यूटमध्ये ट्यूटर असतो. पगार फक्त २५००० दरमहा. मग त्याचा बॉस येऊन सांगतो, "तुझा सान फ्रान्सिस्कोचा प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला आहे. पगार १२००० डॉलर्स दरमहा. कधी जाणार तू?" :बेसुद पडता पडता वाचलेली बाहुली:

२००० च्या जागतिक मंदीनंतर सर्वत्र पगार फारच कमी झाले. त्यामुळे आज सिनेमा पाहताना पहिल्यांदा मला २००० नंतर इंजिनीयर झाल्याचे अतिशय दु:ख झाले. Proud

श्रद्धा Lol

अगर मेरी याद्दाश्त सही है तो अजनबी मधे बॉबी देओल आणि करिना च्या मॉरिशस ट्रीपचा खर्च ५०,००० डॉ. असतो Happy

इथे चित्रपटातले अ. आ. सीन टाकायचे अस असल तरी विषयांतर करुन काल मी बघितलेला अ.आ सीन इथे टाकतेय कारण अजीबात रहावत नाहीये: काल स्टार च्या एका मालीकेत (जीच नाव मी बदलुन :गोपी के अत्याचार" अस ठेवलय) त्यात गोपी लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी लॅप्-टॉप ला साबण लावुन, घासुन, नळा खाली अंघोळ घालते आणी मग दोरी वर वाळत घालते Uhoh या मागच लॉजीक तीने कधी लॅपटॉप ह्या वस्तु ला हात लावलेला नसल्याने तीला तो कसा स्वच्छ करावा हे ठाव नसत म्हणुन ती तीच्या देवराणी च्या कटात फसते; ती सांगेल तस करौन लॅप-टॉप धुते Uhoh

>>त्यात गोपी लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी लॅप्-टॉप ला साबण लावुन, घासुन, नळा खाली अंघोळ घालते आणी मग दोरी वर वाळत घालते या मागच लॉजीक तीने कधी लॅपटॉप ह्या वस्तु ला हात लावलेला नसल्याने तीला तो कसा स्वच्छ करावा हे ठाव नसत म्हणुन ती तीच्या देवराणी च्या कटात फसते; ती सांगेल तस करौन लॅप-तॉप धुते << Uhoh हे राम!

फारेण्ड, एकदम जबरी नियम आहेत.

चित्रपट- आर्या (तेलूगु)
या शिनेमात दोन हिरो आणि एकच हिरविण आहे, मेन हिरो त्यागी,दिलदार इ.इ. त्यामुळे तो हिरविणीला दुसर्‍या हिरोबरोबर जाउ देतो. ते जाताना स्वतःला त्रास होउ नये म्हणून झोपेच्या गोळ्या खाउन सुम पडतो. पण व्हिलन येउन हिरो नं.टूला बदडतात, तर अशा 'क्रायसिस'मधे हिरोनंवनचा पाळीव मासा सर्व जोर लाउन त्याच्या फिशबाउल मधून उडी मारतो व हीनंवनच्या थोबाडावर आपटून त्याला झोपेतून जागा करतो. Proud

<<,तर अशा 'क्रायसिस'मधे हिरोनंवनचा पाळीव मासा सर्व जोर लाउन त्याच्या फिशबाउल मधून उडी मारतो व हीनंवनच्या थोबाडावर आपटून त्याला झोपेतून जागा करतो. <<<
Rofl Rofl

तर अशा 'क्रायसिस'मधे हिरोनंवनचा पाळीव मासा सर्व जोर लाउन त्याच्या फिशबाउल मधून उडी मारतो व हीनंवनच्या थोबाडावर आपटून त्याला झोपेतून जागा करतो

विश्वास नाही बसत हो..... कुत्र्याने/मांजराने/माकडाने/मुंगीने/सापाने/गाढवाने/बैलाने/म्हशीने/घोड्याने हे काम केले असे दाखवले असते तरी माझा विश्वास बसला असता. पण पाळिव माशाला इतके ज्ञान? पाण्याबाहेरच्या जगाशी त्याचा संबंध फक्त तांदळाच्या पिठात घोळुन तापत्या तव्यावरच्या तेलात पडण्यापुरताच येत असणार..... त्याला माणसे कशी ओळखु आली? आणि उडी मारुन हिरोला उठवायची अक्कल??

साधना, प्लीज टेक युवर वर्डस् ब्याक. पाळलेल्या माशाला मानसे ओळखता येतात. आय क्यान प्रूव्ह बर्का.

बाकीचं बकवासच मात्र.... Happy

Pages