परवा अचानक लेकी ने डिक्लीयर केल , आज काहीही झाल तरी मला थ्री इडीयटस बघायचाच आहे. एरवी कधी फारशी पिक्चरच्या वाट्याला ही न जाणारी आज एकदम थ्री इडीयटस बघायच म्हणतेय ??
मला ही आश्चर्य वाटल. मी तिला कारण विचारल्यावर उत्तर मिळाल की सगळ्या मित्र मैत्रीणींनी बघीतलाय आणी व्हॅन मधे , रीसेस मधे त्याची चर्चा करत असतात आणि मला मात्र त्यात भाग घेता येत नाही, कारण मला त्यातल काही माहितीच नाही. सगळ्यांनी तिला तो पिक्चर बघीतला नाही म्हणून ऑडमॅन आउट ठरवल. खरच काय आहे अस त्या पिक्चर मधे ?? "अग काकु तो डिलीव्हरी चा सिन सोडला ना तर बाकी पिक्चर एकदम फंडू आहे " इती पुतणी इ.५ वी. बापरे !! हे ऐकल्यावर माझ्या बाळबोध विचारांना तो पिक्चर मुलीला दाखवण पटेना. "अग तु किती नाही दाखवलस तरी मुल चर्चा करतात बाहेर, सगळ माहिती होत मुलांना, किती दिवस बावळट ठेवणारेस तिला ? आज मी सीडी आणलीय मुलांना दाखवायला, पाठव तिला पण बघायला , तु जितक नाही म्हणशील तितका तिला बघायची इच्छा होइल" इती मैत्रीण, पिक्चर बघीतला नाही किंवा त्या बाबत काही माहिती नसेल तर मुल बावळट होतात हे मला नविनच ज्ञान मिळाल होत. मी म्हंटल इतक आवर्जून दाखवण्या सारख तरी काय आहे त्यात ?
ती:"अग मुलांना आपल्या आवडी प्रमाणे करीयर करु द्याव, आपल्या इच्छा आकांक्षा लादु नयेत त्यांच्यावर"
मी: हो पण मग त्या साठी पिक्चर दाखवायची काय गरज आहे ? आणि आपण लादतो ना आवडी निवडी आपण बघायचा, मुलांना कशाला दाखवायचा ??
लेकीने सांगीतल , शाळेत मुलांची चर्चा ऐकुन ,काल वर्गात टिचरने विचारल किती जणांनी थ्री इडीयटस पाहिला नाही ? तेव्हा ४० मुलांपैकी फक्त तीन मुलींनी हात वर केला. न बघणार्यांच प्रमाण अगदीच नगण्य होत.
आम्ही तो पिक्चर काही बघितला नाही. म्हणजे तशी इच्छा झाली नाही आणि वेळ ही. पण मला वाईट वाटल, त्याबद्दल तिला वाटणारी उत्सुकता ,शंकांच आपण निरसन केल नाही. मनात विचार आला की आपले हे बाळबोध वाटणारे विचार आपण थोडे बाजुला ठेऊन जर तिला दाखवला असता तर काय बिघडणार होत ?? पण तस ही तो न दाखवून काय बिघडत ? फक्त बाकी मुलांनी बावळट ठरवू नये म्हणून आपण तो पिक्चर बघावा हे मनाला पटल नाही.
परवा मुलीची एक मैत्रीण वय वर्ष १० सांगत होती "तुझ ना लव्ह मॅरेज होईल" ??????? मी चाट पडले. तिची आई म्हणाली अग काल "व्हॉटस युअर राशी " बघीतल्याचा परिणाम ग बाकी काही नाही, ती एकदम थंड पणे सांगत होती. वर "अग खर तर प्रियांका सारखा ड्रेस आणायचा हट्ट चाललाय तिचा, पण कुठे मिळालाच नाही" ( मलाच हुश्श वाटल. हे असल ऐकुन तर तिडीक जाते डोक्यात ) खरच आजकाल आईवडीलांना ह्यात काहीच वाटत नाही आपण मुलांसमोर काय बघतो ? किंवा काय बघाव काय बघु नये. तसले कपडे मुलांना आणून द्यावेत की नाही ?? असल्या पिक्चर्स ना मुलांना नेण जरुरी आहे का ? त्यांना नको त्या वयात नको ते दाखवण गरजेच आहे का ? बाकी असंख्य गोष्टी बघण्यासारख्या, वाचण्या सारख्या असताना मुद्दाहुन पिक्चर मधे दाखवला जाणारा ला स्त्री पुरुष संबंधातला नको इतका भडक पणा, जवळीक, व्हायलन्स, हाणामारी हे नको त्या वयात पदरचे १७५ रु (हल्लीच सिटी प्राईडच तिकीटआहे ) खर्च करुन त्यांना दाखवण जरुरी आहे का ?हे बघून पदरात खरच काय पडत ?? हे बघीतल नाही तर मुल खरच मागे पडणारेत का ??
मधे मटा मधे आलेल्या एका मानसोपचार तज्ञाच्या लेखात वाचल की ह्या सगळ्या गोष्टींचा मुलांच्या मनावर परिणाम निश्चित होतो, मुलांच्या हार्मोन्स वर परिणाम होतो. अडनिड्या वयात मुलांना काही तरी अर्धवट ज्ञान मिळत. पण आज काल एवढा विचार करायला कोणाकडे वेळच नाही, आणि जरी आपण अगदी बाहेर पिक्चर दाखवला नाही तरी घरच्या इडीयट बॉक्स वर ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतातच.
परवा एका मैत्रीणीचा फोन आला "अग निधी ला ना ते गाण बघायचय , वाजले की बारा आणि अप्सरा आली , येतेस का नटरंग ला ? " मी म्हंटल पाहिलाय मी तो पिक्चर पण शहाणी असशील तर मुलीला नेऊ नकोस तिला बघण्या सारखा अजिबात नाही. आवर्जुन दाखवण्या सारखा तर मुळीच नाही. त्यावर मला शेरा मिळाला , तु फारच विचार करतेस बुआ, अग आज जग कुठे चाललय ? आणि तु काय हे , हे दाखवु नकोस ते दाखवु नकोस असले विचार करत बसतेस. २१ व्या शतका कडे चाललोय आपण आणि तु बस अजुन १८ व्या शतकातली, बंधन घालत. मुलांना रामायण दाखवण्याचे दिवस गेले आता "
नंतर तिच्या लेकीने स्टोरी ही सांगीतली अग काही नाही तो बॉय असतो ना तो त्यांचा ऑर्केस्ट्रॉ चालवण्यासाठी गर्ल बनतो, पण तो खरा गर्ल नसतो. तु बघ बिनधास्त. माझी बोलतीच बंद झाली, तिला त्यातल काय कळल ? काय समजल ? हे माझ्या आकलना पलिकडच होत. आणि हे का बघायच नसत हे मुलीला कस समजवाव हे कळत नव्हत.
मी टिपीकल १८ व्या शतकातला विचार करुन तिला सांगीतल बघ तुला नटरंग बघण्यापेक्षा मॅड च किट आणून देते तेवढ्याच पैशात , काय हवय बोल ? (कारण मला माहिती होत ती मॅड च किटच मागणार म्हणून )
तुम्हाला सगळ्यांना काय वाटत हे सगळ मुलांना दाखवण, त्यांनी पहाण जरुरी आहे का ??



ह्म्म... खरं तर रसग्रहणासहीत दाखवला पिक्चर तर काही वाईट नसावं. ऑफकोर्स ए रेटींग नसेल तर काय हरकत आहे? तसंही आईने मला पिक्चर दाखवला ह्यात लेकीचही समाधान आहे ना? की तुला खात्री आहे की ती तुला न सांगता पिक्चर पहाण्याचे प्लॅन्स बनवणार नाही?
काय पहावं / दाखवावं हा वयैक्तिक ? असला तरी तूचवर लिहिल्याप्रमाणं तिला तो पिक्चर बघीतला नाही म्हणून ऑडमॅन आउट ठरवल>>> आता चर्चाच करायची असेल तर जे जे उत्तम ते ते आल पाहिजे ना चर्चेत म निव्वळ पिक्चर दाखवून काय होणारे? त्या पिक्चरच्या संदर्भातली माहिती इन जनरल कलाकारांनी घेतलेले श्रम (असतील तर / ते!!
) ह्या वरची माहिती देऊन एक "अलग सोच" नाही का निर्माण करता येणार?
सध्या येवढच सांगतो. विश्वास ठेव ही पिढी खूप खूप फास्ट आहे!
[संपूर्ण वयैक्तिक मत!]
मला पण या गोंधळात नेहमीच पडायला होतं...
माझा लहान भाऊ(आत्ता ९ वी त(मराठी माध्यम ते पण गावात... मुंबईत नाही)) आहे) जोगवा बघायचा म्हणून हट्ट धरून बसला होता... आणि मी सांगितलं त्याला बघण्यासारखा नाहीय तर चिडला...
मलापण नेहमी प्रश्न पडतो, हे सेक्स एज्युकेशन... याचा मुलांवर विपरीत परीणाम तर होणार नाही ना...
नको त्या वयात नको ती अक्कल येऊन... माहीत नाही...
म्हणून अजून जन्मालाही न आलेल्या आमच्या बाळाच्या भविष्याबद्दल विचार करून मला टेन्शन येतं... तेव्हा तर परिस्थिती खुप बदललेली (की बिघडलेली ??) असेल... let us hope for d best!!!
ऑडमन आउट प्रकरण फार वाईट असतं स्मिता. मुलीला तिच्या मतांवर ठाम रहायला शिकव. जर तिला चर्चेत भाग घेता येत नसेल तर तिने तो चित्रपट का पाहिला नाही हे तिला स्पष्ट सांगता यायला हवे.
जर तू आज तिला धाकाने किंवा प्रेमाने नाही दाखवलास चित्रपट तरी आता फक्त वाईट वाटून गप्प राहीलही ती, पण नेहमी नाही. त्यामुळे तिच्या मैत्रिणींच्या घोळक्याचा ताबाही घेणे आवश्यक आहे. ती ज्या मुलींबरोबर राहते त्यांच्याशी तू पण मैत्री कर, त्यांची मनसिकता समजावून घे आणि त्यांनाही चांगलं वाईट पचेलसं शिकव. जर तिचा ग्रूप तुझ्याकडं मोकळा झाला तर असले प्रसंग येणार नाहीत किंवा तुला काय करता येइल याची कल्पना राहील.
जर गप्प राहीलीस तर डुआयने म्हटल्याप्रमाणे उद्या तुझ्या नकळत गोष्टी सुरु होण्याची शक्यता.
अजून एक म्हणजे खूप ताणू नये, अश्याने जबरदस्त कुतूहल निर्माण होते आणि नको त्या गोष्टी घडतात. त्यामुळे चांगले चित्रपट मुलांबरोबर जऊर पहावे तसेच टीव्ही वरचे कार्यक्रमही. आणि त्यावर सकारात्मक चर्चा पण व्हावी. मुलांना विचार मांडता यायला हवे.
फार लिहीलं नै!
सॉरी, मी आधी कुठेतरी साजिर्याची पोष्ट वाचली आणि डुआयचा उल्लेख नकळत त्याच्या नावाने झाला.
प्रयोग, असा कठीण काळ अजून महाकठीण होत जाणार. दोन हात करायलाच हवेत.
प्रयोग, अनुमोदन.
बर्याच प्रमाणात डुआयचे पण पटले.
मला अनेक वेळा — अजूनही — काही गोष्टी माहीत नाहीत म्हणून टीकेचा धनी व्हावं लागलं आहे.
विषयः
(१) मला मायकल जॅक्सनची गाणी माहीत नाहीत
(नाही आवडत मला त्याची गाणी आणी त्याचं ते नको तिथे हात ठेऊन हिडीस हावभाव करणं इत्यादी इत्यादी)
(२) मला "प्ले स्टेशन" म्हणजे काय माहीत नाही.
(३) माझ्याकडे कॅमेरावाला भ्रमणध्वनी नाही.
स्मिता, ह्या लेखाचा बर्यापैकी विस्तार करता यईल.
साजिरा म्हटल्याप्रमाणे उद्या तुझ्या नकळत >>> साजिरा आलाय का इथं त्याच्या डूआय न? नाही ना? साजिरा कुठं काय म्हणलाय ( अजून) अहो तो मी आहे. साजिरा नव्हे! नावात डुआय आहे मी काही त्याचा डूआय नाही.
मुलीला तिच्या मतांवर ठाम रहायला शिकव. जर तिला चर्चेत भाग घेता येत नसेल तर तिने तो चित्रपट का पाहिला नाही हे तिला स्पष्ट सांगता यायला हवे.>> नक्कीच. पण का हे ठरवता आलं पाहिजे. केवळ कुणीतरी नाही म्हणालं म्हणून नाही पहात हे कारण नव्हे ना? [जसं की विषयांतराचा धोका पत्करून - माझ्या मावशीचा मुलगा हिंदी - बॉलिवूडचे टिपीकल पिक्चर पहात नाही कारण त्याला सायफाय मूव्हीज आवडतात. हिंदीतला रोमॅन्स नाही आवडत!]
प्रयोगा,
टीव्हीच नको पहायला मग! शक्य आहे का? चांगल काय वाईट काय नीट समजावून दिलं की झालं नाही का?
बाकी तुझ्या ३ ईडी. च्या पोस्ट बद्दल बोललो तर उद्या मला बॉ. च्या प्रत्येक सि. बद्दल तसंच बोलावं लागेल... म्हणून यावर सध्या काहीही बोलत नाही
स्मिता,
हा विषय ३ ईडी पुरताच मर्या. नाहीये ना...
प्रयोग ... १०० % अनुमोदन.... आज्काल नविन्च गोष्ट ऐकायला मिळाली. पालक म्हणतात मुल मुल जाउन बघन्यापेक्षा आपल्या बरोबर बसुन बघुतेत ना?... ते चांगल...
आणि चित्रपट होता "टशन"... पालकांना असं वाटत कि मुलांच्यावर जास्त बंधन घातल कि ते अपरोक्ष काहितरी करतील...
स्मिता, तुझ्याशी अगदी सहमत. कुठलाही सिनेमा, नाटक, टिव्हीवरचा कार्यक्रम बघितलाच पाहिजे असं मला वाटत नाही. माझ्या मुलांनाही बहुधा वाटत नसावे. प्रत्येकाला त्याची आवड असायलाच पाहिजे असे काही नाही. आणि सगळी करतात म्हणून आपण केले पाहिजे हे तर मला मुळीच पटत नाही. मी कदाचित इथे अमेरिकेत लांब आहे म्हणून तसे असू शकेल कदाचित, पण मला इथेही बर्याच मित्रमैत्रिणींनी हा सिनेमा बघायलाच हवा असे सांगितले. मी म्हणते मला जेव्हा सवड असेल तेव्हा एखादा बरा सिनेमा मला बघावासा वाटला तर तेव्हा मी बघेन, किंवा मुलांनाही घेऊन जाईन. पुष्कळ वेळा तेव्हा मला त्या मित्रमैत्रिणींशी बोलायला काही विषय रहात नाही हेही खरे आहे, तेव्हा थोडा वेळ मी त्यांनी सांगितलेली गोष्ट रस घेऊन ऐकते. पण ऐकावे जनाचे करावे मनाचे असे मी मानते. थोड्या काळाने दुसरा विषय चालू होतोच.
हे नुसते सिनेमाच्याच बाबतीत आहे असे नाही तर इतरही अनेक गोष्टीत लागू पडते. मुलं जेव्हा मागे लागतात तेव्हा त्यांनाही मी हेच सांगते व हेही सांगते की आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या व्यक्ती आहोत, प्रत्येकाने केलेच पाहिजे अशा गोष्टी आपण सगळेच करतो, उदा. दात घासणे, आंघोळ करणे वगैरे. सिनेमा बघणे हे त्यात मोडत नाही. कधी मुलांनी फारच हट्ट केला तर मी त्यांना वयोमानानुसार मित्रांबरोबर कधीतरी जाऊही देते, पण त्याबरोबरच हेही सांगते, की एकदा परवानगी दिली, नेहमीच देईन असे नाही.
प्रयोग,उत्तम पोस्ट.
स्मिते,विचार करायला लावणारा लेख. peer preesure हा घटकही तेवढाच महत्वाचा आहे. कॉलेजात जाणारी तरुण पिढी सिगरेट,ड्रग्ज आणि दारुच्या आहारी जायला केवळ peer pressure हेच कारण आहे. 'काही होत नाही,अगदीच चम्या आहेस्,काय काकूबाई आहेस' असल्या कुत्सित शेर्यांमुळे बहुतेक जण एका सिगरेटने सुरुवात करुन शेवटी चेन स्मोकर झाल्याची कित्येक उदाहरणे आहेत.
प्रयोग, १००% अनुमोदन रे बाबा!
आम्ही (मी, नवरा, नणंद, तिचा नवरा आणि ५ वर्षाची पोरगी) गेलेलो चित्रपट बघायला
मला स्वतःलाच तो घाणेरडे पणा बघायला नको वाटत होता - त्यातून ती छोटी मुलगी..
आम्हाला कुणालाच तो पिक्चर आवडला नाही (चिप तम चित्रपट आहे तो!)
पण मग जवळजवळ प्रत्येकानं आम्हाला मूर्खात काढलं (आवडला नाही???????? अशी प्रतिक्रिया)
अर्थातच, दुसर्यानं मूर्खात काढलं म्हणून मूर्ख वाटायच्या वयापासून आम्ही लांब आलेलो असल्यानं काही फरक नाही पडला..
(असं कुणी मूर्खात काढायला गेलं की मी 'There is always a difference between masses and classes' असं म्हणायचा दुष्टपणा करते
)
तो तुषार कपूर- इशा कोप्पीकर प्रभुतींचा एक पिक्चर पण बसमधे बघायला लागलेला (नाव आठवत नाही - ह्याचा आनंद आहे) .. आश्चर्य म्हणजे बाकीचे लोक तो एन्जॉय करत होते!!!!
आणखीन एक म्हणजे दोस्ताना!!! समलिंगी संबंधांना माझा विरोध नाही, पण त्यांचं भांडवल करून घाणेरडे जोक्स मारणं मला अभिरुची हीन वाटतं.
असो.. ऑड मॅन आऊट असायची सवय झाली आहे.. (काही जवळच्या लोकांशी मतं जुळतात ह्याचच काय ते समाधान!)
>>> तुम्हाला सगळ्यांना काय वाटत हे सगळ मुलांना दाखवण, त्यांनी पहाण जरुरी आहे का ??
नाही, ठाम पणे नाही!
>>>>> ऑड मॅन आऊट असायची सवय झाली आहे.. (या ऑड म्यान आऊट चा कृतीलाच अनुल्लेख असेही सम्बोधतात बर का!
खूप पूर्वी "वाळीत" टाकणे असे म्हणायचे! )
क्यान यू बिलिव्ह? मी शोले चक्क १९७८ साली बघितला! ज्यावेळेस म्हणजे ७४ (चू.भू.दे.घे.) च्या सुमारास तो रिलिज झाला होता तेव्हा वपुढील ४ वर्षे वरील थ्रीइदियट्स प्रमाणेच चर्चा चालायच्या,
ते बहुसन्ख्य शोले बघितलेले, आम्हा न बघितलेल्या मोजक्यान्ना मूर्ख ठरवायचे
आम्ही, अल्पसन्ख्य, अनुल्लेखनीय असचे, त्यान्नाच शतमूर्ख ठरवायचो.
शतमूर्ख ठरवण्याची क्षमता, ही शिकवण आईबापान्नीच द्यायला लागते असे मला तरि वाटते!
अतिशय विचार करायला लावणारा विषय आहे.
हे खरच जरुरी आहे का?
तसं बघायला गेलो तर, निव्वळ जगायला आवश्यक अशा प्राथमिक गरज सोडल्यास काहीही आवश्यक्/जरूरी नाही. उरलेल्या गोष्टी आपण, मला आवडतं/नावडतं म्हणून, पटतं/पटत नाही म्हणून, चालतं, अजिबात चालत नाही म्हणून.... करतो. त्यातच मुलांना काय करू द्यायचं आणि काय नाही ह्याची निवडही आलीच.
थ्री इडियट्स आणि नटरंग दोन्ही चित्रपट मी बघितले. जे आवडत नाही ते सहज विसरून जाण्याच्या सवयीमुळे ते हिडिस प्रसंग जरी बघताना अंगावर आले तरी... डोक्यात राहिले नाहीत. पण एक चांगला विषय हाताळण्याच्या कसबासाठी बघितले.
त्या विषयांशी संबंधित सगळच नीटपणे हाताळता आलंय असं नाहीये. पण म्हणून अख्खा चित्रपट "टाकाऊ"त नाही काढता आला, मला.
माझा मुलगा मोठा आहे त्यामुळे ह्या चित्रपटांसाठी उगीच फार विचार मला करावा लागला नाही. पण हे दोन्ही चित्रपट माझ्या भावाने त्याच्या बारा वर्षांच्या मुला बरोबर पाहिले. चित्रपटांविषयी चर्चा झाली.
थ्री इडियट्समधला "विचार" परत परत बोलला गेला, चर्चिला गेला, त्यातला हिडिसपणा टाळून.
नटरंगची गाणी आधी ऐकली. इतक्या सुंदर गाण्यांसाठी चित्रपट बघायचा म्हणून बघितला गेला. केवळ कलेच्या "नादा"पायी एखादा माणूस आयुष्याला चूड लावायला तयार होतो... हे सुंदर रितीनं दाखवलय.
"ह्या माणसाचं वाईट वाटतं. तरीही, कुटुंबाला, मुलाला, बायकोला, वडिलांना असं वार्यावर सोडणं चूकच होतं त्याचं" हा विचार भाच्याने आणि लेकाने पुन्हा पुन्हा बोलून दाखवला.
अर्धवट ज्ञान हे वाईटच. न कळत्या वयात मिळालेली अर्धवट माहिती खूप वाईट परिणाम करु शकते.
ते तसं होत रहाणार आहे... आजूबाजूला जे काही चाललय - चित्रपट, सिरियल्स, विचित्र बातम्या, जाहिराती... ह्या सगळ्यापासून मुलांना आपण आयसोलेट नाही करू शकत. पण त्यांच्याशी बोलून काय चूक आणि काय बरोबर हे मात्रं नक्की बोलत(बजावत??) राहू शकतो. एका विशिष्टं वयानंतर तर बोलत रहाणे, संवाद ठेवणे हा एकच उपाय असतो.
पालक म्हणून आपण तितकच करू शकतो....
"पीअर प्रेशर" हा भयंकर प्रकार आहे. पालकांनी सतत मुलांबरोबर संवाद ठेवणं... योग्य अयोग्याचे निकष, योग्य तेच निवडण्यासाठी लागणारं मानसिक बळ देणं... हे सगळं करत रहाणं सोप्पं नाही.
आपण त्यांच्याबरोबर बघणं म्हणजे प्रोत्साहन देणं का? किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर बघू देणं म्हणजे वार्यावर सोडणं का? .... माहीत नाही.
स्मिता, हा विषय खरतर एक हितगुजाचा विषय म्हणून सुरू करू शकतेस. इथल्या पालकांच्या चर्चेतून खूप काही चांगलं निघू शकतं.
लेख सुंदर जमलाय... विचार मंथन तर सुरू केलच आहेस
>थ्री इडियट्स चित्रपटात एक अत्यंत घाणेरडे ....
एकदम बरोबर! मलाही असंच वाटलं होतं...
>'बलात्कार' आणि 'स्तन' हे शब्द वापरुन केलेले अचकट-विचकट संवाद.
हा आणि इतरही डायलॉग्स, सीन लोकांनी डोक्यावर घ्यावे याचं आश्चर्य वाटलं.
पण लोकांना काय आवडेल काही सांगता येत नाही, असो..
>नटरंग बद्दलही तेच!
गाणी छान. हिरोची मेहनत छान वगैरे बरेच काही चांगलेच आहे.
पण इतका डोक्यावर घ्यावा अशी कथा नाही वाटली..
म्हणुन मग याच्यावर विश्वास ठेवतो आता

>classess/masses
प्रयोग,दाद १००% अनुमोदन.. स्मिता, हा विषय खरतर एक हितगुजाचा विषय म्हणून सुरू करू शकतेस. इथल्या पालकांच्या चर्चेतून खूप काही चांगलं निघू शकतं.
अगदी!!अगदी!!
There is always a difference between masses and classes'>>> ह्म्म्म्म
सगळ्यापासून मुलांना आपण आयसोलेट नाही करू शकत. पण त्यांच्याशी बोलून काय चूक आणि काय बरोबर हे मात्रं नक्की बोलत(बजावत??) राहू शकतो.
दाद, दाद
डुआय शी सहमत.
या वरुन आठवले , शाळेत आमच्या ८ वीच्या वर्गात एक मुलगी होती. तिची आइ तेव्हा ( ९२-९३ साली ) तिला अजीबात हिन्दि पिक्चर बघु देत नसे. हिन्दी गाणी म्हणु देत नसे तसेच ऐकुहि देत नसे. शिवाय इतर अनेक बन्धने तिच्यावर होती. शाळेत त्यामुळे तिला सगळे खुप चिडवायचे आणि कधी कधी हीणवायचे सुद्धा. तिलाही खुप वाइट वाटायचे आणि आइचा खुप राग यायचा. शिवाय तीला स्वताला हिन्दि गाणी ऐकायची प्रचन्ड आवड होती. त्यावर तिने एक idea केलि होती. तिचे आइ अडिल कोणत्यातरी महाराजान्च्या मठात जात असत . तिथुन तिने साइबाबांच्या गाण्याच्या कहि cassete आण्ल्या होत्या. आणि गंमत म्हण्जे त्यातिल सर्व गाण्यांना हिन्दि पिक्चर च्या गाण्याच्या चाली होत्या. अगदि 'धक धक करने लगा ' पासुन ' चोलि के पिछे क्या है' पर्यंत
थोड्क्यात म्ह्ण्जे मला असे वाटते की केवळ आइ अडिलांच्या धाकाने ,जबर्दस्तीने मुलाना अश गोष्टिंपासुन लांब ठेवणे अवघड आहे. त्यांना स्वतालाच योग्य / अयोग्य ही जाण आली पहिजे. त्यासाठि पालकानी प्रयत्न केले पाहिजेत.
प्रयोग, दाद १०० % मान्य आहे तुमच म्हणणं,
ड्यु थ्री इडीयटस पुरता मर्यादित नाही हा विषय, एकंदरीत च मुलांना हल्लीचे पिक्चर दाखवण्या संदर्भात आहे, ह्या विषयावर चर्चा किंवा रसग्रहण समजण्या एवढ त्यांच वयही नसत खरतर,( ८/९/१० वर्षाच्या मुलांच) आणि मृदुला म्हणते तस धाक, आणि बंधन घातली की त्यांची उत्सुकता तेवढीच जास्त ताणली जाते. बंधन झुगारुन देण्याची मानसिकता वाढते. मला तरी अस वाटत ह्या गोष्टींपासुन त्यांच लक्ष डायव्हर्ट केल तर नक्की फायदा होऊ शकतो शिवाय बंधन ही घालायची गरज नाही. आपण त्या साठी थोडासा वेळ देण मात्र अगदी गरजेच आहे
उदा: आपण त्यांच्या बरोबर पिक्चर बघत बसण्या पेक्षा जर त्यांच्या बरोबर काही गेम खेळाय्ला अथवा त्यांच्या आवडीची गोष्ट त्यांच्या बरोबर करायला बसलो तर त्यांना पिक्चर, सिरीयल्स, टीव्ही ह्य गोष्टींची आठवण ही होत नाही. आणि जेव्हा ऑड मॅन आउट ठरवल जात तेव्हा चिन्नु म्हणते तस मुलांना आपल्या मतावर ठाम रहायला शिकवण अत्यंत गरजेच आहे .
ह्म्म्म!
)
मुलं ८-९-१० वर्षांची असतात तेव्हा हा प्रश्न येतो खरा...!
(मी आत्ता आठवण्याचा प्रयत्न करत होते की आदित्य २ री-३रीत असताना अश्या प्रसंगी मी त्याची कशी समजून काढत होते?
हा सगळा प्रकार 'तारेवरची कसरत' या शीर्षकाखाली येतो. पण आपल्या मुलांसाठी एखादा चित्रपट अयोग्य आहे असं वाटत असेल तर तो न बघणं हेच उत्तम. (मी स्वतः पक्की मूवी बफ आहे. पण आदित्य लहान असताना अनेक सिनेमांवर मी पाणी सोडलेलं आहे.
(थ्री इडियट्स मी आणि नवर्यानंच जाऊन पाहिला... अगदी योगायोगानं, म्हणजे आदित्यला नको न्यायला असं काही मनात नव्हतं.
त्यातला तो दाक्षिणात्य विद्यार्थ्याच्या भाषणाचा सीन मला 'तत्त्वतः' पटला, आवडला. आदित्यला त्याच्या शाळेतल्या मित्राकडून तो सीन अगदी सविस्तर समजला. त्या मित्राचं त्या सीनमधलं वाक्य-न-वाक्य पाठ आहे म्हणे.
हे सगळं आदित्यनं मला घरी येऊन सांगितलं. मग मी त्या सीनमागचं तत्त्व त्याला समजावून सांगितलं - गप्पांच्या ओघात, त्याच्या अभ्यासातली उदाहरणं देऊन इ. दिग्दर्शकाला त्या सीनमधून जे सांगायचंय ते लक्षात न घेता मूर्ख लोकं त्यातल्या भलत्याच गोष्टी लक्शात ठेवतात असा खेदही त्याच्याजवळ व्यक्त केला. त्या सिनेमातले इतर काही चांगले प्रसंग त्याला सांगितले. ते सगळं आदित्यला पटलं असावं. वर नेहमी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांच्या जगात रमणारी आपली आई आपल्याशी एका नव्या सिनेमाच्या गप्पा मारते आहे हे बघून तो खूषही झाला असावा.)
>>>> आपल्याशी एका नव्या सिनेमाच्या गप्पा मारते आहे हे बघून तो खूषही झाला असावा. <<<<
अगदी अगदि, हा सन्वाद साधणे-साधता येणे सर्वात महत्वाचे! नुस्ते हे करु नको नि ते बघु नको अस उपयोगाचे नाही. का बघु नको, नि बघितलसच, तर काय घे नि काय सोड याची तत्वे समजावयालाच लागतात, ती देखिल सोप्प्या मोजक्या शब्दात
कालच रात्री मी अन पोरा-पोरीन्नी मिळून थ्री इडियट्स बघितला. थोरलिला ती एका वर्कशॉप मधे गेलेली असल्याने सिनेमा बनतो कसा ते माहित आहेच, पण त्यामुळे धाकटीलाही ते अप्रुप नाही. त्यामुळे, एखादा प्रसन्ग कसा भासतोय्/जाणवतोय या पेक्षा कसा रन्गवलाय यावरच (झालीच तर) चर्चा होते. पडद्यावरील सर्व "जुगवलेले/मुद्दामहून घडवलेल अस्त" हे सगळ्यान्ना पक्क माहित आहे.
दूसरी गोष्ट म्हणजे मी तरी मुलान्ना अगदी बजावुन सान्गितलय (माझ्याच लहानपणीच्या अनुभवान्वरुन) की चारचौघात एखादी गोष्ट आपल्याला माहित नसेल तर बिनधास्त ते कबुल करा, त्यावर चारजण हसतील तर हसूद्यात, त्यान्च्याकरता विनोदाचे-अनुल्लेखाचे गिर्हाईक बनलात तरी नाही आभाळ कोसळत वा नाही जगातील काडी इकडची तिकडे होत. एक कायम लक्षात ठेवा की आत्ता दात काढून हसणार्यान्पेक्षा, तुमच्या घराची कौटुम्बिक रचनाच वेगळी असल्याने त्यान्च्या पेक्षा कैक जास्त जीवनोपयोगी गोष्टीन्च्या माहिती तुम्हाला आहेत. तुम्ही पथ्य एकच पाळा की त्या त्यान्ना माहित नाहीत म्हणून त्यान्च्यावर हसू नका, त्यान्च्या सारखे बनू नका! अनुकरण केल तर चान्गल्याच गोष्टीने करा, पण मूळात चान्गल-वाईट जोखायला शिका.

अन शक्य झाल तर अशा प्रकारे हसणार्यान्ना सुधरवण्याच्या भानगडीत न पडता अधिक चान्गली सिनियर सन्गत शोधा!
स्मि खर आहे पण प्रत्येक वेळी आपण त्यांना पंखाखाली नाही घेऊन ठेऊ शकत. आपण नाही दाखवल तरी बर्याच माध्यमातून आदळतच काही बाही. बंधन घातली तरी कुठे तरी ती बंधन तोडायची इच्छा मनात येते.
दुसरा पर्याय देणं, नको तर का नको हे पटेल अस कारण देऊन समजावणं, आणि त्यातल काय वेचायच/घ्यायच हे निवडण्याची दृष्टी देण त्या दृष्टीने प्रयत्न करण हे तर आपण करु शकतो नक्कीच.
३ इडी. काय किंवा नटरंग काय बघायला हरकत नाही पण आपण फोकस त्यातल्या तत्वांवर/ मेहनतीवर ठेवु शकतोच की. मैत्रिणींकडुन जे कळत त्यापेक्षा पालकांनी चर्चा करुन चांगल काय ते बघायला मदत करावी अस माझ मत (म्हणुन उगाच पि. दाखवाव अस नाही तर जे मैत्रिणींकडुन ऐकते त्यापेक्षा तुझ्याकडुन कळल की काय थीम आहे. काही चांगल्या गोष्टी आहेत त्या काय आहेत, काही नाहीत आणि म्हणून नाही बघत आहोत वगैरे तर तिला नक्की पटेल आणि मैत्रिणींच ऐकुन मत होण्या पेक्षा हे जास्त चांगल)
विचार करायला लावणारा लेख
पण आजकाल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट. मोबाईल म्हणा.. याचे फायदे - तोटे आहेतच.. म्हणुन त्याचा वापरच करायचा नाही ही गोष्ट पटत नाही. हल्लीची पिढी खुप हुषार आहे.. फास्ट आहे, तर त्याना समजून सांगितले तर चटकन त्याना लक्षात येइल असे वाटते..
कविता चे पोस्ट खुप पटले.
बहुतान्श चर्चा सिनेमा भोवती फिरते आहे, पण एकन्दरीतच वृत्तपत्रादि टीव्ही इत्यादिक मिडीया वर, त्यान्च्या सादरीकरणावर, त्यातल्या तथ्यावर आम्हि सडेतोड चर्चा करतो मुलान्समोरच! चिकित्सा करण्याची सवय लावणे महत्वाचे असते.
एक अतिशय वाईट घटना काल घडली आत्महत्येची, पेपर मधे आलीये, त्याबाबत देखिल, त्यामागची कारणमिमान्सा किती किती प्रकारे असू शकेल, याची चर्चा त्यान्चेसमोर झाल्याने, अभ्यासक्रमाच्या सहन न होणार्या काठीण्यापासून, रॅगिन्ग ते लव्हजिहाद पर्यन्त सर्व सन्दर्भ तपासुन्-चर्चुन झाले. यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने पोरी शहाण्या झाल्या तर ठीकच्चे!
पण केदार, ह्या असल्या गोष्टी समजावण्याच त्यांच वय असत का ?? ह्या असल्या विषयांची ओळख आपण हुन करुन देण गरजेच आहे का ? थोडी कळत्या वयाची झाल्या नंतर चर्चा करण अगदी योग्य आहे, पण लहान मुलांना असल्या गोष्टींपासुन डायवर्ट करण सोप आहे अस वाटत, बाहेरच काही ऐकुन, वाचुन ही मुल प्रश्ण विचारतात त्यांना योग्य ते , पटेल अस उत्तर देण, शंका निरसन करण पालकांच काम आहे
>>>> ह्या असल्या गोष्टी समजावण्याच त्यांच वय असत का ??
प्रत्येक एजगृप प्रमाणे समजावयाचे निकष नक्कीच बदलत जातात, पण दुर्दैवाने, "जननिन्देला, हेटाळणीला, कम्पुशाहीला तोन्ड कसे द्यायचे" याचे बाळकडू हल्लीच्या काळी फार लहान वयातच पाजावे लागते हे ही तितकेच खरे आहे. यावर उतारा म्हणजे मुलान्च्यात गर्वरहित आत्मप्रतिष्ठा जागवणे!
चारचौघात एखादी गोष्ट आपल्याला माहित नसेल तर बिनधास्त ते कबुल करा, त्यावर चारजण हसतील तर हसूद्यात, त्यान्च्याकरता विनोदाचे-अनुल्लेखाचे गिर्हाईक बनलात तरी नाही आभाळ कोसळत वा नाही जगातील काडी इकडची तिकडे होत.>>> it makes lot of sense. peer pressure झुगारुन द्यायला ह्याचा खुप उपयोग होतो.
स्मिते उदा. म्हणून ३ डी घे
सानिकाला मी हे सांगितलेल कळलय नक्की (हे ती इतरांना सांगते तेव्हा कळत मला) ३ डि मधे सांगितलय खुप आभ्यास करा पण नुसत प्रश्न पाठ करु नका. म्हणजे काय तर मी तिला एक उदाहरण दिलं
तिला सायन्स मधे "how days & night formed "असा प्रश्न आहे. टिचरने दोन वाक्य दिल्येत पाठ करुन लिहायला. मी तिला पृथ्वीचा गोल, नाईट लँप घेऊन दाखवल. तिच्या ते पक्क लक्षात राहील. मग तिला म्हंटल आता कठीण शब्दाचे स्पेलिंग तेव्हढे पाठ करुया म्हणुन नी लिहुन.
तेव्हा तिला हे पण सांगितल. ३ डि मधे हेच सांगितलय बिट्टू. नुसत उत्तर पाठ करुन कळल असत का तुला? नाही ना मग आता कळल ना कसे होतात दिवस नी रात्र ते. कित्ती सोप्प आहे की नाही हे. मग आता स्पेलिंग केली की झालं
स्मी इथे हे उदा. लिहायचा हेतू हा की प्रत्येक वयोगटाला कळेल्/पचेल इतकच त्यांच्या भाषेत सांगायची हातोटी आपण वाढवायची. तिला तिच्या वयाला हवाय तेव्हढा कळली थीम बस झाल की
हेच नटरंग च. मी तिला स्टार प्रवाह वर झालेली अतुल कुलकर्णीची मुलाखत माझ्याबरोबर बसुन दाखवली. तिला सांगितल. बघ हे काही सोप नसत. ह्यासाठी पण त्याने किती अभ्यास केलाय ना? असा अभ्यास केला की आपल्याला ती गोष्ट नक्की जमते (काही कळु नको दे पण येव्हढ कळल तिला हे काय सोप्प काम नाही, ह्यात पण अभ्यास आहे) आत्ता पुरत तेव्हढ बास आहे माझ्यासाठी
थोडक्यात आज सांगू की उद्या ह्याला उत्तर नाही. कोणत्या वयात काय नी कितपत सांगायच हे आपण ठरवु शकतोच की. थोडा त्यांच्यावर पण विश्वास ठेऊया की. आपल्या आई बाबांनी ठेवालाय की आपल्यावर विश्वास
असा अभ्यास केला की आपल्याला ती गोष्ट नक्की जमते (काही कळु नको दे पण येव्हढ कळल तिला हे काय सोप्प काम नाही, ह्यात पण अभ्यास आहे) आत्ता पुरत तेव्हढ बास आहे माझ्यासाठी <<
खरंच कवे. जुगवलेले/ घडवलेले म्हणून एखाद्या कलेची हेटाळणी करण्यापेक्षा हे फारच चांगले.
विषयांतर पुरे.
बाकी चर्चा छान चाललीये. वाचतेय. शिकतेय.
छान लेख स्मिता.
कविताला/दादना/लिंबु यांना अनुमोदन.
अजिबातच न दाखवण्यापेक्षा मी तरी दाखवून चर्चा करणे पसंत करेन. पण एकंदरितच टी.व्ही, सिनेमातील निवडकच दाखवणे पसंत करेन. वाईट न दाखवण्यापेक्षा चांगल्यावाईटाची जाण देणे हे मला महत्वाचं वाटतं. नाही म्हणलं तर ती फक्त आपल्यापासून लपवायला शिकतील.
दाखवाव तर काय दाखवाव, किती प्रमाणात दाखवाव, हे आपल्या पाल्याच्या (आणि आपल्या)कुवतीवर अवलंबून आहे. मूल जितकं कुशाग्र तितकी त्याची जिज्ञासा.
यासंदर्भातील एक महत्वाचा किस्सा आठवतो.
आम्ही आठवी/नववीत असू. मैत्रिणीच्या डॉक्टर वडिलांनी एक केस नुकतीच अनुभवली होती. अतिशय छोट्या तान्ह्या बालकावर बलात्कार झाला होता आणि त्यात ती दगावली होती. त्यांनी स्वतःच्या मुलीचं बौद्धिक घेतलं आणि तिने ते आख्ख्या ग्रुपला पोचवलं आणि ते आमच्या सर्वांच्या स्मृतीत कोरलं गेलं आहे. आज वाटतं त्याकाळी त्यांनी किती बहूमोल कामगिरी केली. १२ वर्षांच्या मुलीसमोर हे बौद्धिक घेताना त्यांची स्वतःची विचारपातळी किती स्पष्ट असेल. स्पष्ट, स्वच्छ, सौम्य शब्दात त्यांनी लेकीला स्त्रीची संमती, बलात्कार, माणसातील पशुत्व, कायद्याची चौकट, पिडोफिलीया याबाबत सांगीतलं. हेही सांगीतलं की तू वृत्तपत्रात वाचलंच असशील आणि तुला त्यातलं sensational तेवढंच न समजता मुळापासून समजावं म्हणून मुद्दाम सांगतो आहे. गंमत म्हणजे ग्रुपमधील साहीजणींपैकी बहूतेकजणींना हे घरी सांगता आलं नाही, कारण घरातील वातावरण. आता वाटतं त्यांनी आमच्या सर्वांच्या आईवडलांचही बौद्धिक घ्यायला हवं होतं.