तुळापूर :
शहाजीराजांनी या ठिकाणी हत्तीला तराफ्यात उतरवून त्याचे वजनाइतके सोने दान केले अशी एक गोष्ट सांगण्यात येते. यावरूनच गावाला तुळापूर नाव पडले. तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. पूर्वीचे नाव 'नांगरवास' असे होते. भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेले छोटेसे गाव. तुळापुर आळंदी पासून अंदाजे १४ किलोमीटरवर तर पुण्यापासून ३० किलोमीटरवर आहे. येथे महाराष्ट्रातील नद्यांचा दुर्मिळ त्रिवेणी संगम पहावयास मिळतो. श्रीक्षेत्र आळंदीकडून वाहत येणारी इंद्रायणी नदी, भीमाशंकरच्या दाट जंगलात उगम पावलेली भीमा व तिची उपनदी भामा या तीन मोठ्या नद्यांचा संगम तुळापूर येथे झाला आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. तुळापूर येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.
संगमेश्वर मंदिर
तुळापूरला श्री शंकराचे जुने मंदिर होते. काही कालावधीनंतर हे मंदिर श्री संगमेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. इसवी सन १६३३ च्या सुमारास आदिलशाही दरबारातील वजिर श्री मुरारपंत जगदेव यांनी स्वामी रुद्रनाथ महाराज यांच्या आज्ञेचे पालन करून श्री संगमेश्वर मंदिराची डागडुजी केली. येथे वास्तव्यास असताना छत्रपती शहाजी महाराज तसेच बालशिवाजी दोघेही संगमेश्वराची पूजा करीत असत. येथील संगमावर मोठा नदीघाट उभारला असून, बोटिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. माणसी ३० रुपये प्रमाणे आपल्याला नदीतून एक चक्कर मारता येते. निरगुडकर फाउंडेशनद्वारा येथे संभाजीमहाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
तमाम शिवप्रेमींची ही श्रद्धास्थाने. तुळापूरपासून जवळच असलेले वढू बुद्रुक आणि तुळापूर ही भीमा नदीतीरावरची ही पवित्र स्थाने. या दोन गावांना ऐतिहासिक फार महत्व आहे. या भूमीत छत्रपती संभाजी महाराजांवर अंतिम संस्कार झाले. औरंगजेबाने आमानुष व क्रुरतेने संभाजी महाराजांचा अंत केला आणि शरीराचे तुकडे अस्ताव्यस्त भीमेच्या किनारी टाकून दिले. त्या सर्व इतिहासाची साक्षीदार ही भूमी आहे. शंभूराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबाने साखळदंडात कैद करून तुळापूर येथे आणले होते. फाल्गुन अमावस्येला ११ मार्च १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली होती. वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोनही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे. वढूपासून तुळापूर ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. वेळेअभावी मला वढूला जाता आले नाही. औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे इकडेतिकडे फेकून दिले त्या वेळी प्रत्येक मराठी माणूस हादरून गेला. आपला राजाचा क्रुरतेने केलेला अंत येथील जनतेला कळल्यावर अंतिम संस्कार योग्य रीतीने व्हायला पाहिजे असे वाटले. वढूच्या ग्रामस्थांनी यात पुढाकार घेतला. जीव धोक्यात घालून, भीमानदी रात्रीत ओलांडून व मुगली सैन्याला चकवून त्यांनी संभाजी महाराजांची मिळतील ती अंगे गोळा केली आणि विधिवत अंतिमसंस्कार केले.
संभाजी राजे :
संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ (14 मे 1657चा.) रोजी पुरंदर गडावर झाला. राजे केवळ २ वर्षांचे असतानाच सईबाई वारल्या. सईबार्इंच्या मागे राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरील आग्रा भेटीत त्यांना राजकारणाचे धडे शिकू लागले. या काळात महाराजांच्या बरोबर त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडला. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या गोष्टीत संभाजी राजे पारंगत होते. राजांचे संस्कृत व हिंदी या भाषांवरही विलक्षण प्रभुत्व होते. त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथात केवळ ९ वर्षांच्या कालखंडात राजांनी १२८ लढाया जिंकून शिवाजीमहाराजांचे नाव राखले.
संभाजीराजांचा वाढता पराक्रम औरंगजेबाला घाबरून सोडणारा होता. पूर्ण ताकदीनिशी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. 1689 मध्ये राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संमगमेश्वर येथे मुक्कामी थांबले होते. 1 फेब्रुवारी 1689 ला आपला सख्खा मेहुणा गणोजी शिर्केयाच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी मुकर्रबखान या मोगली सरदाराने त्यांना ताब्यात घेतले. तेथून धिंड काढत अतिशय क्रूरपणो 15 फेब्रुवारी 1689 या दिवशी पेडगावच्या किल्यात औरंगजेबासमोर राजांना आणण्यात आले. धर्म बदलण्याची अट लाथाडून धर्मनिष्ठ राजांनी मरण पत्करले. 12 मार्च 1689 या दिवशी गुढीपाडवा होता. गुढीपाडवा हा हिंदुचा मोठा सण. या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी 11 मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. राजांना तुळापूर येथे आणण्यात आले. त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. मृत्युसमयी राजांचे वय अवघे 32 होते.
महाराजांच्या पराक्रमाने, शौर्याने ही भूमि पावन झालेली आहे. संभाजीराजांबद्दल वाचून व ऐकून अंगावर आजही काटा उभा राहतो. अशा ह्या परमप्रतापी धर्मविर संभाजी महाराजांच्या समाधीस्थळास एकदा तरी प्रत्येकाने भेट अवश्य द्यायला हवी.
तुळापूरहूनजवळच असलेल्या वाघोलीकडे जाण्याकडे निघालो. वाघोली हे पुणे-नगर रस्त्यावरील प्राचीन गाव. येथे वाघेश्वराचे जुने मंदिर आहे. तुळापूरहून निघाताना संध्याकाळचे ६.३० वाजले होते.
वाघाच्या जबड्यात घालुनि हात मोजुनि दात...
बलिदान स्थळाकडे जाणाºया मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर हे शिल्प बसविले आहे. छत्रपती संभाजीमहाराज यांचे मनाला स्फूर्ती देईल असे शिल्प आहे. रायगडच्या पायथ्याला सांदोशीच्या जंगलात संभाजीमहाराजांनी सिंहाशी झुंज दिली होती. त्याचा जबडा हाताने फाडून ठार केले होते. या घटनेवर आधारित हे शिल्प असून, सुमारे आठ फूट उंच, दहा फूट लांब असे शिल्प आहे.
श्री कवी कलश यांची समाधी :
श्री छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी तसेच संभाजी महाराजांचे जवळचे सल्लागार व काव्यसम्राट श्री कवी कलश यांना देखील संभाजी महाराजांबरोबरच तुळापूर येथे ठार करण्यात आले. त्यांची समाधी आपणांस संगमेश्वर मंदिराच्या डाव्या बाजुस दिसते.
कसे पोचाल :
- पुण्यापासून ईशान्येला अंदाजे ४० किलोमीटरवर असलेल्या तुळापूर या ठिकाणी पोहचण्यासाठी नगररोड मार्गे सुमारे ३२ किलोमीटर अंतर तर आळंदी रोड मार्गे अंदाजे ३४ किलोमीटर अंतर पार करावे लागते.
- तुळापूर येथे जाण्यासाठी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा उपलब्ध आहे.
- पुण्याकडून यायचे झाल्यास :
- पुणे नगर रोड - चंदन नगर - वाघोली - लोणीकंद - (डावीकडे) तुळापूर फाटा -फुलगाव - तुळापूर.
- दुसरा मार्ग
- पुणे -आळंदी रोड मार्गे: पुणे - येरवडा - विश्रांतवाडी - कळस - दिघी - च-होली -आळंदी - मरकळ - तुळापूर (रस्ता थोड्या ठिकाणी खराब आहे.)
- स्वत:ची गाडी असेल तर तुळापूरमध्ये पोहोचण्यासाठी जवळपास १ तास पुरेसा होतो.
अधिक फोटोसाठी कृपया ही लिंक पहा
http://ferfatka.blogspot.com/2013/04/blog-post.html
उपयुक्त माहिती माझ गांव जवळच
उपयुक्त माहिती माझ गांव जवळच आहे इथून फुलगाव.
छान माहिती. धन्यवाद.
छान माहिती. धन्यवाद.
लिंबीच्या बाबांची नेमणूक
लिंबीच्या बाबांची नेमणूक तुळापुरलाच होती, त्यामुळे इथे कित्येक वेळेस गेलो आहे.
दरवेळेस सुन्न व्हायला झाले, दरवेळेस जाणवले की आम्ही हिंदून्नीच आमच्याच कर्माने प्रचण्ड काही गमावले, हो, अगदी आमचाच राजा, आमचाच छत्रपती देखिल गमावला, अन तरीही आजही आम्ही शहाणपण शिकत नाही!
दरवेळेस अजुन एक विचार येतोच येतो की आज मी आत्ता इथे उभा आहे, पण काय उपयोग? त्या वेळेस मी इथे का नव्हतो?
आणि आता मी आहे, इथे, तिथे, तरीही काय करणार आहे?
तिथे गेले की एका अनामिक, अगतिक काहीच करू न शकल्याच्या अपराधीपणाच्या भावनेने मन हताश होते, पण तरीही तिथून पाय निघता निघत नाही!
ज्या बळावर शंभुराजान्नी धर्माकरता हाल सोसले, कळी काळालाही लाजवेल असा मृत्यू पत्करला, त्या त्यांच्या बळाचा काही अंश तरी माझ्यात माझ्या पुढच्या पिढ्यात उतरत राहुदे, अशी प्रार्थना करुनच तिथुन मागे फिरलो.
छान व उपयुक्त
छान व उपयुक्त माहिती.
धन्यवाद.
छान माहिती.
छान माहिती.
शिवाजी सामंतांची ' छावा '
शिवाजी सामंतांची ' छावा ' कादंबरी वाचा....... रडु आवरेनासे होते त्यांचे केलेले हाल वाचुन.....तितकेच वाईट कवी कुलेशांचे पण वाटते.. ........
जागेची माहिती फारच छान.... पण एक शंका आहे....बाबासाहेब पुरंदरे लिखित ' राजा शिवछत्रपती ' पुस्तकात जिजा बाईंची शिवाजी महाराजांनी सोन्याची तुला केली म्हणुन त्या गावास तुळापुर पडले असे लिहिले आहे.....पण वर मात्र " शहाजीराजांनी या ठिकाणी हत्तीला तराफ्यात उतरवून त्याचे वजनाइतके सोने दान केले अशी एक गोष्ट सांगण्यात येते. यावरूनच गावाला तुळापूर नाव पडले" असे लिहिले आहे.... ते कसे????
ज्या बळावर शंभुराजान्नी
ज्या बळावर शंभुराजान्नी धर्माकरता हाल सोसले, कळी काळालाही लाजवेल असा मृत्यू पत्करला, त्या त्यांच्या बळाचा काही अंश तरी माझ्यात माझ्या पुढच्या पिढ्यात उतरत राहुदे, अशी प्रार्थना >>++१११११
छान माहिती
छान माहिती
अनिश्का ताई आपल्याकडे
अनिश्का ताई
आपल्याकडे ग्रहणात दान करण्याची पद्धत आहे. शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाचे दिवशी एक दानसोहळा करण्याचे ठरविले. दि. 6 जाने. 1665 ला सूर्यग्रहण होते. महाबळेश्वर येथे त्यांनी आपल्या आईची म्हणजेच जिजाऊसाहेबांची सोन्याने तुळा केली.
‘‘बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्नपती पुस्तकात जिजाबाईंची शिवाजी महाराजांनी सोन्याची तुला केली म्हणुन त्या गावास तुळापुर पडले असे लिहिले आहे..’’ असा उल्लेख आपण केला. सध्या माङयाकडे हे पुस्तक उपलब्ध नाही. मित्रकडून घेऊन वाचून सांगतो. पण माङया तरी वाचनात हा उल्लेख नाही. कारण तुळापूरला ‘‘शहाजीराजे भोसल्यांची कल्पकता. भीमाइंद्रायणीच्या डोहांत हत्ती नौकेत चढविण्यात आला. शिवाजीराजांच्या लुकलुकत्या बालनेत्रंनी हा प्रसंग पाहिला.’’ असे एक चित्र काढून ठेवलेले आहे.
त्या चित्रचा फोटो खाली जोडत आहे.