विषय क्र. १: इजाजत

Submitted by माधव on 22 August, 2012 - 06:44

"चल पिक्चरला!" माझ्या डोळ्यावर चढणारी सुस्ती भंग करत मित्राने फर्मावले. विचारणे वगैरे प्रकार हॉस्टेलवर चालत नाहीत, तिथे थेट आज्ञाच असते.

मी त्याच्याकडे एक नि:शब्द कटाक्ष फेकला.

"अरे एकच शो आहे" माझ्या नजरेतले भाव ओळखत तो थोडासा ओशाळत म्हणाला. हॉस्टेलवर रहाताना सिनेमाला जायची एकच राजमान्य वेळ असते - रात्री ९ ते १२. आणि आत्ता सकाळचे फक्त १०:३० वाजत होते.

माझी त्याच्यावरची नजर तशीच, पण आता भाव दुसरे. मित्रच तो, त्याने ते पण बरोबर वाचले.

"डेक्कनला, इजाजत, ११ चा शो आहे." रेखा आणि आरडी यांच्यापुढे मला सुस्ती गौण आहे हे त्याचे गणित बरोबर होते.

एक कप अमृत रिचवून आमच्या सायकली कर्वे रोडच्या उताराला लागल्या. सगळे सोपस्कार पूर्ण करून जेंव्हा आत पोहचलो तेंव्हा अंमळ उशीरच झाला होता. म्हणजे जाहिराती, त्यावरची आमची बडबड असे काही करायलाच मिळाले नाही. चित्रपटाची नामावली सुरुच झाली आम्ही गेल्यागेल्या. आणि पुढचे अडीच तास बडबड करायला सुचलेच नाही. एक उत्कट अनुभव उलगडत गेला आमच्या समोर आणि अगदी रोमारोमात भिनत गेला - कधीही न विसरण्यासाठी.

इजाजत - काय नाहीये या सिनेमात? कथेतील ठसठशीत व्यक्तीरेखा आणि त्या सादर करायला रेखा, नसिरुद्दीन, अनुराधा पटेल अशी तगडी स्टारकास्ट, गुलज़ारची सुंदर गाणी आणि छोटे बर्मन खाँ साहेबांचे अप्रतीम संगीत आणि गुलज़ारचीच पटकथा व संवाद. असा मणीकांचन योग हिंदी चित्रपटात फार कमी वेळा येतो. पण सर्वात महत्वाचे म्हणजे या सगळ्यांना एकत्रीत करून दिग्दर्शकाने (हा पण गुलज़ारच) जो अनुभव दिलाय या चित्रपटातून तो कधीच विसरता येत नाही, आणि तेच त्याचे सगळ्यात मोठे यश.

चित्रपट सुरू होतो तो पावसातून जाणार्‍या एका ट्रेनपासून. पावसाने नटलेल्या हिरव्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर नावे येऊ लागतात आणि तो फील अचूक पकडत झुळूझुळू वाहणार्‍या झर्‍याच्या अवखळ चालीत आशा गाऊ लागते -

छोटीसी कहानी से
बारीशों के पानी से
सारी वादी भर गयी
लाला लाला लालाला

कडव्यात चौथी ओळच देत नाही, बांध चाल - गुलज़ार पहिला गुगली टाकतो. छोटे नवाब बर्मन तो चेंडू असा काही टोलवतात की बॉलर बरोबर आपणही अवाक् होतो. त्या चौथ्या ओळीच्या जागी आरडी चक्क लाला लाला असा फिलर वापरतो पण तो फिलर न वाटता गाण्याची ओळच बनून जातो. गाणे चालूच असते अणि आपण ऐकतच असतो, डोळे टक्क उघडे ठेऊन. हो, अशोक मेहताचा कॅमेरा तो हिरवा निसर्ग असा काही टिपत असतो की पापणी मिटणेही जीवावर येते. सगळ्या चित्रपटभर त्याचा कॅमेरा सुंदर फ्रेम्स दाखवतच रहातो - एकदाही प्रसंगापेक्षा भारी न होण्याची खबरदारी घेत.

गाडी थांबते आणि नायक, नायीकेची प्रतिक्षालयात भेट होते. मग सगळा चित्रपट फ्लॅशबॅकने उलगडत जातो. आजोबांनी महेंद्रचे लग्न सुधाशी ठरवलेले असते. तो नोकरीचा बहाणा करून ते पुढे ढकलत असतो पण खरे तर त्याचे मायावर प्रेम असते. मनाने आणि शरीराने ते एकमेकांचे झालेले असतात. पडद्यावर काहीही अती न दाखवता गुलज़ार हे शारीरीक प्रेम नुसत्या शब्दांतून रंगवतो, त्याची परीसिमा गाठतो - एक सौ सोला चाँद की राते एक तुम्हारे कांधे का तील या ओळीत. आपण फक्त तोंडात बोटे घालून बघतच रहातो ही अजब कारीगिरी.

तर आजोबा आता कसलीही सबब ऐकायला तयार नसतात. महेंद्र सुधाला मायाबद्दल सगळे सांगून टाकतो. ती तरीही त्याला स्विकारते; एका छोट्याशा अपेक्षेच्या बदल्यात - त्याने यापुढे आपल्याशी एकनीष्ठ रहावे. लग्न होते आणि त्या दोघांचे आयुष्य सुखा-समाधानात चालू होते. निदान वरवर तरी तसे वाटत असते. पण नियतीला ते मान्य नसते. ती म्हणते -

कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जिने दो
जिंदगी है बेहने दो
प्यासी हू मैं प्यासी रेहने दो
(मला इथे अभिमान मधला ’बिरहा ही जीवन का सच्चा सूर है’ ह संवाद नेहमी आठवतो. ती प्यास, ती तनहाइ पाठ सोडत नाही माणसाचा)

लग्न करून घरी आल्यावर सुधाला एक वही मिळते मायाच्या कवितांची. आणि सुरू होते तिची घुसमट. त्या उत्कट कवितांमधून माया आणि महेंद्रचे गहिरे प्रेम तिच्या पुढे उलगडत जाते आणि आपण त्यांच्या प्रेमाच्या आड आलो आहोत अशी तिची भावना होऊ लागते. तिचीच का आपलीही घुसमट व्हायला लागते इतके ते प्रेम अथांग असते. ते अथांगता दाखवताना गुलज़ार लिहितो -

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, सावन के कुछ भिगे भिगे दिन रखे है, और मेरे खत मे लिपटी रात पडी है, वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो

हे ऐकत असताना डोळ्यापुढे ना रेखा असते ना अनुराधा. असतो तो फक्त पाण्याबाहेर काढलेला एक मासा आणि त्याची तडफड. घुसमट नाही होणार तर काय?

गुलज़ारने जेंव्हा ह्या ओळी पहिल्यांदा आरडीला ऐकवल्या होत्या तेंव्हा त्याने त्यांना संगीत द्यायला साफ़ नकार दिला होता. सहाजीकच होते ते. शब्द सुंदरच आहेत पण चालीत बांधण्यासारखे अजिबात नाहीत. आरडीची चिडचिड झाली तो गुलज़ारला म्हणाला "तू उद्या मला टाइम्स ऑफ इंडियातली बातमी देशील आणि म्हणाशील याला चाल लाव" पण गुलज़ार शब्द बदलायला तयार झाला नाही. शेवटी आरडीने विडा उचलला आणि एक सुंदर गाणे आपल्याला मिळाले. गुलज़ारच्या या शब्दांनी त्याला गीतकाराचे राष्ट्रीय पारितोषीक मिळवून दिले आणि ते गाणार्‍या आशाला गयिकेचे. पण एवढे अशक्यप्राय काम करुनही आरडीला त्या गाण्याबद्दल कसलेच पारितोषीक नाही मिळाले.

सुधाची घुसमट वाढतच जाते आणि घडणार्‍या काही घटनांमुळे महेंद्र मायात परत गुंतत चालला आहे अशा गैरसमजात ती घर सोडून जाते. फ्लॅशबॅक संपतो आणि आपण दी एंड पाशी येऊन पोहचतो (हिंदी चित्रपटाचा कधी शेवट होत नाही, त्याचा दी एंडच होतो). महेंद्र सुधाचा गैरसमज दूर करतो आणि ते दोघे आता परत एकत्र येणार असे वाटत असतानाच ’तो’ शेवट होतो. इतका अटळ पण पटलेला शेवट दुसर्‍या कुठल्याही चित्रपटात मला आढळला नाहीये अजून पर्यंत. चित्रपट संपतो आणि आपण शेवटच्या अनपेक्षीत वळणाने सुन्न झालेले डोके घेऊन बाहेर पडतो.

यातल्या अभिनेत्यांविषयी काय बोलावे? कुठे कुणी अभिनय केलाय असे वाटतच नाही सगळे आपल्या अवतीभवती घडतय इतके खरे वाटत रहाते. अनुराधाचा हा रेखाबरोबरचा उत्सव नंतरचा दुसराच चित्रपट. पण ती रेखापेक्षा कुठेही कमी पडलेली नाही - ना सौंदर्यात ना अभिनयात. रेखा आणि नसिरुद्दीन तर महानच आहेत. शेवटच्या प्रसंगात शशी कपूरही छाप पाडून जातो.

माझ्या मनात संपूर्ण चित्रपटाइतकेच जागा अडवून बसले आहे ते चित्रपटातले चौथे गाणे -

खाली हाथ शाम आयी है
खाली हाथ जायेगी
आज भी ना आया कोइ
खाली लौट जायेगी

कुणी मला विचारले संध्याकाळची कातरता कशी असते तर क्षणाचाही विलंब न करता मी हे गाणे ऐकवेन. हे ऐकल्यावर जे वाटते तीच संध्याकाळची कातरता.

नेहमी संध्याकाळी येणारी ही कातरता त्या दिवशी सिनेमाहून परत येताना मात्र टळटळीत दुपारी माझ्या सायकलवर डबलसीट बसून आली होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडता चित्रपट , मस्त लेख. संपूर्ण चित्रपट पाठ झाला तरी पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो (आसाच आणखी एक 'आंधी).
एकसौ सोलह चांद की रातें बद्दल http://groups.yahoo.com/group/gulzarfans/message/4328

गुलजार हाडाचा कवी असल्यामुळे चित्रपटांची गाणी चित्रित करताना अधिक तन्मयतेनं करतो असं वाटतं. 'कतरा कतरा'चं धुक्यातलं पिक्चरायझेशन मस्त आहे. रेखा कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत फिट्ट कशी बसते याचं बरेचदा आश्चर्य वाटतं.

अफाट लिहिलंय माधव !
केवळ अप्रतिम...
इजाजतची सग्गळी गाणी प्रचंड आवडतात. (लिबास आणि इजाजत दोन्हीची गाणी मी अजिबात न कंटाळता कितीही वेळा ऐकू शकते)
चित्रपट बर्‍याच वर्षांपूर्वी पाहिला होता. तुमचा लेख वाचून चित्रपट परत पहायची गरज वाटायला लागली आहे.

ना कम ना ज्यादा' लिहिलंय तुम्ही, माधव! माझ्यामते बक्षीसपात्र >> +१००० Happy

>>नायक कायम निर्दोषच असला पाहिजे, ही तद्दन बॉलिवूडी सवय वाटते मला.
गेली ना रेखा सोडून त्याला... तेव्हा राग आवरता घ्या बरे.. Happy

खुपच छान लिहिलय. इजाजत माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक. सगळी गाणी अप्रतिम नी आवडती.

फक्त ते
<<<<<<<<<<<छोटीसी कहानी से
बारीशों के पानी से
सारी वादी भर गयी
लाला लाला लालाला

क्डव्यात चौथी ओळच देत नाही, बांध चाल - गुलज़ार पहिला गुगली टाकतो. छोटे नवाब बर्मन तो चेंडू असा काही टोलवतात की बॉलर बरोबर आपणही अवाक् होतो. त्या चौथ्या ओळीच्या जागी आरडी चक्क लाला लाला असा फिलर वापरतो पण तो फिलर न वाटता गाण्याची ओळच बनून जातो. >>>>>>>>>>>

लाला लाला लालाला च्या ऐवजी 'ना जाने क्यु' असं आहे. Happy

ना जाने क्यु दिल भर गया
ना जाने क्यु आंख भर गयी

गुलज़ारने जेंव्हा ह्या ओळी पहिल्यांदा आरडीला ऐकवल्या होत्या तेंव्हा त्याने त्यांना संगीत द्यायला साफ़ नकार दिला होता. सहाजीकच होते ते. शब्द सुंदरच आहेत पण चालीत बांधण्यासारखे अजिबात नाहीत. आरडीची चिडचिड झाली तो गुलज़ारला म्हणाला "तू उद्या मला टाइम्स ऑफ इंडियातली बातमी देशील आणि म्हणाशील याला चाल लाव" पण गुलज़ार शब्द बदलायला तयार झाला नाही. शेवटी आरडीने विडा उचलला आणि एक सुंदर गाणे आपल्याला मिळाले.

<<<

व्वा व्वा

सुंदर लेख माधव, फार आवडला, धन्यवाद यातील माहितीसाठीही Happy

अप्रतिम चित्रपट ! लेख खुप म्हणजे खुप आवडला Happy
सगळेच दिग्गज and everybody was at their best !
'उमराव जान' मधली रेखा आणि इजाजतमधली रेखा ....
'कजरारे' लिहीणारे गुलझार आणि 'इजाजत'ला श्रीमंत करणारे गुलझार.....

जियो दोस्त !

>>"तू उद्या मला टाइम्स ऑफ इंडियातली बातमी देशील आणि म्हणाशील याला चाल लाव"

त्याही पुढचा किस्सा खरे तर असा आहे की: आशाताईं, गुलजार व पंचम दा बसले होते.. गुलजारची ती कविता (मेरा कुछ सामान) आशाताई एखादी कविता गुणगुणावी तशा गुणगुणत होत्या. पंचम च्या कानावर ते पडले- "काय गात होतीस तू..." त्यांनी विचारले. "काही नाही सहज".. असे म्हणून आशाताईंनी पहिली ओळ गुणगुणली.. "मेरा कुछ सामान... तुम्हारे पास पडा है..." साधारण त्याच चाल व तालात ज्यात ते गीत नंतर बांधले गेले. गुलजार ला वाटले आता पंचम चांगलाच वैतागणार..

पण पंचम ला ती पहिल्या ओळीची चाल ईतकी आवडली की अख्खे गाणे त्याने १० मिनीटात संपूर्ण संगीतबध्द केले- ईती खुद्द आशाताई.
(संदर्भः Pancham Unmixed. National Award - Best Compilation Film-2009 by Brhamnanad Singh. Perhaps the only most comprhensive docu of २ hrs on Pancham.. Worth every frame!!)
जळी स्थळी.... फक्त ज्याला संगीतच दिसले आणि सुचले तो पंचम हे काय अजब रसायन होते हे जाणून घ्यायचे असेल तेही अनेक गुणवान कलाकार मंडळींच्या शब्दात (गुलजार, अख्तर, विशाल भारद्वाज,
शंकर महादेवन, शम्मी, ऊषा, आशा, फैजल कुरेशी, कविता क्रिश्णमूर्ती, अमेरिका, अमिराती येथील गृप्स, पंचम भक्त, .... आजचे अनेक संगीतकार, पंचम च्या ऑर्केस्ट्रा मधिल लोक्स, निर्माते, दिग्दर्शक, विधू चोप्रा... असे कितीतरी..)

तर ही फिल्म तुम्हाला पहायलाच हवी. फिल्म च्या शेवटी मात्र अक्षरशः काळजात खोल तुटते.

पंचम च्या भक्तांसाठी ही फिल्म म्हणजे एक पोथी आहे, ती तुमच्या "पंचम" देव्हार्‍यात हवीच!

(युट्यूब वर कदाचित ही फिल्म असेल पण अस्सल्/मूळ कॉपि विकत घेवूनच पहा तेही पंचम चाहत्यांबरोबरच.. वरील उपरोल्लेखित भाग, फिल्म च्या या जागी आहे: ५५.१९ ते पुढे).

काही लोकांना पंचम ने कुठून काय "ऊचलले" यात विशेष रस असतो.. त्यांनी ही फिल्म आवर्जून पहावी. त्यांच्याच भाषेत "ऊचलल्यावर" त्याला पुढे कुठल्या ऊंचीवर नेवून ठेवायचे याचा थोडाफार अंदाज फिल्म मधून येवू शकतो. त्यासाठी देखिल किती व्यासंग हवा याची थोडी फार कल्पना येवू शकेल. आणि यातील जाणकार व्यक्ती त्याबद्दल देखिल बोलल्या आहेत. माझ्या भाषेत, पंचम ने त्यांना "दत्तक" घेतले आणि ५-६ मिनीटांच्या संगीत सुरावटीत त्यांचा राज्याभिषेक केला!

मुळात पंचम च्या कामाबद्दल बोलायची आपली तरी लायकी नाही. पण आता पाने भरून लिहावेसे वाटते आहे.. तरिही संपणार नाही..

बाकी श्री गणपती बाप्पांना सर्व गीत संगीत वाद्य या निर्मीतीचे मूळ क्रेडीट द्यायचे ठरले तर जगभर सर्वत्रच "ऊचलेगिरी" दिसून येईल! Happy

पण नासिर ची व्यक्तिरेखा निर्दोष वाटत नाही जशी मासूम मधे पण वाटत नाही>>>

म्हणूनच तर दोन्ही pictures great आहेत. नासिर दोन्हीकडे तद्दन फिल्मी हीरो नाही तर सामान्य माणूस आहे - प्रेम करणारा, चूका करणारा

माझ्या अतिशयच आवडत्या पिक्चर्सपैकी एक.
माधव छान च Happy

नायक कायम निर्दोषच असला पाहिजे, ही तद्दन बॉलिवूडी सवय वाटते मला>>>>>>>> लले, जे प्रतेक्षात नसतं ते पडद्यावर बघायला आवडतं पब्लिकला म्हणून तर एवढाले पैसे खर्च करून जातात ना लोक्स बॉलिवुडी सवयी स्विकारायला Proud

पिक्चर पाहीलेला नाही पण त्यातले " मेरा कुछ सामान" बरोबर कॉलेजजीवनातल्या काही आठवणी कायमच्या जोडल्या गेल्यात.

मंजिरी सोमण,

>> जे प्रतेक्षात नसतं ते पडद्यावर बघायला आवडतं पब्लिकला म्हणून तर एवढाले पैसे खर्च करून जातात ना
>> लोक्स बॉलिवुडी सवयी स्विकारायला

अगदी खरंय!

पण पुलंप्रमाणे मलाही स्वत:चे पैसे खर्च करून दुसर्‍याची श्रीमंती पाहायला जाणं रुचत नाही. म्हणून मी चोरून चित्रपट पाहतो. Lol

आ.न.,
-गा.पै.

वि.सू. : चोरून = आंतरजालावरून चोरून!

माधव, मस्त लिहिला आहे लेख. या स्पर्धेबद्दल वाचलं तेव्हा मनात आशा निर्माण झाली होती कि कोणी तरी नक्की या सिनेमाबद्दल लिहिणार.

मी हा सिनेमा ३ वेळा पाहिला आहे. न ठरवता पण वयाच्या ३ वेगवेगळ्या टप्प्यांवर. टीनएजमधे अनुराधा एकदम जवळची वाटली. लग्न झालं तेव्हा परत एकदा पहायचा योग आला, या वेळेस कोणास ठावुक का पण रेखाकडे सहानुभुती झुकली. सध्याच परत एकदा पहायचा योग आला. यावेळेस मनाने कोण चुक, कोण बरोबर असा न्याय केलाच नाही. आता तर प्रचंड आवडला सिनेमा. सगळ्या व्यक्तिरेखांची कमी-अधिक समजुन घेण्याची मॅच्युरिटी (कदाचित Wink ) आल्यामुळे यावेळेस फारच अपिल झाला.

गाणी तर कमाल आहेत. 'मेरा कुछ सामान' अप्रतिम शब्द आणि संगीत. गुलजारच्या प्रेमाच्या काठावर उभी असताना या सिनेमाने आणि यातल्या गाण्यांनी मात्र त्यांच्या पुर्ण प्रेमात पाडलं. एखाद्या माणसाने सुंदर लिहावं तरी किती. हा सिनेमा कोणाला रेकमेंड करावा तर कशासाठी? गुलजारांच्या शब्दांसाठी, आरडींच्या गाण्यासाठी, रेखा आणि नासीरचा उत्तम अभिनय कि अनुराधा पटेलचं सुंदर असणं आणि तिची उत्कट व्यक्तिरेखा. दिग्दर्शन, कथा, गाणी, पिक्चरायझेशन, कलाकार, एकुणातच नितांत सुंदर सिनेमा. माधव, परत एकदा आभार !

माझा पण आवडता चित्रपट Happy
सुरेख लेख....

>>इतका अटळ पण पटणारा शेवट
अगदी अगदी..

हा चित्रपट पाहताना या सर्व कलाकारांचं समीकरण इतकं जमून आलंय की आपण एक चित्रपट पाहतोय की अनुभव असंच.
गाणी अप्रतिम ...R.D. At his best....:)

माधव,

स्त्रीपुरुष नातेसंबंधांवर इजाजत चित्रपट खूपच बोलके भाष्य करतो. नात्यांचे गोफ हळुवार तरीही अनपेक्षितपणे उलगडत जातात. शेवटीशेवटी (तो तिला हृदयविकाराच्या झटक्याचं सांगतो तेव्हा) जरा धसमुसळेपणा होतो, पण खपून जातो.

गाणी मात्र अप्रतिम आहेत. आम्ही साताठ पोरं कर्नाळ्याचा डोंगर चढून खाली उतरलो होतो. दुपारी ४ च्या सुमारास तिथून अलिबागचा रस्ता पकडला. एकाची जीप होती. अर्थातच त्याच्याच हाती संगीत प्रक्षेपण होतं. त्याने कॅसेट लावली आणि 'मेरा कुछ सामान...' सुरू झालं. त्यासरशी आम्ही सार्‍यांनी गिल्ला केला की कसलं फालतू गाणं लावलंस म्हणून. हे काय गाडीतून जातांना ठेक्यावर म्हणायचं गाणंय!

अलिबागेस रात्री राहायची व्यवस्था बाहेर राहुट्यांत होती. तेव्हा टेपवर परत तीच कॅसेट लावली आणि परत मेकुसा... सुरू झालं. यावेळी मात्र काय जादू झाली कोणास ठाऊक पण गाणं एका वेगळ्याच धुंदीत घेऊन गेलं. समोरचा अथांग सागर की आकाशीचा प्रफुल्ल चंद्र की रात्रीचा मंद समीर कोणी जादू केली असेल कोणास ठाऊक! आम्ही पोरंपोरंच होतो म्हणून बरं. जर कोणी पोरी सोबत असत्या, तर काय झालं असतं (की नसतं....?) कोण जाणे.

तर अशी झाली इजाजतशी पहिली ओळख. नंतर रसपानाचा कार्यक्रम सुरू झाला. एकावर एक धुंदी चढतच गेली. आजही मे.कु.सा. ऐकलं की हाती प्याला घ्यावासा वाटू लागतो.

आ.न.,
-गा.पै.

मस्त लिहिलंय. इजाजत आवडता आहे. सगळ्यांचीच कामं मस्त जमून आली आहेत. गाणी अप्रतिम आहे. कतरा कतराचं लोकेशन, नासिरुद्दिन-रेखाचं घर, तिचं साधं रहाणं सगळंच छान.

आहाहा!!! माझा ही अत्यंत आवडता चित्रपट..
गुलजार च्या गाण्यांनी अक्षरशः वेडं केलं होतं.. 'मेरा कुछ सामान..' ऐकताना त्याच्या कल्पनाशक्ती ला कितीकिती सलाम करु असं झालेलं!!
अनुराधा पटेल ने 'वेडी माया' साक्षात उभी केलीये.. नसीर ला पाहून राग येणे ,ही गोष्ट तर त्याच्या अभिनयाला दर्शकांकडून मिळालेली दादच!!
रेखा ची भूमिका ही आवडलीच होती..
माधव ,खूप सुंदर लिहिलंत .

छान लेख!
मेरा कुछ सामान हेच एका लेखाचा विषय आहे, त्यातले संतूर तर अद्वितिय!
पंचम च्या भक्तांसाठी ही फिल्म म्हणजे एक पोथी आहे, ती तुमच्या "पंचम" देव्हार्‍यात हवीच!>> प्रचंड अनुमोदन.
http://www.onlinewatchmovies.net/hindi/pancham-unmixed-an-unending-journ...

पण नासिर ची व्यक्तिरेखा निर्दोष वाटत नाही जशी मासूम मधे पण वाटत नाही>>>

कळले नाही असे तुम्हाला का वाटते. मला तर दोन्ही चित्रपटात नासिरची व्यकितीरेखा निर्दोष प्रामाणिक वाटली. दोन्ही चित्रपटांमधे त्याचे लग्नापुर्वी कुणा इतर स्त्रिशी संबंध असतात. हे तो प्रांजळपणे कबुल करतो. तरीही त्याला भोगावे लागते.

माधव, अप्रतिम लिहिले आहेस. डोळ्यावाटे धार लागली. जेंव्हा भूतकाळ संपून वर्तमानकाळात सिनेमा येतो तेंव्हा काळजात दुखर्‍या कळा सुरु होतात भावनांच्या.

छान लेख.माझाहि आवडता सिनेमा आणि गाणितर तोड नाहि. मि आणि माझ्या मुलि अशि दोन पिढ्याना हि आवडणारि गाणि त्यामुळे इजाजतचि कॅसेट कितिदा वाजली असेल याला सिमाच नाहि.गाडिवरुन जाताना उडणार्‍या ओढणिपेक्षा पँट शर्ट जास्त चांगले असे माझे मत या सिनेमामुळे झाले त्यामुळे मुलिना नविन जिन मिळाल्या हा त्यांच्या द्र्स्टिनी व्यावहारिक फायदा .

माधव मस्त लेख.. ईजाजतच्या ऑडिओ कॅसेट्मधे गाण्याआधी संवाददेखील आहेत. मस्त चित्रपट आणि अवीट गोडीची गाणी Happy

Pages