असाही श्रावणमास

Submitted by एम.कर्णिक on 8 August, 2009 - 11:35

या कवितेत कै. बालकवींच्या अत्यंत सुंदर कवितेतील काही ओळी केवळ विनोदासाठी व्यंगार्थाने वापरल्या आहेत इतकेच. अन्यथा त्या गोड आणि रम्य कवितेची चेष्टा करण्याचा उद्देश कदापि नव्हता.

श्रावणमासी खर्च खिशासी चिंता दाटे चोहिकडे
क्षणात येते भरुनि हुडहुडी क्षणात फिरुनी ताप चढे

वरती बघता ग्रहनक्षत्रे फिरती डोळ्यांच्या पुढती
फास बांधला गळ्याभोवती असे भासही मग होती

खिल्लारे रस्त्याने जाता मंगलमय गोमय करती
शिरवे येता पादत्राणे चिकचिक वसने चिताडती

सरलासा हा मास भासतो तोच पारणे ते उपटे
सामानाचा भार पाठिवर खर्चाने छाती फाटे

सुवर्णचंपक, रम्य केवडा तसा मोगरा दरवळतो
कामावरती जातो म्हणता हुकूम गजर्‍याचा सुटतो

सायंकाळी घरी परतता अटळच जो नेणे असते
ना न्यावा तर बिस्तर पतिचे नक्की सोफ्यावर जाते

श्रावणमासी सणवारांची रेलचेल असते पुरती
मासे अन मांसाहाराची पुरीच होते गच्छंती

पत्नीच्या व्रतवैकल्यांमधि पती बापुडा अतृप्त
श्रावणमासाचा हा महिमा बालकवींना अनवगत.

गुलमोहर: 

कविता आवडली.

>>गेयता सर्वत्र सांभाळली जात नाही
अनुमोदन.

प्रभुणे, तुम्हाला माहिती नसणार बहुतेक, पण श्री. कर्णिक वयानं आपल्यापेक्षा मोठे आहेत. त्यांचा एकेरी उल्लेख वाचायला बरा वाटला नाही.

योगेश आणि मृण्मयी,
प्रतिसादाबद्दल तुमचे दोघांचेही आभार.
मी कविता लिहिताना ओळी मला अपेक्षित असलेल्या चालीवर गुणगुणत लिहितो. आणि वृत्त, यमक, यति या सर्व कसोट्यांमधे उतरण्यासाठी प्रसंगी र्‍हस्व-दीर्घ उच्चारांत मोकळिक घेऊन त्याप्रमाणे शब्द लिहितो. पुन्हा पुन्हा वाचूनही गेयतेला ब्रेक लावणारे शब्द माझ्या लक्षात येत नाहीत. कृपया दाखवाल का? म्हणजे पर्यायी शब्दयोजनेचा प्रयत्न करीन.

योगेश,
एकेरी उल्लेखाबद्दल रोष नाही...
कारण तुमचा काही दोष नाही
वयमानानाने मान मिळावा
माझा असा आक्रोश नाही.

मृण्मयी,
तुमची भावना मनोमन सुखावून गेली ही प्रांजळ कबुली देतो.
धन्यवाद आणि आशीर्वाद दोन्ही !
-मुकुंद कर्णिक

मुकंदजी,
विडंबन खुप छान आहे!
बालकविना सगळे माहित असणार म्हणून तर त्यानी कविता केली...:)

वरती बघता डोळ्यांपुढती ग्रहनक्षत्रे फिरतात
फास बांधला गळ्याभोवती असे भासही होतात

वरच्या ह्या दोन ओळीत ओळीचं शेवटचं अक्षर दीर्घ नसल्यामुळे की काय (गुणगुणून बघताना ) थोडी गडबड वाटली. आणि मी ओळींत बदल करून म्हणून पाहीलं. Happy

वरती बघता डोळ्यांपुढती ग्रहनक्षत्रे फिरताती
फास बांधला गळ्याभोवती भास असेही मग होती

मृण्मयी,
'फिरताती' असा शब्द नाही, 'फिरती' असे शुध्द रूप आहे ते इथे बसणार नाही म्हणून या कडव्यातील पहिली ओळ थोडी वेगळी करून तुम्ही सुचवलेली दुसरी ओळ स्वीकारली आहे. एक मात्रा कमी पडण्याचा दोष शेवटच्या कडव्यातही आहे. ते कडवे-
'पत्नीच्या व्रतवैकल्यांमधि अतृप्तच राहतो पती
बालकवीना ना ठावी ही श्रावणमासाची महती'
असे करता आले असते पण करत नाही कारण मला हवा असलेला परिणाम त्यातून साधत नाही असे वाटते.
पुन्हा एकदा आभार.
-मुकुंद कर्णिक

कर्णिक,
छानच विडम्बन आहे.
आणि विडम्बन करताना वृत्त, मात्रा, र्‍ह्स्व, दीर्घ थोडे बदलले तरी चालतात.
परिणाम आणि कवीचा सन्देश महत्वाचा.
अत्र्यान्ची "झेंडूची फुले" वाचल्यास अशी अनेक उदाहरणे दिसतील.

छान आहे विडंबन. मलाही गेयतेला ब्रेक लावणारे शब्द नाही सापड्ले. चालीत बसते.
>>>>>>>>>.
मोदक पण
वरती बघता डोळ्यांपुढती ग्रहनक्षत्रे फिरतात
फास बांधला गळ्याभोवती असे भासही होतात

या ओळी
वरती बघता डोळ्यांपुढती ग्रहनक्षत्रे फिरतात
फास बांधला गळ्याभोवती भास असेही होतात
अशा अजुन चांगल्या वाटतील. Happy

मयूर, धनू, कविता, बाळूनाना,
धन्यवाद तुम्हा सर्वांना.