असंच

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मी एक पेंटींग बघत होतो. पावसाळी संध्याकाळ आणि उधाणलेला समुद्र. आकाशातल्या ढगांच्या फ़टीतून मधूनच किंचितसे सुर्य किरण समुद्रावर पडलेत आणि क्षितिजापाशी असलेलं पाणी एकदम चकाकून आलयं... अन हे सगळं, समुद्राकाठी बांधलेल्या कठड्यापाशी उभं राहून कुणीतरी एका हरवलेल्या नजरेनी ते पहातयं......... अन अचानक एक आश्चर्य घडलं... हे चित्र जिवंत झालं... त्या उधाणलेल्या समुद्राच्या स्थिर लाटा एकदम घोंघावत त्या कठड्यावर झेपावल्या... पांढरा शुभ्र फ़ेस बनून कधी परतीच्या लाटा बनल्या तर कधी त्या कठड्यावरुन उंच उंच उडून हवेत क्षणभर टपोरे मोती साकारून गेल्या... काही कळायच्या आतच ते मोती त्या उभ्या असलेल्या मुलाच्या अंगावर पडले... अंगावर पडलेला त्या पाण्यानी एकदम सगळं वातावरण शहारून गेलं... मनातली क्षितीजं दूर झाली अन द्रुष्टीच्या पलिकडचं खूप सारं नजरेसमोर येऊन उभं राहिलं.........
नाही... खरंतर असं आश्चर्य वगैरे काहीच घडलं नाही... पण आज संध्याकाळचे जिवंत क्षण मात्र चित्र बनून माझ्या मनात घट्ट घर करून गेले......
वरळी सी फ़ेस... समुद्राची अखंड खळखळ आणि क्षणाक्षणाला पालटत जाणारं त्याचं रूप. दूर क्षितीजापाशी हिरव्यागार रंगात डुंबून राहिलेला तर काठापाशी तांबूस रंगात रंगलेला... मधूनच सुर्याच्या तेजात सोनेरी चकाकणारा अन रात्रीच्या वेळी काळ्या रंगाची शाल पांघरून फ़क्त फ़ेसाळलेल्या पावलांनी जमिनीला मिठी घालणारा... कधी अल्लड तर कधी भिती वाटावी इतका वेडावलेला... मिट्ट काळोख्या रात्री फ़क्त आपल्या आवाजानी अस्तित्व दर्शवणारा... इतक्या वेगवेगळ्या छटा घेऊन प्रत्येक वेळी वेगळेपणानी नजरेत भरणारा... तसे पाहिले तर हे सगळे रंग समुद्राचे स्वत:चे नाहीतच...त्याला स्वत्:ला एकच रंग... तो म्हणजे अखंड खळखळत रहाणे. उन्हात.. पावसात.. वादळात.. दिवसा.. रात्री कधीही पाहिलं तरी अखंड खळखळत रहाणारा... त्या खळखळणार्‍या लाटा म्हणजे समुद्राची भाषा असावी...कधी भरती येऊन खूप काही सांगू पहाणारा तर कधी ओहोटी लागून एकलकोंड्या सारखा सगळ्यांपासून दूर जाऊ पहाणारा... निश:ब्द आणि गंभीर... जो रंग टाकू त्यात उठून दिसणारा........
खरंतर समुद्र, वारा, सूर्य, पाऊस आणि अशा सगळ्याच गोष्टी निर्जीव निर्विकार... निसर्गानी ज्या स्थितीत ठेवलं आहे त्यात अखंडपणे टिकून रहाणार्‍या... माणसाच्या जाणिवा त्याला आकार देतात.. शब्द देतात आणि सुरेखपणे एकमेकात गुंफ़ून टाकतात... निसर्गानी त्याच्या भाषेत घातलेल्या हाका असतात ह्या... त्याच निसर्गानी मला ऐकायला कान दिले... पहायला डोळे दिले आणि अनुभवायला जाणिवा दिल्या... म्हणून त्याचं बोलण भरभरून ऐकू येतं...खूप सारं डोळ्यात साठवता येतं आणि मनसोक्त त्याच्यात सामावून जाता येतं... पण एक मात्र खरं, जिवंत प्राण्यांना निसर्गानी जाणिवा दिल्या आणि स्वत्:कडे मात्र निर्विकारता खूप जपून ठेवली...आपल्याला जणिवांबरोबर सुख दिलं, दु:खं दिली, आनंद दिला आणि वेदनाही दिल्या... आणि त्याच बरोबर ह्या सगळ्यात राहून स्वत्:सारखं निर्विकार बनण्याची ताकदही दिली...
ही निर्विकारताच अशा वेळी माझ्याशी संवाद साधू लागते...वार्‍याच्या आवाजानी...खळखळून बोलणार्‍या लाटांनी...कडकडीत उन्हाच्या धगीतून आणि कोसळणार्‍या पावसाच्या सरीतून...मनातल्या त्या जिवंत चित्रावर असंख्य वेगवेगळे रंग चढत रहातात आणि मग निसर्गाची सगळीच रूपं माझी होऊन जातात आणि मीही तितकाच त्यांचा होऊन जातो...त्या निर्विकार जिवंत चित्राचा एक भाग बनून जातो...

विषय: 
प्रकार: 

वाव अमेय छान ..... सुंदर.....
भारावलेले ......