नमस्कार,
'मायबोली.कॉम' हे मराठीतील पहिले व मोठे संकेतस्थळ. आंतरजालावरील पहिला दिवाळी अंकसुद्धा मायबोलीचाच. मायबोलीच्या या 'हितगुज दिवाळी अंका'चे यंदा दहावे वर्ष! आणि योगायोगाने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचंही हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. या दोन्ही आनंदसोहळ्यांचं औचित्य साधण्यासाठी व महाराष्ट्राची गौरवगाथा गाण्यासाठी 'महाराष्ट्र' ही यंदाच्या हितगुज दिवाळी अंकाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. दुहेरी महत्त्वाच्या या टप्प्यावरील हितगुज दिवाळी अंक प्रसंगाच्या तोलामोलाचा, सकस आणि सर्वांगसुंदर व्हावा अशी आमची मनीषा आहे. म्हणूनच अंकाच्या मुखपृष्ठासाठी आम्ही स्पर्धेद्वारे प्रवेशिका मागवत आहोत.
मायबोलीच्या दिवाळी अंकांना एक समृद्ध परंपरा आहे. अनेक प्रतिष्ठित दिवाळी अंक स्पर्धांत मायबोलीच्या दिवाळी अंकांना बक्षिसं मिळाली आहेत. महाराष्ट्राचं वैभव असणार्या अनेक दिग्गजांचा या अंकांत सहभाग राहिला आहे. ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, सुलेखनकार कल्पेश गोसावी यांनी यापूर्वी मायबोलीसाठी आपली चित्रं दिली आहेत.
मायबोलीचा ऑनलाइन दिवाळी अंक जगभरातील लाखो वाचकांपर्यंत पोहोचतो. त्यांच्याकडून वाखाणला जातो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपली कला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. जगभरात पसरलेला मायबोलीचा वाचकवर्ग आपल्या कलेचं नक्कीच कौतुक करेल, यात शंका नाही.
या स्पर्धेत सहभागी होऊन आपण आमच्या अंकाची शोभा वाढवाल, ही आशा!!!
स्पर्धेचे नियम :
१. मुखपृष्ठाची संकल्पना 'महाराष्ट्र' या अंकाच्या संकल्पनेला सुसंगत, तसेच सुवर्णमहोत्सव-दिवाळी या मंगलप्रसंगांना शोभेशी असावी. उद्योग-अर्थ-राजकारणापासून कला-क्रीडा-साहित्यासह महाराष्ट्राचे विविधांगी पैलू, महाराष्ट्राची संस्कृती, समाज, मराठी भाषा यांची झलक त्यातून दिसल्यास उत्तम! अर्थात, स्पर्धक आपापल्या पसंतीनुसार यांची व्याप्ती सीमित ठेवू शकतात किंवा यातील एखाद्याच पैलूला लक्षून मुखपृष्ठ बनवू शकतात.
२. मुखपृष्ठाकरता स्पर्धकांना माध्यमाचे स्वातंत्र्य आहे. स्पर्धक आपापल्या आवडीनुसार रंग, रेखाटन, प्रकाशचित्रे, सुलेखन इत्यादी माध्यमे वापरू शकतात.
३. प्रवेशिकेच्या चित्राभोवती घन (सॉलिड) रंगाची बारीक कड ठेवून द्यावी (शक्यतो पांढर्या रंगात किंवा चित्रातील पार्श्वभूमीला मिळत्या-जुळत्या सॉलिड रंगात). त्यायोगे मुखपृष्ठाच्या पानाचा पार्श्वरंग (बॅकग्राऊंड कलर) जुळवणे सोपे होते व भिन्न रिझोल्यूशनांच्या ब्राउझरांमध्येही मुखपृष्ठ नेटके दिसायला मदत होते. प्रवेशिका JPEG किंवा PNG फॉर्मॅटात पाठवाव्यात. अंतिम फायलीचे आकारमान १२० kB पेक्षा छोटे असावे.
४. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत ७ सप्टेंबर, २००९ ही आहे. मुखपृष्ठाच्या निवडीबाबत अंतिम अधिकार संपादक मंडळाचा राहील. निवडल्या गेलेल्या मुखपृष्ठात संपादक मंडळास थोडे बदल/फेरफार करून हवे असल्यास निवडल्या गेलेल्या मुखपृष्ठकाराची तसे बदल करून देण्याची तयारी हवी. मुखपृष्ठनिवडीचा अंतिम निर्णय दिवाळी अंक प्रसिद्ध होईपर्यंत जाहीर केला जाणार नाही.
५. प्रवेशिका पाठवताना त्यासोबत आपला मायबोली आयडी नमूद करणं बंधनकारक आहे.
६. आपली प्रवेशिका आपण संपादक मंडळाला sampadak@maayboli.com पत्त्यावर पाठवू शकता.
स्पर्धेविषयी/नियमांविषयी काही शंका असल्यास याच पत्त्यावर संपादक मंडळाशी संपर्क साधावा.
आपल्या उत्साहवर्धक सहभागाकरता, उत्तमोत्तम प्रवेशिकांकरता आम्ही आतुर आहोत. धन्यवाद!
आपले,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २००९
आपली मेल वाचून आनंद वाटला.
आपली मेल वाचून आनंद वाटला. जिंकण्या हरण्या साठी वा स्पर्धाम्हणून नव्हे पण स्वतःच्या मोजमापासाठी आणि मायबोलीला उत्तमातील उत्तम निवड करण्याकरिता अजून एक पर्याय उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आभारी आहे
.............अज्ञात
अंतिम फायलीचे आकारमान १२० kB
अंतिम फायलीचे आकारमान १२० kB पेक्षा छोटे असावे.
उभा आडवा (लांबी-रुंदी) पिक्सेल मध्ये किती असावी, सांगाल का?
चाऊ, ८०० x ६०० पिक्सेल
चाऊ, ८०० x ६०० पिक्सेल रिझोल्यूशनाच्या पडद्यावरील इंटरनेट एक्स्प्लोरराचं पान व्यापेल इतपत चित्राचे आकारमान असावे. अर्थातच यापेक्षा अधिक रिझोल्यूशनाच्या पडद्यांवर मुखपृष्ठ आपोआपच मावू शकेल. उदाहरणादाखल : गतवर्षीच्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ ७६७ x ५४३ पिक्सेल एवढे होते. ८०० x ६०० पिक्सेल रिझोल्यूशनाच्या पडद्यावरील इंटरनेट एक्स्प्लोरराच्या चौकटीचे स्क्रोलबार वगळून जो दृश्यमान भाग उरतो, तो साधारणतः त्या चित्राच्या पिक्सेल-आकारमानाएवढा असेल.
मुखपृष्ठ स्पर्धेसाठी
मुखपृष्ठ स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर, २००९पर्यंत वाढवण्यात आली आहे.
आपल्या भरघोस प्रतिसादाची अपेक्षा !!!