डायरी..तीची-२

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ऑगस्ट

शाळेत जाताना पाऊस पडतो हल्ली. मी छत्री रेनकोट घेऊन नाही जात. मी पटापट रस्त्यावरच्या दुकानांच्या शेडखालून जाते. अधेमधे रस्ता ओलांडत असताना पळत पळत जाते. हमालवाड्यातून जाताना मात्र अजिबात शेड मिळत नाही मग लक्ष्मी रस्त्यावरुनच जाते. करोनाचं चप्पलच मोठ्ठ दुकान आहे एका कोपर्‍यावर. त्या दुकानाची मज्जा म्हणजे कोपर्‍यावर असल्याने दोन्ही बाजूला दार आहे मधे एक खांब आहे. मी सरळ या दारातून आत जाते आणि दुसर्‍या बाजूने बाहेर. त्या दुकानातले लोक काही मला ओरडत नाहीत.
--
पावसामुळे मला आणि नीताला मधल्या सुट्टीत मैदानावर फिरायला जाता येत नाही. मग आम्ही वर्गाबाहेरच्या गॅलरीत उभं राहतो. पाऊस बघत. शाळेत सगळ्या मुली मस्त मस्त रंगाच्या वॉटरबॅग घेऊन येतात. त्यांच्या वॉटरबॅगेतनं त्या दुसर्‍या कुणाला पाणी प्यायला देत नाहीत. माझ्याकडे वॉटरबॅग नाहीये. मी मागितली नाही बाबांकडे. मला काही मागायचं म्हणजे जरा विचित्र वाटतं. मी मधल्या सुट्टीत थोडसं भिजायला लागलं तरी खाली नळावर जाऊन पाणी पिते.
---
गणपती आलेत. आमच्या घरी गणपती आहेत आणि उभ्या गौरी. आईला गणपती पहायला जायचं असतं, मला पण.. बाकी बाबा गणपती पहायला जातात की नाही कोण जाणे. ते कधी कधी सिल्कचा सलवार झब्बा वगैरे असा भारी ड्रेस घालून जातात कुठे कुठे.. आम्ही घरातले कुणी नाही जात त्यांच्याबरोबर. मी नाही माझी बहीण पण नाही. आईबाबा एकत्र कधीच कुठे जात नाहीत.

मी आईबरोबर गणपती पहायला गेले. आई फार भरभर चालते. एका ठीकाणी गर्दीत आई दिसेनाशी झाली. मी पळतपळत आईला पुढच्या गणपतीपाशी गाठलं. आई माझा दंड तिच्या खरखरीत हाताने दाबून धरते, दुखेल इतका, जवळजवळ फरफटतच मला नेते. ती नेहमीच असं करते. तीला कधीच निवांत वेळ नसतो. कुठेही जायचं असलं की ती अशीच मला फरफटत नेते. मी पाय दुखायला लागल्यावर कटकट करते.. आई चिडते..मी रडते..
--
लक्ष्मी रस्त्यावरुन जाताना सगळ्यात मस्त मज्जा म्हणजे फूटपाथवरच्या विक्रेत्यांकडच्या वस्तू बघणे. काल मी एका चप्पलवाल्याच्या शेजारच्या माणसाकडे वस्तू पहात होते. चप्पल घेणार्‍या एका माणसाने मला हाक मारली.
"माझी पण मुलगी हिच्या एवढीच आहे हीच्या मापाची द्या चप्पल.." मी माझी चप्पल काढून नवी चप्पल घालून पाहीली.. मस्तच .
--
मी घरी गेले की मी माझा माझा अभ्यास करते. आईबाबा कधी अभ्यास घेत नाहीत. ते म्हणतात की आम्ही नाई शिकलो... तुला शाळेत कशाला घातलंय.. बाईंना विचार..असंच कायतरी . मी शेजारपाजारी, शाळेत कुणाकुणाला विचारुन कायतरी अभ्यास करते.
--

--काल्पनिक--

विषय: 
प्रकार: 

किती निरागस...सह्हीच!... लिहा पुढे. Happy
________________________________________
प्रकाश

मीनू छान लिहीत आहेस ग. भाग जरा मोठे मोठे टाक ना.

काल्पनिक जरी असलं तरी वाईट वाटलं वाचुनं....
बिच्चारी , आईवडिलांच्या दुराव्याच्या जात्यात भरडली जातेयं.........

सगळ्यांच्याच प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. सध्या वेळाची मारामारी आहे वेळ होईल तसं लिहीतेय पण पुढचा भाग मोठा टाकायचा नक्की प्रयत्न करेन.

एका सामान्य मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातल्या मुलीची डायरी कशी असेल असं लिहायचा प्रयत्न करतेय. आत्मचरीत्र नाही आणि काही शिकवायचा /संदेश द्यायचाही प्रयत्न नाही फक्त जे घडलं ते त्या त्या वयात तिच्या नजरेतून तिने कसं बघितलं तसं लिहावं असा विचार आहे