दंवबिंदूंचे झाले ओझे....

Submitted by arun_lele on 6 January, 2008 - 06:24

बीज एकले खाली जमिनी
ग्रीष्म ताप तो सहन करूनी
सृजन कळा सोसे ही अवनी
दिवस संपती रात्री सरोनी
दीर्घ प्रतिक्षा अशी संपुनी
गर्जत घन ते येता दुरूनी

कुशीत दडले सान सोनुले
काळ्या माती मधे झोपले
हळूच जागे करी तुषार
हलके वाटे उतरुनी भार
अंकुर बीजातूनी आले
उत्सुकतेने पाहू लागले
वरती डोकावूनी पाहिले
रंग सभवती कसे बदलले
मित्र सभवती कसे बैसले
हिरवी मखमल हिरवे शेले
हिरवा शालू लेवून सजले

जीव चिमुकला वाटे भीती
बघू पाहता अजूनी वरती
हिरवी शेते हिरवी धरती
हिरवी गवते हिरवी पाती
रंग छटा या किती बहरती

कुणी पांघरी पिवळी शाल
हाती धरली लाल मशाल
निळी पागोटी निळ्या डोंगरी
रंगांशी गुजगोष्टी करी
मोत्यांचे सर कुणी ल्यायले
हिरे पाचूही डोईस धरले

गंमत चाले पानांची
चाहुल घेता पायांची
अचपळ कैसा येई हाता
थरथर काया हलवू जाता

शुभ्र ओढुनि वरती साज
लाल तुमान ही चढ्वी आज
पारिजात हा दिसे देखणा
सौंदर्य तुझे रे खुले साजणा

गर्भ रेशमी सोनसळी ग
सुंदर दिसते चाफेकळी ग
लाल गुलाबी पिवळा ग
गर्द केशरी गुलाब ग
सूर्यफुलाला दिशा न उमगे
शेवंतीला पडले कोडे
कोण आगांतुक पसरे शेला
उत्सुक सारे पहावयाला

सूर्यबिंब ते प्राची दिसता
सरे प्रति़क्षा वाट संपता
हा तर दिनमणी पूर्व उदेला
सवंगडी रे मित्र आपला
इंद्रधनूशी डाव ही रंगे
येता खेळा अपुल्या संगे
आता दिसतो आता लपतो
डाव रडीचा मधे सोडतो

वनराणीने पहाट होता
भेट दिला त्या मोती कंठा
ऐटीत स्वारी मनी हरकली
चोहीकडे मग पाहू लागली
एक क्षणी तो बिलगुन जाई
तसा अवतरे क्षणात येई
तुषार संगीत सुरेल वाजे
दंवबिंदूंचे झाले ओझे.........

-------- अरुण लेले

गुलमोहर: 

सुंदर! दवबिंदू, इंद्रधनू आणि हिरवे शेले.. श्रीमंत आहे बरं तुमची कविता.

गोड कविता ,
नावामुळे वाचावि वाट्ली आणि आवडली