दार

Submitted by mayurlankeshwar on 3 January, 2008 - 23:29

नाही वाटंत असं आजकाल की
घटनांच्या काळ्यापांढर्‍या कागदावर
उमटवून द्यायलाच हवेत शब्दांचे
शतरंगी शिक्के...
'आहे हे असं आहे' असंच मानून चालायचं
तर मग बसतीलच कसे
अपेक्षाभंगाचे अनपेक्षित धक्के?

आपण आपलं एक स्थितप्रज्ञ दार व्हावं
कोसळलेल्या भिंतींमधलं...
म्हणजे कसं होईल की
'नसलेल्या घरात अमुक अमुक दिशेनेच
पाऊल टाकायला हवं' ह्या परंपरेतून
सुटका होईल नसलेल्या घरात येणार्‍यांची
आणि नसलेल्या घरातून बाहेर जाणार्‍यांची...
तरीही तोपर्यंत मोक्ष मिळाल्याचा दावा करू नये आपण
जोपर्यंत कोणी बांधत नाही दाराला
एखाद्या कवितेचं तोरण!
--मयूर.

गुलमोहर: 

तोरण झकास लागलय दाराला Happy
हॅपी न्यु ईयर!

मयूर...
बर्‍याच दिवसांनी लिहीलंस?
आवडली (आणि कळली Wink ) कविता मला....

'नसलेल्या घरात अमुक अमुक दिशेनेच
पाऊल टाकायला हवं' ह्या परंपरेतून
सुटका होईल नसलेल्या घरात येणार्‍यांची
आणि नसलेल्या घरातून बाहेर जाणार्‍यांची...

आवडल्या ह्या ओळी!..
लिहीत रहा...

मयूर, मला जितकी कळली तितकी आवडली... तरीही तुझं स्वत:चं ह्या कवितेवरचं "भाष्य" ऐकायला आवडेल.
(अमुक अमुक दिशेने.... संदर्भ कळला नाहीये.)
तरीही...
स्थितप्रज्ञ दार...
सुंदर.

मयूर सुरवात छान झाली पण पुढे मोक्ष आणि कवितेचं तोरण.. नाही कळलं रे.

मेघा

सुंदर, आगळ वेगळ मजा आली.